निरागसपणाचा मंत्र

1
535

लहान मुलांना गोष्टी सांगणे हे खरेच कौशल्याचे काम ! त्यांच्या विचारशक्तीला पटले तरच ती छोटी मुले त्याला मान्यता देतात. आपलेसे करतात. एक गोष्ट, त्यातील पात्रे, त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, विचार हे म्हणजे त्यांच्या डोक्यात पेरलेले एवढेसे बीज असते. गोष्ट संपली तरी ती त्यांच्या डोक्यातून, मनातून गेलेली नसते. मुले त्यांच्या कुवतीनुसार ते समजून घेतात, कल्पनेत रमतात, आकलन करतात. त्यांचे विश्व या गोष्टींमुळे विस्तारले जाते. गोष्ट प्रत्यक्ष सांगणे आणि मोबाईलवर कार्टून किंवा गोष्ट दाखवणे यात प्रचंड फरक असतो. त्यांच्यावर होणारे हे बालपणीचे संस्कार त्यांचा मोठे नागरिक होण्याचा मुलभूत पाया असतो. म्हणजेच छोट्या बाळांना, मुलामुलींना गमतीच्या गोष्टी सांगत घडवणे ही पालकांची गंभीर जबाबदारी असते. मूल छान दिसण्यासाठी बाजारात, ऑनलाईन, पैसे देऊन घेण्याच्या असंख्य गोष्टी मिळतात, त्यामुळे मुले गोड गोंडस दिसतातही, पण त्यांनी कसे असायला हवे, यासाठी त्यांना गोष्टी सांगत घडवायचे असते. ते पैसे देऊन करता येत नाही. नीलिमा गुंडी यांचा लेख या विचाराच्या कितीतरी मिती स्पष्ट करतो.

– अपर्णा महाजन

निरागसपणाचा मंत्र

मी आजी सात वर्षांपूर्वी झाले आणि आजीपणाचा सांस्कृतिक वारसा नातीकडे पोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे हळूहळू आली; ती म्हणजे गोष्ट सांगणे ! गोष्ट सांगणे, ही ‘गोष्ट’ वाटते तितकी सोपी नाही ! कोरोनाच्या काळात मुक्ता – माझी लेक – घरातून ‘ऑनलाईन’ काम करत असताना, माझ्याकडे नातीला गोष्ट सांगण्याची जबाबदारी अधूनमधून आली. साडेचार-पाच वर्षांच्या नातीला -अनाहिताला- व्हिडिओ कॉल करून गोष्ट ऐकण्यात गुंतवणे हे आव्हानच होते ! ते काम किती कठीण आहे हे लेकीच्या प्रेमळ(!) सूचनेवरून माझ्या लक्षात आले. तिने मला बजावले, ‘आई, गोष्ट जरा रंगवून सांगत जा ! गोष्ट अर्धा तास तरी चालली पाहिजे ! तुझ्या गोष्टी दहा मिनिटांत संपतात ! तशा नकोत !’ माझ्या कथनकौशल्याचा पंचनामा असा झाला असल्यामुळे मला गृहपाठ करूनच गोष्टी सांगाव्या लागल्या !

तसा, गोष्टींचा खजिना पुस्तकांमध्ये उपलब्ध होता. रामायण, महाभारत, पंचतंत्र, इसापनीती, बिरबलाच्या गोष्टी इत्यादी इत्यादी ! पण काही गोष्टी अनाहिताला चित्रांच्या पुस्तकातून माहीत होत्या ! काही इतर कोणी सांगितलेल्या होत्या. त्यामुळे जुन्या गोष्टींबरोबर नव्या गोष्टीही सांगाव्या लागत. विशेषतः तिच्या मागणीनुसार आयत्या वेळी गोष्टी रचाव्या लागत ! गोष्टीत पात्रे किती असणार, कोणकोण असणार… या तिने दिलेल्या तपशिलांनुसार मला ‘हुकमे हुकूम’ गोष्ट सांगावी लागे. तिच्यावर ‘ट’ या अक्षराची, का कोण जाणे, मोहिनी जबरदस्त आहे. त्यामुळे गोष्टीत ‘टिटी’ नावाचे पात्र हवेच असे ! (माझी कथनशैली टणक होण्यास याचा उपयोग झाला असावा !) तिला आजी-आजोबा आणि टिटी किंवा टिटू यांच्यामध्ये घडणारे नाट्यपूर्ण प्रसंग आवडत असत. आजारी आजीसाठी घोड्यावर बसून, डोंगर ओलांडून लांबच्या तलावातील निळे कमळ घेऊन येणारी शूर नात, त्या कमळातील मधाबरोबर दिलेल्या औषधाने बरी झालेली आजी… अशी गोष्ट ऐकताना ती रंगून जात असे (आजही तिला ती गोष्ट आवडते !) तिला जुनी गोष्ट मी जर पुन्हा सांगितली तर माझी उलटतपासणी होते ! गोष्टीतील प्रत्येक तपशिलात जराही बदल झाला, तर तो जणू तिच्या लेखी अफरातफरीचा प्रकार असतो !

