लावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे

2
99
_Lavani_1.jpg

महाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे! मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी मिळाली नाही. कारण तमाशात सादर केली जाणारी लावणी म्हणजे कामोत्तेजक भावभावनांचे छचोर दर्शन असेच मानले गेले. तमाशा किंवा लावणी ही कला तिच्या अंगभूत लावण्यामुळे-सौंदर्यामुळे गावकुसाबाहेरून गावातील मंडळींना खुणावत राहिली. त्यामुळेच लावणीकला गावकुसाबाहेर राहूनही मृत पावली नाही. महाराष्ट्रातील इतर अनेक लोकनृत्ये त्यांचे स्वत्व पांढरपेशी कलांच्या प्रभावापुढे गमावत असताना लावणी मात्र तिचे अस्सल रांगडेपण टिकवून आहे. लावणीकलेला स्वतःचे स्वत्व टिकवणे शहरी संस्कृतीचा व कलांचा स्पर्श न झाल्यामुळे शक्य झाले आहे.

लावणी गेल्या दोन-तीन दशकांत मात्र पांढरपेशांचेही मनोरंजन करताना दिसत आहे. त्या कलेने अनेक बदल-स्थित्यंतरे पचवली आहेत. लावणी पेशवाईच्या अस्ताबरोबर संपली असे वाटत असतानाच, खोलवर घुसवली गेलेली ती कला जमिनीच्या आतून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने वर उन्मुक्तपणे फोफावलेली, बहरलेली जाणवते.

मराठी सारस्वताच्या गेल्या साडेसातशे वर्षांत संतांचे आणि पंतांचे साहित्य जसे टिकून राहिले तद्वत तंतांचे म्हणजे शाहिरांचे लावणीवाङ्मयही टिकून राहिले, कारण लावणी रचनाकारांनी लावणीमध्ये समाजमनाचा, समाजाच्या विशिष्ट भावनांचा वेध घेतला आहे.

लावणीचा अभ्यास प्रामुख्याने लावणीच्या संहितेच्या अंगाने झाला आहे. त्यामुळे लावणी म्हणजे काय, लावणीत हाताळले गेलेले विषय या अनुषंगाने लावणीवर चर्चा होत राहिली. परंतु तिच्या दृश्यरूपाबद्दल – सादरीकरणाबद्दल कमी लिहिले गेले. तसेच, लावणी हे तमाशातील गण-गवळण-बतावणी या शृंखलेतील एक अंग असल्यामुळे ‘तमाशातील एक उपांग’ एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून लावणीकडे बघितले गेले. लावणीचे जे स्वरूप सद्यकाळात बघायला मिळते, त्यातून ‘लावणी’ या शब्दाचा नेमका अर्थबोध होत नाही.

– व्युत्पत्तिकोशकार कृ.पां. कुलकर्णी यांनी लावणी म्हणजे एक प्रकारचे ग्राम्यगीत (A kind of rural erotic song) अशी ‘लावणी’ची व्याख्या केली आहे. त्यांनी ती व्याख्या करतानाच ग्राम्यता, शृंगारिकता व गेयता अशी लावणीची तीन प्रमुख लक्षणे सांगितली आहेत.

– अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी ‘जी हृदयाला चटका लावते ती लावणी’ असे म्हटले आहे.

– प्रसिद्ध साहित्यिक दुर्गा भागवत यांनी ‘शेतात लावणी करताना म्हटले जाणारे गीत ते लावणी’ अशी लावणीची व्याख्या केली आहे (‘लोकसाहित्याची रूपरेखा’). दुर्गा भागवत यांनी पुढे म्हटले, की लावणी करताना म्हटली जाणारी कृषिकर्मातील ती गीते गाण्याची प्रथा नंतर सार्वत्रिक पावली.

