बलुतेदारी पद्धतीची बीजे भारतात नवाश्मयुगात रोवली गेली असावी. नवाश्मयुगातील शेती आणि गाववसाहती ही भारतीय माणसाच्या जीवनातील फार मोठी उत्क्रांती होय. माणूस समुहाने वस्ती करून राहू लागला. त्यामुळे आणि शेतीमुळे त्याच्या गरजा वाढल्या. गरजा पूर्ण होण्यासाठी माणसाला काही कौशल्ये आत्मसात करून घ्यावी लागली. त्यांवर आधारित निरनिराळ्या व्यवसायांची निर्मिती झाली. ती व्यावसायिक कामे कुशल माणसांवर सोपवली गेली. जसे, की मातीची भांडी, रांजण, मडकी ह्या दैनंदिन गरजेच्या वस्तू तयार करणारे कारागीर, शेतीच्या कामात येणारी शेतीची अवजारे (नांगर, वखर) तयार करणे- ती दुरुस्त करणे या आणि इतर अनेक कामांसाठी वस्तू निर्माण करणारे कारागीर तयार झाले. त्या तशा कारागीरांना त्यांच्या कार्याचा मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूंच्या स्वरूपात दिला जाई आणि तेथूनच विनिमय पद्धत रूढ झाली. गरजेनुसार वस्तुनिर्मिती करणारे कुशल कारागीर आणि निर्माण केलेल्या वस्तूंची देवाणघेवाण धान्याच्या किंवा इतर वस्तूंच्या रूपात करण्याची पद्धत असल्याबाबतचा उल्लेख नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात आढळतो.
कालांतराने, वेगवेगळ्या कुशल कारागीरांचा तो तो व्यवसाय झाला. ते व्यवसाय वंशपरंपरेने पिढ्यान् पिढ्या चालत परंपरागत झाले. ते ते काम करणाऱ्या कामाच्या विभागणीवरून जाती निर्माण झाल्या. जसे, लाकडापासून वखर, नांगर, तिफण, मोगाडे, डवरा आणि अशी शेतीवाडीशी संबंधित अवजारे तयार करणारे कारागीर म्हणजे सुतार (सुताराला ग्रामीण बोलीभाषेत ‘वाढई’ हे संबोधन वापरतात); लोखंडापासून फाळ, फास, विळे, खुरपे आणि तत्सम वस्तू तयार करणारे लोहार (खाती); न्हावी (माली); कपडे धुणारे धोबी (वरठी);पळसाच्या किंवा मोहाच्या पानापासून पत्रावळी तयार करणारे भुणिक; मेलेल्या प्राण्यांच्या चामड्यापासून चपला-जोडे तयार करणारे चर्मकार(चांभार); कपडे शिवणारे शिंपी… अशा कुशल कारागीर असणाऱ्या समुहांच्या त्यांच्या त्यांच्या कार्याच्या विभागणीनुसार जाती अस्तित्वात आल्या. तसे कुशल कारागीर पुढे बलुतेदार म्हणून नावारूपाला आले. स्थलकालपरत्वे, वेगवेगळ्या प्रांतांत आणखी काही बलुतेदार असल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. ‘बलुतेदार’ हा शब्द बऱ्याच खेड्यांत व्यावहारिक दृष्ट्या वापरला जात नाही. तर सुतार, लोहार, धोबी, न्हावी यांच्यासाठी त्यांच्या भागात ‘आयकिरी’ हा शब्दप्रयोग करतात. आयकिरी हा शब्द प्रमाणभाषेतील नसावा. तो शब्द मराठी शब्दकोशात आढळून येत नाही. ‘आयकिरी’ शब्दाला समान वेगवेगळे शब्दप्रयोग स्थानिक बोलीभाषांत असू शकतात.
