रायरंद आणि बहुरूपी यांची सोंगे (Folk Art of Rairand And Bahuroopi)

0
79

बहुरूपी

रायरंद किंवा बहुरूपी म्हणजे अनेक रूपे घेऊन लोकांचे मनोरंजन करणारा लोककलावंत. रायरंद, रायरंद्र, रार्इंदर हे शब्द मराठी भाषेतील रायविनोदी म्हणजे विदूषक, बहुरूपी, खुशमस्कऱ्या या अर्थाने वापरले जातात. बहु म्हणजे विविध किंवा अनेक आणि रूपे म्हणजे सोंगे. तुकाराम यांच्या एका अभंगात बहुरूपी रूपे नटला नारायण। सोंग संपादून जैसा तैसाअसा उल्लेख आहे. म्हणजे तुकाराम म्हणतात, भगवान विष्णू बहुरूपी असून त्यांनी दहा अवतार घेतले आहेत. संतांनी ईश्वराला खेळिया असेदेखील म्हटले आहे. त्यावरून खेळ करणारा तो खेळिया आणि नानाविध रूपे घेणारा तो बहुरूपी होय. बहुरूपी या संकल्पनेला भारतीय जीवनरीतीत असा धार्मिक, सांस्कृतिक संदर्भ जोडला गेला आहे.

बहुरूपी या शब्दाची व्युत्पत्ती भारतीय संस्कृती कोशात दिलेली आहे, ती अशी- बहुरूपी ही भिक्षेकरी जमात आहे. ती मुख्यत्वे महाराष्ट्रात आढळते. ते लोक नावाप्रमाणेच बहुविध रूपे म्हणजे सोंगे घेऊन लोकांची करमणूक करतात व त्यांनी दिलेल्या द्रव्यातून उदरनिर्वाह चालवतात.

रायरंदमधील राय ही मानाची पदवी आहे, तर रंद, इंद, इंद्र या शब्दांना मराठीत काही अर्थ नाही. रायरंदकिंवा बहुरूपीया नावाने ओळखली जाणारी संस्था ही मूलतः जात नसून, तो करमणूक हीच उपजीविका असलेला कलावंतांचा समाज, समूह आहे. रायरंद हे बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वीचे अस्पृश्यांचे (पूर्वाश्रमीचे महार) मागते आहेत. ते स्वतःला सोमवंशी म्हणवून घेतात. रायरंद मुलूखगिरीसाठी सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन जात. ते लोक सवारीसाठी उंट आणि घोडे यांचा वापर करत असत. तो रिवाज राजस्थानमधील भांड जमातीतील लोकांसारखा वाटतो. महाराष्ट्रात रायरंदांची संख्या फारच अल्प आहे. त्यांची वस्ती नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, दोंडाईचा या दोन ठिकाणी दिसते. रायरंद जमातीतील स्त्रिया सौंदर्यवान असतात असे लेखक रुस्तम अचलखांब यांनी नमूद केले आहे. रायरंदांकडे अस्पृश्यांची सात पिढ्यांची नोंद असते. रायरंद हा बहुआयामी प्रतिभेचे प्रतीक असून तो उत्कृष्ट वक्ता, गायक, नर्तक आणि शीघ्रकवी असतो.