– समीक्षक म. वा. धोंड म्हणतात, ‘सर्वसामान्य जनांच्या मनोरंजनाकरता त्यांना रूचतील अशा लौकिक, पौराणिक वा आध्यात्मिक विषयांवर रचलेली, कडे व ढोलके यांच्या तालावर विशिष्ट ढंगाने म्हटलेली खटकेबाज व सफाईदार पद्यावर्तनी वा भृंगावर्तनी जातिरचना म्हणजे लावणी.’ (‘म‍ऱ्हाटी लावणी’)

– डॉ. प्रभाकर मांडे यांनी लावणीची व्याख्या केली आहे, की लावणी ही एक प्रकारची कविता, गाणे, चीज असून डफ, तुणतुणे, टाळ व दिमडी-ढोलके इत्यादी वाद्यांच्या जोडीने ते म्हटले जाते. लावणी हा गायनप्रकार प्रामुख्याने भावनात्मक संगीताचा असल्याने लावणी म्हणजे शृंगार-विरहाचा परिपोष करणारी बहुजनसमाजाच्या बोलीभाषेतील भावगीतिकाच होय.

– तमाशा परंपरेत लहानाचे मोठे झालेले नामदेव व्हटकर यांनीही लावणीची व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची ती व्याख्या अधिक सुसंगत आहे. ते लिहितात- ‘पूर्वीच्या काळातील गाणारा अशिक्षित कवी आपल्या साथीदारांच्या ताफ्यात बसून कशी रचना करत असेल, याचे चित्र डोळ्यांपुढे आणले, की ‘लावणी’ शब्द कोठून आला ते झटकन उमगते. ढोलकी किंवा तुणतुणे यांची बारीक साथ चालू आहे. शाहीर शून्यात बघत शब्द हुडकून आणून एकापुढे एक लावत आहे. घाट, माट, थाट अशी यमके ठेक्यात जुळून शब्दांची बरोबर लावण झाली, गाणे तालासुरात री ओढणा‍ऱ्यांनाही चांगले जमून ठाकठीक बसले, की मग ते पूर्ण झाले. अशा वेळी अमक्या विषयावरची लावण किंवा लावणी झाली का? असे विचारले जाई. म्हणूनच शब्दांच्या या लावणीवरूनच ‘लावणी’ हा शब्द आला असावा.’ (‘मराठीची लोककला-तमाशा’)

– काही मान्यवरांनी लवण म्हणजे सुंदर. तसेच लवण या शब्दाचा अर्थ मीठ असाही आहे. मिठाने जशी जेवणाची गोडी वाढते, तशी लावणीमुळे नृत्याची गोडी वाढते, म्हणून लवण या शब्दावरूनच ‘लावणी’ शब्द आल्याचाही निष्कर्ष काढला आहे.

– काहींनी आकर्षक शब्दांची सुभग मांडणी म्हणजे लावणी अशीही व्याख्या केली आहे.

या व्याख्यांव्यतिरिक्त लावणीची व्युत्पत्ती सांगण्याचा एक प्रयत्न ‘लावणी’ नृत्यातील एका विशिष्ट हालचालीवरूनही केला गेला आहे. लावणीतील नर्तकी ‘कंबर हलवी शंभर जागी लवून’ म्हणून ती लवणी म्हणजे लावणी अशी व्याख्या केली गेली आहे. लावणी या नृत्यप्रकाराच्या अशा विविध व्याख्या केल्या गेल्या असल्या, तरी ‘लावणी’ची एकच एक व्यवच्छेदक व्याख्या केली गेलेली नाही. वरील कोठल्याही व्याख्येतून लावणीचा उगम व विकास यांचा नेमका बोध होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभ्यासकांनी लावणीची व्याख्या करताना गेल्या साडेतीनशे वर्षांतील लावणीची परंपराच डोळ्यांसमोर ठेवलेली दिसते, पण लावणी हा शब्द थेट ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतही आढळतो. उपलब्ध असलेली सगळ्यात जुनी लावणी मन्मथ शिवलिंग यांची असून ती क‍ऱ्हाडच्या भवानीदेवीवर रचलेली आहे. तसेच ती चौदाव्या शतकातील आहे. म्हणजे लावणी हा शब्द अकराव्या शतकापासूनच प्रचलित होता.

