श्रीमद्भागवत – परमसत्याच्या अनुभूतीसाठी !

2
451

‘श्रीमद्भागवत महापुराण’ ही रचना महर्षी वेदव्यास यांची आहे. अन्न-वस्त्र-निवारा या लौकिक गरजांपलीकडे मानवी जीवनाचे उद्दिष्ट आहे, ते म्हणजे परमसत्याचा शोध. त्याचा एक मार्ग म्हणजे विष्णुदेवतेच्या लीलांचे वर्णन ऐकणे. तेच भागवत ग्रंथाचे सार आहे. त्यात भक्ती, ज्ञान, वैराग्य व ध्यानयोग यांचे विवेचन केले गेले आहे. त्यामुळे त्यास भक्तिशास्त्राचा ग्रंथ असेही म्हणतात…

भागवत सप्ताह हा एक धार्मिक सोहळा मानला जातो. प्रत्यक्षात त्या सोहळ्यामध्ये श्री विष्णूच्या अवतार कथा आणि त्यामागील विचार-तत्त्वज्ञान कथन केले जाते. ते निरुपण ‘श्रीमद्भागवत’ या ग्रंथाआधारे केले जाते. वास्तवात ते महापुराण आहे. ती ग्रंथ रचना महर्षी वेदव्यास यांची आहे. त्या ग्रंथनिर्मितीमागील कथाही रोचक आहे. महर्षी वेदव्यास यांनी महाभारत, अठरा पुराणे हे ग्रंथ रचले, तरीही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांचे मन अशांत होते. त्यांची भेट तशा मनस्थितीत ब्रह्मर्षी नारद यांच्याशी झाली. त्यांनी व्यासांना उपदेश केला, की “तुम्ही धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचे वर्णन केले, पण तुम्ही वासुदेवाच्या महिम्याचे-निर्मल यशाचे वर्णन, गुणगान केलेले नाही. त्यामुळे तुमचे मन अशांत आहे. तसे केल्यास परमात्मा संतुष्ट होईल. लक्षात घ्या, की ज्ञान हे भक्तिद्वारा सुशोभित होते. तुम्ही भगवंतांच्या लीलांचे स्मरण समाधीद्वारा करावे व तशी ग्रंथरचना करावी. त्यात भगवंतांचा महिमा, त्यांचे गुणगान आणि त्यांच्या लीला म्हणजेच प्रख्यात यश यांचे वर्णन असावे, भक्तिभाव असावा. त्यामुळे विद्वानांची जिज्ञासा पूर्ण होईल व सांसारिक दु:खाने पीडित असलेल्यांस शांती मिळेल. सर्व जिवांना मुक्ती लाभेल.”

नारदमुनी यांनी व्यास यांना चार श्लोकांमधील (चतु:श्लोकी) भागवताचा उपदेश केला. व्यासमुनी समाधीत गेले. त्यांनी त्या अवस्थेत ‘ईशभक्ती हाच सर्व अनर्थाचा उपाय’ असल्याचे जाणले आणि त्यानंतर अठरा हजार श्लोकांची ‘भागवत’ संहिता रचली. आख्यायिका अशी आहे, की श्रीगणेशाने ती संहिता लिहून घेतली व ग्रंथबद्ध केली. अशा प्रकारे, चतु:श्लोकी भागवतापासून अठरा हजार श्लोकांचा ग्रंथ तयार झाला.

व्यासांनी तो ग्रंथ लोककल्याणासाठी रचला आहे. तो भारतीय संस्कृतीतील एक महान ग्रंथ आहे. ते महापुराण म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातील सर्व सिद्धांतांचे सार आहे – त्यात वेदान्त, सांख्य योग, पुराणे, शास्त्रे यांचेही निरूपण आहे. त्यात भक्ती, ज्ञान, वैराग्य व ध्यानयोग या अध्यात्मासाठी उपयुक्त साधनांचे विवेचन विस्तृतपणे केले आहे. त्यात भक्तिमार्गास श्रेष्ठ साधन मानले आहे. त्यामुळे त्यास भक्तिशास्त्राचा ग्रंथ असेही म्हणतात. तो ग्रंथ वैष्णवांना प्रिय आहे. वैष्णव त्यास पंचमवेद मानतात. ‘भागवता’त ब्रह्मज्ञानावर, अध्यात्मावर चर्चा ठिकठिकाणी आहे. त्यामुळे त्यास अध्यात्मदीप ब्रह्मसंहिता किंवा ‘परमहंस संहिता’ असेही संबोधतात.

