माणकेश्वराची शिव-सटवाई – उत्सव, स्वरूप आणि आख्यायिका

2
107
carasole

मराठवाड्यातील माणकेश्वर गावठाणामध्ये विविध ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या दोन तालुक्यांतील भौगोलिक प्रदेशात आढळतात. माणकेश्वरची निजामाच्या राजवटीचे शेवटचे टोक अशीही ओळख आहे.

शिव-सटवाई ह्या ग्रामदैवताची हेमाडपंथी मंदिरे विश्वरूपा नदीच्या डाव्या तीरावर, माणकेश्वर गावापासून पूर्वेस, एक-दीड किलोमीटर अंतरावर आहेत. शिव आणि सटवाई या दोन देवतांच्या उत्सवप्रसंगी धार्मिक विधी सामुहिक स्वरूपात पार पाडले जातात. ग्रामस्थांमध्ये त्या निमित्ताने ऐक्य व सामंजस्य या भावनांचा सागर ओसंडून वाहताना दिसतो. माणकेश्वरची ख्याती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक – आंध्रापर्यंत पसरलेली दिसून येते.

नदीतीरावर उगमापासून अस्तापर्यंत अनेक शिवालये आहेत. मात्र शिवालयांसंदर्भात आणि तेथे सुरू असणाऱ्या सण-उत्सवासंदर्भात व तेथील देव-देवता यांच्या संदर्भात लिखित स्वरूपाची माहिती उपलब्ध नाही. जी माहिती समोर येते ती तेथील पुजाऱ्यांनी मौखिक स्वरूपात सांगितलेल्या आख्यायिकांवरून.

माणकेश्वर येथील शिव-सटवाई मंदिर आणि माणकेश्वर गाव यांच्या नावासंदर्भात काही आख्यायिका आहेत. माणकेश्वर येथील शिव-उत्सव आणि सटवाई-उत्सव यांचे स्वरूप भिन्न-भिन्न आहे. ते वेगवेगळ्या तिथींना करण्याची प्रथा आहे. शिव-उत्सव श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी आणि महाशिवरात्र या दिवशी केला जातो. सटवाईचा उत्सव बाराही महिने असतो. सटवाईची पूजा आणि तिचा उत्सव प्राचीन मातृसत्ताक समाजव्यवस्थेतून निर्माण झाला. तिच्या उत्सवाकरता कोणताही दिवस ठरलेला नसतो. मात्र मंगळवार, शुक्रवार, चैत्रशुद्ध पौर्णिमा आणि विशेष करून नवरात्र यावेळी सटवाईचा उत्सव थाटामाटात साजरा होतो. ‘बोकडांचे बळी’ हा उत्सवाचा खास विशेष. सटवाई हे जागृत देवस्थान मानले जाते. उत्सव सुगी-सराईचे दिवस संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात भरतो. तिच्या उत्सवाचे खरे स्वरूप नवरात्रात अनुभवण्यास मिळते. इतर वेळी, वर्षभर केला जाणारा उत्सव म्हणजे सटवाईला केलेले नवस फेडण्याचा कुलाचार असतो.

नवरात्र महोत्सव सटवाई मंदिरात घटस्थापनेपासून – आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून – सुरू होतो. त्या नऊ दिवसांमध्ये पहाटेपासून देवीची सिंहासनसदृश पूजा बांधून तिची नित्यपूजाअर्चा व आरती असा कार्यक्रम सुरू होतो. मंदिरात अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. आसपासचे आणि गावातील आराधी देवीची भक्तिगीते तन्मय होऊन गातात. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असंख्य भक्तगण हातात परडी, पाजळण्यासाठी पोत घेऊन उभे राहतात. आराधी तेल जाळून, मंडळास पैसे दान करून सटवाई मातेचे दर्शन घेतात. रात्रभर भक्तिगीतातून आई अंबाबाई सटवाईचा महिमा गायला जातो. पहाटे, देवस्थानच्या ट्रस्टींच्या हस्ते सपत्निक होमाची पूजा केली जाते. ‘आई राजा उदो ऽ उदो ऽ ऽ’ म्हणून देवीच्या नावाचा गजर होतो. शेवटी, ‘दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी’ ही आरती म्हटली जाते. माणकेश्वरमधील शिव आणि सटवाई यांची मंदिरे कोणी बांधली? कधी बांधली? मंदिरावरील मूर्तीची भग्नावस्था कोणी केली? प्राचीन कालखंडात तेथे किती मंदिरे अस्तित्वात होती? मल्लिकार्जुन हे स्वयंभू शिवलिंग आहे का? सटवाई तेथील लोकजीवनात कशी रूढ झाली? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे आख्यायिकांवरूनच संकलित करावी लागतात. माणकेश्वर येथील शिव-सटवाईविषयी मंदिर, दातकोणीचे झाड, समाधी, देवळाली ते माणकेश्वर भुयारी मार्ग, गायनागोबा, पुरलेले धन, बळी प्रथा व विश्वरूपा नदी यांविषयीची आख्यायिका आहेत.

