मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान

अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे. भारतीय साहित्यशास्त्रात ज्याचा उल्लेख केल्याशिवाय वाङ्मयाचा इतिहास पूर्ण होत नाही, असा भारवी हा सिद्धप्रज्ञ नाटककार अचलपूरला होऊन गेला ! स्वामी चक्रधरांचे वास्तव्य अचलपूरला दहा महिने असणे ही अचलपूर तालुक्याच्या व शहराच्या दृष्टीने मोठी सांस्कृतिक उपलब्धी मानली जाते. त्यांनी त्यांच्या सर्व अनुयायांना मराठी भाषेचा दंडक घालून देणारे, ‘महाराष्ट्री असावे’ असे स्पष्टपणे बजावले. त्यांची महती अशी, की त्यांच्या केवळ स्मरणाने, दर्शनाने, संपर्काने लाखो लोक परममार्गी झाले ! गणपत आपे यांनी महिंद्रभटाला म्हटले आहे, की स्वामी चक्रधर हे मराठी अनावर बोलत असत. चक्रधर स्वामी त्यांच्या ‘अनावर मराठी’त रामदरण्याशी बोलताना, सामान्य जनतेशी संवाद साधताना व ‘गरूड घोडियावर बसून आंबिनाथाच्या मंदिरात जात असताना’ येणाऱ्या-जाणाऱ्यांशी बोलत असत. स्वामींचे त्यांच्या अचलपूरच्या वास्तव्यातील हे पराक्रम !

अचलपूरच्या इतिहासात बहुतांश कालखंड हा मुस्लिम राजवटीचा म्हणून हिंदी-उर्दू भाषेच्या प्रभावाचा होता. नागपूरकर भोसले यांची अधिसत्ता गाविलगडावर काही काळ होती. तेवढाच काय तो मराठी शासकाचा सहवास अचलपूरला लाभला. तरीदेखील सामान्य जनतेने मराठी भाषा अधिकाधिक वृद्धिंगत केली.

अचलपूर तालुक्याचा विस्तार 1980 पूर्वी चांदूरबाजारसहित होता. त्यामुळे करजगाव व शिरजगाव, ब्राह्मणवाडा यांसारखी मोठी गावे अचलपूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रात होती. महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव त्या गावांमध्ये विशेषत्वाने होता. करजगाव हे तर त्या चळवळीचे केंद्र होते. सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करजगावला झाले होते ! अचलपूरच्या वाङ्मयीन क्षेत्रातील ती खूप मोठी नोंद होय ! मराठी साहित्याची गंगोत्री रिद्धपूर, आद्य कवयित्री महदंबेचे ढवळे, म्हार्इंभटकृत आद्य पद्य ग्रंथ ‘लीळाचरित्रा’ची निर्मिती, माधानचे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांची विपुल ग्रंथनिर्मिती या घटना अचलपूर व चांदूरबाजार यांचे वाङ्मयीन व भाषिक वैभव वाढवणाऱ्या आहेत.

साहित्य, नाट्य, संगीत या कलांचा वारसा हे अचलपूरचे सांस्कृतिक संचित आहे. बाविशीबावन एक्का ही नाट्यगृहे अचलपूर नाट्य संस्कृतीची ओळख आहेत. मराठी नाटकांची जन्मभूमी पश्चिम महाराष्ट्र ही असल्याचे सांगितले जात असले तरी मराठीतील नाटकाचा पहिला प्रयोग अचलपूरमध्ये झाला असे तेथील जाणकार ठामपणे सांगतात. अचलपूरवासियांनी मास्टर दीनानाथ व बालगंधर्व यांचे आगमन व नाट्याभिनय अनुभवलेला आहे. संगीत क्षेत्रातील नामवंत गायकांनीही अचलपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घातलेली दिसून येते. वसंतराव देशपांडे, हृदयनाथ मंगेशकर, रविंद्र साठे, श्रीधर फडके, भीमराव पांचाळे, अरुण दाते, सुवर्णा माटेगावकर, अजित कडकडे या गेल्या शतकातील गायक-संगीतकारांच्या मैफिलींनी अचलपूरवासियांना मंत्रमुग्ध केले होते. या साऱ्या कार्यक्रमांचे माध्यम मराठी भाषा हेच होते. त्यामुळे मराठी भाषेतील माधुर्याचा लळा येथील रसिकांना लागला. मराठी भाषेने अचलपूर तालुक्यातील रसिकांच्या कलासक्तपणाला तरल बनवण्याचे कार्य केले. कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर, बाबाजी तारे यांची नारदीय कीर्तन शैली व सोबतच तालुक्यातील विविध खेड्यापाड्यांमधून चालणारी वारकरी कीर्तन परंपरा या संवाद माध्यमांनी मराठी भाषेचा प्रसार-प्रचार करण्यास हातभार लावला आहे.

