भारूड (Bharud)

0
82
_Bharud_1_0.jpg

भारूड या लोककलेचे ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल आकर्षण आहे. भारूडाचे आयोजन स्वतंत्रपणे वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, यात्रा आणि तशा इतर उत्सवांमध्ये केले जाते. त्या कलेत लोकमानस जिंकण्याची ताकद आहे, तेवढी ती रंगतदारही आहे. प्रबोधन हा त्या कलेचा गाभा आहे. भारूड नाट्य, वक्तृत्व आणि संगीत यांच्या मिलाफातून रंगत जाते. ते अध्यात्माच्या प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम आहे. संत एकनाथ हे या कलाप्रकाराचे जनक मानले जातात.

भारुडाची बैठक थोड्याबहुत फरकाने कीर्तनासारखी असते. भारूड पथकात मध्यभागी वीणेकरी, त्याच्या एका बाजूला मृदंगवादक व दुसऱ्या बाजूला पेटीवादक (हार्मोनियमवादक) असतो आणि भोवताली पंधरा-वीस टाळकरी असतात. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठऽऽल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर सुरुवातीला होतो आणि ‘विठोबा रखुमाई’ चे भजन सुरू होते. भजन उत्साहाने बराच वेळ गायले जाते आणि शेवटी, रंगात आलेल्या श्रोत्यांना सोबत घेऊन ‘पुंडलिक वरदे’चा जयघोष होतो. सभामंडप दुमदुमून जातो.

उत्साह, लगबग, रंगतदार चाली, संगीत, खुसखुशीत निवेदन हे भारूडाचे महत्त्वाचे घटक असतात. भजन संपले, की निवेदक (भारूडकार) उभा राहतो आणि श्रवणीय शैलीत लोकांच्या डोळ्यांसमोर चित्र उभे करतो. भारुडाच्या आरंभी लोकांना ते एका गावात घडणारी नित्याची कथा ऐकत आहेत अशी कल्पना तयार होते. गावाचा दिनक्रम पहाटेपासून सुरू होतो, सडा-रांगोळी होते, पक्ष्यांचा किलबिलाट, गुरांचे हंबरणे आणि अशा तजेलदार वातावरणात जात्यावर ओव्या गाणार्‍या महिला सुरात गाऊ लागतात.

सुंदर माझं जातं ग, फिरतं बहुत…
ओव्या गाऊ कौतुके तु,
ये रे बा विठ्ठला…

भारुडात मध्ये-मध्ये लोकसंस्कृतीतील अशा गीतांची पेरणी केली जाते. त्यानंतर निवेदकाचे ग्रामवर्णन सुरू असते. तेवढ्यात, ‘दान पावलं, दान पावलं’ म्हणत वासुदेवाची स्वारी गाव जागवण्यासाठी मंचकावर हजर होते. मोरपिसाची टोपी घातलेले त्याचे रूप पाहून पहाट झाल्यासारखे वाटू लागते. तो लोकांना अभंगामधून रामनाम जपण्याचा उपदेश देऊन नाचत-नाचत निघून जातो. तेवढ्यात जोशीबुवा हातात काठी घेऊन हजर होतात. जोशीबुवा लोकांना चार उपदेश करतात आणि निघून जातात. एकामागे एक येणाऱ्या त्या लोककलावंतांचा ठसा श्रोत्यांच्या मनावर उमटत असतो, उत्सुकता वाढत जाते. तेवढ्यात जोरजोरात आरोळ्या ठोकत, तोंडाने भयावह आवाज काढत, हातातील आसुडाचे फटके अंगावर घेत मरीआईचा भक्त येतो. तो कडकलक्ष्मीचा अवतार पाहून मुले आईला बिलगतात. श्रोतृवर्ग तो रुद्र अवतार कुतूहलाने पाहू लागतो. ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत, देवीला प्रश्न विचारले जातात. सहसा, ते प्रश्न विनोदी ढंगाचे असतात, पण त्यातून प्रबोधनही केले जाते.

ग्रामजीवनातील एकेक प्रश्न कोणत्या ना कोणत्या कलाप्रकारातून उलगडत जातो, संसारातील वैताग मांडला जातो; तसाच, आनंदही व्यक्त केला जातो. भारूड सादर करणारी मंडळी त्यांची श्रोत्यांवर असणारी पकड कधीही सैल होऊ देत नाहीत. भारूड निवेदनासोबत संगीत आणि नाट्यमय प्रसंगांची पेरणी करत पहाटेपर्यंत रंगत जाते. मग त्यात ‘विंचू चावला’, ‘दादल्या नको गं बाई’ अशी रंगतदार भारुडे लोकांना पोटभर हसण्यास लावतात आणि संसारातील गुपिते उघडी करून टाकतात. भारूडांमध्ये वरवर पाहिले असता विनोद व मनोरंजन दिसते, पण ती गीते व अनुषंगाने येणाऱ्या कथा या रूपक अलंकाराने युक्त असतात. बहुतांश भारूडांमधून भौतिक सुखांचा उपभोग घेत असतानाच, उपभोगांवर मर्यादा ठेवून परमार्थ कसा साधावा याबाबतचे आध्यात्मिक मार्गदर्शन असते.

– संकलन (नितेश शिंदे)

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here