बहुरूपी हे नाथ डवरीगोसावी समाजातील म्हणून ओळखले जातात. बहुरूपी हा व्यवसाय म्हणून नाथ डवरीगोसावी समाजातील काही घटकांचे अर्थार्जनाचे साधन आहे. ते रामायण, महाभारत आणि पुराणे यांतील देवीदेवतांची सोंगे घेतात. त्या सोंगांची परंपरा केवळ बहुरूपी अथवा रायरंद यांच्या खेळात आहे असे नव्हे; तर भारूड, लळित, बोहाडा, आखाडी, पंचमी, चैती आदी भक्तिनाट्यांमध्ये देखील ईश्वराच्या सोंगांची परंपरा आहे. बहुरूप्यांच्या सोंगांमध्ये तुंबडी हे प्रमुख वाद्य असते. त्याखेरीज पेटी, टाळ, ढोलकी या वाद्यांचाही वापर होत असतो. तुंबडी म्हणजे वाळलेला कोहळा. त्याला वरून एक काठी लावतात आणि एक तार जोडून वर घुंगरू बांधतात. प्रयोगाच्या सुरुवातीला प्रमुख नट तुंबडीचा मोर नाचवत येतो आणि तो कोठले सोंग करून दाखवणार आहे, त्या सोंगाचा परिचय करून देतो. सोंग कोठलेही असो, त्याच्या पायात घुंगरू असतात. त्याचे सोंग घुंगरांच्या आवाजातच रंगते. शिवाजी महाराजांच्या काळात बहुरूपी बहिर्जी नाईक त्यांच्यासोबत होते.

रायरंद हे 14 ऑक्टोबर 1956 पूर्वीच्या महार (आताच्या नवबौद्ध) या समाजाचे मनोरंजन व प्रबोधन करत; बौद्धवाड्यात बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराहा उपदेश गीतगायनाच्या माध्यमातून आंबेडकर-अनुयायांसमोर गात आणि बिदागी घेऊन उपजीविका भागवत. रायरंद यांची वतनाची गावे ठरलेली असत. एक रायरंद दुसऱ्या रायरंदाच्या वतनदारीत प्रवेश करत नसे. रायरंदाला वतनातील गावांमधील बौद्धधर्मीय (महार) कुटुंबांची सात पिढ्यांची वंशावळ मुखोद्गत असे. रायरंद हे अस्पृश्यांच्या सर्व सांस्कृतिक घडामोडींचे जणू केंद्र असत. रायरंद समाजातील कुटुंबांची घरे खुराड्यासारखी असल्यामुळे, सगळी वयस्कर मंडळी रात्री चावडीवर येऊन झोपत आणि त्यावेळी अनेक विषयांवर खलबते करत; लग्नाचे, श्राद्धाचे व इतर कार्यक्रम चावडीवरच होत असत. तमासगिरांची ढोलकी चावडीमध्ये खुंटीला टांगलेली कायमची असायचीच. औरंगाबादचे अभ्यासक प्रभाकर मांडे यांनी गावगाड्याबाहेरया ग्रंथात रायरंद आणि बहुरूपी यांच्या संदर्भात संशोधनपर लेखन केले आहे.


रायरंद आणि बहुरूपी निरनिराळी सोंगे घेतात, अभिनय करतात, गाणी म्हणतात, लोकांची करमणूक करतात. ते हुबेहूब सोंगे घेण्यात पटाईत असतात. ते वेगवेगळ्या नकला करण्यात पारंगत असतात. ते पक्ष्यांचे आवाज काढणे, पाहता पाहता वेषांतर करून समोरच्या माणसाला ठकवणे आणि त्याचा खेळ करणे यामध्ये वाकबगार असतात. त्यांचा प्रभाव लोकमानसावर पडतो. ते त्यांच्या जिभेवर असणाऱ्या सरस्वतीच्या साहाय्याने किंवा तिच्या बळावर जनमानसाला आकर्षून घेऊ शकतात.

