सातपुड्यातील लोकउत्सव – बहिरम यात्रा

1
326

बहिरमची यात्रा म्हणजे दोन राज्यांतील हिंदी व मराठी भाषिक लोकांमधील सांस्कृतिक संगम आहे ! यात्रा मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवर भरते. सलग दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी यात्रा म्हणून बहिरमच्या यात्रेचा लौकिक सर्वदूर आहे. यात्रेला पौराणिक महात्म्य आहे. बहिरम (भैरवनाथ) हे बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. यात्रेत देवदर्शनासोबत अध्यात्म, चित्रपट, मनोरंजन, महाप्रसाद, खाद्य संस्कृती, महिला मेळावा, कीर्तन, प्रदर्शन, पशुविक्री, कृषी साहित्य अशी सर्व गोष्टींची रेलचेल राहते.

तीर्थक्षेत्र कारंजा बहिरम हे गाव वसलेले आहे चांदुर बाजार तालुक्यात. यात्रेवर प्रभाव आहे अचलपूर परिसराचा. ते अमरावती शहरापासून उत्तरेस परतवाडा-बैतुल मार्गावर पासष्ट किलोमीटर अंतरावर येते. वऱ्हाड प्रांताच्या अचलपूर परिसरात वाकाटक, राष्ट्रकूट व यादव या राजवंशांचे राज्य होते. त्यांतील वाकाटक व राष्ट्रकूट हे राजवंश भगवान शंकराचे भक्त होते. बहिरम देवस्थान परिसरात असलेल्या भांडे तलावानजीक असलेले प्राचीन शिवलिंग ही त्या इतिहासाची साक्ष देते. अमरावती जिल्ह्यातील कौडिंण्यपूरचा संदर्भसुद्धा बहिरमशी जोडला जातो. भगवान श्रीकृष्ण व कौडिंण्यपूर राजा रुख्मी यांच्या दरम्यान युद्ध झाले होते. तेव्हा बलराम यांच्या सैन्यात गवळ्यांचा समावेश होता. ते सैनिक म्हणजेच गवळी वऱ्हाडात थांबले. ते गवळी बांधव बहिरम डोंगराच्या पायथ्याशी हेटी करून राहू लागले. त्या हेटीचे गवळ्यांच्या गावात रूपांतर झाले ! त्या तीर्थस्थळावर बहिरमबुवाची म्हणजेच भैरवाची भव्यदिव्य मूर्ती बघण्यास मिळते.

असे सांगतात, की फार पूर्वी भैरवनाथाच्या मूर्तीसमोर सुपारी ठेवली जाई. गवळ्यांचे वास्तव्य असल्याने दुधदुभते भरपूर. ते गवळी लोक त्यांच्या दैवताला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या घरचे लोणी आणि त्यासोबत शेंदूर सुपारीला लावत. ती परंपरा होऊन गेली होती. पंचक्रोशीतील ग्रामस्थसुद्धा त्यांच्या घरी असलेल्या पशूंच्या जननानंतर पहिल्या बारा दिवसांचे दुग्धजन्य पदार्थ देवाला अर्पण करत. लोणी व शेंदूर यांच्यामुळे सुपारीएवढा देव वाढीस लागून त्या मूर्तीने महाकाय स्वरूप धारण केले आहे ! त्याच परिसरात सुंदर व मनमोहक श्रीगणेशाची प्राचीन मूर्ती बघण्यास मिळते.

बहिरम देवस्थानच्या प्रवेशद्वारावरील नाद (घंटा) व नंदी हे अनेकांचे आकर्षण आहे. तो नाद पंचधातूने बनलेला दोनशेचाळीस किलो वजनाचा आहे. खारतळेगाव येथील बळीराम मारोडकर (सराफ) यांनी तो देवस्थानला अर्पण केला. तो नाद 30 नोव्हेंबर 1957 रोजी भारत सरकारचे कृषी व सहकारमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या हस्ते लावण्यात आला. नंदीची मूर्ती आकर्षक व भारदस्त बहिरमबुवांच्या समोर आहे. नंदी पलासखेडी येथील जिवंत नंदीची प्रतिकृती असल्याची दंतकथा आदिवासींकडून ऐकण्यास मिळते. बहिरमबुवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना तब्बल एकशेआठ पायऱ्या चढाव्या लागत. पण शेजारी रस्ता बनल्याने गाडीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. बहिरमच्या एकशेआठ पायऱ्यांवर अपंग गरीब व भिकारी बसतात. अधिक भिक्षा मिळावी म्हणून काही लोक स्वतःला मातीत गाडून केवळ चेहरा दिसेल असे नानाविध प्रयोग करत असतात. लोकांना आकर्षित करणे हा हेतू असे. परिणाम म्हणजे दान बहिरमच्या भिकाऱ्यांना करावे असे नवससुद्धा अनेक भाविक बोलत. हे प्रकार कमी झाले आहेत.

