राजाराम महाराजांचे इटालीमध्ये स्मारक ! (Rajaram Maharaj Memorial In Italy)

0
200

कोल्हापूरचे महाराज राजाराम (दुसरे) ह्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1870 मध्ये युरोपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जनसामान्यांत आणि काही कुटुंबीयांतही नाराजी उमटली. समुद्र ओलांडण्याला सनातनी हिंदुधर्मात मान्यता नाही असा समज होता ना ! पण राजाराम महाराज ती सर्व नाराजी ओलांडून निर्धाराने युरोपात गेले, कारण त्यांना युरोपीय शिक्षणपद्धत समजाऊन घेऊन ती स्वतःच्या संस्थानात सुरू करायची होती. राजाराम महाराज स्वतः इंग्रजी शिकलेले होते. त्यांनी उत्तम संभाषण इंग्रजीत करण्याइतकी पात्रता मिळवली होती. ब्रिटिशांनी राजाराम महाराजांना राज्यकारभार व शालेय शिक्षण, दोन्ही चांगल्या प्रकारचे देण्याची व्यवस्था केली होती.

कोल्हापूरच्या गादीवर बसलेले, परंतु इतिहासात ख्यातनाम नसलेले अनेक राजे होऊन गेले. त्यांपैकी एक राजाराम महाराज दुसरे होत. त्यांचे आयुष्यच अवघ्या वीस वर्षांचे आणि त्यांची कारकीर्द फक्त चार वर्षांची ! त्यामुळे त्यांचा परिचय इतिहासाच्या पुस्तकातून होत नाही. इतिहासात, त्यांचा उल्लेख राजाराम महाराज (दुसरे) असा होतो.

शिवाजी महाराजांच्या पश्चात वारसांत कलह माजला आणि राज्याचे दोन भाग झाले – कोल्हापूर व सातारा. भोसले घराण्यातील रक्ताचे वारस 1760 मध्ये संपले, तेव्हा जवळच्या नातलगांमधून दत्तक घेतले गेले. दत्तक व्यक्ती अधिकृत गादीवर बसू लागल्या. कोल्हापूरचे महाराज बाबासाहेब यांनी त्यांची बहीण आऊबाई पाटणकर हिचा मुलगा नागोजीराव याला वयाच्या सोळाव्या वर्षी दत्तक घेतले. बाबासाहेब यांचे नावही शिवाजी असेच होते. बाबासाहेबांनी दत्तक मुलाचे नाव राजाराम असे ठेवले. तेच राजाराम महाराज (दुसरे). राजाराम (दुसरे) गादीवर बसले तेव्हा ते फक्त सोळा वर्षांचे होते.

राजाराम महाराज (दुसरे) यांनी लंडनला प्रयाण 22 मे 1870 या दिवशी केले. त्यांनी प्रवासात डायरी लिहिण्याची पद्धत ठेवली होती. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची हकिगत कळते. ते ब्रिटिश महाराणींना भेटले, त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठ व इतर अनेक संस्था बघितल्या, महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, ब्रिटिश संसदेचे कामकाज अनुभवले; त्यांनी ब्रिटिश सर्वसामान्य लोकांचे जीवनही बघितले, नाटके बघितली, त्यांतील काय आवडले / नाही याबद्दलच्या नोंदीही त्यांच्या डायरीत मिळतात.

त्यांचा हिंदुस्तानात परत येण्याचा प्रवास इटालीमार्गे होता. परंतु त्यांना फ्लॉरेन्समध्ये हवामान सोसले नाही आणि ते आजारी पडले. ब्रिटिश सरकारने त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार करण्यास सुचवले, तशी तयारी केली. परंतु राजाराम महाराज यांनी त्यांच्याकडून उपचार करून घेण्याचे नाकारले. महाराजांच्या बरोबरच्या लोकांमध्ये एक मोहामेडन डॉक्टर होता, राजाराम महाराजांनी त्याच्याकडून उपचार करवून घेतले. पण उपचारांचा उपयोग झाला नाही आणि राजाराम महाराज यांचे निधन 30 नोव्हेंबर 1870 रोजी झाले. त्यांच्या बरोबरच्या मंडळींनी त्यांचे अंत्यसंस्कार हिंदू धर्माप्रमाणे व्हावेत असा आग्रह धरला, मात्र त्या वेळी इटालीमध्ये मानवी देहाचे दहन करण्यास परवानगी नव्हती.