लोकवाङ्मयाच्या अभ्यासकांनी आख्यायिकांचे भटकी दंतकथा (आख्यायिका) आणि स्थानिक आख्यायिका अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. स्थानिक आख्यायिकेचे (दंतकथा) पूजाविधी संदर्भातील आख्यायिका, ऐतिहासिक आख्यायिका, देव-देवतांविषयक आख्यायिका, मंदिर स्थापत्यकलाविषयक आख्यायिका, भगतांच्या गद्यपद्यमिश्रित आख्यायिका आणि नवसपूर्तीच्या आख्यायिका अशा उपप्रकारांत वर्गीकरण केलेले आहे. येथे मी केवळ देव-दैवतविषयक, उत्सवविषयक आणि मंदिर-स्थळविषयक आख्यायिकांचेच विश्लेषण प्रमाण ठेवले आहे.

बाबासाहेब अंधारे नामक ग्रामस्थाने सांगितले, की “मणिकेश्वर या नावावरून आमच्या गावास माणकेश्वर हे नाव पडले असावे.” तसेच र.आ. अंधारे यांनी औरंगाबाद येथील दैनिक ‘समाचार’मधून ‘राजा दक्ष’ने “यहाँ माणिक लिंग की स्थापना की थी| इस लिए इस गाँव का नाम माणकेश्वर कहलाया” अशी माहिती दिली आहे.

सटवाई मंदिर आणि सटवाईविषयक काही आख्यायिका प्रा. डॉ. नवनाथ शिंदे लिखित ‘माणकेश्वराचे शिव-सटवाई’ या ग्रंथामध्ये उपलब्ध होतात. त्या अशा :

• माणकेश्वर येथील शिवमंदिर आसुरी शक्तीद्वारे एका रात्रीत बांधले गेले व नंतर दिवस उगवण्याच्या आधी असुर नाहीसे झाले!
• देवळाली ते माणकेश्वराचे शिवमंदिर यांच्या दरम्यान एक भुयार आहे. देवळाली येथील ग्रामस्थ आबा शंख हे यवनकाळात त्या भुयारी मार्गाचे तीन किलोमीटर अंतर रोज चालत येऊन महादेव मंदिरात तेलाचा दिवा लावत असत.
• महादेव मंदिराजवळच दातकोरणीचे झाड आहे. त्या झाडाला लागणाऱ्या फळांच्या बियांना महादेवाच्या पिंडीचा आकार निसर्गत: प्राप्त झाला आहे. झाडाचा पाला अनेक रोगांवर गुणकारी समजला जातो.
• चालुक्य काळातील राजा दक्ष याने माणिक लिंगाची स्थापना केली होती. म्हणून त्या गावास माणकेश्वर असे नाव पडले.

प्रभाकर देव यांनी ‘Temples of Marathwada’ या शिवमंदिर व शिवविषयक ग्रंथामध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. ती अशी “Mankeshwar is a small village located at the distance of few miles from Osmanabad, a district headquarter of the region. Right in the village is a beautiful antiquarian remain in the form of chalukyan architecture. It is Mahadev Temple.” त्यांच्या मते, शिव म्हणजे मंगल व कल्याण स्वरूप देवता. त्याला महादेव, महेश, नीलकंठ, शंकर अशा अनेक नावांनी संबोधतात. शिवाच्या अशा नामाभिधानावरून मंदिरासही विविध नावे मिळाली असली तरी भाविक भक्तगण त्या मंदिरास शिवमंदिर असेच संबोधतात.

