मकर संक्रांत २२ डिसेंबरला हवी

1
39
सूर्याचे उत्‍तरायण
सूर्याचे उत्‍तरायण

सूर्याने एका राशीतून दुस-या राशीत जाण्यास संक्रमण असे म्हणतात. अशा प्रकारे वर्षभरात मेष, वृषभ, मिथुन इत्यादी बारा संक्रमणे क्रमाक्रमाने होत असतात. यांतील सर्वात प्राचीन काळापासून ओळखली गेलेली संक्रमणे म्हणजे कर्क आणि मकर; असे का? त्याचे कारण ते दिवस वर्षातले वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहेत. कर्क संक्रमणाच्या दिवशी आपल्याकडे (उत्तर गोलार्धात) सर्वात मोठा दिवस आणि लहान रात्र असते; तर मकर संक्रमणाच्या दिवशी सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र असते. त्याबरोबरच, सूर्याचे उत्तरेकडे मार्गक्रमण मकर संक्रमणापासून सुरू होते. कारण त्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे झुकू लागतो. यालाच उत्तरायणारंभ म्हणतात. त्या दिवसापासून दिवसाची लांबी वाढू लागते.

मकर संक्रांत १४ जानेवारीला साजरी केली जाते. मकरसंक्रांत १४/१५ जानेवारीला तर टिळक पंचांगानुसार १० जानेवारीला येते. मागच्या शतकात ती १३ जानेवारीस साजरी होत होती तर यापुढे काही वर्षांनी, ती १५ जानेवारीस येत जाईल. हे दिवस काही उत्तरायणारंभाचे नाहीत; त्याचप्रमाणे तो सर्वात लहान दिवस व मोठी रात्र असा वैशिष्ट्यपूर्ण दिवसदेखील नाही. मग संक्रांत या दिवशी का साजरी करायची?

भारतीयांनी कालगणना करण्यासाठी पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमण या गती विचारात घेतल्या आहेत. पण त्याबरोबरच पृथ्वीला आणखी एक गती असते. त्यास परांचन गती असे म्हणतात. परांचन गतीमुळे ऋतू मराठी महिन्यांच्या धर्तीवर मागे सरकू लागतात. आजही आपण चैत्र-वैशाख वसंत ऋतू म्हणतो, वास्तविक सध्या वसंत ऋतूचे आगमन फाल्गुनातच होते! सुमारे दोन हजार वर्षापूर्वी वसंत ऋतू चैत्रातच येत असे; ज्यावेळी धर्मशास्त्राची मांडणी झाली. त्याचप्रमाणे मकर संक्रमण हे देखील २१/२२ डिसेंबर रोजी होत होते, तेंव्हा उत्तरायण आणि मकर संक्रांत हे एकाच दिवशी येत होते. व त्यामुळे उत्तरायणाशी संबंधित व्यक्तिगत व कौटुंबिक आचार हे मकर संक्रांतीस जोडले गेले. पृथ्वीच्या परांचन गतीची माहिती भारतीय धर्माशास्त्रकारांना फार उशिरा झाली. तोपर्यंत उत्तरायण आणि मकर संक्रमण यांच्यात फारकत होऊ लागली होती.

आपण १४ जानेवारीस संक्रांत साजरी करतो, वास्तविक तोपर्यंत थंडीचा बहर कमी होऊ लागलेला असतो. २०५० नंतर संक्रांत १६-१७ जानेवारीस येऊ लागेल आणि पुढे तशीच त्यात एक-एक दिवस वाढ होत राहील. संक्रांतीस धर्मशास्त्राने सांगितलेला आचार हा थंडीशी संबधित आहे, तो काही वर्षांनी आपण उन्हाळ्यात करू लागू! धर्मशास्त्रकारांचा मूळ उद्देश बाजूला राहून केवळ परंपरा म्हणून आपण चुकीच्या वेळी हा सण साजरा करणे योग्य होणार नाही.

संक्रांत साजरा करायचा उद्देश जर अबाधित ठेवायचा असेल तर २२ डिसेंबर (उत्तरायाणारंभ दिन) हाच संक्रांतीचा दिवस योग्य आहे. अन्यथा, १४ जानेवारी आणि १५ जानेवारी ह्या दिवशी संक्रांत हा चुकीच्या परंपरेचा घोळ तसाच चालू राहील!

– मंदार दातार
 

आज आपण १४ जानेवरीस संक्रांत साजरी करतो, वास्तविक तोपर्यंत थंडीचा बहर कमी होऊ लागलेला असतो. २०५० नंतर संक्रांत १६-१७ जानेवारीस येऊ लागेल आणि पुढे असेच त्यात एक-एक दिवस वाढ होत राहील. संक्रांतीस धर्मशास्त्राने सांगितलेला आचार हा थंडीशी संबधित आहे, तो काही वर्षांनी आपण उन्हाळ्यात करू लागू. धर्मशास्त्रकारांचा मूळ उद्देश बाजूला राहून केवळ परंपरा म्हणून आपण चुकीच्या वेळी हा सण साजरा होत राहील.

संक्रांत साजरा करायचा उद्देश जर अबाधित ठेवायचा असेल तर २२ डिसेंबर (उत्तरायाणारंभ दिन) हा एका वेगळ्या नावाने हा दिवस साजरा करावा. किंवा सध्याच्या परंपरेनुसार १४ जानेवारी किंवा १५ जानेवारी दिवशी तीळ गूळ देऊ गोड बोलण्याचे वृत किंवा निश्चय परत करावा.

– अरविंद परांजपे
संचालक, नेहरू तारांगण
paranjpye.arvind@gmail.com

Last Updated On – 22th Dec 2017

About Post Author

1 COMMENT

  1. या लेखामध्ये मांडलेला
    या लेखामध्ये मांडलेला मकरसंक्रांत या सणाचा शास्त्रीय विचार थोडा चुकला आहे. शास्त्राप्रमाणे पाळावयाचे नियम जरी हिवाळा या ऋतूशी निगडीत असले तरी मकरसंक्रांत सन केव्हा साजरा करतात हे कारण मात्र चुकले आहे.
    मकरसंक्रांत म्हणजे मकर राशीत सूर्याने केलेला प्रवेश. १४ जानेवारी या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे या दिवशी मकरसंक्रांत साजरी करतात. त्याचा उत्तरायण प्रारंभ होण्याशी काहीही संबंध नाही.
    पुढील काही वर्षांनी हा सण १६ अथवा १७ जानेवारीस साजरा करण्यात येईल याचे कारण पृथ्वीचा आस अत्यंत सूक्ष्म गतीने बदलत आहे. त्याला शास्त्रात अयनांश म्हणतात. त्याचा परिणाम सूर्य व पृथ्वीच्या परस्पर भ्रमणावर होतो. त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे काही शतकांनी ऋतुमान इंग्रजी कालगणनेनुसार बदलेल. परंतु भारतीय पंचांगानुसार बदलणार नाही कारण हा अयनांश परिणाम आपण आधीच लक्षात घेतलेला आहे.
    भारतीय शास्त्रकार अतिशय हुशार व प्रगल्भ होते. आपल्या शास्त्रात फार अपवादानेच त्रुटी आढळू शकतील. त्यामुळे भारतीय सणांची सांगड इंग्रजीशी घातली कि असा घोटाळा होणारच!

Comments are closed.