बलिप्रतिपदा – दिवाळी पाडवा

2
183
carasole

कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला गेला आहे.

पुराणकथेनुसार, प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना बंदी केले. मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे त्रिपादभूमीची याचना केली. बळीने ती मान्य केली. वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारताच बळीने त्याचे स्वत:चे मस्तक नमवून त्यावर तिसरे पाऊल ठेव असे वामनाला सांगितले. वामनाने बळीच्या मस्तकी पाय ठेवून त्याला पाताळात ढकलले. ते सर्व आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावास्या या तीन दिवसांत घडले. नंतर वामनाने बळीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘देवा, केवळ लोककल्याणासाठी मी एक वर मागतो. या तीन दिवसांत जो कोणी यमाप्रीत्यर्थ दीपदान करील, त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत आणि त्याच्या घरात लक्ष्मीचे निरंतर वास्तव्य असावे.’ त्यावर वामनाने ‘तथास्तु’ म्हटले. तेव्हापासून या दिवसांत दीपदान व दीपोत्सव करण्याची प्रथा सुरू झाली. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीचा दिवस मानून लोक त्याही दिवशी आनंदोत्सव करू लागले. बळीराजा देवांचा शत्रू असला, तरी तो दुष्ट नव्हता. अलोट दातृत्व आणि प्रजाहितदक्षता याविषयी त्याची ख्याती होती. त्याचे राज्य हे सुराज्य होते. म्हणूनच ते पुन्हा प्रस्थापित व्हावे असी आकांक्षा वरील लोकाचारांत प्रकट झालेली दिसते. म्हणूनच ‘इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात.

या दिवशी बळीची प्रतिमा तयार करून गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी-बैलांच्‍या शिंगांना रंग लावून व त्‍यांच्‍या गळ्यात माळा घालून त्‍यांना सजवतात. मस्त बैल व चपळ कालवडी यांची मिरवणूक काढतात. काही ठिकाणी दिवाळीच्या दिवसांत मशाली घेऊन नाच करण्याचीही प्रथा आहे. त्या आनंदोत्सवाचे हे महत्त्वाचे अंग मानले जाते. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.

पूर्वी, बलिप्रतिपदेच्या पहाटे घरातील एखादी व्यक्तीे सर्व घर झाडून स्वच्छ करी. मग सगळा केर एका टोपलीत जमा करून त्या टोपलीवर जुनी केरसुणी, एक पणती व पैसा-सुपारी ठेवण्यात येई. ती टोपली घरातील प्रत्येक खोलीपुढे ओवाळली जाई. त्या वेळी ती व्यक्ती ‘इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो.’ असे मागणे मागत असे. मग एक स्त्री सूप वाजवत त्या व्यक्तीच्या मागोमाग दरवाजापर्यंत जात असे. पुढे चालणारी व्यक्ती मागे न पाहता घराबाहेर जाऊन सर्व केर रस्त्याच्या कडेला टाकी. नंतर ती व्यक्तीत घरात येऊन कोणालाही न शिवता अंगाला तेल लावून गरम पाण्याने स्नान करत असे.

या दिवशी शेतकरी पहाटे स्नान करतात. मग ते एका मडक्यात कणकेचा दिवा पेटवतात. डोक्यावर घोंगडी घेतात आणि शेतात जातात. ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. नवविवाहित दांपत्य हा दिवस पत्नीच्या माहेरी साजरा करतात. त्याचा उल्लेख दिवाळसण असा केला जातो. यानिमित्ताने जावयाला आहेर दिला जातो.

बळीची पूजा करताना जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा व पुढील मंत्राने बळीची प्रार्थना करावी, असे सांगितले आहे –

 

बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो |
भविष्येन्द्रासुराराते पूजेयं प्रतिगृह्यताम् ||

अर्थ – हे विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बळीराजा, तुला नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असूरशत्रू आहेस. (तरी) ही (मी केलेली) पूजा तू ग्रहण कर.

