शेणींचा करूड

0
42
-heading

गावाकडील बाया दसरा झाला, की शेणाच्या गवऱ्या थापण्यास घेतात. गुरेढोरे शेतात बांधण्यासही त्या दिवसांत सुरुवात होते. काहीजण गुरांचे, गाई-म्हशींचे शेण काढताना गवऱ्यांसाठी शेण एका ठिकाणी गोळा करून ठेवतात. घरची बाई तेथे येऊन ऊन चटकायच्या आधी गवऱ्या थापण्यास लागते. फाल्गुन किंवा चैत्र महिन्यापर्यंत जमलेल्या गवऱ्यांसाठी करूड लिंपतात. लग्नतिथी पाहून करूड रचण्याचा मुहूर्त शोधतात. करूडाखाली लहानमोठ्या दगडांची व लाकडांची चळत अंथरतात. त्यावर गवऱ्या रचतात. आरंभी, पाच गवऱ्यांची पूजा हळदकुंकू टाकून केली जाते. पूजा करतेवेळी ज्वारीची आख्खी भाकर व गवऱ्यांवर उलटी वहाण (चामडी चप्पल) ठेवतात. रचलेल्या गवऱ्यांच्या ढिगाला शेणाने सगळीकडून लिंपून घेतात. करूड बरसात लागण्याच्या आत बारीकसे भोसके पाडून फोडावा लागतो. तो नाही फोडल्यास पाऊस लवकर पडत नाही अशी समजूत आहे. करूड पावसाच्या पाण्याने भिजू नये म्हणून त्याच्यावर इरले टाकतात. पूर्वी इरल्यासाठी एरंडाचा त्रिशंकू टोप तयार केला जात असे. त्यावर उसाची पाचट व पळाट्या उभ्या करत. त्याकरता रायमुनीच्या बंधाट्या वापरून ते बळकट बांधण्यासाठी केकट्याची हिरवी पाने चिरून बंध तयार करतात. त्यानंतर सोपटाचा उपयोग केला जात असे. त्यासाठी चिंचेच्या बारीक फांद्यांचासुद्धा उपयोग केला जातो. अलीकडे, तारांचाही वापर केला जातो. इरले तयार झाल्यावर चार-पाच गडीमाणसे उचलून ते करूडावर ठेवतात. दोन माणसे उचलू शकतील इतके ते वजनाने हलके नसते.

गावोगावी गुरेढोरे कमी झाली आहेत. त्यामुळे शेण दुर्मीळ होत आहे. शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. मकापिकाचे उत्पन्न वाढल्याने चुलीत जाळण्यास लेंढरे उपयोगात येऊ लागली आहेत. घरोघरी गॅसही पोचला आहे. तरीही गोवऱ्याच्या व सरपणाच्या आहारावर खमंग शेकलेल्या भाकरीची चव गॅसवरील भाकरीत नाही, त्यामुळे, गोवऱ्या व त्यांची साठवण यांबाबतच्या आठवणी येत राहतात.

बुलडाण्यात ‘करूड’ला ‘कलवड’ असेही म्हणतात. त्यालाच धाराशिव-लातूर जिल्ह्यांत ‘उडवा’ किंवा ‘हुडवा’ म्हणतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात ‘यिरोळं’ म्हणतात. त्याला गोवरी/शेणकुटे असेही म्हणतात. मुले पूर्वी होळी आली, की ‘उडवा’ फोडायचे आणि गोवऱ्या पळवायचे. गोवऱ्याची राख मंजन, भांडी घासणे, लहान रोपांच्या बुडाला शितळाई राहवी म्हणूनही वापरतात.
तुकाराम महाराजांच्या अभंगात त्याचा उल्लेख आढळतो.

आवा चालली पंढरपुरा 
वेशीपासून आली घरा 
मजहातीचा कलवडू 
मजवाचुणी नको फोडू !

रमेश रावळकर 09403067824  rameshrawalkar@gmail.com

———————————————————————————————————

About Post Author

Previous articleचर्मवाद्ये
Next articleजन्मदत्त उदारमतवादी लक्ष्मण नारायण गोडबोले (Laxman Narayan Godbole)
डॉ. रमेश रावळकर अजिंठा येथील बाबुरावजी काळे महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांचे 'मातीवेणा', 'गावकळा' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी 'करंडा' या लोकसाहित्यावर आधारित 'स्री' गीतांच्या ग्रंथाचे संपादन केले आहे. त्यांना यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 94030 67824

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here