तिने ऐकलेल्या गोष्टी तिच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन तिला नवनिर्मितीत कशा गुंतवतात हे पाहणे खरेच मोठे मनोरंजक असते. मी तिला एकदा हिरकणीची गोष्ट सांगितली होती, त्याची ही गोष्ट आहे ! तिला ती गोष्ट अर्थातच आवडली. मी गोष्टीत हिरकणीचे बाळ असा मोघम उल्लेख केला होता. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या घरातील विविध खेळण्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांचा दरबार तयार केला आणि एक मोठी बाहुली आणि एक छोटीशी बाहुली अशा रूपात हिरकणी आणि तिचे बाळ साकार केले !

तिला आता ‘खऱ्या’ गोष्टी हव्या असतात. माझ्या लहानपणीचे प्रसंग, जवळच्यांची चुकामूक होणे व पुन्हा भेट होणे, वस्तू विसरणे व ती अनपेक्षितपणे परत मिळणे, पावसात गाडी बंद पडली की सर्वांची उडणारी तारांबळ, मुक्ता लहानपणी डेक्कन जिमखान्यावर बाबांबरोबर भाजी घेताना एकटी मागे राहिली होती, तो प्रसंग… असे खरेखुरे अनुभव तिला आवडतात. तिच्या भावविश्वात स्थान असलेल्या व्यक्तींचा भूतकाळ जणू तिला या मार्गाने जाणून घ्यायचा असतो. माझी आई लहान असताना प्रयाग येथील संगमात दलदलीमध्ये अडकली होती. त्या खऱ्या प्रसंगाला कल्पनेची फोडणी देऊन खमंग केलेली गोष्ट, तिला तिच्या न पाहिलेल्या पणजीशी घट्ट नाते जोडून देत गेली ! तसेच न पाहिलेल्या पणजोबांची लाडकी कुत्री – बदी – तिला आवडलीच, पण तिच्यापेक्षा कुत्रीवर प्रेम करणारे पणजोबा तिला जास्त आवडले !

मध्यंतरी, मी तिला ‘पहाडबाबा’ची गोष्ट सांगितली. गावात रस्ता तयार करण्यासाठी स्वतः डोंगर फोडणाऱ्या दशरथ मांझी यांची गोष्ट तिला खूप आवडली. मात्र, ‘ते आबा खरे आहेत का?’ म्हणजे खरेच ही घडलेली गोष्ट आहे का; हा प्रश्न तिने मला इतक्यांदा, इतक्या वेगवेगळ्या सुरात विचारला की शेवटी मला गुगलवर शोध घेऊन त्यांचा फोटो तिला दाखवावा लागला !

हल्ली तिला खरे आणि खोटे हा पेच फारच पडतो. गोष्टीतील व्यक्ती खरी असणे म्हणजे जिवंत असणे ! नाही तर, ‘ती चांदणी झाली का?’ हा पुढचा प्रश्न असतो ! या प्रश्नाच्याच अर्थाचा तिचा एक स्वतंत्र असा वाक्प्रचार आहे, तो म्हणजे- खापरपणजी होणे! मुले त्यांच्या जवळच्या शब्दसंचयातून वेगवेगळ्या संकल्पना कशा आत्मसात करत असतात, नवे संदर्भ ती कसे समजून घेत असतात; हे त्यातून कळते. मी तिला सांगितलेल्या एका गोष्टीत खापरपणजी हे एक पात्र होते. तेव्हा मी तिला तो शब्द स्पष्ट करून सांगितला होता. तिने स्वतः तिची पणजी, तिच्या बाबाची –  सागरची – आजी  पाहिली होती. त्यामुळे  पणजी असते, दिसते, खापरपणजी दिसत नाही, हे तिने स्वतःला समजावले असावे ! अशा प्रकारच्या शब्दज्ञानातून तिने ‘एखादी व्यक्ती मरणे म्हणजे खापरपणजी होणे’ असा अन्वय लावून टाकला आहे ! लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेचे चित्रण दूरदर्शनवर सगळे पाहत असताना तिने ‘लता आजीची खापरपणजी झाली का?’ -असे अचानक विचारून आईबाबांना चकित करून टाकले होते !