राजाराम महाराजांच्या युरोपच्या प्रवासाच्या डायरीस पुरवणी म्हणून त्यासंबंधीचा मजकूर असा दिलेला आहे- “शेले (Shelley) या प्रख्यात कवीचे मृत्यूनंतर दहन 1822 साली इटालीमध्ये झाले होते. ते वगळता, त्या देशात शतकभरात मृत देहाचे दहन या संबंधाने कोणी काही ऐकले नव्हते. इतकेच नाही तर फ्लॉरेन्स शहराच्या कायद्यानुसार कोणाही व्यक्तीचे निधन झाल्यास दफन करणे बंधनकारक होते. अन्यथा दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होती. परंतु ब्रिटिश मंत्री सर ऑगस्टस पॅगेट यांनी मनावर घेतले. खूप परिश्रम केले आणि अखेर सिनॉर पेरूझी यांनी अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांना विनवून महाराजांच्या उत्तरक्रियेला – शवाचे दहन करण्याची – परवानगी मिळवली. महाराजांच्या मृत्यूला चोवीस तास होऊन गेल्यावर, त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांनी अग्नी दिला.”

शेले हा इंग्रजी कवी इटालीमध्ये त्याच्या दोन दोस्तांसह – एडवर्ड विल्यम्स व चार्लस् व्हिव्हियन एरियल- नौकेतून प्रवास करत असताना त्यांची नौका उलटली आणि तिघेही जण बुडून मरण पावले. शेले यांचे शव 8 जुलै 1822 रोजी कुजलेल्या अवस्थेत सापडले. त्याची ओळख पटली ती त्याच्या कोटात सापडलेल्या जॉन किट्स या कवीच्या कवितांच्या संग्रहाच्या एका प्रतीमुळे. शेले याचे शव प्रथम वाळूत पुरले होते. मात्र त्याचा नव्यानेच झालेला मित्र, एडवर्ड ट्रेलॉनी याने शवाचे दहन करण्यासाठी इटालीतील अधिकाऱ्यांशी कित्येक आठवडे वाटाघाटी/चर्चा/वादविवाद केले आणि अखेर 16-8-1822 रोजी शेले याच्या उरलेल्या शवाचे दहन झाले. दहन झाले त्यावेळी ले हंट आणि लॉर्ड बायरन उपस्थित होते. हंट हा शवाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे गाडीत जाऊन बसून राहिला, बायरन घाईघाईने घरी परतला. त्या अंत्यसंस्कारासंबंधी आणखी उद्बोधक माहिती अशी मिळते, की अंत्यसंसस्कार व्हायारेजियो जवळील समुद्रकिनाऱ्यावर झाले. ते मूर्तिपुजकांच्या परंपरेनुसार झाले. दहन होण्यापूर्वी मसाले, सुगंधी द्रव्ये, वाईन अर्पण केली गेली. आश्चर्य असे, की शेले याचे हृदय जळून गेले नाही. ते त्याच्या पत्नीच्या स्वाधीन केले गेले. तिने ते स्वतःचा मृत्यू 1851 मध्ये होईपर्यंत एका रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवले होते ! त्या अंत्यसंस्काराचे रंगीत रेखाटन माहितीजालावर उपलब्ध आहे.

