विजय कुलकर्णी यांचे अजिंठा वेड (Vijay Kulkarni Obsessed With Ajintha Art)

1
81

विजय कुलकर्णी अजिंठा लेण्यांतील चित्रे (कॉपी)गेली चाळीस वर्षें काढत आहेत. ती विविध कलादालनांमध्ये प्रदर्शित केली जात असतात. त्यांनी काढलेल्या त्या चित्रांना मोठी मागणी असते. त्यांचे त्यांच्या तरुणपणी काही अमूर्त चित्रांचे प्रदर्शन एम.एफ. हुसेन, प्रभाकर बरवे यांच्यासमवेत झाले होते. त्याच टप्प्यावर त्यांना अजिंठा येथे जाऊन चित्रे काढण्याची संधी लाभली. त्यांनी तेथे चाळीस दिवस मुक्काम करून अजिंठ्यातील जातककथांची चित्रे काढली आणि तेथून त्यांना अजिंठ्यातील चित्रांचे वेड लागले. आणि त्यांचा आयुष्यक्रम बदलून गेला. ते सांगतात, अजिंठा लेण्यांतील छतावर काढलेली चित्रे सर्वात अवघड आहेत. त्या कलाकारांना ती चित्रे झोपून काढावी लागली असणार. त्यांत अगदी हंससुद्धा चितारले गेले आहेत.

विजय कुलकर्णी यांची अजिंठा चित्रांसंबंधी मार्मिक निरीक्षणे आहेत. त्यांनी काढलेले अजिंठ्यातील पहिले चित्र जहाजाचे होते. त्या जहाजात बरीच माणसे बसल्याचे दिसते. त्या काळातील व्यापाराचा तो संदर्भ महत्त्वपूर्ण ठरू शकतो असे त्यांचे निरीक्षण आहे. तेथील चित्रांमध्ये कमळपाकळ्यांच्या आकारातील डोळे, हातांच्या बोटांची आणि नखांची विशिष्ट अशी ठेवण असल्याचे ते सांगतात. ते म्हणतात, काही चित्रे आपसूकच प्रेक्षकांशी बोलतात. फक्त त्यांच्याकडे बघावे कसे हे समजून घ्यायला हवे. एका चित्रात बासरी वाजवणारा पुरुष कलाकार आहे, तसेच महिला कलाकारही आहेत. त्या चित्रांचा आणि शिल्पांचा वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तसा तो केला जात आहेही.

विजय कुलकर्णी यांचा अजिंठा पेंटिग्ज हा श्वास बनून गेला आहे. त्यांचा जन्मच वेरूळ येथे झाला आहे. अजिंठा हे वेरूळपासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. त्यांचे वडील विष्णुपंत कुलकर्णी हे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील उपसंचालक  पदावरून निवृत्त झाले. त्यांना चित्रकलेचा छंद होता. वडिलांना चित्रकार होणे जमले नाही. म्हणून विजय यांनी त्यांच्या मनाशी चित्रकार बनण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना घरातून प्रोत्साहन मिळत गेले. त्यांनी चित्रकलेची पदवी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून 1972 साली मिळवली. तेथे त्यांचे गुरू होते प्रसिद्ध चित्रकार शंकर पळशीकर. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे विजय कुलकर्णी यांना अजिंठ्याच्या चित्रांच्या अजिंठा लेण्यांत बसून प्रतिकृती बनवण्याची संधी मिळाली. ती पेंटींग्ज महाराष्ट्र सरकारसाठी बनवायची होती. त्यावेळी त्यांच्यासोबत जे.जे.मधील त्यांच्याच वर्गातील दीपक शिंदे व शशांक शेखर घोष हेही दोघे होते.

           त्यांनी त्यांच्या तीन मित्रांसहित –  दीपक शिंदे, चंद्रादोशी सचदेव आणि शकुंतला मुर्डेश्वर – जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पहिला ग्रूप शो केला. त्यांनी त्यांचे वैयक्तिक चित्रप्रदर्शन 1973/74 मध्ये भरवले. त्यातील सर्व चित्रे पंडोल आर्ट गॅलरीचे मालक काली पंडोल यांनी विकत घेतली. त्यानंतर विजय कुलकर्णी यांच्या जीवनाला अजिंठ्याच्या चित्रांची कलाटणी मिळाली. त्यांच्या त्या चित्रांचा वन मॅन शो त्यांनी पुण्यातील इंडियन आर्ट गॅलरीचे मालक मिलिंद साठे यांच्या सहकार्याने केला, तोही खूप वर्षानंतर.

         

विजय कुलकर्णी म्हणतात, मी अजिंठा लेण्यांतील वास्तव्यामुळे आतून बाहेरून अजिंठामयझालो होतो. माझ्या मनात नेहमी एकच कुतूहल असे, की दोन हजार वर्षांपूर्वी एवढी सुंदर चित्रशैली कशी निर्माण झाली असेल! चित्रांमधील रंगसंगती, विशेषकरून इंडियन रेड, ब्राऊन सॅप सीन, यलो ऑकर, व्हाईट या रंगांतील एकत्रित परिणाम मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. त्यांनी अजिंठा चित्रांच्या वेडामुळे मुंबई सोडून औरंगाबादला कायमस्वरूपी राहणे पसंत केले आहे. त्यांनी एक एकर जागा घेऊन देशातील व परदेशांतील चित्रकारांना अजिंठा चित्रशैलीतील चित्रांचा अभ्यास करता यावा म्हणून निवासस्थान बांधले. त्याला रॉक आर्ट गॅलरी – अ रीट्रीट फॉर आर्टिस्ट सेंटर्स अँड थिंकर्स असे नाव दिले.

          त्यांचा कलाप्रवास अजिंठ्यामुळे संपन्न होऊन गेला आहे. ते चेन्नइच्या सारा अब्राहम या आर्ट कलेक्टरच्या कलायात्रानावाच्या ग्रूपमध्ये समाविष्ठ झाले. त्या ग्रूपमध्ये भारतातील एम.एफ हुसेन, विकास भट्टाचार्य, मीरा मुखर्जी, जतीन दास असे नामांकित आर्टिस्ट होते. त्यांच्यासोबत विजय कुलकर्णी यांची मुंबई, दिल्ली, कोलकाता, कोचीन, हैदराबाद आणि क्वालालंपूर येथे प्रदर्शने भरवण्यात आली. कुलकर्णी यांची पेंटिंग्ज अशा तऱ्हेने जगातील महत्त्वाच्या शहरांत विकली गेली.

कुलकर्णी पुढे औरंगाबाद शहरात स्थायिक झाले. औरंगाबादमध्ये त्यांची ताज विवांता आणि हॉटेल रामा इंटरनॅशनल या दोन्ही हॉटेलमध्ये अजिंठा आर्ट गॅलरी आहे. त्यामुळे त्यांची पेंटिंग्ज भारतीय आणि परदेशी पर्यटकांना नेहमीच पाहण्यासाठी उपलब्ध असतात. त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी सुलभा व दोन मुले विक्रांत आणि विराज आहेत. दोघेही मोठ्या नोकऱ्या करतात. कुलकर्णी यांचे अजिंठ्याचे वेड त्यांना कोठच्या कोठे घेऊन गेले आहे! त्यातील कलानंद तर अपारच आहे!
विजय कुलकर्णी – 99606 12430

नितेश शिंदे 9323343406
niteshshinde4u@gmail.com 

—————————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. सततचा चांगला व्यासंग .. छंद बनुन जीवनाचा एक भाग बनतो .. अतिशय बोलकी चित्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here