रसिक राजकारणी जानोजी निंबाळकर

0
299

काही मराठा सरदारांनी निजामशाहीत चाकरी करूनही मराठी राज्याशी स्नेहाचे संबंध ठेवलेले होते, हे सतराव्या-अठराव्या शतकातील महाराष्ट्राचे वैशिष्ट्य होय. ते सरदार मराठेशाहीतून फुटून हैदराबादच्या निजामाकडे गेले होते. त्यांचा निजामाबरोबरचा तो स्नेह मराठी राज्यास हितकारक बऱ्याच वेळा ठरला ! पेशव्यांनी निजामास उपद्रव त्या सरदारांच्या बरोबर कारस्थाने करून वेळोवेळी दिला. उलट, निजामाचाही त्याच्या त्या सरदारांवर पूर्ण विश्वास नसे; त्या सरदारांनादेखील पेशव्यांशी स्नेह ठेवल्याचे विपरीत परिणाम भोगावे लागले.

करमाळा-सोलापूरच्या रावरंभा निंबाळकर घराण्यातील पुरुषांचे पेशव्यांबरोबरचे संबंध स्नेहाचे होते. पैकी जानोजी यांचे संबंध विशेष उल्लेखण्यासारखे आहेत. पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांचा बराचसा काळ पेशवाईचा जम बसवण्यात गेला. त्या वेळी रंभाजी निंबाळकर हे देखील स्वाऱ्यांमध्ये मग्न असत. कालांतराने, रंभाजीराव यांची जहागिरी जानोजी निंबाळकर यांच्याकडे आली. त्या वेळी थोरले बाजीराव पेशवेपदावर आले होते. त्या दोघांचे संबंध हे खास मित्रत्वाचे होते. बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर जानोजी निंबाळकर यांनी नानासाहेब पेशव्यांशीदेखील स्नेह ठेवला होता.

जानोजी निंबाळकर यांनी बाजीराव पेशव्यांशी उत्तम स्नेह रंभाजी निंबाळकर यांच्या हयातीतच राखला होता. जानोजी निंबाळकर यांची लेखनशैली ही खुमासदार होती. जानोजी हे एकीकडे पेशव्यांना गोड गोड पत्रे लिहीत असत व दुसरीकडे, त्यांचाच मुलूख मारत असत ! पेशवे दप्तरातील जानोजी निंबाळकर यांच्या पत्रांतून त्याचा प्रत्यय येतो. जानोजी निंबाळकर यांनी बाजीराव पेशव्यांची पत्नी आणि मातोश्री यांना मानाची वस्त्रे पाठवल्याचे उल्लेख पेशवे दप्तरात मिळतात.

बाजीराव पेशव्यांनी जानोजी निंबाळकर यांस पुण्याला शिमगा खेळण्यास 1736 साली बोलावले होते. जानोजी यांनी चिमाजीअप्पास त्या संदर्भात पाठवलेले उत्तर हे जानोजी यांच्या स्वभावाचे पैलू स्पष्ट करते. जानोजी म्हणतात-  “राजेश्री राऊ पंतप्रधान यांनी कृपा करून सिमगा खेलावयासी पुणियास यावे म्हणून पत्रे पाठविलीं. यैसियास राजश्री आम्हावरी मेहरबानी करीतात हे तमाम दुनिया जाणत आहे. आम्ही काया वाचा मने करून येकनिष्ठता धरून आहोत हे मनोमन साक्ष आहे. परंतु सांप्रत नबाबाची मर्जी नाजूक हरयेक विचारे निमित्य पाहताती. पूर्वी फौज पाठविली, त्याकरिता रोज विपरीत चर्चा करावयास अंतर करीत नाहीत.”