त्यानंतर बळीप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा विक्रम संवताचा वर्षारंभदिन मानला जातो. त्या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया त्यांच्या पतीला ओवाळतात. दुपारी पक्वान्नांचे भोजन करतात. दिवाळीतील हाच दिवस प्रमुख समजला जातो. त्या दिवशी लोक नवी वस्त्राभरणे लेऊन दिवस आनंदात घालवतात. त्या दिवशी द्यूत खेळावे असेही सांगितले आहे. पार्वतीने शंकराला त्याच दिवशी द्यूतात हरवले होते. त्यावरून या प्रतिपदेला ‘द्यूतप्रतिपदा’ असेही नाव मिळाले आहे. या तिथीला द्यूत खेळण्याचे विधान धर्मशास्त्राने सांगितले आहे. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान करून अत्यंत लक्षपूर्वक द्यूतक्रीडा करावी. त्यामुळे पुढील वर्ष बरेवाईट कसे जाईल त्याची ठीक कल्पना येते, असे शास्त्रवचन आहे. त्या विषयीची एक कथा अशी आहे –

एकदा बलिप्रतिपदेच्या दिवशी शंकराने पार्वतीसह द्यूत खेळायला प्रारंभ केला. शंकर त्या खेळात सर्वस्व हरला आणि वल्कले परिधान करून गंगातीरी जाण्यासाठी घराबाहेर पडला. कार्तिकेयाला हे समजल्यावर त्याने त्याच्या पित्याकडून द्यूत शिकून घेतले आणि पार्वतीबरोबर द्यूत खेळून शंकराने पणात हरवलेल्या वस्तू परत मिळवल्या व त्या शंकराला नेऊन दिल्या. त्यानंतर गणेशाने शंकर व कार्तिकेय यांच्याबरोबर द्यूत खेळून त्या वस्तू पुनश्च जिंकल्या व आईला नेऊन दिल्या. अशा प्रकारे पुन:श्च सर्वस्व हरल्यावर शंकर हरिद्वार येथे गेला. तेथे त्याने विष्णूच्या सूचनेवरून त्र्यक्षविद्या (तीन फाशांची विद्या) निर्माण केली. त्या तीन फाशांपैकी एका फाशाचे रूप साक्षात विष्णूनेच धारण केले होते. ही नवी द्यूतविद्या घेऊन शंकर घरी गेला आणि त्याने पार्वतीला खेळात हरवले.

शिव-पार्वतींच्या या द्यूतक्रीडेची स्मृती म्हणून या दिवशी द्यूत खेळण्याची प्रथा पडली.

बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा- फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात व मिरवणूक काढतात. ती पर्वतपूजा केली नाही, तर कार्तिकमासातील सर्व कृत्ये निष्फल होतात, असे सांगितले आहे.

पूर्वी गावागावांमध्‍ये बलिप्रतिपदेच्‍या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाळली जात असे. या सोहळ्यामध्‍ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एकेक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत. ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला जाई. मग गावकरी सहभोजन करत असत. या प्रथेच्‍या पालनातून सामाजिक एकात्मता, बंधुभाव वाढीस लागावा असा या सोहळ्यामागील उद्देश होता.

ठाणे जिल्ह्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी अंगणात शेणाचा किंवा तांदळाच्या पिठाचा बळीराजा काढून त्याची पूजा करतात. सूर्योदयापूर्वी त्या आकृतीजवळच कडू जिरे, झेंडू किंवा अंबाडीचे झाड लावतात.

राजस्थांनात प्रतिपदेला ‘खेंखरा’ असे म्हणतात. त्या दिवशी गोवर्धनपूजा व अन्नकूट करतात. सायंकाळी बैलांची पूजा करतात. महाराष्ट्रातील बैल-पोळा सणाप्रमाणेच तो सण असतो. त्यात बैलांच्या टकरीही लावतात. बैलांना घेऊन गाणी म्हणत शेतकरी घरोघर जातात. त्याच दिवशी नाथद्वारा येथे मिष्टान्नाचा प्रचंड अन्नकूट करून तो गरीब लोकांकडून लुटवण्याची प्रथा आहे.

‘खेंखरा’च्या दुसऱ्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते. नवीन वर्षासाठी नवीन वह्यांत जमाखर्च मांडण्यास प्रारंभ करतात.

केरळमधील ‘ओणम’ हा उत्सव आश्विनमासात बळीच्या स्मरणार्थच साजरा होतो.

– आशुतोष गोडबोले

 

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.