एकीकडे तिला अशी समज येणे चालू आहे. तिच्या गोष्टी ऐकण्याच्या अनुभवांतून तिची वाढ जाणवत आहे. भाषा, निवेदनाचा काळ (भूतकाळ, चालू वर्तमानकाळ, पूर्ण वर्तमानकाळ यांतील फरक); तसेच, कथानकाची सत्यता पारखण्याचा आग्रह हे घटक तिच्या मानसिक वाढीचे निदर्शक आहेत. गोष्ट सांगताना त्यामुळे ‘एकदा काय झालं’ असे म्हणूनच सुरुवात करण्याचा आमचा शिरस्ता असतो. तो अक्षरशः विधी-रिच्युअल- झाला आहे. मी ‘एकदा’ असे म्हणताच तिने ‘काय झालं?’ असे अगदी डोळे विस्फारून म्हणायचे असते !

एखाद्या गोष्टीचा तिच्या मनावर परिणाम कसा झाला आहे, हे कधी तरी अचानक समोर येते ! परवा तिने थंडीसाठी अंगात जाकिट घातले होते. ती दोन हातांनी जाकिट पकडून, खाली वाकत, छातीकडे पाहून एकदम म्हणाली, ‘इथं माझं मन आहे. त्यात माझा बाप्पा असतो. मी आता त्याच्याशी बोलणार !’ मारुतीने छाती फोडून रामाची मूर्ती दाखवली ह्या गोष्टीचा हा स्पष्टच प्रभाव होता ! यातली ‘माझा बाप्पा’ ही देवाची ‘खासगी’ कल्पना मला आवडून गेली !

अनाहिताला गोष्ट सांगताना मलाच काही वेळा, काही प्रमाणात बोध घडत गेला आहे ! मुख्य बोध हा की मुले केवळ वेळ घालवण्यासाठी गोष्ट ऐकत असतात हे विधान सरसकट करता येणार नाही. काही गोष्टी त्यांच्या मनात घर खोल करून राहत असतात. मुले त्यांच्या परीने त्या गोष्टींवर सहज विचार करत असतात. याचा मला एकदा आलेला अनुभव सांगण्याजोगा आहे.

तो अनुभव असा आहे : साधारणपणे पाच वर्षांच्या वयात तिला पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या गोष्टी प्रिय असत. विशेषतः चिऊताईच्या मेणाच्या घरातील नेपथ्य काही प्रमाणात तिच्या घरातील वस्तूंशी, संदर्भांशी जुळणारे लागत असे. मुले मनाने गोष्ट जगत असतात, हे खरेच आहे !  चिऊ-काऊबरोबरच कुत्रा-मांजर हेही तिचे लाडके आहेत; शिवाय वाघ, हत्ती असे जंगली प्राणीही तिला गोष्टीत हवे असत. त्यामुळे सर्कशीची गोष्ट तिला खिळवून ठेवत असे. विशेषतः रुमाल हुंगून तो कोणाचा आहे, हे केवळ वासावरून ओळखणारा कुत्रा तिला भारी वाटत असे ! एकदा, मी तिला लबाड कोल्ह्याची नेहमीची गोष्ट सांगितली. तो कोल्हा एका म्हातारीच्या शेतातील ऊस कसा चोरून खातो, मग म्हातारी कशी त्याला शिक्षा करते वगैरे वगैरे ! दुसऱ्या दिवशी सकाळी अनाहिताचा फोन मला आला. ती म्हणाली, ‘नीलू आजी, कोल्ह्याला शहाणा कर !’ हे फर्मान मला अगदी  अनपेक्षित होते ! मला मनात संतकवी ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ओळ आठवली :  ‘खळांची व्यंकटी सांडो !’ …दुष्टांचा दुष्टपणा दूर होवो !

खरेच ! मुलांना भोवतालचे जग कसे सुसंवादी, शांत, प्रसन्न, एकमेकांशी छान नाते असलेले हवे असते…! अवकाशात जसे ग्रहतारे एकमेकांभोवती तोल सांभाळत फिरत असतात, अगदी तसे, तालासुरात सगळे त्यांना हवे असते !  हा तर निरागसपणाचा मंत्र आहे ! मी मग गोष्टीचा शेवट बदलला. अनाहिताला आवडणारा गोजिरा ससा गोष्टीत आणला. कोल्ह्याला सशाकडे शिकवणीला पाठवले. काही महिने गेले आणि कोल्हाही त्याचा लबाड स्वभाव टाकून देत ‘शहाणा’ बनला ! मग तिला ती गोष्ट आवडली !

प्रत्यक्षात कोल्हा बदलो- न बदलो ! भोवतालचे कुरूप, भयावह वास्तव बदलू शकते; हा विश्वास निदान त्यांच्या कोवळ्या मनात रुजवला गेला पाहिजे, नाही का? तेवढीच त्यांच्या बालमनावर निरागसपणाची पाखर !

– नीलिमा गुंडी 9881091935 nmgundi@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. Aptly penned. A true teacher and grandma at heart. Nurturing and influencing children’s thought, emotion, creativity– all in one.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here