महाराष्ट्रातील लावणी किंवा तमाशा यांचा मूळ स्रोत उत्तरेत असल्याचे म्हटले जाते. ते खरेही काही अंशी आहे. लावणी हा शब्द मराठी सारस्वतात पूर्वापार वापरात असला आणि लावण्या चौदाव्या शतकापासून लिहिल्या जात असल्या, तरी त्यात स्त्रीचे नृत्य हा प्रकार नव्हता. सुरुवातीला, लावणी रचणारे कवी किंवा शाहीर स्वतः डफाच्या साथीने लावणी जमावासमोर सादर करत असत. रामजोशी-होनाजी बाळा यांच्या काळातही लावणीगायन हे प्रामुख्याने त्या-त्या शाहिराने केले. कालांतराने, मोगलांचे आक्रमण महाराष्ट्रावर झाले, तेव्हा त्या सैन्याबरोबर त्यांचे मनोरंजन करण्यासाठी नर्तिकांचा वर्गही आला. त्या नर्तिका दिवाणखाना पद्धतीनुसार नाचून-गाऊन मुस्लिम सैन्याचे मनोरंजन करत. ते नाचगाणे महाराष्ट्रातील तत्कालीन कोल्हाटी-धनगर-मांग अशा फिरस्त्या असलेल्या जमातींनी पाहिले आणि आत्मसात केले. त्या समाजातील मंडळी तमाशा क्षेत्रात अधिक असण्यामागील कारण ते होय.

लावणीत सादर केले जाणारे स्त्रीनृत्य हे लावणीचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र त्या नृत्याची सुरुवात नेमकी कशी झाली हे अनुत्तरित आहे. लावणीनृत्यातील तत्कारांसारख्या पदन्यासावरून ते उत्तरेतील ‘कथक’ या शास्त्रीय नृत्यातून आले असावे असे जाणकारांचे मत आहे. मुस्लिम सैन्याबरोबर आलेल्या नृत्यांगना तशा प्रकारचे नृत्य करत असल्यामुळे ते काही अंशी खरेही आहे. परंतु पदन्यासातील तत्कार सोडला तर लावणीनृत्याचा उत्तरेकडील नृत्याशी काहीही संबंध नाही. उलट, महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या वाघ्या-मुरळी नृत्याशी लावणीनृत्याचा अधिक जवळचा संबंध आहे. वाघ्या-मुरळी नृत्यात मुरळी ज्याप्रमाणे कमरेत वाकतात किंवा हाताच्या मुद्रा करतात, त्याप्रमाणेच लावणीनर्तिका करतात.

महाराष्ट्रात समाजाच्या मनोरंजनासाठी म्हणून स्त्रीने नाचणे या प्रकारची कोठलीही कला अस्तित्वात नव्हती. तामिळनाडूमध्ये देवाच्या मनोरंजनासाठी देवदासी नाचत, त्यांच्या दासीअट्टमपासून भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याची निर्मिती झाली किंवा ओरिसातील मदिरांत देवदासी करत असलेल्या ‘महारी’ नृत्यातून प्रसिद्ध ओडिसी या शास्त्रीय नृत्याचा जन्म झाला. महाराष्ट्रात तसे झाले नाही. महाराष्ट्रात विविध देवदेवतांना स्त्रीपुरुष ‘सोडण्या’ची प्रथा होती. उदाहरणार्थ, रवळनाथाच्या भाविणी, खंडोबाच्या वाघ्या-मुरळी… त्या सा‍ऱ्यांनी देवाची सेवा करावी एवढाच हेतू सुरुवातीला होता. त्यात नृत्य वगैरे भाग नव्हता, मात्र गाणे आवर्जून असायचे. अनेक भाविणी देवासाठी म्हणून गायच्या.