बहिरमची यात्रा सुरुवातीला वर्षातून दोनदा भरत असे, ती केवळ दहा दिवस. पहिली कार्तिक पौर्णिमेला व दुसरी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला. कालातंराने, मुहूर्तावरील यात्रा ही तारखेवर आली. यात्रेची सुरुवात वर्षातून एकदा, 20 डिसेंबरला विधिवत पूजेने होते. ती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते. गूळ, रेवडी, लाह्या, फुटाणे व नारळ हा बहिरमबुवाचा आवडीचा प्रसाद. त्यासह लोणी व शेंदूर हा विशेष मान. भाविक त्याची श्रद्धा अर्पण करताना आलू-वांग्याची भाजी व रोड्ग्याचा नैवेद्य चढवतात. गवळी बांधवांसह आदिवासींचेसुद्धा बहिरम हे श्रद्धास्थान आहे. आदिवासी बांधव बहिरमबुवाला ‘गुळ-भाकरचा नैवेद्य चढवतात. बोकड अर्पण करून त्याचा बळी देण्याची प्रथा होती. देवाला मुक्या प्राण्यांचे रक्त व मांसाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत असल्याने प्राण्यांच्या रक्ताचा पूर एकशेआठ पायऱ्यांवर दिसत असे. एवढे रक्त वाहत असतानादेखील एक माशीसुद्धा तेथे दिसत नाही अशी नोंद इंग्रजी गॅझेटियरमध्ये नमूद आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांचीसुद्धा या यात्रेत रेलचेल राहायची. शंकरराव चंद्रभानजी चौधरी यांची चंचई (चंची) (बटवा) ब्रिटिशकाळात परिचित होती. बहिरमची यात्रा पानसुपारीवर सुरू होई. ती प्रथा 1938 पर्यंतची. शंकरराव चौधरी यांच्या निधनानंतर यात्रेचे नियोजन ‘जनपद’ने सांभाळले. पण नियोजनाचा अभाव होता. पंचायत समिती 1962 मध्ये अस्तिवात आल्यानंतर, यात्रेचे पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडे नियोजन गेले.

तीन ‘ख’ने अमरावती जिल्ह्याचा कायापालट झाला. त्यामध्ये संत गाडगेबाबा यांचा ‘खराटा’, संत तुकडोजी महाराज यांची ‘खंजेरी’ व पंजाबराव देशमुख यांचा ‘खडू’. बहिरमसुद्धा त्याला अपवाद ठरले नाही. गाडगेबाबांचा परीसस्पर्श या यात्रेला होईस्तोवर बहिरमच्या सर्व पायऱ्यांवर रक्ताचे पाट वाहत. गाडगेबाबांच्या ‘गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा’ या नाममंत्राने व संत तुकडोजी महाराज यांच्या खंजेरीने जादू केली. या दोन्ही प्रबोधनकारांनी त्यांच्या कीर्तनाद्वारे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व यात्रेकरू यांच्या मनातील अंधश्रद्धेचे मळभ दूर केले. देव नवसाला पावत नाही, देवाच्या नावाने मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका. ‘बाप्पा हो ! दगडधोंड्यांचे देव नवसाला पावत नाहीत अन् नवसानं पोरंही होत नाहीत.’ या वाणीमुळे लोकांचे मनपरिवर्तन झाले. बहिरमाला प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा बंद झाली. दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात त्याच काळात पंजाबरावांनी शिवाजी शिक्षण संस्थेचे रोपटे लावले होते. त्यामुळे लोक शिक्षित होऊन शहाणी बनू लागली.

भावसिंग राजाने त्याच्या भक्तीसामर्थ्याने काशीतील पवित्र गंगामातेला बहिरम येथे आणले अशी कथा आहे. भावसिंग यांच्या वास्तव्याच्या खाणाखुणा तेथे बघण्यास मिळतात. भावसिंग राजाच्या राजवाड्याचे अवशेष, काळ्या दगडातील जाते, पायवा, ओटा आदींच्या स्वरूपात आहेत. काशी तलावाच्या चारही बाजूंना उंबराचे व पळसाचे मोठमोठे वृक्ष आहेत. त्या परिसरात नैसर्गिक सीताफळाची बनेही बघण्यास मिळतात. गणपती मंदिराच्या मागील बाजूस तलाव आहे. भाविकांना स्वयंपाकासाठी भांड्यांची गरज लागल्यास त्या तलावास भक्तिभावे आवाहन करावे. तसे केल्यास तलावाच्या पाण्यावर भांडी तरंगतात अशी आख्यायिका आहे. म्हणून त्या तलावाला ‘भांडे तलाव’ असे नाव पडले, म्हणे !