          रायरंदांचे मूळ गाव कोणते? त्यांची उत्पत्ती कशी झाली? याबाबत तेच एक आख्यायिका सांगतात- आमचं मूळ कुटुंब जगतकरांचं. जगतकर हे मूळचे परळीचे आणि ह्या जगतकरांपासूनच निरनिराळी अशी आडनावं बनली. सिद्धनाथ मायनाक हा आमचा मूळ पुरूष आहे. तोही मूळ परळीचा होता. तो एक लढाऊ महार होता, सत्यवचनी होता. सिद्धनाथाच्या मुलाने एक सोंग आणले आणि त्याच्या जातिबांधवांची करमणूक केली. सिद्धनाथाने सोमवंशी असे बिरूद बाळगण्याचा आदेश दिला. तो समाज त्याचे जीवन एका विशिष्ट पद्धतीने जगतो. सत्त्वाची पूजा करतो, नैवेद्य करतो. त्याने बौद्ध झाल्यानंतरसुद्धा परंपरेने चालत आलेल्या काही रूढी सोडलेल्या नाहीत. ते पाचवीची आणि सतीची पूजा करतात. त्यांनी कान टोचणे, गोंदवून घेणे हेही परंपरेने चालू ठेवलेले आहे. मुलांचे केस उचलणे हेदेखील बौद्ध झाल्यानंतर प्रचलित राहिले आहे. तशा विधीसाठी ते सोदड, आंबा, कुबट, हरडी, रुई या झाडांचा पाला आणतात. ते त्यांचे जन्मदिवस लग्नासाठी वर्ज्य समजतात. ते लोक मढीची जत्रा, माळेगावची जत्रा,वणीची जत्रा, नेवासा तालुक्यामधील वरखेडची जत्रा येथे जमतात. ते शामशिंगी, शमादयी, बाळंतीण, नंदी, शंकर, पार्वती, म्हातारी, वाघ अशी सोंगे आणतात, त्यांच्यापैकी देवीदेवतांची सोंगे आणतात. निरनिराळी सोंगे आणून करमणूक करणे हाच त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे.

त्यांनी बौद्ध झाल्यानंतर देवीदेवतांची सोंगे आणण्याचा प्रकार बदलला. तो हळुहळू सोडूनही दिला. परंतु त्यांनी हनुमंताची सोंगे आणणे आणि उंचउंच उड्या मारणे हे, त्यांचा लोकमानसावरील प्रभाव लक्षात घेऊन प्रचलित ठेवले आहे. काही जुनेजाणते रायरंद यमाचे सोंग, हल्या ही सोंगेसुद्धा लोकांसमोर करताना अजून दिसतात. सगळी सोंगे झाली की टोपी उलटी करून भोवताली जमलेल्या माणसांकडून पै-पैसा जमा करायचा. त्याला ते उकळपट्टी असे म्हणतात. बहुरूप्यांमध्ये पुनर्विवाह नाही.

रायरंदांवर आंबेडकरी विचारांचा मोठा प्रभाव आहे. ते त्यांच्या गीतांमधून हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा-परंपरांवर प्रहार करतात.औरंगाबाद येथील अर्जुन खरात या रायरंदाने बाबासाहेब आंबेडकर यांचे गौरवगीत गायले आहे. ते नमुन्यादाखल असे-

गायक-

फारच वाईट होता, पूर्वीचा काळ गं फारच वाईट होता, पूर्वीचा काळ गं
बामनाला होत होता
, आमचा विटाळ गं

भिमामुळं विटाळ गेला वं माय

भिमामुळं विटाळ गेला वं माय

बामनाचा जावई झाला वं माय

बामनाचा जावई झाला वं माय

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात एका रायरंदाने रचलेले गाणे असे-

