वसईचे तळाण – पक्षीप्रेमींचा आनंद (Bird Watchers Love Vasai’s Talan)

वसईचा तळाण भूभाग म्हणजे पक्षी निरीक्षकांना मोठी पर्वणी असते! तो उथळ पाणथळीचा मोठा भूभाग. वसईच्या रेल्वे लाईनच्या पूर्व-पश्चिम बाजूंला तसा बराच मोठा भाग आहे. तो भाग तेथे असलेल्या मिठागरांमुळे झालेला आहे.मिठागरात खाडीचे पाणी मीठ बनवण्यासाठी वाफ्यात घेण्यात येते. ते पाण्याचे बाष्पीभवन करण्यासाठी फिरवण्यात येते. छोटे मासे व इतर जीवजंतू त्या मोठमोठ्या वाफ्यांत असतात. शेकडोंच्या संख्येने पक्षी ते जीवजंतू व मासोळ्या खाण्यासाठी त्यात येतात. त्यांचे निरीक्षण करणे हा नेत्रदीपक अनुभव असतो!

 

बलई, पाणबुडके  (पाणकावळा), कोलदेव (स्थानिक नाव) हे पक्षी तर नेहमीच दिसतात. अनेक प्रकारचे पक्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला व शेवटी, हिवाळ्याच्या सुरुवातीला व शेवटी असे तळाणावर राज्य करत असतात. पक्षी जगाच्या काना-कोपऱ्यातून येतात. रोहित पक्षी (फ्लेमिंगो) शेकडोच्या संख्येने उन्हाळ्याच्या शेवटापासून पावसाळ्याच्या शेवटापर्यंत पाहणे हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.

अनेक पक्ष्यांचे दर्शन तळाणाच्या आजुबाजूच्या हिरवळीतदेखील होते. मिठागराचे पाण्याचे वाफे बदकांनी अर्धेअधिक भरलेले व त्यात मध्येच बसलेले बलई, कोळदेव, फ्लेमिंगो पाहणे हे आनंदाच्या ऊर्मी मनात उत्पन्न करणारे ठरते. तळाणात प्रवेश मात्र त्याच्या बांधांचा आडोसा घेत घेत करावा लागतो. कारण तो सारा प्रदेश घसरडा व पाणथळ असतो.

 

तळाणाच्या वाफ्यात एकटी दुकटी पाण्यावर तरंगणारी टिबुकली (शास्त्रीय नाव पोडीसीपीडीडी-ग्रीव) झटकन पाण्याखाली बुडी मारून दिसेनाशी होते. ती बदकासारखीच दिसते. ग्रामीण भाषेत तिला पाणबुडीसुद्धा म्हणतात! त्यांमध्ये काळ्या मानेची टिबुकली असे प्रकार आढळतात.

 

काळे पाणकावळे त्यांचे पंख शरीरापासून लांब पसरून ते सुकवत बांधावर बसलेले असतात. शास्त्रीय नाव फॅलेक्रोकोरॅसीडीकारमरण्ड. डारटर महाराष्ट्रात वर्षभर दिसतात. त्याच कुळातील सर्पपक्षी तळ्याच्या बाजूला असलेल्या एखाद्या वठलेल्या झाडाच्या फांदीवर बसलेला दिसतो. त्याला करोता तिरंदाज असेही म्हणतात. ते पक्षी भारत, बांगलादेश, पाकिस्तान या देशांत आढळतात. सर्पपक्षी पाहताना खर्‍याखुर्‍या सर्पाची आठवण येते. त्याची लांबसडक मान, ती वेळावून पाहणे हे बघत राहवेसे वाटते. ढोकरी आर्डीडी (रेटन, इग्रेट, बिटर्न शास्त्रीय नाव) हे पक्षी बांधाच्या आडोशाला बसून मासे टिपत असतात. कोळदेव तळाणावर उडताना त्यांचे उतरणे व उडणे विमानासारखे दिसते. कोरळ पाच-सातच्या कळपाने हिरवळीवर चरताना दिसतात. मध्येच चमचाही दहा-पंधरांच्या कळपाने दिसतो. चमचा थ्रेस्किऑर्नीथीडी कुळातील आहे. फ्लेमिंगो किंवा अग्निपंख फोनिकोप्टेरिडी कळपाने मान खाली पाण्यात घालून चरताना दिसतात. परंतु ते एका जागी उभे असताना पाहणे हा अनुभव नयनरम्य असतो. फ्लेमिंगोमध्ये लेसर फ्लेमिंगो म्हणून दुसरी छोटी जातसुद्धा असते.