श्रीमद्भागवताचे महात्म्य या महापुराणाच्या आरंभी सांगितले आहे. त्यानुसार, भागवताचा एक श्लोक जरी म्हटला तरीही अठ्ठावीस पुराणे वाचल्याचे फळ किंवा पुण्य मिळते. तसेच, भागवताचा एक श्लोक किंवा अर्धा श्लोक वा चरण ज्याच्या घरात लिहिलेला असेल त्याच्या घरात श्री हरीचे वास्तव्य असते. भागवताचे श्रवण, पठण व कथन कलीच्या प्रभावातून, सर्व पापांतून, दु:खांतून मुक्ती करते. ते करणाऱ्या व्यक्तीस आयुष्य, आरोग्य यांची समृद्धी व पुरुषार्थ यांची प्राप्ती होते आणि अंती, मुक्ती मिळते ! म्हणून त्यास मुक्ती ग्रंथ असेसुद्धा म्हणतात.

भागवत कथेनुसार, श्रीकृष्ण भगवान त्यांचे इहलोकीचे कार्य संपवून धर्म, ज्ञान इत्यादींसहित स्वधामास जाण्यास निघाले, तेव्हा उद्धवाने त्यांना प्रश्न केला, की कलीयुगाच्या प्रभावाने अधर्म वाढेल, सज्जनसुद्धा उदंड होतील. तेव्हा धर्म कोणाला शरण जाईल? भगवंतांनी त्यांचे तेज त्या प्रश्नावर लोककल्याणासाठी एकवटले आणि ते भागवतात विलीन केले व अंतर्धान पावले. अशा रीतीने, एका पुराणरूपी सूर्याचा पृथ्वीवरील अज्ञानरूपी अंध:कार नष्ट करण्यासाठी उदय झाला. त्यामुळे श्रीमद्भागवत ग्रंथास ते श्रीकृष्णाचे वाङ्मयस्वरूप आहे असे मानतात. भागवत ग्रंथाचे बारा स्कंध (खंड) ही भगवंताची बारा अंगे आहेत.

भागवत पुराणाचे श्रेष्ठत्व -1. श्रीमद्भागवत महापुराणात निष्काम अशा श्रेष्ठ धर्माचे वर्णन आहे. तो धर्म परम कल्याणकारी असून आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तापत्रयाचे निर्मूलन करतो, 2. ते भागवत: प्रोक्त आहे. म्हणजे नारायणाने तो धर्म प्रथम संक्षेपात सांगितला व महर्षी व्यास यांनी त्याचा विस्तार केला, 3. भागवत ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय परब्रह्म, परमात्मा- त्याची सगुण रूपे व अवतार असा आहे. भागवताच्या कथा सर्व अशुभ संस्कारांचा नाश करतात व अंती भक्तास मोक्षाची प्राप्ती होते. भागवत हे जिवंतपणीच मोक्ष देणारे शास्त्र आहे, 4. ते सर्व वेद, वेदान्त दर्शने, इतिहास, पुराणे, शास्त्रे यांचे सार आहे. ते भक्तिज्ञान व वैराग्य यांची प्राप्ती करते, 5. ते वेदरूपी वृक्षाचे परिपक्व असे फळ असून त्यात अमृतासमान अपूर्व रस आहे. त्याच्या सेवनाने आनंद मिळतो आणि भय व दु:ख यांची निवृत्ती होते, 6. त्यांतील सर्वजण भागवत धर्माचे अधिकारी आहेत. ते ज्ञान सर्वसमावेशक व समन्वयकारी आहे, 7. त्या पुराणात सर्वत्र अध्यात्मविषयक ज्ञान आहे. त्यामुळे त्यास ‘अध्यात्मदीप’ व ‘परमहंस संहिता’ असे म्हणतात.