शेले याचे दहनही इटालीमध्ये त्या गोष्टीला बंदी असताना खास परवानगी मिळवून केले गेले. फ्लॉरेन्स नगरपालिकेने एक अधिकृत निवेदन या संबंधात प्रसृत केले. त्यात दहन कसे झाले याची हकिगत दिली आहे. डायरीला असलेल्या पुरवणी मजकुरात तेही निवेदन आहे. “कोल्हापूरचे महाराजा यांच्या शवाचे दहन व मिरवणूक याबाबतचे निवेदन –1 डिसेंबर 1870 रोजी मध्यरात्री 1 वाजता, मॅनीन चौकातील हॉटेल डेल्ला पेसमध्ये, मी, खाली हस्ताक्षर करणारा, नगरपालिका स्वच्छता प्राधिकरणाचा सचिव आणि पोलिस संचालक, सिनॉर पिअर सारूझो सियाती यांच्यासह महापौरांच्या आज्ञेनुसार या अंत्यविधीच्या यात्रेला व दहनाला उपस्थित राहिलो. मिरवणूक निघण्यापूर्वीची कार्यपद्धत निश्चित स्वरूपात माहीत नाही. हे गृहीत धरले आहे, की शवाला आंघोळ घातली गेली असेल आणि त्यावर कदाचित नॅफ्था शिंपडला गेला असेल.”

यानंतर निवेदनात बरेच तपशील आहेत, पण त्यांतील काही चुकीचे आहेत असे संपादकांनी म्हटले आहे. उदाहरणार्थ, “ मृताच्या शवावर घातलेली आवरणे व अलंकार ही खूप किंमतवान होती. त्यांत मोत्यांचा कंठा, सोन्याचे कडे, पगडीवर भारी किंमतीचा शिरपेच आणि इतर अनेक बारीकसारीक रत्ने” हा नगरपालिकेच्या निवेदनातील मजकूर चुकीचा आहे. मृताच्या देहावर किंमतवान अशी एकच गोष्ट म्हणजे शाल होती अशी तळटीप संपादकांनी जोडली आहे. राजाराम महाराजांची डायरी त्यांच्या निधनानंतर सुमारे दोन वर्षांनी प्रकाशित केली गेली. त्या डायरीचे संपादक म्हणून कॅप्टन एडवर्ड डब्ल्यू वेस्ट यांचे नाव दिलेले आहे. ते कोल्हापूर संस्थानच्या पोल्टीकल एजंटचे सहायक होते.

नगरपालिकेच्या निवेदनात प्रत्यक्ष संस्कार कोणते केले गेले याचे आणखी काही तपशील येतात- मृताचे पाय पौर्वात्यांच्या रिवाजानुसार, पायांची घडी घालून शरीरावर ठेवले होते. हिंदुस्थानी लोकांना नवी पालखी मिळवण्यात यश आले नाही, त्यामुळे बघ्यांची गर्दी टाळण्यासाठी हॉटेलच्या मालकीच्या एका ओम्नी बसमधून मृतदेह, एका फळीवर घालून नेण्यात आला. त्या ओम्नी बसच्या मागोमाग कॅप्टन वेस्ट (राजपुत्राचे लष्करी मदतनीस) एका गाडीत बसून गेले. अंत्यसंस्काराची वेळ भल्या रात्रीची होती आणि हवाही वाईट होती; तरीही अनेक घोडागाड्या तेथे पोचल्या व लोक मोठ्या संख्येने त्या प्रसंगी हजर राहिले. दहनाची जागा जेथे निश्चित केली होती, तेथे लाकडांची एक रास उभी केली होती, तेथे एका हिंदुस्थानी अनुचराने मातीचे काळे मडके फोडले. चौकोनी आकाराच्या लाकडांच्या ढिगावर (चितेवर) मृतदेह हातांनी उचलून ठेवला गेला. मृताच्या एका नोकराच्या हातात एक मंद प्रकाश देणारा कागदी कंदील होता. त्या मंद प्रकाशामुळे प्रेतावर काही द्रव शिंपडणे व इतर विधी, जे पौर्वात्यांच्या ग्रंथात वर्णन केलेले आहेत, ते जमलेल्या उत्सुक लोकांना दिसले नाहीत.

पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास मृतदेह लाकडाच्या सुमारे तीन फूट उंचीच्या राशीवर ठेवला गेला. मृताचा चेहरा व्यवस्थित हजामत केलेला होता. त्यावरील आवरण दूर करून चेहरा पूर्व दिशेकडे वळवून ठेवला गेला. ब्राह्मणांनी मृताच्या चेहेऱ्यावर तूप, कापूर, चंदनआणि इतर सुगंधी द्रव्ये चोपडली. त्याच प्रमाणे मृताच्या मुखात एक सोन्याचे नाणे आणि विड्याची पाने ठेवली. (संपादकांनी तळटीप जोडली आहे, की महाराजांच्या बरोबर आलेल्या लोकांत कोणीही ब्राह्मण नव्हता.) लाकडाच्या तुकड्यांमध्ये लहान आकाराचे मातीचे काही गोळे होते, त्यांना पीठ लावलेले होते. लाकडे घुमटाकार रचली होती, त्यामुळे मृत देहाचा मधला भाग झाकला गेला होता. त्याच्यावर बर्च झाडाच्या फांद्या होत्या. त्यांना काही सुगंधी द्रव्ये लावलेली होती.

अंत्यसंस्कार सकाळी सुमारे दहा वाजता समाप्त झाले. हिंदू लोकांना जमावापासून पोलिसांनी संरक्षण दिले होते. त्यानंतर जमलेल्या लोकांपैकी काहींनी नदीचे पाणी लाकडाच्या राशीतील उरलेल्या लाकडांवर शिंपडले आणि अग्नीतून वाचलेल्या अस्थींचे तुकडे गोळा केले. सर्वांनी ते काळजीपूर्वक एकमेकांच्या हाती सोपवत अखेर एका पोर्सेलीनच्या कुंडीत जमा केले. तिला लाल कापड बांधून, ती मेण लावून घट्ट बंद केली गेली.

ह्या विस्तृत निवेदनावर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहे.

इटालीच्या लोकांमध्ये राजाराम ह्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल कुतूहल असणे  फ्लॉरेन्स नगरपालिकेने ते शमवण्याचा प्रयत्न करणे हे समजू शकतेत्याच बरोबर ख्रिस्ती परंपरेत  बसणाऱ्या कृत्यांना परवानगी देणे सत्ताधाऱ्यांना खूप अवघड गेले हेही नोंदले पाहिजे. माहितीजालावर themrityu.substack.com या पोर्टलवर एक लेख यासंबंधी उपलब्ध आहे. त्यात असे म्हटले आहे, की “राजाराम यांच्या अंत्यसंस्कारामुळे इटालीत राजकीय चर्चा सुरू झाली. थॉमस लॅकूर या इतिहासकाराने नोंदले आहे, की त्यावेळी अंत्यसंस्कारामुळे इटालीमध्ये राजकीय व धार्मिक वातावरण खूपच तापले होते. डॉक्टर्स, वैज्ञानिक, प्रागतिक विचारवादी, सकारात्मक भूमिकावाले रिपब्लिकन लोक दहनाच्या बाजूने होते.”

लेखात पुढे अशी माहिती मिळते, की “इटालीमध्ये पहिले कायदेशीर मान्यता मिळालेले पार्थिवाचे दहन 1876 मध्ये मिलान शहरात सिमिटेरो मॅजिओर (Cimitero Maggiore) मध्ये झाले. ते पार्थिव जर्मन उद्योजक आल्बर्टो केलर यांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी त्याच्या पार्थिवावर दहनसंस्कार झाले होते.”

राजाराम महाराज अवघे काही महिने इंग्लंड आणि युरोपात राहिले. मात्र त्यांच्याबद्दल युरोपात विलक्षण कुतूहल निर्माण झाले होते. ते बऱ्याच प्रमाणात शमवणारा लेख ‘गुड वर्डस’ नियतकालिकात जून 1871 मध्ये प्रकाशित झाला. त्या लेखाच्या लेखिका होत्या लेडी व्हर्न. त्या लेखातील महत्त्वाचा भाग –

