कोकणात एक प्रकारच्या उंदराला पाजवा म्हणतात. त्याचा अर्थ ‘साहित्य संस्कृती महामंडळा’च्या मराठी शब्दकोशात तसाच, शेतातील एक प्रकारचा उंदीर असा दिला आहे.
भारत हे घर-उंदराचे मूळ उत्पत्तिस्थान समजले जाते. उंदीर माणसाबरोबर भूमी आणि जल मार्गाने जगभर पसरला. घर उंदराचा प्रतिस्पर्धी आहे भुरा उंदीर. तो जास्त करून बंदर, बंदरालगतची शहरे व गावे यांतील उघडी गटारे, ओढे,नाले अशा ओलसर ठिकाणी राहतो. पाजवा हा भुरा उंदीर असण्याची शक्यता आहे. भारतात घर-उंदरांच्या तेरा उपजाती आढळतात.
पाजवा उंदीर कोकणात आढळत असल्यामुळे, त्याचा उल्लेख तेथील लोकांच्या बोलण्यात व लिखाणात आढळतो. गो.ना.दातार यांच्या ‘चतुर माधवराव’ या पुस्तकातील ‘हरवलेली नथ’ या कथेत पाजव्या उंदराचा उल्लेख आहे. गो.ना. दातार कोकणातील राजापूरचे आणि ती कथाही घडते कोकणातच. पाजव्या उंदराचा दुसरा उल्लेख विजय तेंडुलकर यांच्या ‘हे सर्व कोठून येतं?’ या पुस्तकातील ‘प्रचंड’ या लेखात आढळला.
तेंडुलकर यांचा आचार्य अत्र्यांवर लिहिलेला तो ‘प्रचंड’ लेखदेखील प्रचंड गाजला. तेंडुलकर त्यांच्या उमेदीच्या काळात ‘मराठा’मध्ये नोकरी करत होते. त्यांच्याकडे ‘मराठा’मध्ये अग्रलेख लिहिण्याचे काम येई. असेच त्यांनी त्यांच्या अग्रलेखात पाजव्या उंदराचा उल्लेख केला. तेव्हा अत्रे यांनी तेंडुलकरांना विचारले, “पाजवा म्हणजे काय? हा कोठला शब्द काढला?” तेंडुलकर म्हणाले, “असा शब्द आहे. मी लहानपणापासून ऐकत आलोय.”
“शक्यच नाही. आम्ही न ऐकलेला शब्द मराठी भाषेत असणारच नाही.” अत्रे गरजले.
परंतु तेंडुलकरांना अत्र्यांचा रात्री उशिरा पुन्हा फोन. “आहे. तुम्ही म्हणता तसा शब्द आहे. पण तो कोकणात वापरतात. आपला ‘मराठा’ संपूर्ण महाराष्ट्रात जातो. लोकांना कळतील असे शब्द वापरा.” अत्रे म्हणाले.
स्वत:ची चूक खुल्या मनाने मान्य करणारे अत्रे आणि दबावाला बळी न पडता त्यांच्या मतांवर ठाम राहणारे तेंडुलकर. अत्रे आणि तेंडुलकर यांची स्वभाववैशिष्ट्ये दाखवून देणारा हा किस्सा. तसा साधाच पण घडला मराठी साहित्यातील दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांमध्ये आणि त्याला निमित्त होते, एक साधा उंदीर – पाजवा!
– डॉ. उमेश करंबेळकर