मी बदकांच्या तीन-चारच जाती पाहिल्या आहेत. प्रत्यक्षात त्या बऱ्याच असतात, पण त्यांच्यातील साम्यामुळे मला त्या तीन-चारच ओळखता आल्या असतील. बदकांच्या जातीत अडई, बाड्डा, धनवर, वणकी शेकडोंच्या संख्येने तळाणात पाहण्यास मिळतात. एकदा मी तेथे नाकेर बदकसुद्धा पाहिले आहे. मी ते त्याच्या नाकावर असलेल्या ओबडधोबड उंचवट्यावरून ओळखले.

 

मला सगळ्यात आनंद झाला जेव्हा मी सारस पक्षी पाहिला. फार क्वचित तो तळाणात आला आहे. डोके व मानेचा वरील भाग लाल व राखी रंगाचा पाण्यात चालताना पाहणे अवर्णनीय आहे. वसई परिसरातील तळाणात साधारणपणे Little Cormorant (छोटा पाणकावळा), Gray Heron (राखी बगळा), Greater Flemingo (मोठा रोहित), Lesser Flemingo (छोटा रोहित), Asian Openbill (उघडचोच करकोचा),  Painted Stork (रंगीत करकोचा), Glossy Ibis (मोठा शराटी), Black Wing Stilt (शेकाट्या) Black Tailed Godwit (काळ्या शेपटीचा मालगुजा), Western Reef Egret (सागरी बगळा), Great Egret( मोठा बगळा),  Little Egret (लहान बगळा), Eurasion Speenbill (युरेशियन चमच्या), Indian Pond Heron (वंचक), Common Sandpiper (देशी तुतारी), Pied Avocet (उचाट) हे स्थलांतरित/स्थानिक पक्षी हंगामात जगण्यासाठी येत असतात.

 

स्थानिक आदिवासी लोकांचा डोळा त्या पक्ष्यांवर फार असतो. त्यांचा फासे लावून बदक व इतर पक्षी पकडून विकणे हा धंदा, ते पक्षी गळाला मासे लावूनसुद्धा पकडतात. भटकी कुत्रीसुद्धा पक्ष्यांवर डोळा ठेवून असतात. एकदा, मी संध्याकाळच्या सुमारास बांधाच्या आडोशाला बसलेला असताना, अचानक वाफ्यावर बदकांसहित सर्व पक्षीगण आवाज करत उडाले. म्हणून द्विनेत्री त्या बाजूला फिरवली तर दोन कुत्री वाफ्यात दिसली. मी ती काय करतात यावर नजर ठेवली, तर ती कुत्री पाण्यातून फक्त डोके वर ठेवून हळुहळू बदके बसलेल्या बाजूला जाताना पाहिली. बदके दोन-चार वेळा उडाली. परंतु अखेरीस एक कुत्रे तोंडात बदक धरून येताना दिसले. मी हळहळलो. परंतु काय करणार? जिवो जिवस्य जीवनम्! तर असे हे वसईचे तळाण पक्षीप्रेमींना आनंद देणारे आहे. विविधतेने नटलेले सृष्टीधन आहे.

छायाचित्रे सहाय्य –  रमेश शेणाई 9423354343

– रॉबिन अंड्राडीस

(स्वेद, दिवाळी 2013 उद्धृत, संपादित-संस्कारीत)

——————————–————————————————————–

 

 

 

 

 

 

 

 

 

 

———————————————————————————————————–

About Post Author

4 COMMENTS

  1. खुपच सुंदर छायाचित्रे नि त्यावरील लिखाण पण चार ओघवते कंटाळा न आणणारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here