श्रीमद्भागवत ग्रंथाची परंपरा – भागवत ग्रंथाची रचना प्रथम श्री विष्णूंनी करून ते ब्रह्मास चतु:श्लोकी रूपात भागवत सांगितले. सृष्टिरचनेचे कार्य सुरळीत होण्यास मदत हा त्यामागे विष्णूचा हेतू होता. ब्रह्माने त्यांचे मानसपुत्र नारदमुनी यांना ते निरूपण केले. नारदांनी व्यासांस आणि व्यास यांनी त्यांच्या शुक या पुत्रास भागवत पुराण कथन केले. शुक परम अधिकारी होता. शुकदेवांनी ते राजा परीक्षित यांना सात दिवस सतत कथन केले. परीक्षित यांस सात दिवसांत मृत्यू येणार असा शाप होता. त्यास ते कथन श्रवण केल्याने मुक्ती मिळाली ! त्या सभेत श्रीसुत हेसुद्धा हजर होते. श्रीसुत हे व्याख्याते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी ते ज्ञान ग्रहण करून प्रथम शौनकादी ऋषींना नैमिषारण्यात सांगितले आणि शेवटी, ते ग्रंथाकार घेऊन सर्वसामान्य जनांपर्यंत पोचले.

दुसरी परंपरा अशी आहे, की भागवत हे आदिनारायणाने भगवान शेषास कथन केले. त्याने सनतकुमारांस, सनतकुमारांनी पराशर मुनींस, पराशरमुनींनी ते मैत्रेय ऋषींस आणि मैत्रेयांनी ते विदुरास कथन केले.

श्रीमद्भागवताचे स्वरूप – श्रीमद्भागवत हे महापुराण असून त्यात अठरा हजार श्लोक, बारा स्कंध आणि तीनशेपस्तीस अध्याय आहेत.

त्या ग्रंथाच्या सुरुवातीस, शौनकादी ऋषींनी श्रीसुतास सहा सर्वोत्कृष्ट प्रश्न विचारले आहेत. ते असे – 1. शास्त्रांचे सार काय आहे? 2. अत्यंत कल्याणप्रद किंवा श्रेय काय आहे? 3. श्रेयाचे साधन कोणते? 4. भगवंतांच्या अवतारांचे प्रयोजन काय? 5. भगवंतांनी कोणकोणते अवतार घेतले? 6. जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वधामास गेले तेव्हा धर्म कोणाला शरण गेला?

तसेच प्रश्न परीक्षितानेसुद्धा शुकदेवास विचारले; उद्धवाने श्रीकृष्णास विचारले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे श्रीमद्भागवत हा ग्रंथ ! भारतीय प्राचीन परंपरेप्रमाणे त्या ग्रंथातसुद्धा अध्यात्म, तत्त्वज्ञान, सनातन धर्म, सत्य हे विषय कथासंवाद, व्याख्यान, स्तुती, उपदेश, मार्गदर्शन इत्यादींद्वारा प्रकट केले आहेत. प्रत्येक स्कंधाचा विषय वेगवेगळा आहे. ते महापुराण असल्याने त्याची दहा लक्षणे आहेत, म्हणजेच दहा प्रतिपाद्य विषय आहेत. ते असे – 1. सर्ग, 2. विसर्ग, 3.स्थान, 4. पोषण, 5. ऊति, 6. मन्वंतरकथा,7. इशानुकथा, 8. निरोध, 9. मुक्ती आणि 10. आश्रय. (भागवत 2 .10.1). दहावे लक्षण आश्रय म्हणजे परब्रह्म परमात्मा हे प्रधान प्रतिपाद्य तत्त्व असून त्याचा विशुद्ध अर्थ निश्चित करण्याकरता पहिली, एक ते दहा अशी लक्षणे (तत्त्वे) आहेत.

भागवत धर्म – भागवत ग्रंथाचा एकादश स्कंध हा गीतेसमान आहे. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात भागवताचे सार किंवा संदेश आहे. नारदाने भागवत धर्माचे निरूपण त्याच्या दुसऱ्या अध्यायात केले आहे. ते नीमी राजा व नवयोगेश्वर यांच्यातील संवादाच्या रूपाने आहे. भागवत धर्म म्हणजे साधकास भगवद्प्राप्ती सुलभतेने होण्यासाठी भगवंतांनी स्वत: सांगितलेले उपाय (भागवत 11.2.34). ते अज्ञ जनांच्या उद्धारासाठी आहेत. त्याचे थोडक्यात वर्णन-

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा             बुद्ध्या ऽ ऽ त्मना वानुसृतस्वभावात्