सुरुवातीच्या काळात, तमाशात स्त्रीपात्र नव्हते. पुरुष नाचे स्त्रीपात्र रंगवून नाचायचे. तमाशात किंवा लावणीत स्त्री नाचवण्याची पद्धत रूढ झाली ती पेशवाईत. दुस‍ऱ्या बाजीरावाने शाहिरांना आणि त्यांच्या लावणीकलेला प्रोत्साहन दिल्यामुळे त्या काळात मोठ्या प्रमाणावर लावणीची रचना झाली. तसेच, राजाश्रय मिळतो म्हणून अनेक जण त्या क्षेत्रात आले. त्या काळात अनेक महिलाही लावणीगायन करायच्या. त्यांचे गाणे खुलेआम रस्त्यावर होत नसे. कलावंतिणी बावनखणीसारख्या बंदिस्त वास्तूंमध्ये गात. त्यांचे गाणे ऐकण्यास तत्कालीन प्रतिष्ठित समाज जात असे.

लावणी ही स्त्रीनृत्यप्रधान कला असल्यामुळे त्याकडे सारेजण आकर्षित झालेले दिसतात. लावणीचे सादरीकरणानुसार कोणकोणते भेद आहेत यावर फार लिहिले-बोलले गेलेले नाही. लावणीचे त्यानुसार तीन प्रमुख भेद पडतात. पैकी पहिली शाहिरी लावणी, दुसरी बैठकीची लावणी आणि तिसरी फडाची लावणी. पैकी शाहिरी लावणी शाहीर त्याच्या साथीदारांच्या मदतीने व डफ-तुणतुण्याच्या साथीने सादर करतो. शाहीर सादर करत असलेली लावणी काहीशी उच्च स्वरातील म्हणजे पोवाड्याशी मेळ साधणारी असते. शाहिरी लावणीत नर्तिका नसते. शाहीर व त्याचे झिलकरी आवाजाच्या चढउताराने लावणी रंगवतात. बैठकीची लावणी हा प्रकार महत्त्वाचा आहे. त्या प्रकारात लावणी बसून सादर केली जाते. मात्र बसून सादर केली जाते, म्हणून ती बैठकीची लावणी नव्हे! तर कोणीतरी आयोजित केलेल्या बैठकीत सादर होणारी, म्हणून ती बैठकीची लावणी! उत्तरप्रदेशात लखनौमधील कोठींवर ज्याप्रमाणे ठुमरी-दाद‍ऱ्याची बरसात रसिकांवर केली जाते, त्याचप्रमाणे बैठकीच्या लावणीत शास्त्रीय ढंगाच्या विलंबित गतीच्या लावण्या सादर केल्या जातात. बैठकीच्या लावण्या या उपशास्त्रीय प्रकारात मोडतात. साथीची वाद्येही तेथे नेहमीपेक्षा वेगळी असतात. उदाहरणार्थ, फडाच्या लावणीत ढोलके-तुणतुणे ही वाद्ये असतात. परंतु बैठकीच्या लावणीत साथीला तबला, पेटी आणि सारंगी अशी खानदानी शास्त्रीय वाद्ये असतात. बैठकीच्या लावणीत गाणारी कलावती गाणा‍ऱ्याबरोबर बसून भावदर्शक अभिनयही करते. तिचा तो अभिनय केवळ चेह‍ऱ्यावरील नसतो, तर ती संपूर्ण अंगाने, पण बसूनच बोलत असते. गायिका गाण्याबरोबर करत असलेल्या त्या अभिनयाला ‘अदा’ असे तमासगिरांच्या भाषेत बोलले जाते, तर चेह‍ऱ्यावरच्या अभिनयाला ‘भावकाम’ असा शब्द वापरला जातो. पेशवाईत बैठकीची लावणी सादर करणा‍ऱ्या अनेक कलावती होत्या. त्यांचा मुक्काम व दिवाणखाने पुण्याच्या शुक्रवारपेठेतील बावनखणी या परिसरात असायचे. बैठकीच्या लावण्या म्हणणा‍ऱ्या गायिकांचे उपकार महाराष्ट्रावर खूप आहेत, कारण त्यांनीच उत्तर पेशवाईत नावारूपाला आलेली लावणीकला ख‍ऱ्या अर्थाने जोपासली. त्याचे श्रेयही दुस‍ऱ्या बाजीरावालाच जाते. त्याने शास्त्रीय ढंगाच्या ठुम‍ऱ्या-दादरे ऐकले होते. त्याने त्याच्या दरबारी असलेल्या होनाजी बाळाला ते ऐकूनच शास्त्रीय ढंगात म्हणता येतील, अशा लावण्यांची रचना करण्यास सांगितले. शाहिरांनी तशा लावण्या रचून सादर केल्याही. मात्र पेशवाई १८१८ मध्ये बुडाल्यावर लावणी कलेला कोणी वाली उरला नाही. साहजिकच, शाहीरही पेशवाईबरोबर देशोधडीला लागले. बैठकीच्या किंबहुना, एकूणच लावणीच्या त्या पडत्या काळात बावनखणीतील कलावंतिणींनी पेशवाईतील लावण्या आत्मसात करून-टिकवून ठेवल्या. त्यांच्यामुळेच लावणीचा पारंपरिक ठेवा पुढील पिढीपर्यंत पोचला आहे.