“ही पहिली वेळ होती की राज्यारूढ असलेला हिंदू राजा इतक्या लांबवरच्या प्रवासाला निघाला होता. ते समुद्र ओलांडणार या कल्पनेने त्यांच्या लोकांत विषाद निर्माण झाला होता. तो चांगले इंग्रजी बोलू शकत होता व त्याने आधुनिक इतिहासाचे ज्ञानही काही प्रमाणात मिळवले होते. तो दिसत जरी मोठा होता तरी फक्त वीस वर्षांचा होता. नैसर्गिक असा रुबाब त्याच्यात होता. त्याचा पोशाख नेहेमी गर्द हिरव्या रंगाचा कोट व डोक्याला लाल मासळी कापडाची गुंडाळी करून बांधलेली असे. त्याचे लग्न अगोदरच झाले होते आणि तो येथे येण्यास निघण्यापूर्वी अगदी थोडा काळ अगोदर त्याला एक अपत्य झाले होते. परंतु ते अपत्य ‘फक्त मुलगी’ असल्याने त्याची निराशा झाली होती. कारण मुली वारसा हक्काने राज्यावर बसू शकत नाहीत.

राजासाठी आणखी एक मुलगी राखून ठेवली होती. ती आता सात वर्षांची आहे. राजाराम त्याच्या इंग्लिश मित्रांना म्हणाला होता, की मी माझ्या राणीला तुम्हाला भेटण्यास आणीन, पण ती राणी म्हणजे त्याच्या मुलीची आई. ही, त्याच्यासाठी राखून ठेवलेली मुलगी नव्हे.

त्याला इंग्लंडमधील सर्वसामान्य जीवन बघायचे होते, त्यानुसार तो एका कंट्री हाऊसमध्ये राहिला होता. त्याच्याबरोबर तेरा नोकर होते. राजा व त्याची माणसे यांनी त्यांचे स्वतःचे अन्नपदार्थ – तांदूळ, मसाले, मांस, पीठ आणले होते. ते शिजवलेले अन्न उदारपणे सर्वांना देत- वाटत असत, पण त्याची चव फार तिखट असे. ती सर्व मंडळी बोटे वापरून जेवत आणि नंतर लगेच हात स्वच्छ धुत असत… त्यांच्या अन्नावर ‘द्विज’ सोडून – ब्राह्मण व क्षत्रिय – अन्य कुणाची सावली पडू दिली जात नसे.

राजा अत्यंत दयाळू व सौजन्यशील होता. तो Croquet हा लाकडी चेंडूचा खेळ अत्यंत उत्साहाने खेळत असे.

त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ अशा शब्दांत व्यक्त झाली – “अशा तऱ्हेने, आपल्या हिंदुस्तानीच काय पण इंग्लिश मित्रांपासूनही खूप लांब अंतरावर आणि आपली तरुण पत्नी व मुलगी यांना मागे ठेवून बिचारा Poor Boy King मरण पावला. त्याला कोल्हापूरच्या शिक्षणपद्धतीत सुधारणा करायची होती. त्याने खास इच्छा व्यक्त केली होती ती त्याच्या राणीला शिक्षण देण्याची.”

राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर, चार वर्षांनी म्हणजे 1874 मध्ये, त्यांचा अर्धपुतळा इटालीत कॅसिन पार्कमध्ये उभारला गेला. शिल्पकार चार्लस फुलर यांनी तो तयार केला होता. अर्धपुतळ्याचा खर्च ब्रिटिश सरकारने दिला. राजाराम यांनी ज्या वास्तुशिल्पकार चार्लस् मँट याला कोल्हापुरात अनेक सार्वजनिक इमारती उभारण्याचे काम दिले होते, त्याने त्या अर्धपुतळ्यासमोरचा तंबू उभारला. स्मारकाच्या तळाशी इंग्रजी, इटालियन, हिंदी आणि पंजाबी या भाषांत मजकूर कोरलेला आहे. स्मारक 1872 मध्ये उभे झाले; त्यानंतर त्या स्मारकाच्या बाजूला इंडियन पॅलेस कॅफे उघडला गेला, तेथे बसून कॉफी पीत पीत राजाराम महाराज यांच्या अर्धपुतळ्याकडे नजर टाकता येते.

राजाराम महाराज यांच्या स्मरणार्थ 1972 साली फ्लॉरेन्समध्ये आधुनिक असा एक पूल उभारला गेला, त्याला हिंदुस्थानी (भारतीय) माणसाचा पूल – Ponte all Indiano – असे नाव दिले आहे.

– मुकुंद वझे 9820946547 vazemukund@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here