‘रजाचा गज करणे’ हा जुना वाक्प्रचार. रज म्हणजे मातीचा कण, गज म्हणजे हत्ती. रजाचा गज करणे याचा शब्दश: अर्थ मातीच्या कणाचा हत्ती करणे. वाक्प्रचार दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जाई.
विद्याधर वामन भिडे यांच्या ‘मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी’ या कोशात अतिशयोक्ती करणे, छोटी गोष्ट मोठी करून सांगणे असे त्याचे अर्थ दिले आहेत. त्या अर्थाचा ‘राईचा पर्वत करणे’ हा वाक्प्रचार मराठीत आहे.
रजाचा गज करणे याचा दुसरा अर्थ लहानाचा मोठा करणे, संस्कार करून घडवणे असा मोल्सवर्थच्या शब्दकोशात आहे. तो पूर्वी मुलांना वाढवणे, घडवणे या अर्थाने वापरला जाई. लहान मूल म्हणजे एक प्रकारे मातीचा गोळा. आई-वडील त्याचे लालन-पालन करतात, त्याच्यावर चांगले संस्कार करतात. अशा त-हेने मुलांचा ‘रजाचा गज’ करतात! अनंत फंदी यांचे ‘माधवाख्यान’ नावाचे पेशव्यांच्या कारकिर्दीवरील एक काव्य आहे. त्यामध्ये –
मी केले रजाचे गज |
आता सोडुनि जाताति मज |
डोळां अश्रु आले सहज |
साहेबांच्या तेधवां ||
असे वर्णन आहे. राघोबादादा आणि आनंदीबाई यांनी त्यांची अमृतराव व बाजीराव ही मुले नानांच्या हवाली केली, त्या वेळच्या प्रसंगात राघोबादादांच्या तोंडचे ते वाक्य आहे.
गुजराथी भाषेत ‘रजनुं गज करवुं’ असा वाक्प्रचार आढळतो.
– डॉ. उमेश करंबेळकर
सुंदर माहिती
सुंदर माहिती.