करोति यद् यत् सकलं परस्मै          नारायणायेति समर्पयेत्तत्

अर्थ – माणूस शरीर, वाणी, मन, बुद्धी, अहंकार व इंद्रिये आणि स्वभाव यांनुसार जी जी कर्मे करतो ती सर्व परमात्म्यास अर्पण करणे (म्हणजे भागवत धर्माचे अनुसरण करणे) होय. माणसास स्वस्वरूपाची विस्मृती मायेच्या प्रभावामुळे झाली आहे. त्यामुळे तो ईश्वरास विन्मुख झाला आहे. त्यासाठी सत्संग, गुरूचा आश्रय, सेवा व अनन्य भक्ती यांनी ईश्वराचे भजन, कल्याणकारी जन्मकथांचे श्रवण, गान करावे व इतर कोठेही आसक्ती न ठेवल्यास त्यास श्री हरीच्या प्रती अनुराग व प्रेम उत्पन्न होते. तो प्रभूचे शरीर वा प्रकट रूप सर्व जगात आहे असे समजतो, सर्वांविषयी आदर- प्रेम ठेवतो तोच परम भागवत होय. त्यास भगवंताचा अनुभव येऊन त्यास परमशांती प्राप्त होते.

अशाच प्रकारचा उपदेश उद्धवगीतेतील एकोणतिसाव्या अध्यायात आहे. उद्धव श्रीकृष्णास विचारतो, की असे कोठले सरळ व सुगम साधन आहे, की ज्यायोगे मनुष्य परमपदास प्राप्त होईल? श्रीकृष्ण त्यास भागवत धर्माचा उपदेश करतात. “भक्तांनी सर्व कर्मे माझ्यासाठी करावी. जेथे भगवंताचे भक्त राहतात तेथे निवास करावा व त्यांचे अनुकरण करावे. माझ्या सर्व पर्वांचा नृत्यगीत, अभिनय इत्यादींनी महोत्सव करावा. जो सर्व प्राण्यांत समभाव ठेवतो व माझे दर्शन सर्वांभूती करतो तो खरा ज्ञानी. त्याचे सर्व दोष (ईर्षा, स्पर्धा, तिरस्कार, अहंकार इत्यादी) नाहीसे होतात व त्यास सर्वत्र ब्रह्मदर्शन घडते. तोच भागवत धर्म आहे.” श्रीकृष्ण पुढे सांगतात, की तेच ब्रह्मविद्येचे रहस्य आहे. ते देवांनाही दुर्लभ आहे. ते ज्ञान भाविकांना देणाऱ्यास मोक्ष आणि श्रवण करणाऱ्यास पराभक्तीची प्राप्ती होऊन मुक्ती मिळते. ते ज्ञान झाल्यावर जाणण्यासारखे काहीही शिल्लक (अवशिष्ट) राहत नाही. (भागवत 11.29.32) जेव्हा मनुष्य सर्व कर्मत्याग करून आत्मसमर्पण करतो तेव्हा त्यास अमृतस्वरूप मोक्षाची प्राप्ती होते. तो माझ्यात विलीन होऊन माझ्या स्वरूपास प्राप्त होतो ! उद्धवगीता या नावाने कोणताही भाग-विभाग – ग्रंथ नाही. परंतु भागवत ग्रंथात अकराव्या खंडात सात ते एकोणतीस या अध्यायांत श्रीकृष्णाने उद्धवास उपदेश केला आहे. त्यात मानवरुपी जगण्याचे विविध मार्ग व त्याबरोबर तत्त्वज्ञान येते. त्यामुळे त्या भागाचा उल्लेख उद्धवगीता असा सर्वसाधारण भक्तमंडळी करतात.

भागवताच्या सहाव्या स्कंधात विष्णुदूतांनी भागवत धर्म प्रतिपादन केला आहे. भगवद् नामाचा महिमा सांगितला आहे. त्यानुसार कोठल्याही पापाचे प्रायश्चित्त भगवंताचे नामस्मरण हेच आहे. अजामिळ याच्यासारख्या महापातकी मनुष्यास ‘नारायण’ या विष्णुनामाच्या उच्चारणाने विष्णुलोकाची प्राप्ती झाली.