जानोजी हे निजामाची चाकरी बजावत असताना पेशव्यांना ‘आम्ही कायावाचामने करून एकनिष्ठता धरून आहोत’ असे लिहितात याची गंमत वाटते. अर्थात अशा एकनिष्ठ म्हणवणाऱ्या जानोजी यांनी पेशव्यांच्या मुलखास उपद्रव करणेदेखील सोडलेले नव्हते.

            जानोजी यांचा तृतीय पुत्र धारराव निंबाळकर यांनी बाजीराव पेशव्यांस त्याच वेळी शिमग्याच्या या निमंत्रणासंदर्भात एक पत्र पाठवले होते. ऐतिहासिक पत्रव्यवहारात सहसा न आढळणारी गोष्ट म्हणजे सदरचे पत्र पूर्णपणे विनोदी भाषेत लिहिलेले आहे ! त्या पत्रात धारराव लिहितात- “पत्री आज्ञा जे, सिमगिया कारणे येणे. यायासी उजूर कराल तर मारुं, म्हणौन लिहिले, तरी आम्ही नबाबासोचे मनसफदार आहोत. कदाचित आम्हास साहेबांनी मारिले, तरी दोन्ही राज्यांस विचार पडोन येखादे बिगाडखाले मनसुबा येईल. याजकरिता आम्हास साहेब मारणार नाहीत हा भरवसा आहे. राजश्री जानबा साहेबांस सिमगा खेळावयासी बोलाविले यांसी उजूर नाही. साहेब मेहरबानी करिताती. हे तमाम पृथिवी जाणते आणि यांची निष्ठा आहे, हे साहेबांचे चित्त साक्ष देत आहे. परंतु पूर्वी आम्ही राजापुरीस आलो होतो, त्याची बदनामी आली. त्याचे परिमार्जन होत नाही. या दिवसांत नबाबाची मर्जी येक प्रकार जाली आहे…. या संधीमध्ये हरकोणी विपरीत भाव दाखविला म्हणजे याचे संकट साहेबासच पडेल. याचकरिता सेवेसी पत्र लिहिली आहेत.”

बाजीराव पेशव्यांनी जानोजी निंबाळकर यांना शिमग्यासाठी बोलावताना आपण येण्यास ‘उजूर’ म्हणजे आक्षेप कराल तर आपणास मारू असे थट्टेने लिहिले होते. त्यास उत्तर देताना धारराव यांनी ‘आम्हास मारिले तर पेशवे व निजाम या राज्यांत बिघाड होईल, या कारणाने पेशवे आम्हास मारणार नाहीत’ असा विश्वास व्यक्त केला आहे. धारराव यांनी तत्कालीन राजकीय परिस्थितीचे चित्र विनोदातच दर्शवलेले आहे. परंतु पत्राचा सूर शेवटी मात्र गंभीर केलेला आहे. निंबाळकर यांनी पेशव्यांची जी भेट त्या पूर्वी घेतली होती, त्यामुळे ‘त्यांची निजामशाहीत बदनामी झाली. त्याचे निरसन अद्यापही झालेले नाही व शिमग्याच्या या संधीचा फायदा घेऊन निजामाकडील कोणी विपरीत अर्थ काढला तर त्याने पेशव्यांनाच अडचण येईल’ असेही धारराव सुचवतात. धारराव यांनी त्यांच्या वडिलांप्रमाणे पेशवे त्यांच्यावर मेहरबानी करतात व ते त्यांच्याशी निष्ठावान आहेत हे दर्शवण्याची संधी सोडलेली नाही. पेशवे काय, निजाम काय किंवा मराठे सरदार काय, हे एकमेकांना किती ओळखून होते हे यावरून स्पष्ट होते.

जानोजी यांच्या लेखनातील लालित्य व वाङ्मयीन सौंदर्यदृष्टी त्यांच्या पत्रव्यहारामधून लक्षात येते. जानोजी यांनी नानासाहेब पेशवे यांना आंबे भेट म्हणून करमाळ्याहून जून 1759 मध्ये पाठवले. त्यासोबत पाठवलेल्या पत्रात जानोजी लिहितात- “नूतन झाडे आंबियाची लाविली, त्यास फळे आली. ते सेवेसी पाठविली असेत, पसंद पडावया योग्य नाहीत, परंतु नूतन वस्तू श्रेष्ठास नजर करावी यास्तव प्रेषण केली असे.”

