फलटणचे जब्रेश्वर मंदिर

0
116

फलटणला महानुभाव पंथीयांची ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जात असे. तेथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे आहेत. महानुभाव साहित्यात फलटणचा उल्लेख ‘पालेठाण’ म्हणून केलेला आढळतो.

फलटणचे ‘जब्रेश्वर मंदिर’ आजही राजवाडा व श्रीराम मंदिर यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. शहरात यादव काळात इसवी सनाचे दहावे ते चौदावे शतक अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन असे हे मंदिर. ते हेमाडपंथी शैलीतील आहे. ते मूळचे जैन मंदिर असावे. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील) जिनाची मूर्ती यावरून ते स्पष्ट दिसते. चौथे मुधोजीराव निंबाळकर (1853-1916) यांनी जब्रेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली.

ते पवार गल्लीत आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. गर्भगृह व प्रवेशमंडप ही मंदिराची दोन प्रमुख दालने- तळ्याचे विधान चतुरस्त्र आहे. मंदिराबाहेरील भिंतीवर शिल्पांकन आहे. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले यांची मूर्ती आहे, तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मिणी, नंदी, कासव, गणपती अशा मूर्ती आहेत. गाभाऱ्यातील पिंड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिंडीवर दोन शाळुंका आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूच्या मैथुन शिल्पांची बरीच मोडतोड झालेली आहे.

मंदिर रस्त्याच्या मधोमध, एक मीटर उंचीच्या पीठावर आहे. त्या पीठाची बाह्यरेषा मंदिराच्या बाह्य रेषेशी थोडे अंतर राखून ती समांतर असल्यामुळे पीठाच्या मंदिरा व्यतिरिक्त भागाचा उपयोग प्रदक्षिणा पथासारखा होतो. मंदिरात जाण्यासाठी द्वाराजवळ पायऱ्या आहेत. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ अणि गर्भगृह असा त्याचा तलविन्यास आहे. या मंदिराचे विमान आणि मंडप या दोन्ही वास्तुघटकांचे तलविन्यास सप्तरथ असून विमानावर पूर्वी विटांचे भूमिज शिखर होते. सध्या त्या शिखराच्या फक्त दोन भूमी शिल्लक आहेत. मंदिराच्या रथ-प्रकारावरून ते मंदिर सप्तभूम मंदिर असावे असे वाटते.

उत्सेधदृष्ट्या जगतीमध्ये एकावर एक असे दोन खूर आहेत. वरील खुराचा भाग अंतर्वलित होऊन त्यांवर जो वास्तुघटक येतो त्याला छाद्‌य म्हणता येईल. त्यावर खूर, जाडंब आणि कुंभ हे पीठाचे घटक आहेत. त्यावर कपोतासारखा एक भाग आहे. त्यावरील भागात म्हणजे मंडोवरात अनुक्रमे जाडंब आणि तवंगयुक्त कुंभ, (चतुष्पटल नक्षीने युक्त), कलश, मंची कपोत, जंधा, उद्‌गम, भरणी शिरावटी आणि छाद्य हे घटक येतात. त्यावर विमानाच्या आणि मंडपाच्या शिखरास सुरुवात होते. छाद्याच्या वर कपोत आणि मंची असे आणखी दोन घटक येतात. त्यांच्यावर भूमिज शिखराचे कूटस्तंभ येतात. विमानाच्या भद्रांना लहान निर्गम आहेत. त्यांना प्राचीन वास्तुशास्त्रीय परिभाषेत नंदिका म्हणतात. जंधा पातळीवर मंदिराच्या पूर्व, पश्‍चिम आणि दक्षिण बाजूंवर देवीच्या मूर्ती आहेत. शिखर पातळीवर सर्वसाधारणपणे इतर भूमिज शिखरांवर आढळते त्याप्रमाणे शिखराच्या पायावरच शिखराची एक प्रतिकृती असून त्याच्यावर शूरसेनक आहे. त्या शूरसेनकावरील लतेचा आणि मूलमंजरीचा भाग शिल्लक नाही. मंडोवराच्या जंधा भागावर स्त्रीयुग्मे दाखवण्यात आली आहेत. अधूनमधून मिथुन मूर्तीही आहेत. बहुतांशी सलिलांतरामध्ये तपस्वी आणि व्याल दाखवलेले आहेत. जंधेंवर विशिष्ट प्रकारची मूर्तियोजना आहे. चार दिक्पाल कपिलीवर कोरलेले आहेत. मंडोवराच्या जंधा भागावर काही कथापरपट्ट आहेत. मंदिराच्या मंडपाच्या पूर्व आणि पश्‍चिम भागांच्या मध्यावर निर्गम आहेत. पैकी पूर्व भागावरील अंगावर अंबिका आणि सर्वानुभूती यक्ष दाखवला आहे तर पश्चिम भागावरील अंगावर अंबिका तिच्या वाहनासह (सिंहासह) दाखवली आहे.

संकलननितेश शिंदे 9892611767 info@thinkmaharashtra.com

(आधार – सातारा गॅझेटियर)
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here