सटवाईच्या नावासंदर्भात शैव पुराणात सांगितलेल्या आख्यायिकेचा संदर्भ असे निर्देशित करतो, की शिवाचे दहा अवतार होते. त्या दहाही अवतारांत शिवाला वेगवेगळ्या दहा बायका होत्या. त्यांतील नवव्या अवतारात शिव मातंग आणि पार्वती मातंग अशा रूपाचा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात सटवाई या नावाचे श्रद्धेचे स्थान आहे. शब्दकोशातील अर्थाप्रमाणे सटवी हे स्त्रीलिंगी नाम असून षष्टी देवता, शूद्र देवता, सटी, सट, सठी, दुर्गा देवता, रान सटवाई, संतुबाई, सुभान, मेहमाता, जातमातृ, छटी, ब्राह्मी, कुमारी, बहुपुत्रिका, वारुषी, यानिका, रौंद्री, घोडा सटवाई अशा तिच्या नावांसंदर्भात आख्यायिका आहेत. पैकी शैव पुराणातील आख्यायिकेस विशेष महत्त्व आहे. मातंग समाजातील शिव आणि मातंगी समाजातील सटवाई पूर्वी एकाच मंदिरात होती. परंतु सटवाईला बकरू (देवीला सोडलेला बोकड) लागतो, म्हणून तिला बाजूला ठेवण्यात आले. सटवाई ही मातंग ऋषींची मुलगी असून महादेव हा मातंग समाजाचा जावई आहे. बकरे पडत असूनसुद्धा दोघे जवळ हायती. मग ती कोण हायती? तर सटवाई आणि महादेव नवरा-बायकोच हायती.

देवीच्या मंदिर स्थापत्याबाबतही काही आख्यायिका सांगितल्या जातात. सटवाईचे मंदिर मूळ पार्वतीमातेचे मंदिर असले पाहिजे. प्रा. रजनी जोशी यांनी ती मंदिरे एकाच वेळची असून जेथे शंकराचे मंदिर असते तेथे पार्वतीचेही मंदिर असलेले दिसून येतेच असे मत नोंदवले आहे. त्यांनी देवी ही एकच असते. तिने अनेक रूपे धारण केलेली असतात अशा ग्रामस्थांच्या सूरात-सूर मिसळलेला आढळतो, तर पुरातत्त्व विद्या शाखेच्या अभ्यासक डॉ. माया पाटील यांनी सटवाईला मातृका म्हटले जाते असा त्यांचा अभिप्राय नोंदवला आहे. माणकेश्वर येथे मातृदेवतेची पूजा-उपासना प्राचीन काळापासून केली जात असली पाहिजे. त्या देवळांशेजारी जगदंबेचे देवालय आहे. ती देवी म्हणजे सटवाई हीच देवी होय असे कुमार जोशी यांना वाटते.

सटवाई देवीबरोबरच तिच्या पायाखाली असणाऱ्या दैत्याच्या अनुषंगानेही सुरेश जगदाळे यांनी सांगितलेली आख्यायिका अशी, “देवीने दैत्याला मारले. त्यावेळी देवीला दैत्याची दया आली. त्याला देवी म्हणाली, ‘बाबा, शेवटचे मागणे काय असेल तर माग.’ दैत्याने मागणी घातली, की ‘माझा जो मांसाहार आहे तो मला शेवटपर्यंत पुरव.’ देवीने ‘हो’ म्हणून दैत्याला वचन दिले. देवीच्या पायाखाली दैत्याची मूर्ती आहे. त्यावरून देवीसमोर बकरे कापले जाते. देवीला मात्र शिवाप्रमाणे गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.”

– प्रा. डॉ. बाळासाहेब दास

संदर्भ –
‘माणकेश्वरची शिव सटवाई’ – डॉ.  नवनाथ शिंदे. (पद्मगंधा प्रकाशन, पुणे.)
प्रा. रजनी जोशी व डॉ. माया पाटील या संशोधकांनी निरीक्षणातून नोंदवलेले निष्कर्ष
डॉ. नवनाथ शिंदे यांनी कुमार जोशी व सुरेश जगदाळे या माणकेश्वरस्थित पुजाऱ्यांची घेतलेली ध्वनिमुद्रित मुलाखत

Last Updated On – 22nd Jan 2017

About Post Author

2 COMMENTS

  1. अप्रतिम माहिती. धन्यवाद.
    अप्रतिम माहिती. धन्यवाद.

Comments are closed.