वास्तव असे, की बहिरमची यात्रा म्हणजे ग्रामीण भागातील सुपर मार्केट किंवा मॉल ! कारण तेथे बैलबाजार, घोडेबाजार, रेड्यांचा बाजार भरत असे. यात्रेतील बैलबाजार हा विदर्भात नावाजलेला. मुगलाई, नागोर, इंदूर, माळवा या प्रदेशांतील जातींसह अन्य महाराष्ट्रीयन व मध्य प्रदेशातील बैलांच्या जाती तेथे मिळत. यात्रेत हेले व गौळाऊ गोऱ्हे विकण्यास 1975 पर्यंत येत. त्या बैलांची रवानगी भंडारा जिल्ह्यात अधिक होई. बैल, हेले, गोऱ्हे बहिरमबाबांच्या नावाने मंदिरावर सोडणारे भक्तही होते. घोडे यात्रेत विक्रीस 1968 पर्यंत यायचे. पन्नास-साठ उंच, धिप्पाड घोडे उपलब्ध असत. पाकिस्तानमधील बलुची लोक घोडे विक्रीसाठी आणत. नव्या काळात घोडे विक्रीसाठी येत नसले तरी घोड्यांचा साज, खोगीर, जीन, रिकीब, लगाम, बेत (चामड्याची वस्तू ज्याच्या सहाय्याने प्राण्याला फटके मारले जातात) या यात्रेत उपलब्ध असतात. ती यात्रा शेतकऱ्यांची म्हणूनच प्रसिद्ध आहे. बैलांचा साज यात्रेत सहज उपलब्ध होतो. झुला, साखळ्या, गोंडे, हस्तिदंती, कवड्यांचे मनके, घंट्या, घुंगरू असा सर्व साज. ते साहित्य दिवसेंदिवस परिसरातील शहरांत उपलब्ध होत असल्याने त्याची दुकाने यात्रेत येणे बंद होत आहे. बैलबंडी, जुवाडी, चाकडा, रेंगी, भोंडछकड, गावराणी काड्या, घाटर (म्हशीच्या गळ्यात बांधली जाणारी घंटी) असे बरेचसे साहित्य मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातून येई. कापूस मोजण्यासाठी लागणारी ‘हातदंडी’ हे यात्रेतील आकर्षण असे. ती लाकडाची ‘हातदंडी’ पाच-सहा रुपयांना मिळे. शेतकरी त्यांचा कापूस ‘हातदंडी’ने मोजत. यात्रेकरू बैलबंडीने येत. त्यांचा मुक्काम पाच-सहा दिवस असे. बाजारात उत्तम दर्ज्याचे शेणखतसुद्धा मिळे. शेतीच्या कामासाठी ताळ(ड)पत्री, सतरंजी, चादर अशी दुकाने सजत. अचलपूर येथील हातमागावर विणलेल्या थैलीला यात्रेत विशेष मागणी असे. यात्रेतून बैलबंडी, छकडे, रेंगी, दमणी, जुवाडी, चाकजोडी हद्दपार झाली आहेत.

शेतकऱ्यांची यात्रा असे ‘ग्लॅमर’ असल्यामुळे कापसाला भाव मिळावा म्हणून बहिरम येथे मोठे आंदोलन 24 जानेवारी 1975 रोजी झाले होते. वीस हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता. ते आंदोलन पेटल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून गोळीबार केला ! नानासाहेब चौधरी यांच्या पुढाकाराने तेथे 1971 मध्ये संत मेळावा भरला होता. विदर्भातील मोठमोठे संत व त्यांचे अनुयायी या मेळाव्यात सहभागी झाले होते. गोरेगावचे पुंडलिक बाबा, बोरगावचे परसराम बाबा, अचलपूरचे सूरदास महाराज, परतवाड्याचे गुलाबबाबा, राजाकिनीच्या सकुबाई, अकोल्याचे अनंत महाराज अशी संतांची मांदियाळी येथे जमली होती. त्याकरता संत नगरी येथे उभारण्यात आली होती. त्या दरम्यान पाऊस पडल्याने यात्रेत मुक्कामी अनेकांच्या चुलीही पेटल्या नाहीत. तेव्हा अन्नदानीतील ज्वारीच्या कण्या व भाजीचा प्रसाद उपस्थितांनी ग्रहण केला. त्याच दरम्यान भारत -बांगलादेश-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. तेव्हा त्यात भारताचा विजय होईल असे भाकित त्या संतानी व्यक्त केले. अन दुसऱ्या दिवशी भारताच्या विजयाचे वृत्त आले ! तशी घोषणा कारंजा बहिरमचे सुरेंद्र पाटील चौधरी व इतर मान्यवर यांनी उपस्थितांना दिली.