मेरे भिमराज ने सबका भला किया-

शुरवीर बहाद्दुरने कलम से जला दिया

भिम ने हमारे वास्ते क्या-क्या न किया-

सब कुछ किया मगर किसी से पैसा ना लिया

तलवारी का धारी, भिम माझा दुधारी होता-

एकटाच भिम माझा माझा हो लाखाला भारी होता

साऱ्याच पुढाऱ्यांना तो बाबाचा धाक होता

भिमराव आमचा हो बापाचा बाप होता

गीत गायनाला जिथे-जिथे जातो-

आधी भिमरावा तुझे नाव घेतो-

अर्जुन जगदेव खरात यांनी त्यांची हकिगत सांगितली. त्यावरून रायरंदांचे अनेक पैलू कळत गेले. अर्जुन म्हणाले, ‘मी राहणार शुलीभंजन, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद. मी बाळंतिणीचं, शिवाजीचं, तंट्या भिल्लाचं सोंग काढत असे. रूपचंद खरात या माझ्या काकांनी एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून सुभाषचंद्र बोस यांचा वेष घेऊन सरकारला फसवलं होतं. आम्ही बुद्धाचे मागते झालो. माझ्या वडिलांना बौद्ध झालेल्या जातबांधवांनी सांगितलं, की तुम्ही देवादिकांची सोंगं आता काढू नका. बुद्धाची, आंबेडकरांची गाणी गात तुमची गायन पार्टी सुरू करा. आम्ही बुद्धाची गाणी पेटी, ढोलकी घेऊन म्हणू लागलो. माझे वडील एके काळी बाजीराव नाना, ओ बाजीराव नाना,तुंबडीभर देना, आता तुंबडीभर देनाअसे म्हणत गात फिरायचे-

तुंबडीभर देना बाजीराव नानाहे बहुरूप्यांचे लोकप्रिय गीत असे-

तुंबडीभर देना, बाजीराव नाना

घरी नाही दाना, हवालदार माना

शशावानी ताना, नाव ठेवा नाना

घवनकि माल बोलो, परभनी का जाना

राजा का घोडा बोले, बैठने का देना

चिंदे कि भाल बोले बुढ्ढे को देना

बहुरूप्यांच्या सामाजिक सोंगांच्या वेळी त्यांनी म्हटलेल्या गीतांमध्ये अद्भुत आणि बीभत्स रसांचे दर्शन प्रामुख्याने होते. तुंबडीभर देनामधील वर्णन असे-

लग्नाला निघा तुम्ही लग्नाला लवकर निघा

लग्नाला जेवायला केली बरबट्याची पोळी

थूक लावून बोटं आंबाड्याची भाजी

मिठाचे लाडू निंबाडचा शिरा

आम्ही उंटांचा व्यवसाय करतो. उंटांचे कार्यक्रम केले तर आम्हाला हजार रूपये आणि धान्य मिळते. आम्ही बाळंतीण बाईला उंटाच्या लेंडीचा शेक देतो. त्यामुळे तिची तब्येत चांगली राहते. रायरंद आणि बहुरूपी, आम्ही एकच. उंटावरचा सारन (उंटावर उपजीविका करणारा) म्हणजे ती आमची उपजीविका होती. पूर्वीचे सारन जे होते ते इतके जादूगार होते, की ते गावात मारूतीच्या मंदिराजवळ आले तर सगळे लोक त्यांना बाबा आले, बाबा आलेअसे म्हणायचे आणि मग त्यांना धान्य वगैरे द्यायचे. रायरंद हे मुसलमान, बौद्ध आणि मराठा या तीन जातींचे आहेत. जालनाजिल्ह्याच्या अंबड तालुक्यात येरे गावी मुसलमान रायरंद आहेत. मुसलमान रायरंद वाघ बनून मोहरममध्ये नाचतात. आम्ही मुखवटे वारूळाची माती, चिंचोके, कागदाची रद्दी यांपासून बनवतो.

