सविनय कायदेभंग आणि पंढरपूरातील अनुष्ठान

महात्माजींनी चालू केलेली कायदेभंगाची चळवळ, त्यांचा सत्याग्रह यशस्वी व्हावा म्हणून पंढरपूरातील ब्रह्मवृंदाने जाहीर अनुष्ठानास सुरुवात केली! ते अनुष्ठान साम्राज्यशाहीच्या रोषाची पर्वा न करता पंढरपूरमधील दत्तघाटावर पार पडले. गांधीजींची ती चळवळ सर्वसामान्य माणसाला किती त्याची स्वत:ची वाटत होती, याचे हे उत्तम उदाहरण! हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशी घटना तो पावेतो घडली नसावी…

सविनय कायदेभंगाची चळवळ महाराष्ट्रात जोरात चाललेली होती. त्या चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्य हाकेच्या अंतरावर आलेले आहे असे सर्वांना भासत होते. प्रत्येकजण त्याच्या परीने त्या चळवळीला हातभार लावण्याचा प्रयत्न करत होता. महात्माजी मिठाचा सत्याग्रह 6 एप्रिल 1930 रोजी करणार होते. ती पर्वणी साधत सोलापूरच्या युवक संघाने सोलापूरच्या म्युनिसिपालिटीवर राष्ट्रीय निशाण फडकावले. राजकीय सभा, निषेध मिरवणुका यांनी जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. परदेशी कपड्यांची होळी, बेकायदा तयार केलेल्या मिठाची विक्री गावागावांत होत होती. युवक संघाने खेड्यापाड्यांत सभा घेत राष्ट्रीय निशाण फडकावण्याचा धडाका लावलेला होता. कायदेभंगाच्या चळवळीचा सूर असा टिपेला लागला होता. तेव्हा पंढरपूरात आगळेच नाट्य घडत होते. महात्माजींनी चालू केलेली कायदेभंगाची चळवळ, त्यांचा सत्याग्रह यशस्वी व्हावा म्हणून पंढरपूरातील ब्रह्मवृंदाने जाहीर अनुष्ठानास सुरुवात केली! अनुष्ठान म्हणजे कार्यसिद्धीसाठी धार्मिक असे पूजापाठ-स्तोत्र-मंत्रादी जपजाप्य करणे. ते अनुष्ठान पंढरपूरमधील दत्तघाटावर साम्राज्यशाहीच्या उरावर पार पाडले गेले. त्यासाठी चंद्रशेखर भटजी, शंकर भटजी, धडे गुरुजी व गोरे भटजी यांनी पुढाकार घेतला होता. ते चौघेही वेदशास्त्रसंपन्न गुरुजी होते. गांधीजींची चळवळ सामान्यातील सामान्य माणसाला त्याची किती वाटत होती, याचे यापेक्षा वेगळे उदाहरण सापडणार नाही! साम्राज्यशाहीच्या रोषाची पर्वा न करता पंढरपूरमधील ब्रह्मवृंदाने अनुष्ठान पार पाडले. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशी घटना तो पावेतो घडली नसावी.

गांधीजींना त्यांनी चालवलेल्या चळवळीला यश यावे म्हणून कोणी अनुष्ठान करत असेल याची कल्पना असण्याची शक्यता नव्हती. पण सामान्य माणसाला ती चळवळ अशी त्याची स्वत:ची वाटत होती. त्या साऱ्याचे बक्षीस त्या ब्रह्मवृंदाला तरी काय मिळणार होते? झाला तर त्यांच्यावर सरकारी रोषच! पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. त्या ब्रह्मवृंदाची नावेदेखील कोणाच्या स्मरणात नाहीत. स्वातंत्र्याचे रोपटे वाढले, तरारले ते अशा निरपेक्ष त्यागावर!

भारतीय संस्कृतीची तीच गंमत आहे. तेथील जनता संमिश्र आणि सरमिसळ आहे. कट्टर धार्मिक व अध्यात्मवादी आणि तितकेच आग्रही पुरोगामी व भौतिकवादी असे सर्व लोक येथे एकत्र नांदतात. त्यामुळे त्यांचे पुढारी आणि अनुयायी यांच्यामध्ये संगती असेलच असे नव्हे. स्वातंत्र्यकारण सर्वांना मान्य झाले होते. पुढाऱ्यांपैकी टिळक व गांधी हे धर्मकारणात खूप गुंतलेले नव्हते. मात्र टिळक, गोखले व गांधी हे तिघे परमेश्वराचे अस्तित्व मानत होते. टिळक स्वतः ज्योतिष विद्येचे मोठे अभ्यासक होते! त्यांनी ग्रह, नक्षत्रे यांची कठीण गणिते सहजतेने अभ्यासली होती. तरी त्यांनी चळवळीच्या राजकारणात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना मुहूर्त वा शकुन-अपशकुनास महत्त्व दिले नाही. तसेच, गांधीजींनीही कधी कोणती गोष्ट मुहूर्तावर केली नाही. टिळक व गांधी यांनी त्यांच्या राजकीय जीवनात कर्मकांडाचा आधार घेतला नाही. त्या उलट असे सांगितले जाते, की नामदार गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना अगदी कुंडली मांडून केली होती!

– अनिरुद्ध बिडवे 9423333912 bidweanirudha@gmail.com

———————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. Kalachya padadya aad geleli tasech ya upakramabaddal lokana dnyat nasaleli mahiti aapan dnyat karun dili tyabaddhal dhayawad.Aapalya ya sanshodhanabaddhal abhinandan.Yapudhehi asich navin navin mahiti wachawayas milo hi apeksha..Abhinandan.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here