एकदा, जानोजी निंबाळकर यांनी पेशव्यांना भेट म्हणून धोतरजोड्या पाठवल्या होत्या. त्या सोबतच्या पत्रात ते लिहितात, “मु ॥ कमलालये जाणोन निजानंदलेखन की जे विशेष सांप्रत आपल्या व रा भाऊ सा व राजश्री रघुनाथ राऊजींच्या चरण पुसावयास धोतरजोडे तीन पाठवले आहेत. येक दिवस यांसी चरणस्पर्श करून देणे. त्यास दिधले पाहिजे.”

जानोजी यांचा पत्रलेखनामधील विनय पाहून आश्चर्य वाटते. अर्थात एकीकडे असे पत्रलेखन करत असताना, दुसरीकडे जानोजी यांच्या राजकीय कागाळ्या या चालूच होत्या. जानोजी निंबाळकर यांनी सदाशिवराव भाऊ यांस संक्रांतीची तिलशर्करा एका संक्रांतीस पाठवली होती. नानासाहेब पेशव्यांकडूनही जानोजी यांस एका संक्रांतीस तिळगूळ आला असता, त्याविषयी पोच देणारे एक पत्र जानोजी यांनी पेशव्यांस लिहिले आहे. नानासाहेब यांना लिहिलेले सदरचे पत्र म्हणजे वाङ्मयीन दृष्ट्या एक अनमोल ठेवा आहे. जानोजी यांच्या लेखनातील काव्यालंकार पाहून कसलेल्या लेखकांनी थक्क व्हावे, असा तो नमुना आहे. जानोजी 24 जानेवारी 1756 रोजी पाठवलेल्या त्या पत्रात लिहितात-

“पत्रसंक्रमणाचे तिलशर्करायुक्त पाठविले, ते पावोन परम समाधान जाले. कितेकांनी या तिळाचे लावण्य पाहून तिलोत्तमाच्या लावण्याचे मूळ हेच तीळ असतील ऐसे मानिले, अस्मात चित्ताने कृपाश्नेहमये जाणोन आवडीने शर्करासहित सेविता रसनेस गोडी व चित्तास प्रतिक्षणी अभिवृद्धी लक्षणी श्नेहवशता प्राप्त जाली, तो विस्तार लिहिणियाहून विशेषतर असे, हे विनंती”

जानोजी यांची रसिकता या पत्रांमधून प्रकटलेली दिसते. पत्रातील संस्कृत शब्दांची योजना आणि पुराणकथेतील तिलोत्तमेची तिळाशी केलेली योजना या गोष्टी त्याच्या कलात्मक अभिरुचीची साक्ष देतात. जानोजी निंबाळकर हे केवळ समशेरीचे फर्जंद नव्हते, तर ते एक अव्वल रसिक राजकारणी होते आणि राजकारणी व्यक्तिमत्त्वाच्या ठिकाणी सहसा न आढळणारे साहित्यिक गुण त्यांच्या ठिकाणी वास करत होते, हे या छोट्याशा पत्रात आलेल्या काव्यविभ्रमावरून स्पष्ट होते. निंबाळकर आणि पेशवे यांच्या हर्षामर्षाची अशी काही उदाहरणे इतिहासात जागोजागी सापडतात. परस्परांचे शत्रू असूनदेखील निंबाळकर आणि पेशवे यांच्यामधील स्नेहाचा इतिहास हा विलक्षण हर्षामर्षाने रंगलेला दिसतो.

– अनिरुद्ध बिडवे 9423333912 bidweanirudha@gmail.com

————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here