वस्तुविनिमय पद्धत जवळपास सर्व खेड्यांतून वर्तमान स्थितीत हद्दपार झालेली आहे. सुतार, लोहार, न्हावी रोख पैशांच्या बदल्यात कामे करतात. ‘पैसा’ हे विनिमय म्हणजे देवाणघेवाणीचे साधन झालेले आहे. त्याला कारणेही अनेक आहेत. पण साधारणतः दोन दशकांपूर्वीपर्यंत सुतार, लोहार, न्हावी, धोबी, चांभार हे कुशल कारागीर धान्याच्या मोबदल्यात त्यांची सेवा गावाला देत असत. त्याला ‘दान’ म्हणत. दानीच्या स्वरूपात ते गावकऱ्यांना लागणारी अवजारे वर्षभर करून देत. गावच्या भुणिकाकरवी एक पुकार घालून गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील पाटील, सरपंच आणि काही मानवाईक मंडळी गावातील मध्यभागी, मंदिराच्या पारावर एकत्र येत. त्यांच्या त्या बैठकीला गावातील सर्व कृषकवर्ग म्हणजे शेतकरी हजर राहत असे. बैठकीत खाती, वाढई, न्हावी, वरठी, भुणिक, गुराखी ह्यांना बोलावण्यात येई. प्रमुख मंडळी सभेत त्यांच्या कामाचा मोबदला ठरवत. तो मोबदला धान्याच्या रूपात ठरवला जाई. त्यांना चार किंवा पाच कुळव ज्वारी (अथवा त्या प्रदेशातील गहू, तांदूळ असे मुख्य धान्य) वर्षाकाठी द्यायचे; सोबत दोन दोन पायल्या (पायली हे माप) हरभरे, तुर, जवस, उडीद, गहू असे शेतात पिकणारे काही दैनंदिन गरजेचे धान्य ठरवले जाई. त्याला बोलीभाषेत ‘दान’ असे म्हणतात. ‘दान’ ठरवताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाई. ते दानीचे वर्ष ‘मांडवस’ म्हणजे गुढीपाडवा या सणापासून तर पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत असे. त्यांच्यासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांचा ‘वांगोळा’(वांगुळा) [शेतकरी शेताच्या एखाद्या छोट्याशा कोपऱ्यात वांगे, टमाटर, मिरची अशा भाजीपाल्याची सोय करण्यासाठी लागवडीसाठी वापरली जाणारी जागा म्हणजे वांगोळा. भेद्रे म्हणजे टमाटर.] हक्काने मोकळा असे. वांगुळ्यातील वांगी, मिरची, भेद्रे, शेंगा वगैरे तोडण्यास कधीच कोणी मनाई करत नव्हते. त्यामुळे भाजीपाला विकत घ्यावा लागत नसे. एकेका गावात वाढई, खाती, वरठी, भुणिक समाजाची तीन-चार घरे असत. ते त्यांचे त्यांचे शेतकरी वाटून घेत. त्यामुळे सारे सुरळीत चाले. शेतीच्या हंगामात प्रत्येकाला घाई असे. तशा वेळी कास्तकार गोडीगुलाबीने कामे करून घेई. सारे एकमेकांवर अवलंबून असे. प्रत्येक ‘आयकिरी’चे व्यवहार दानीच्या म्हणजे धान्याच्या स्वरूपात असत. त्याला मांडवस, नागपंचमी, पोळा आणि अशा काही प्रमुख सणांच्या दिवशी जेवणासाठी बोलावले जाई. [दान म्हणजे धान्याच्या रुपात केलेला विनिमय किंवा व्यवहार. शेतकरी बलुतेदारांना दानीच्या स्वरुपात धान्य देत त्याला बोलीभाषेत ‘दान‘ म्हणतात. दानीचे वर्ष मांडवस ते मांडवस म्हणजे यंदाचा गुढीपाडवा ते पुढच्या गुढीपाडव्यापर्यंतचाकालावधी] धोबी गावातील प्रत्येक कुटुंबाचे कपडे धुऊन, वाळवून, नीट घड्या घालून घरी आणून द्यायचे. ते रात्रीच्या वेळी मोठे पसरट भांडे – त्यात वाट्या वगैरे ठेवून पाच-दहा घरचे शिजवलेले अन्न मागत. तो त्यांच्या कामाचा मोबदला असे. कधी, धोबी जेवण मागण्यास आला नाही, तर घरच्या मंडळींना चुकचुकल्यासारखे वाटे. त्यात प्रेम होते. आपलेपणाची, आपुलकीची भावना होती. धोबी जेवण घेण्यासाठी सणावाराला गावामध्ये आजही येतात.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या आडनावाने फार परिचित नसत, तर मधू वाढई, रामदास वाढई, आत्माराम वाढई, सुधा वाढई, चंद्रू खाती, मारोती खाती, भाऊराव माली, गणपत माली, देवराव माली, मधू माली, इठू वठ्ठी, माधवा वठ्ठी अशा प्रकारे त्यांच्या धंद्यावरून गावात परिचय असे. ही नावे माझ्याच गावातील आयकिरी बांधवांची आहेत.“जारे, थोडा मधू वाढयाच्या कामठ्यात जाऊन वखर भरून घेऊन ये बरं”. “गेल्तो होतो मधु माल्याकडं दाढी घोटाले” “आज चंद्रू खात्याच्या कामठ्यात भाय गर्दी होती.” “इठू वठ्ठी अज आलास नाई, धुनं गोट्यावरच राहीलं.” असा वार्तालाप ग्रामीण बोलीभाषेत होई.