जोकरचे सोंग

अमरावतीजिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील आष्टी हे गाव बहुरूप्यांसाठी प्रसिद्ध आहे. बहुरूप्यांची कबीरपंथी परंपरा त्या गावात आहे. तेथील गुलाबराव वैद्य म्हणाले, आम्ही स्वतःला रायरंद म्हणत नाही, तर बहुरूपी म्हणतो. बहुरूप्यांची परंपरा भारताच्या अनेक राज्यांत आहे. त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. आमचा धर्म कबीरपंथी आहे. आम्ही हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही जातींच्या परंपरा पाळतो. भगवान विष्णू हा पहिला बहुरूपी होता. कारण त्याने दहा अवतार घेतले. विष्णू, कृष्ण, राम या देवता आम्हाला वंदनीय आहेत. आमची आडनावे वैद्य, औंधकर, सातारकर, मिरजकर, पठाणेकर, काशीकर, काळे अशी आहेत. आमच्यात जन्माचा विधी हिंदू संस्कृतीप्रमाणे असतो. पाचवी पूजली जाते, सात दगड ठेवून पाचवीची पूजा केली जाते. आमचे कुलदैवत सादाळबुवा आहे. उपरेलला सादाळबुवा आहेत. आमच्या देव्हाऱ्यात सर्व धर्मांच्या मुर्ती असतात. मुसलमान धर्मातील फोटोही असतात, जसे की ताजुद्दीन बाबा, यांचे फोटो लावून आम्ही पूजा करतो. आमची सोयरीक एका आडनावामध्ये होत नाही. आमच्यामध्ये महिला कुंकू लावत नाहीत. कुंकू हे सोंगासाठी वापरले जाते. आमचा समाज हा भटक्या, विमुक्तांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तो अनुसूचित जमातीमध्ये (शेड्यूल्ड ट्राईब्ज) समाविष्ट करावा अशी आमची मागणी आहे. आमचा बहुरूपी समाज वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आहे. आमचे जोकरचे सोंग सामाजिक सोंगांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. राज कपूरच्या मेरा नाम जोकरया चित्रपटाचा प्रभाव त्याच्यावर आहे.

          आम्ही रंगरंगोटीसाठी मुरदाडशिंग वापरतो. त्याच्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होत नाहीत. मुरदाडशिंग हा एक प्रकारचा दगड आहे. तो राजस्थानातून येतो. त्याची किंमत आठशे रूपये प्रतिकिलो इतकी असते. आम्ही स्वतः वेषभूषेमधील मुकुट आणि गळ्यातील माळा तयार करून घेतो. आम्ही तंट्या भिल्ल, शामादायी, साधू-संत, शंकरजी, यमराज, रेडा अशी सोंगे घेतो. यमराज आम्ही दोन प्रकारचे करतो; एक रेड्यावर बसणारा, त्याला रेड्याचे सोंग म्हणतो आणि एक रेड्याशिवाय, त्याला यमाचे सोंग म्हणतो. आम्ही एक शंकरजी खाली फिरणारा व एक शंकर नंदीवर बसणारा अशी सोंगे घेतो. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून आम्हाला शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसाराची कामे मिळतात. त्यासाठी आमची पथनाट्याची संस्थादेखील आहे. बहुतांश समाज नोकरीधंद्यासाठी गुजरातमध्ये स्थायिक झाला आहे. काही लोक नवसारी, बारडोली, बोडोली, मोहाला, वानगाव येथे स्थायिक झाले आहेत.

 समाजाने परिस्थितीनुसार रीतिरिवाज बदलून टाकले आहेत. बहुरूपी या समाजातील एकाच घरात दोन संस्कृती गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. समाजातील वृद्ध पुरूषांची नावे पाहिली तर ती मुस्लिमधर्मीयांची आहेत आणि नव्या पिढीतील युवकांची नावे हिंदुधर्मीयांची आहेत. घरातील सासू मुस्लिम संस्कृती जपते, तर सूनबाई कपाळावर टिकली लावून हिंदू संस्कृतीचे आचरण करते. नाव मुस्लिम असले तरी घरात शंकरजी, हनुमान, गणपती, नारद आदी हिंदू देवीदेवतांचे मुखवटे असतात. पोटासाठी सोंगे घेऊन गावोगाव फिरणाऱ्या त्या समाजातील माणसे महिनोन् महिने बाहेरगावी असतात. महिलाच त्यांच्या अनुपस्थितीत कुटुंबाचा गाडा चालवतात. समाज लहान असल्याने विवाहासाठी केवळ मावशी, आई यांचे संबंध सोडून इतर आडनावांतील युवक-युवती लग्न करू शकतात. मुलगा तेरा ते चौदा वर्षांचा झाला, की तो ज्येष्ठांबरोबर सोंगे काढून त्यांच्या व्यवसायाला हातभार लावतो. लहान मुले नारद, भक्त प्रल्हाद, बाळकृष्ण, गवळण, सुदामा, पेंद्या आदींची सोंगे घेतात; तर मोठी माणसे शंकर-पार्वती, गणपती, फकीर, लैला-मजनू, राक्षस, तंट्या भिल्ल, गुरू-चेला अशी सोंगे घेतात. समाज जेवढ्या आनंदाने ईद साजरी करतो, तेवढ्याच आनंदाने दिवाळी-दसराही साजरा करतो. एकीकडे रोजेठेवणारा समाज हिंदू समाजातील उपवासही करतो.

          अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडासंभू येथे बहुरूपी समाजाची शंभर कुटुंबे आहेत. राजेश चांदभाई औंधकर हा युवक समाजातील मुलामुलींनी शिकले पाहिजे म्हणून तेथे प्रयत्न करत आहे. विदर्भात त्या समाजाची औंधकर, सातारकर, खेडेकर, फलटणकर, वैद्य, काळे, पठाणेकर, मिरजकर एवढ्याच आडनावांची कुटुंबे आहेत. ती आडनावे त्यांच्या गावावरून व व्यवसायावरून पडली आहेत. बहुरूप्याची सोंगे घेता घेता औषधींचा व्यवसाय करणारे ते वैद्य, औंधहून आलेले औंधकर अशी ती आडनावे पडली. समाजातील कोणालाही त्याचा धर्म-जात माहीत नाही. त्यांची जी भाषा आहे ती मराठी, हिंदी व उर्दू मिश्रित आहे. त्या भाषेत पाण्याला निरमा’, दारूला चिंगई’, तर मटनाला नमाडीम्हणतात. ते त्या भाषेला पारसी’ भाषा म्हणून संबोधतात.

          राजेशचे आजोबा नजरुद्दीन जहरूभाई औंधकर सोंग घेऊन पुसद्याच्या राममंदिरात प्रत्येक रामनवमीला जायचे. त्यामुळे त्यांना संस्थानाच्या समितीने शेती दिली. बहुरूप्यांना शेती अशी गावा गावांत मिळाली होती. परंतु ती त्यांच्या ताब्यात राहिली नाही. टाकरखेडासंभू येथील गुलाबराव देशमुख (माजी खासदार के. टी. देशमुख यांचे वडील) यांनी जहरूभाईंना मुलांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनीही मुलांना शिकवले. जहरूभार्इंचे ज्येष्ठ पुत्र एन्.जे. औंधकर (एन्.जे.) हे त्या काळी दहा वर्ग शिकले. समाजातील ते पहिले शिक्षक आहेत. त्यानंतर त्यांच्या प्रेरणेने समाजातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेऊ लागले. समाजातील पहिली महिला शिक्षक होण्याचा मान ज्योती विकास वैद्य (पूर्वाश्रमीच्या ज्योती गफूर उपाख्य गणेश औंधकर) यांना जातो. बहुरूप्यांच्या चालीरीती मराठा-कुणब्यांप्रमाणे असतात. ते लोक बहिरोबा, जनाई-जोखाई, खंडोबा इत्यादी देवतांना भजतात.