समापन – ‘सर्वसमावेशकता व समन्वय’ ही काळाची गरज आहे. श्रीकृष्णांनी उद्धव गीतेच्या रूपाने श्रीमद् भागवत ग्रंथात जगाला शेवटचा अमूल्य संदेश दिला आहे. (स्कंध अकरा, अध्याय सात ते एकोणतीस). त्यांत भारतीय तत्त्वज्ञानाच्या दर्शनांचा, वैदिक ग्रंथांचा, इतिहास-पुराणे-अनेक संप्रदाय-पंथ ह्यांचा समन्वय आणि समावेश आहे. तसेच, त्यात ज्या भागवत धर्माचे प्रतिपादन आहे तो वैश्विक (युनिव्हर्सल) आहे. त्यात जातपात, वर्ण, वंश, लिंग, उच्च-नीच असा कोठलाही भेदभाव नाही. सर्वजण समान अधिकारी आहेत. तो धर्म सर्वसमावेशक असल्याने महाराष्ट्रातील संतश्रेष्ठींनी भागवत धर्माचा अंगीकार व प्रसार केला. भागवत धर्म अजूनही प्रचलित आहे; पूजेनंतर आरतीमध्ये ‘कायेन वाचा मनसेन्द्रियैवा…’ हा श्लोक आहे. तो भागवत पुराणातील अकराव्या स्कंधातील दुसऱ्या अध्यायातील आहे. भागवत (ग्रंथातील) धर्म आणि त्यातील तत्त्वज्ञान जर श्रद्धेने आचरणात आणले तर समाजात आपसात मैत्री, प्रेम, करुणा, बंधुभाव, सहयोग, सहिष्णुता इत्यादी निर्माण होऊन जीवन सहज, सुलभ, सुंदर, संपन्न आणि सार्थ होईल. मनुष्यास प्रपंच आणि परमार्थ यांत समन्वय साधता येईल. सर्वसामान्य जीवन हे अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा भागवल्यावर समाधान मानणे असे आहे. परंतु त्या पलीकडेही परमोच्च अशी एक जीवनावस्था आहे. त्यामध्ये परमात्म्याची म्हणजे परमसत्याची अनुभूती व शाश्वत आनंद आहे. वेदव्यास यांच्या मते, भागवत पुराणाच्या अभ्यासाने मनुष्य परमसत्याचा साक्षात्कार व अनुभूती करून घेऊ शकतो. म्हणूनच, त्यांनी भागवत ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरणात जन्मादस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्व भिज्ञ : स्वरा…… सत्यं परं धीमहि  (भागवत १.१.१ ) (ज्याच्यापासून जगताची निर्मिती, स्थिती व संहार होतो. जो सर्वानुभूती विद्यमान आहे अशा परम सत्याचे आम्ही ध्यान करतो असे म्हटले आहे.)

संदर्भ –

1.    श्रीमन्महर्षी कृष्ण द्वैपायन प्रणीतं श्रीधरस्वामी विरचित भावार्थदीपिका संवलित (संस्कृत व हिंदी), श्रीमद्भागवत महापुराणम्, भाग प्रथम से नवम, सम्पादक व्याख्याकार  – आचार्य शिवप्रसाद द्विवेदी, चौखम्बा सुरभारती प्रकाशन, वाराणसी

2.    श्रीमद्भागवतान्तर्गत, एकादश स्कन्ध (सटीक), गीता प्रेस, हिंदी अनुवादक – स्वामी अखण्डानंद सरस्वती

3.    महर्षी वेदव्यासविरचित श्रीमद्भागवत सार, सरस्वती बुक कंपनी, पुणे, प्रकाशक – रमेश कुंदूर, आदर्शविश्व प्रकाशन

4. भागवतामृत (परमपूज्य डोंगरे महाराजांच्या श्रीमद्भागवतावरीलप्रवचनांचे सार), हरिभक्त परायण रामदासबुवा पोटे, महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर

5. श्रीमद्भागवत संक्षेप – हसुमती मेहता, प्रकाशक – संघवी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई.

 

 मिता मोहन शेणॉय 9892399497 prof.mashenoy@gmail.com

——————————————————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

  1. श्रीमद्भागवत या ग्रंथावरील अतिशय उद्बोधक लेख

  2. अतिशय सुंदर लेख. यातून लेखिकेचा भागवताचा व्यासंग दिसतोय.रसाळ व सोप्या शैलीत भागवताचे नेमके वर्म विशद केले आहे. भागवत पुराणाचे महत्व सर्वसामन्यांपर्यंत पोहचविण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. लेखा सोबत काढलेले श्रीकृष्णाचे चित्र ही अप्रतिम आहे.भागवता वरचा हा सुंदर लेख प्रसिद्ध केल्या बद्दल थींक महाराष्ट्र चे मनःपूर्वक आभार. भविष्यात लेखिके कडून भागवता वरिल उत्तमोत्तम लेख वाचायला मिळतील अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here