गावातील अनेक कार्यक्रम न्हावी-धोबी यांच्याशिवाय पार पडत नसत. विवाह, मुलाचे नामकरण, नवस, बोरवण, वास्तुपुजन, तेरवी ह्या अशा सर्व कार्यक्रमांना त्यांची हजेरी ही ठरलेली असे. मुलामुलीचे लग्न ठरवण्यापासून उरकेपर्यंत न्हावी फार महत्त्वाची भूमिका पार पाडे. विवाहाच्या अक्षता घरोघरी वाटणे (लग्नपत्रिका छापण्याची भानगड नसे). अक्षता म्हणजे लग्नाचे आमंत्रण. विवाहाच्या, नवसाच्या, बारशाच्या, तेरवीच्या अशा विविध कार्यक्रमांची आमंत्रणे देण्याचे काम न्हावी करत असे. एका हातात निमंत्रणाची सुपारी आणि दुसऱ्या हातात दोन-तीन झोरे (थैली) असत. त्यात कोणी पसाभर ज्वारी तर कोणी गहू, तुरी, मुग, हरभरे असे काहीबाही त्याच्या झोऱ्यात बिदागी देत. त्याला ‘पायफेरी’ असे म्हटले जाई. विवाहप्रसंगी पाहुण्यांना टिळा लावणे, वधुवरांच्या मागे उभे राहून हातपंख्याने हवा घालणे, ओवाळणी पात्रातून अक्षता देणे अशा कामांत न्हावी पुढे असत. त्यांची मालकी ओवाळणीच्या पैशांवर असे. गावातील लोकांच्या हजामतीव्यतिरिक्त तशी संबंधित कामे न्हावी यांना करावी लागत. गावातील धोबीसुद्धा तशी संबंधित कामे करत. त्यांना त्याचा मोबदला दिला जाई. त्याला ‘बोजवारा’ असे म्हटले जाते. ‘साजोणी’ (साजवनी) ला वाढई, खाती, माली, वठ्ठी यांना सहकुटुंब जेवणाचे आवतन असे. दरवर्षी मांडवसीला त्या सर्वांना ‘घुगऱ्या’चे आमंत्रणे ठरलेले असे. जी गावे शहरांपासून खूप लांब आहेत किंवा ज्या गावांना शहरी जीवनाचा वारा लागलेला नाही अशा गावगाळ्यात तशा परंपरागत प्रथा किंवा चालीरीती विदर्भाच्या काही भागांत चालू आहेत, पण त्या गावांचे प्रमाण बोटावर मोजता येतील इतपतच आहे.