          रामदासस्वामींचेबहुरूपी म्हणून एक प्रसिद्ध भारूड आहे. ते असेः

         खेळतो एकला बहुरूपी रे ।

           पाहतां अत्यंत साक्षपी रे ।।धृ.।।

सोंगे धरीतां नानापरी रे ।

बहुतचि कळाकुसरी रे ।।

दाखवी अनेक धाता माता रे ।

बोलतो अभिनव धाता रे ।

सदा पडदे लावितसे रे ।

फौजा सोंगांच्या दावितसे रे ।।

गातो नाचतो वाजवितो रे ।

त्याग करतो देतो घेतो रे ।।

ऐखा हा भूमंडळी थोडा रे ।

पाहतां तयांसि नाही जोडा रे ।।

अखंड खेळतो प्रगटेना रे ।

पाहती उदंड तया दिसेना रे ।।

पाहो जाता अंतचि लागेना रे ।

दास म्हणे खेळता भागेना रे ।।

प्रकाश खांडगे 9829913600 prakash.khandge@gmail.com
(ललित
, नोव्हेंबर-डिसेंबर 2019 वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)

प्रा. प्रकाश खांडगे यांनी लोकसाहित्याचे आणि लोककलांचे अभ्यासक म्हणून भारतीय आणि राज्य पातळीवर लोकसाहित्य आणि लोककलांना सैद्धांतिक बैठक प्राप्त करून दिली. तसेच, त्यांनी विद्यापीठ पातळीवर लोककलांच्या अभ्यासाची नवी अभ्यासपद्धती तयार केली. त्यांनी लोकसाहित्य, लोककलेच्या क्षेत्रातील ज्ञानाचा तसेच व्यासंगाचा फायदा राज्यातील सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या लोककलावंतांना करून दिला. खांडगे यांनी शासनाच्या लोककलांच्या संदर्भातील अनेक पथदर्शी विकास योजनांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. खांडगे यांनी 2004 मध्ये मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीची मुहूर्तमेढ रोवली. ते मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतून प्राध्यापक म्हणून निवृत्त 2017 मध्ये झाले. त्यांनी लोककला अकादमीचे विभाग प्रमुख पद सांभाळताना पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केले. खांडगे यांच्या प्रयत्नाने लोककला अकादमीत पीएच. डी. संशोधन केंद्र सरु झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली. ते लोकसाहित्य, लोककलेच्या संशोधन क्षेत्रात तसेच, मुक्‍त पत्रकारितेत 1978 पासून आहेत. त्यांनी लोकसाहित्य, लोककला आणि लोककलावंत यांच्या संदर्भात विस्तृत लेखन केले आहे.

———————————————————————————————————————————-

About Post Author

Previous articleतुळशीचे लग्न (Tulsi Vivah)
Next articleनासिकचा प्राणवायू विश्वाला! (Nasik Area Has Exclusive Vegetation)
प्रकाश खांडगे ठाणे येथे राहतात. ते शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठाचे समन्वयक आहेत. त्यांनी पस्तीस वर्षे लोकसाहित्य, लोककला क्षेत्रात संशोधनाचे कार्य केले. प्रकाश खांडगे यांना 'खंडोबाचे जागरण' या ग्रंथासाठी महाराष्ट्र शासनाचा 'उत्कृष्ट ग्रंथ संशोधन पुरस्कार' (ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार) प्राप्त झाला आहे. तसेच, त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोककलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 'कलादान पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. त्यांनी अमेरिका आणि चीन येथील आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य व लोककला परिषदांमध्ये शोधनिबंध वाचन करून भारताचे प्रतिनिधित्व केले. खांडगे यांनी मुंबई विद्यापीठात लोककला अकादमी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. ते मुंबई विद्यापीठात अकरा वर्षे सहयोगी प्राध्यापक होते. त्यांची 'चाळ माझ्या पायात', 'खंडोबाचे जागरण', 'भंडार बुका', 'नोहे एकल्याचा खेळ' अशी चार पुस्तके, तर 'गर्जा महाराष्ट्र माझा', 'लोक लेणी' व 'लोकमुद्रा' ही तीन संपादने प्रकाशित आहेत. प्रकाश खांडगे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता', 'लोकमत', 'सकाळ', 'पुण्यनगरी' आदी वृत्तपत्रांतून सदरलेखन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here