वसईच्या ख्रिस्ती समाजातील नावे/आडनावे (Christian Names and Surnames in Vasai)

 

वसईतील ख्रिस्ती समाज हा पोर्तुगीज राजवटीत धर्मांतरीत झाला.त्यांची नावे आणि आडनावे पोर्तुगीज धाटणीची. तेव्हाच्या धार्मिक पुरोहितांनी ती बाप्तिस्मा संस्कार करताना (नामविधी सोहळा) दिली. तेथील काही ख्रिस्ती घराण्यांतपूर्वाश्रमीची म्हात्रे, नाईक, पाटील ही नावे अलीकडच्या काळापर्यंत वापरली जात होती.

पोर्तुगीज, इटालियन नावे उच्चारायला कठीण होती. म्हणून तेथील मराठमोळ्या बाळबोध लोकांनी त्याचे अपभ्रंशदेखील केलेले जाणवतात. त्यामुळे पीटरला पेद्रु, आलेक्सला आलू,फिलिपला फिलू, सेबेस्टियनला बस्त्याव, फ्रान्सिसला फरशा (फरसू), डायगोला देगू,डोमणिकला दुमा, लॉरेन्सला लोर्‍या, जोसेफला झुज्या, थॉमसला तोम्या, गॅब्रीयलला गब्रू, अन्थोनीला अंतोन, जॉनला झ्याव, मॅथ्यूला मातेस, मोनिकाला मनी, मर्सियानाला मर्सी, सुजाणाला सिजू, कॅथरीनला कत्रिण, तेरेजाला तेरस, कार्मेलींनाला कार्मेल; अशा नावांनी पुकारले जात असे.

तीच गत आडनावांचीही झालेली जाणवते. रॉड्रिग्जचे लुद्रिक, तुस्कानोचे तुस्कान, फर्नाडिसचे फर्नाद, परेराचे पिरेल, डिमेलोचे दमेल, आल्मेडाचे दालमेत, डिसोजाचे सोज, डिसील्वाचे सील, डीपेन्हाचे पेन, मिनेजिसचे मिनेज, मार्टिनचे मर्ती, डिकुन्हाचे कून, लेमोसचे लेम, मच्याडोचे मशाद, गोन्साल्वीसचे घोसाळ, फोन्सेकाचे फोस, डायसचे दिस, लोपीसचे लोप, कर्वाल्होचे कर्वाल, डिकोस्टाचे कोस, तेलीसचे तेल, डायसचे दिस, कर्णेलोचे कर्नेल, फरेराचे फरेल, कोरियाचे कुरेल असे अपभ्रश झाले आहेत.

विशेष म्हणजे, सरकारी कागदोपत्री तशा नावा/आडनावांची नोंद झालेली आहे. जुन्या वसईत जी घराणी होती, त्यांच्या पोर्तुगीजांकडून आलेल्या आडनावांना विविध, विक्षिप्त नि मनोरंजक अर्थसुद्धा लाभले गेले आहेत-

अल्फान्सो : उच्चकुलीन

अल्बूकर्क : पांढरा ओकवृक्ष

अल्मेडा : पठार

अम्ब्रोज : सुगंध

अन्द्रादे  : पुरुष

बाप्तिस्टा : धुणे

बार्बोझ : झुडुपात वस्ती करणारा

बॅरेटो  :  माती

बेंजामिन : दक्षिणेकडचा

बोथेलो  : समुद्र गावात गोळा करणारा

कर्नेरो : मेंढी

कर्वाल्हो : ओकवृक्ष

सिरेजो : चेरीचे बोर

कोयलो : ससा

कोलासो : पालक-बंधू

कोरिया : चामडी पट्टा

डिकोस्टा : शेरा

कुटीन्हो : छोटा आश्रय

क्रास्टो :राजवाडा

डिक्रुज : क्रूस

डिकुणा : पाचर

डायस : दिवस

डिसोझा  : भाजी विक्रेता

डीनिज : पाठपुरावा

फलकाव  : ससाणा

फर्णाडिस : शूर गिर्यारोहक

फेराव : डंख

फरेरा : समुद्र

फोन्सेका  : झरा

फरगोस  : टोक असलेला

फुर्ट्याडो  : चोरलेला

गोम्स  :  पुरुष

ग्रासीयस : उमदा

लेमोस : उंच झाड

लेवीस  : प्रसिध्द युध्द

डिलीमा : फाइल

लोबो  : लांडगा

लोपीस  : लांडगा

लुईस : फ्रेंच सोन्याचे नाणे

मच्याडो : कुर्‍हाड

मार्टिन : रोमन युध्ददेवता

मस्कारनेस : छत्री

मतीयस : देवाची भेट

डिमेलो : काळा पक्षी

मेंडीस : सर्व श्रेय

मेंडोसा  : थंड पर्वत

मिनेजिस  : लढाऊ वृत्ती

मिस्किटा : मशीद

मिरांडा  : प्रेमळ

डीमोन्ती : डोंगर

मोन्तेरो  : शिकारी

मोरायस  : मल्बेरी झुडुपापाशी वस्ती करणारा

मुर्जेलो : काळा रंग

नाजरेथ : पहारा ठेवणारा

ओलीव्हरा : ओलीव वृक्ष

पेगडो  : गोंद

डीपेना : दगड

परेरा : शूर हृदयाचा

पिरेस : मिरची

पिंटो : कोंबडी

पो : माती

रिबेलो  : जमीन उतार

रेमेडिओस : उपाय

रिबेरो : नदीकाठी वस्ती करणारा

रोड्रिग्स : प्रसिध्द शक्ती

रोझारिओ : जपमाळ

डिसा : जमिनदाराचा चाकर

सेल्स  : खारट

डिसील्वा : जंगलात वस्ती करणारे

सोरायस  : लाल केसाचा

डिसोझा  : खारी दलदल

तेलीस : खोगीर वस्त्र

तुस्कानो  : इटलीच्या तुस्कानी गावचा

या नावा/आडनावांवरून व ती आडनावे धारण करणार्‍यांच्या स्वभाववैशिष्ट्यानुसार काही बोली वाक्प्रचार/म्हणी सुद्धा प्रचलित झाल्या. तू म्हणजे पेद्रुस’ (साधाभोळा)’, ’खाऊन पिऊन दालमेत’ (सुशेगात), पिरेल पिरेल, वईत (कुंपणात) खिरेल, बोंबा मारेल’. 

 

जोसेफ तुस्कानो 98200 77836 haiku_joe_123@yahoo.co.in

जोसेफ तुस्कानो हे विज्ञान लेखक आहेत. ते भारत पेट्रोलियम या राष्ट्रीय तेल कंपनीतून पश्चिम विभागाचे गुणवत्ता आश्वासन प्रबंधक म्हणून निवृत्त झाले. ते पर्यावरण आणि शिक्षण या संबंधित विषयांत कार्यरत आहेत. त्यांची विज्ञानातील नवे कोरे, विज्ञान आजचे आणि उद्याचे, आपले शास्त्रज्ञ, कुतूहलातून विज्ञान, ओळख पर्यावरणाची अशी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.   

—————————————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here