पळसाला पाने तीन

0
171

पळस हे रानातील झाड आहे; ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड असते.

वसंत ऋतू आला, की त्याची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल-शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते. ते संपूर्ण रानात लक्षवेधक ठरते. पळसाची फुले पाण्यात टाकली असता फुलांचा रंग पाण्यात उतरतो. आदिवासींची रंगपंचमी त्या नैसर्गिक रंगाने साजरी होत असते.

पळसाला बहुतेक नावे त्याच्या फुलांवरूनच पडली आहेत. पळसाला इंग्रजीत ‘प्लेम ऑफ फॉरेस्ट’ तर संस्कृतमध्ये ‘अग्निशिखा’ असे म्हणतात. वाऱ्यावर हलणाऱ्या लाल-शेंदरी फुलांमुळे जणू काही त्या झाडाने पेट घेतलाय आणि ते ज्वालांनी घेरलेय, असे लांबून दिसते. संस्कृतमध्ये पळसाला ‘किंशुक’ असेही नाव आहे. ती फुले पाहून पोपटाच्या चोचीची आठवण होते – ‘किंचित शुक इव’ वाटणारे ते किंशुक अथवा हा पोपट तर नव्हे? अशी शंका मनात निर्माण होते, म्हणून किंशुक. बहिणाबाईंनी त्यांच्या काव्यात पळसाच्या त्याच वैशिष्ट्याचे समर्पक वर्णन केले आहे.

पाहा पयसाचे लाल फूल हिरवे पान गेले झडी
इसरले लाल चोची मिठ्ठू गेले कुठे उडी

बाबा आमटे यांच्या ‘या सीमांना मरण नाही’ या कवितेत ‘ते मोहोर येतील, तेव्हा अंगार भडक होतील पळस; त्या आगीने दिपून जातील प्रासादांचे सारे कळस’ अशा ओळी आहेत. त्या वाचून बाबांना ‘ज्वाला आणि फुले’ या पुस्तकाचे नाव पळसफुलांवरून सुचले असेल, असे वाटते.

_Palsache_Jhad_2.jpgभारताच्या इतिहासात प्लासी लढाई (1757) प्रसिद्ध आहे. त्या रणांगणाला ‘प्लासी’ हे नाव पळसाची वने जवळ असल्यामुळे पडले होते. ‘पळसाला पाने तीन’ ही म्हण मराठीत पळसावरून रूढ झाली. त्याचे कारण पळसाला पाने फक्त तीन असतात. बेलालाही पळसासारखी तीन पाने असतात; तशीच, निर्गुंडीलाही असतात. निर्गुंडीचे शास्त्रीय नाव Vitex Nirgunda Trifolia असे आहे. त्यामुळे ही म्हण पळसालाच का चिकटली, असा प्रश्न पडतो.

पळसाच्या पानांचा उपयोग द्रोण, पत्रावळी करण्यासाठी केला जातो; त्यावरून एक शक्यता मनात डोकावली. ती अशी, की बेल, निर्गुंडी ह्या वनस्पती गावात सहज आढळतात. बेल शंकराच्या देवळात किंवा बागेत औषधी वृक्ष म्हणून लावला जातो. निर्गुंडी ही कुंपण म्हणून लावली जाते. त्यामुळे त्या वनस्पती सर्वांच्या परिचयाच्या असतात. त्या मानाने
पळस गावात सहसा आढळत नाही.

पूर्वी जेवणावळीसाठी द्रोण-पत्रावळींचा वापर खेडोपाडी केला जाई. त्यासाठी पळसाची पाने लागत. फुललेला पळस सहज ओळखता येतो. परंतु इतर काळात तो ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याची मोठी तीन पाने! ‘पळसाला पाने तीन’ ही म्हण अशी अस्तित्वात आली असण्याची ही एक शक्यता. गोष्टीचे सामान्यत्व त्या म्हणीतून सूचित होते. देशात स्थल, काल, धर्म, जात, लिंग सर्व व्यापून राहणारी सरकारी कचेऱ्यांतील एक समान गोष्ट – ‘भ्रष्टाचार!’ त्यामुळे कोठल्याही कचेरीत जा, एकच अनुभव तुम्हाला येईल. कारण कोठेही जा, पळसाला…

– उमेश करंबेळकर

(‘राजहंस ग्रंथवेध’ एप्रिल 2016 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

About Post Author

Previous articleवासा कन्सेप्ट – परावलंबनातून स्वावलंबनाकडे!
Next articleअजगर
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here