बहिरम यात्रा दीर्घकाळ चालते, त्यामुळे येणारे यात्रेकरू मुक्कामी असत. शेतकऱ्यांच्या राहुट्या (कापडी तंबू) असत. तो काळ 1950 चा. त्यानंतर इतरांच्याही राहुट्यांचे प्रमाण वाढले. अजून ती प्रथा आहे. राहुट्यांमध्ये अनेक व्यवहार होतात.

यात्रेत मध्य प्रदेशातील मातीची भांडी प्रसिद्ध आहेत. यात्रेनंतर उन्हाळा लागत असल्याने तेथील रंगीबेरंगी मटके व माठ यांना विशेष मागणी राहते. बैतुल येथील मातीच्या ‘चिलम’ला यात्रेकरूंची मोठी ‘डिमांड’ असे. यात्रेत मातीची भांडी अधिक असल्याने अनेक मंडळी मातीच्या हंडीत मटन शिजवतात. म्हणून बहिरमचे हंडीचे मटन प्रसिद्ध आहे. त्या नावाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली आहे ! हंडीची अंडाकरीही उपलब्ध आहे. चाळीस-पन्नास मांसाहारी खानावळी यात्रेत असतात. चुलीवरची गरमागरम भाकर हे आकर्षण असतेच. काही खवय्ये मित्रपरिवारासह राहुटीमध्ये शाकाहारी किंवा मांसाहारी भोजनाचे आयोजन करतात. बहिरमच्या रोड्ग्याच्या जेवणासाठी लोक शनिवार-रविवारी कोसो दूर अंतर पार करून बहिरमला येतात.

बहिरम यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे तेथील टुरिंग टॉकिज. मनोरंजनासाठी पूर्वी तेथे नाटके होत. त्यानंतर टुरिंग टॉकिजचा काळ आला. घरोघरी ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध असले तरी बहिरममध्ये टुरिंग टॉकिजचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. चित्रपट ज्या दिवशी मार्केटमध्ये ‘रिलीज’ होई त्याच दिवशी तो बहिरममध्ये पण झळके. टुरिंग टॉकिजचा प्रेक्षकवर्ग ग्रामीण व त्यातही आदिवासी समाजाचा. त्यामुळे तेथे मिथुन चक्रवर्तीचा चाहता वर्ग मोठा असे. अद्यापही मिथुनचे चित्रपट तेथे हाऊसफुल्ल भरतात. नाटकांसह सोबतीला पुरुषांचे तमाशे होत. महिलांचे तमाशे 1940-45 नंतर भरवले जाऊ लागले. शेतकऱ्यांच्या यात्रेत कलेलासुद्धा मान होता ! दोन हजारपर्यंत महिलांचे तमाशे होत. 2000 सालानंतर तमाशे बदनाम होत गेले. आमदार बच्चू कडू यांनी त्या विरूद्ध पुढाकार घेतला. तमाशे बंद झाले. स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद यांनी विविधांगी प्रयोग करत बहिरम यात्रेचे स्वरूप पालटले.

बहिरम ही व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची जत्रा म्हणून इंग्रजांच्या काळात ओळखली जाई. ब्रिटिश अधिकारी वीस-पंचवीस दिवस संपूर्ण ऑफिस आणि लवाजमा यांसह तेथे असत. पुढे, तहसील व कोर्टही तेथेच भरू लागले. लोक त्यांची शासकीय कामे तेथे पूर्ण करून घेत. अलिकडे यात्रेकरूंना सांस्कृतिक मेजवानी 2000 पासून मिळू लागली. सुरेखा ठाकरे या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी यात्रेत नवचैतन्य आणले. तेथे लावणी महोत्सव, संगीत रजनी, वऱ्हाडी झटका, मराठी कवी संमेलन, कृषी मेळावा, संत्रा परिषद, सरपंच मेळावा, पशु प्रदर्शनी, महिला मेळावा असे कार्यक्रम होऊ लागले. आमदार बच्चू कडू यांनी ‘प्रशासन आपल्या दारी’ ही मोहीम तेथे राबवली. जिल्हा परिषदेनेसुद्धा काही कालावधीसाठी तसे प्रयोग केले. पारंपरिक स्वरूपाची ऐतिहासिक यात्रा पर्यटन करण्यासाठी प्रसिद्ध होत आहे. डोंगर-पर्वत रांगेत वसलेल्या बहिरमच्या कुशीतील ही यात्रा शनिवार-रविवारचा पिकनिक स्पॉट होत आहे. यात्रेत सर्व यात्रेकरूंची तहान भागवणारी सात मनकर्णा विहीर खंडार होण्याच्या मार्गावर आहे. या यात्रेला गतवैभव मिळू शकेल?

श्रीनाथ वानखडे 9422036700 / 9890097000  shrinathwankhade@gmail.com

शिरजगाव कसबा ता.चांदूर बाजार जि.अमरावती.

—————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here