गावातील अनेक कार्यक्रम न्हावी-धोबी यांच्याशिवाय पार पडत नसत. विवाह, मुलाचे नामकरण, नवस, बोरवण, वास्तुपुजन, तेरवी ह्या अशा सर्व कार्यक्रमांना त्यांची हजेरी ही ठरलेली असे. मुलामुलीचे लग्न ठरवण्यापासून उरकेपर्यंत न्हावी फार महत्त्वाची भूमिका पार पाडे. विवाहाच्या अक्षता घरोघरी वाटणे (लग्नपत्रिका छापण्याची भानगड नसे). अक्षता म्हणजे लग्नाचे आमंत्रण. विवाहाच्या, नवसाच्या, बारशाच्या, तेरवीच्या अशा विविध कार्यक्रमांची आमंत्रणे देण्याचे काम न्हावी करत असे. एका हातात निमंत्रणाची सुपारी आणि दुसऱ्या हातात दोन-तीन झोरे (थैली) असत. त्यात कोणी पसाभर ज्वारी तर कोणी गहू, तुरी, मुग, हरभरे असे काहीबाही त्याच्या झोऱ्यात बिदागी देत. त्याला ‘पायफेरी’ असे म्हटले जाई. विवाहप्रसंगी पाहुण्यांना टिळा लावणे, वधुवरांच्या मागे उभे राहून हातपंख्याने हवा घालणे, ओवाळणी पात्रातून अक्षता देणे अशा कामांत न्हावी पुढे असत. त्यांची मालकी ओवाळणीच्या पैशांवर असे. गावातील लोकांच्या हजामतीव्यतिरिक्त तशी संबंधित कामे न्हावी यांना करावी लागत. गावातील धोबीसुद्धा तशी संबंधित कामे करत. त्यांना त्याचा मोबदला दिला जाई. त्याला ‘बोजवारा’ असे म्हटले जाते. ‘साजोणी’ (साजवनी) ला वाढई, खाती, माली, वठ्ठी यांना सहकुटुंब जेवणाचे आवतन असे. दरवर्षी मांडवसीला त्या सर्वांना ‘घुगऱ्या’चे आमंत्रणे ठरलेले असे. जी गावे शहरांपासून खूप लांब आहेत किंवा ज्या गावांना शहरी जीवनाचा वारा लागलेला नाही अशा गावगाळ्यात तशा परंपरागत प्रथा किंवा चालीरीती विदर्भाच्या काही भागांत चालू आहेत, पण त्या गावांचे प्रमाण बोटावर मोजता येतील इतपतच आहे.
काळ बदलला… व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. नवीन पिढीने शिक्षणाला महत्त्व देत परंपरागत चालत येणारे व्यवसाय सोडले. कामाचे स्वरूप यंत्र आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून बदलून घेतले. व्यवसायकौशल्य ज्ञान-विज्ञानाने फार विकसित झाले. राहणीमान बदलले. पैसा नावाच्या वस्तूला महत्त्व आले आणि विनिमय पद्धत हद्दपार झाली. ग्रामीण भागातील परंपरेने चालत आलेली वस्तुविनिमयाची बलुतेदारी संपुष्टात आली.
– राजेंद्र घोटकर 9527507576 ghotkarrajendra@gmail.com
राजेंद्र घोटकर हे शिक्षक आहेत. त्यांचे बीएड आणि डीएडचे शिक्षण झाले आहे. त्यांचा ‘वंचितांच्या वेदना‘ हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. विविध मासिक आणि त्रैमासिकांमध्ये त्यांचे लेख व कविता प्रकाशित झालेल्या आहेत.
———————————————————————————————————————-
20_25 वर्षापूर्वी ही बारा बलुतेदारी पद्धती ग्रामीण भागामध्ये पहावयास दिसे परंतु आज रोजी यांनी शहरी भागाकडे धाव घेत वस्तुविनिमय पद्धती ही मोडकळीस आल्याचे दिसते. गुरुजी आपल्या लेखातून हुबेहुब चित्र तेव्हाचे दिसत आहे . खरोखरच आपला लेख वाचून थक्क केलय _ जयगुरु 👏👏👏
आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद सर जी.सस्नेह जयगुरुदेव
माहितीपूर्ण चांगला लेख आहे ,
छान माहिती –
मनःपुर्वक आभार सर जी
धन्यवाद जी
चांगला लेख यातील काही माहिती आधी होती काही आता मिळालीसध्या ही पध्द्त अस्तित्वात नाही त्याला नाईलाज आहे या पद्धती मध्ये प्रेम आपलेपणा विश्वास होता आता तो शोधावा लागतो
धन्यवाद सर जी