अचलपूर तालुक्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चार अध्यक्ष दिले. प्राचार्य राम शेवाळकर, कादंबरीकार अरुण साधू, गो.नी. दांडेकर, प्रसिद्ध तत्त्वचिंतक व साहित्यिक पु.भा.भावे. ते अचलपूरच्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिकले. दांडेकर यांनी ‘पूर्णामाईची लेकरं’ ही कादंबरी लिहिली. महाराष्ट्राला पुरोगामित्वाची, बुद्धिनिष्ठ दृष्टी देणारे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे वास्तव्य अचलपूरला होते. त्यांनी गाडगेबाबांचे सर्वांगसुंदर वस्तुनिष्ठ चरित्र लिहिलेले आहे. ठाकरे यांचे प्रागतिक विचार महाराष्ट्राला दिशादर्शक ठरले आहेत. मराठी शायरी लोकाभिमुख करणारे भाऊसाहेब पाटणकर यांचा जन्म व बालपणही अचलपूरचेच. अलिकडच्या काळात कवी अनिल पाटील, राजा धर्माधिकारी, गौतम गुळधे, कथाकार शैलजा गावंडे, गजानन मते, चंद्रकांत बहुरूपी, प्रमोद गारोडे असे कलावंत मराठी भाषेच्या प्रसार-प्रचाराचे कार्य करत आहेत.

अचलपूर तालुक्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असल्याने सुजाण रसिकांचे प्रमाणही तेथे अधिक आहे. स्नेहसौरभ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, विवेक पिंपळीकर स्मृती व्याख्यानमाला, सार्वजनिक वाचनालयाच्या व्याख्यानमाला यांचे कार्यक्रम अचलपूर-परतवाड्यात सातत्याने होत असतात. तशा व्याख्यानमालांत शिवाजीराव भोसले, ना.स. इनामदार, यु.म. पठाण, राम शेवाळकर, श्रीकांत तिडके, मुजफ्फर हुसेन, विवेक घळसासी, अनंत अडावतकर, व.पु. काळे, कर्नल सुनील देशपांडे, मा.गो. वैद्य, विजया डबीर, प.सी. काणे, अरविंद खांडेकर, सुशीला पाटील या नामवंत वक्त्यांनी हजेरी लावलेली आहे. अशा व्याख्यानांतून होणारे भाषेचे संस्कार व त्या संस्कारातून अप्रत्यक्षपणे होणारा प्रसार हे भाषासमृद्धीचे सूत्र आहे. त्यात अचलपूर तालुका आघाडीवर राहिला आहे.

विदर्भ साहित्य संघाचे संमेलन आय.ई.एस गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात 1976 मध्ये पार पडले. त्या संमेलनाचे अध्यक्षपद मधुकर आष्टीकर यांनी भूषवले होते. विदर्भ साहित्य संघाची दोन जिल्हा साहित्य संमेलने मधुकर केचे व बाबाराव मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्या साहित्य संमेलनांमधील मराठी साहित्य व भाषा यांच्या प्रसार-प्रचारासंबंधीची मेजवानी अनेकांच्या स्मरणात राहून गेली आहे. भाषा ही समाजाची सांस्कृतिक व सामाजिक ओळख असते. ती जपण्यासाठी विविध उपक्रम घ्यावे लागतात. त्याबाबतीत मराठीच्या संदर्भात अचलपूर तालुक्याचे योगदान संस्मरणीय आहे. स्नेहसौरभ, संस्कार भारती, भारवी नाट्य अकादमी, आंतरभारती, राष्ट्र सेवा दल, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, बामसेफ, विदर्भ साहित्य संघ, प्रतिभा साहित्य संघ अशा संस्था व तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातूनही मराठी भाषा प्रसार-प्रचाराचे कार्य होत आले आहे.

– काशीनाथ बऱ्हाटे 9420124714

————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here