बैठकीच्या लावण्या उत्तरेतील मुज‍ऱ्याच्या धर्तीवर म्हणणा‍ऱ्या अनेक नामवंत गायिका महाराष्ट्रात होऊन गेल्या. त्यामध्ये बाई सुंदराबाई, कौसल्याबाई कोपरगावकर, गोदावरी पुणेकर, अनसूयाबाई जेजुरीकर अशा गायिकांचा आदराने उल्लेख करावा लागेल. ज्यांनी बैठकीची लावणी गायली-जपली अशा यमुनाबाई वाईकर, गुलाबबाई संगमनेरकर यांच्यासारखे मोजके कलावंत विसाव्या शतकात होते.

फडाच्या लावणीला लावणीच्या क्षेत्रात प्रतिष्ठा अधिक आहे. फडाच्या लावणीची खासीयत म्हणजे त्या लावणी प्रकारात मुख्य नर्तकीबरोबर नाच्या-सोंगाड्या असे इतर साथीदार असतात. नर्तकी लावणी उभ्याने नाचून सादर करते. फडाच्या लावणीत गाणारी वेगळी असते आणि नाचणारी वेगळी असते. मात्र ‘बैठकीची लावणी’ व ‘फडाची लावणी’ यांमधील मुख्य भेद म्हणजे बैठकीची लावणी संथ असते, तर फडाची लावणी जलदगतीची असते. तसेच, फडाच्या लावणीत ढोलकी आणि तुणतुणे यांना अतिशय महत्त्व असते. फडाच्या लावणीला ढोलकीची लावणी असेही म्हणतात.

फडाची लावणी हा लावणीचा मुख्य प्रकार असला तरी त्यात चौकाची लावणी, छक्कड लावणी, बालेघाटी, जुनरी, धनगरी असे काही पोट प्रकार आहेत. त्यांतील बालेघाटी, जुनरी व धनगरी लावणी हे भेद प्रादेशिकतेमुळे व विशिष्ट जमातीमुळे पडलेले आहेत. मात्र चौकाची लावणी व छक्कड लावणी हे भेद लावणीच्या ठरावीक गुणवैशिष्ट्यांमुळे पडलेले आहेत. उदाहरणार्थ, चौकाची लावणी मोठी असून चार चार ओळींचे एकेक कडवे असते. प्रत्येक लावणीत तशी चारपाच कडवी असतात. चौकाच्या लावणीचे वेगळेपण म्हणजे त्या लावणीत प्रत्येक कडव्याची चाल वेगळी असते तर छक्कड लावणीत फक्त सहा ओळी असतात. त्या लावणीची मांडणीही विशिष्ट पद्धतीने केलेली असते. त्या लावणीत सहा ओळींची वैशिष्ट्यपूर्ण विभागणी केलेली असते. ती विभागणी दोन ओळी + तीन ओळी + एक ओळ अशी असते. उदाहरण म्हणून अप्पा तांबोळी यांची पुढील लावणी पाहा –

