निळोबारायांची अभंगार्तता

0
145

ज्ञानदेवांनी जी भक्ती कल्पना मांडली, संत नामदेवांनी ज्या भक्तीचा प्रसार पंढरी ते पंजाबपर्यंत केला, तुकोबांनी ज्या भक्तीचे गोडवे गायले; निळोबांनी त्याच भक्तीचा प्रसार पुढे, दोन शतकांनंतर केला. देव आणि भक्त एक होऊनही भक्तीच्या सुखासाठी वेगवेगळे राहतात ही अद्वैतातील भक्तीची त्यांची कल्पना. त्या भक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त होते असा साऱ्या संतांचा अनुभव आहे. ती भक्ती स्नानसंध्या, देवतार्चन, पोथीपुराणे, यज्ञयाग, तीर्थयात्रा या लौकिक समजुतीप्रमाणे नव्हती, तर ईश्वरप्रणिधान होती व आहे.

सर्व संत त्यांना अद्वैताचा अनुभव आल्यानंतरही देवाची भक्ती करण्यात आनंद मानतात. ते त्यांचे तत्त्वचिंतन देव-भक्त संबंध, परमेश्वर चिंतन, परमेश्वरस्वरूप, भक्तस्वरूप अशा निरनिराळ्या विषयांतून व्यक्त करतात. संतांनी त्यांनी ज्या देवाचा अनुभव घेतला त्या देवाचे स्वरूप, त्याचे विश्वव्यापकत्व वर्णन करून सांगितले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, की ‘ज्याप्रमाणे सुवास सुमनात, त्याप्रमाणे देव त्रिभुवनात अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे.’ तोच विचार निळोबांनी अनेक दृष्टांत देऊन सांगितला आहे. निळोबा म्हणतात –

बीजापोटी महातरु | होता फांकला तो थोरु |

सविताबिंब दिसे सान | प्रकाशिले त्रिभुवन ||

तेवि विठ्ठल विटेवरी | भासे परि तो चराचरी |

निळा म्हणे जीवन जीवां | प्राण प्राणियांचा आघवा ||

म्हणजेच बीजापोटी महावृक्ष, त्याप्रमाणे विटेवरील विठ्ठल चराचर व्यापून आहे, ‘भरला आहे सागर | न लगे अंत-पार कोणासी |’ देव हा अंतपार न लागणाऱ्या सागराप्रमाणे आहे. देवाची लीला कळणेही शक्य नाही. निळोबा देव आणि भक्त यांची एकरूपता उपमांद्वारा दाखवतात.

गोडी आणि गूळ, सोने आणि अलंकार, बिंब आणि प्रतिबिंब, रत्न आणि रत्नकीळ हे जसे भिन्न नाहीत; तसेच, देव आणि भक्त, दोघेही वेगवेगळे दिसत असले तरी ते एक आहेत-एकरूप आहेत हे निळोबाराय पटवून देतात. निळोबांनी त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक अभंगांतून देव आणि भक्त एकरूप कसे असतात, अद्वैतात द्वैताची गोडी कशी चाखतात यासाठी ‘देव चालिला सांगाती | भक्त जाती ज्या ज्या पंथे | परम आनंद उभयतांसी | देव भक्ता सुखाच्या राशी ||’ अशा अनेक अभंगांतून त्यांची भावना व्यक्त केली आहे. त्यांनी साधकावस्था, साध्य साधता येत नाही म्हणून आलेली पराकोटीची उदासीनता आणि परमेश्वर भेटीनंतर झालेला आनंद या साऱ्याचे वर्णन सुंदर केले आहे. निळोबा प्रत्येक माणसाने स्वत:चा उद्धार हरिभक्ती करून घ्यावा हेच सुचवतात. सत्याचे व असत्याचे दर्शन हरिकृपेमुळे लाभते. हरिभक्तीतून अशी एकनिष्ठा निर्माण होते. त्यामुळे संसारातील वर्म उलगडते. निळोबा सांगतात,

‘न सांपडे ऐसी कधी | वेळ लागली ते संधी |

हरिचे गुण वाचे यावे | श्रावणी श्रवण ते करावे ||’

प्रत्येकाने संधी मिळेल तेव्हा हरीचे गुणगायन करावे, भजनात रंगून जावे, कीर्तनाचे श्रवण करावे. मानवी जीवन क्षणभंगूर असल्याने त्यासंबंधी चालढकल करण्यात अर्थ नाही.

‘गेली जातील वर्षेकाळ | आयुष्य वेचोनियां निष्फळ |

निळा म्हणे यालागी करा | वेगे आता चित्ती धरा ||’

जन्माला आल्यानंतर ज्यांना विठ्ठलाचे स्मरण नाही असे मूढ लोक खरोखरीच भाग्यहीन होत. कारण मोहभ्रमाने ते पतनाकडे खेचले जातात.

‘नाही केली सुटका काही | ये चि प्रवाही पडिलासी |

निळा म्हणे लाहोनि हाती | केली माती आयुष्या ||’

माणसाने स्वत:चा उद्धार हरिभक्तीद्वारे करून घ्यावा अशी अपेक्षा आहे. पण निळोबांना हरिभक्तीकडे पाठ फिरवून माणूस बहुमोल आयुष्याचा नाश करतो ही बोच आहे. निळोबा पारमार्थिक जीवनाची भूमिका सांगताना म्हणतात, ‘स्वत: दु:खी असणारे लोक इतरांना सुखी कसे करणार? ते सामर्थ्य एका देवातच आहे. दिवसांमागून दिवस जाऊन आयुष्य कसे संपले ते कळत नाही व ‘न दिसे उपाय प्राप्तीचा’ असे होऊन जाते. म्हणून विश्वनिर्मात्या परमात्म्याच्या चरणी लगटून जावे हे श्रेयस्कर आहे.’ निळोबांनी त्यांचा साधनामार्ग सांगताना हरिकथेवर भर दिला आहे. हरिकथेत हरिभक्ताची काया अमर होते.

‘नाम वाचे श्रवणी कीर्ती | पाऊलें चित्ती समान ||’

निळोबांच्या भक्तिकल्पनेचे वेगळेपण असे, की ते देवाची आर्तता अधिक विस्ताराने रंगवतात. तसा भावाविष्कार त्यांच्या अभंगांतून तपशीलाने आला आहे. निळोबांनी गुरू, संत, कीर्तन, नाम यांतूनही तत्त्वचिंतन मांडले आहे.

शोभा घोलप 9823064732 mohitrgholap@gmail.com

(‘आदिमाता’वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here