जाता जाता धक्का यानं मारला गं

कसा मस्तीचा बोकुड मेला

मी जात होते पाण्याला

माझ्या मागून चोरावानी आला

शिरी माठ भरून घेतला

यानं निरीस हात माझ्या घातला गं…कसा मस्तीचा बोकुड मेला

म्हणजे दोन ओळींचे ध्रुपद, तीन ओळींचा अंतरा आणि सहावी ओळ पुन्हा मूळ ध्रुपदाला जोडून घेतलेली.

लावण्या, त्यांच्यामध्ये ‘चौकाची’, ‘छक्कड’ असा फरक असला तरी जलदगतीच्याच असतात. त्यामुळे त्या रसिकांना आवडतात. त्याउलट, बैठकीच्या लावण्या ठाय लयीत असल्यामुळे त्या फक्त संगीताचे दर्दी असलेल्यांना आवडतात. लावण्यांचे असे काही भेद आहेत. मात्र लावण्यांचा विचार सादरीकरणातील त्या भेदांच्या अंगानेच व्हायला हवा. कारण वर्षांमागून वर्षें सरली तरी संहिता कायम असते. फरक पडतो, तो सादरीकरणात. तेव्हा गेल्या काही वर्षांत बदललेल्या लावणीच्या फॉर्मचा विचार व्हायला हवा!

– मुकुंद कुळे, 9769982424

About Post Author

Previous articleचंद्रकांत पवार – पोस्टमन ते कीर्तनकार
Next articleशंकर खाडे यांचा बेडगला मुक्त गोठा
मुकुंद कुळे हे व्‍यवसायाने पत्रकार. ते पंचवीस वर्षांपासून त्‍या क्षेत्रात कार्यरत आहे. ते दैनिक 'महाराष्‍ट्र टाईमस'मध्‍ये नोकरी करतात. त्‍यांना साहित्य- कला- संस्कृती यांमध्‍ये विशेष रस आहे. कुळे यांनी लिहिलेले 'पंचलावण्य' हे पहिले पुस्तक. त्‍यात महिला लावणी कलावंतांच्‍या चरित्रलेखांचे संकलन आहे. त्‍यांच्‍या 'इतिहासाचे साक्षीदार' या दुस-या पुस्तकास राज्यशासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. त्‍यांनी 'लोकरहाटी' या पुस्तकातून नामशेष होत चाललेल्या ग्रामसंस्कृतीचा वेध घेतला आहे. ते पुस्तकही राज्यशासन पुरस्काराने गौरवण्‍यात आले. कुळे यांची इतर तीन संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्‍या तीनही पुस्तकांत प्रसिद्ध लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या लेखांचे संकलन आहे. त्यांची नावे अनुक्रमे 'कायमचे प्रश्न', 'रंग-रुप' आणि 'रस-गंध' अशी आहेत. कुळे यांचा लोकसाहित्य हा आवडीचा विषय. त्‍यांचे गेली काही वर्षे तत्संबंधीचे संशोधन सुरू आहे. त्‍यांनी त्या विषयावर आधारित लेख विविध परिसंवादांत वाचले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9769982424

2 COMMENTS

  1. सर माहिती अप्रतिमच आहे मी…
    सर माहिती अप्रतिमच आहे. मी लावणी वर phd करत आहे मी आपणास माहीत विचारली तर चालेल का

Comments are closed.