नास्तिक आहे… म्हणूनच मस्त जगतो !

ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल स्पष्ट भूमिका घेणारे लोक जगात फार थोडे असतात; परंतु देव आहे की नाही याबाबत विचार करणारे लोक भरपूर असतात. किंबहुना, अगदीच भाविकभाबडे लोक वगळले तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रसंगी ‘देव मदतीला येईल का? पण देव असेल तरच ना !’ असा प्रश्न उद्भवत असतो. त्याचे प्रमुख कारण माणसाची दुर्बलता व म्हणून हतबलता हेच असते. तथापि काही कणखर माणसे कोणत्याही संकटप्रसंगी मनाचा निर्धार कायम ठेवून केवळ बुद्धीने विचार करून निर्णय घेतात. त्याची योग्यायोग्यता नंतरच्या परिस्थितीनुसार ठरते यावर त्यांचा विश्वास असतो. अशाच बुद्धिनिष्ठ, तार्किक विचार करण्याची शक्ती कमावलेल्या लेखकाने तो नास्तिक कसा बनत गेला याची कहाणी येथे सांगितली आहे…

सभोवतालची सामाजिक व कौटुंबिक पार्श्वभूमी आज आस्तिक व जातीयवादी आहे. ती माझ्या बालपणीही तशीच होती. मीदेखील त्याच व्यवस्थेचा भाग होतो. आम्हाला आठवी-नववीत पाठ्यपुस्तकात जोतिबा फुले यांचा एक निबंध होता. त्यात त्यांनी ईश्वराऐवजी ‘निर्मिक’ हा शब्द वापरला होता. त्याची कारणेही दिली होती. तेथेच माझ्या मनात ठिणगी पडली. मी पत्र लिहिताना ||श्री|| ऐवजी ||निर्मिक|| असे लिहू लागलो ! तरीही देवाच्या अस्तित्वाबाबत असंख्य प्रश्न मनात उमटत असत; त्याला उत्तरे समाधानकारक मिळत नसत.

मी मला बँकेत नोकरी मिळाल्यानंतर वाचनालयातून पुस्तके आणू लागलो. ‘देव ही केवळ कल्पना आहे, तो अस्तित्वात नसतो’ या विचारांचे दृढीकरण वाचनामुळे झाले. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत सक्रियपणे 1986 ते 1997 या काळात केले. पुढे, मला ‘देवाधर्माला विरोध नाही’ ही समितीची भूमिका पटेनाशी झाली. डॉ. लागू यांची ‘परमेश्वराला रिटायर करा’ ही भूमिका पटू लागली. माझ्या बँकेतील पदोन्नतीमुळेही ‘अंनिस’चे काम थोडे बाजूला पडले. मी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती 2008 साली घेतली आणि मुलांच्या शैक्षणिक विकासासंदर्भात काम करू लागलो. मुलांमध्ये जमेल त्या प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवण्याचा माझा प्रयत्न असे. त्या सर्व प्रवासात काही गोष्टी लक्षात आल्या. एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून ‘नास्तिक’ बनवणे अशक्य आहे. नास्तिक होण्यासाठी त्या व्यक्तीला नास्तिक विचार पटावे लागतात. त्याच्या सभोवतालची सामाजिक, कौटुंबिक व शैक्षणिक व्यवस्था त्यासाठी अनुकूल असावी लागते. समजा, व्यक्ती नास्तिक बनली; तरी तिला तिच्या सर्व सामाजिक आचरणात नास्तिक विचारधारा पाळता येत नाही. पण व्यक्तिगत पातळीवर आचरण जास्तीत जास्त नास्तिक विचारधारेच्या जवळ नेता येते, असा अनुभव मला येत गेला. त्यामुळे मी माझे व्यक्तिगत वर्तन बहुतांश धार्मिक रूढी, कर्मकांड यांपासून दूर ठेवू शकत आहे.

व्यक्ती कुटुंबप्रमुख असेल तर तिला ते अधिकार वापरून स्वतःचे कुटुंब काही प्रमाणात तरी धार्मिक रूढी व कर्मकांड यांपासून दूर ठेवू शकता येते. सक्ती करावी लागते. त्याला इलाज नसतो. माझे वडील निवर्तले तेव्हा मी कुटुंबप्रमुख नव्हतो. मी तेव्हाची अनावश्यक कर्मकांडे रोखू शकलो नाही. मात्र, त्या वेळेसही मी व्यक्तिशः त्या कर्मकांडात भाग घेतला नाही. पण आई गेली तेव्हा मी कुटुंबप्रमुख होतो. मी आईची मृत्युपश्चात निरर्थक कर्मकांडे केली नाहीत; समाजवादी संस्थांना थोडी देणगी दिली व दरवर्षी देत आलो आहे.

मी माझा आंतरजातीय विवाह नोंदणी पद्धतीने अगदी कमी खर्चात जाणीवपूर्वक केला. पत्नी नास्तिक नाही, रूढी-परंपरा पाळते. पण आमच्या घरात देवघर नाही. कोणतेही धार्मिक विधी होत नाहीत. पत्नीचा मी देवळात तिला न्यावे वा मी तिच्याबरोबर यावे असा आग्रह नसतो. ती क्वचित कोणाबरोबर प्रसंगपरत्वे देवळात जाते. मी मुलावर जाणीवपूर्वक नास्तिक विचार बिंबवण्याचे प्रयत्न केले नाहीत; पण तो नास्तिक झाला आहे ! मी धार्मिक कर्मकांड करत नाही तरी गावच्या देवाच्या पालखीच्या काळात ‘देव’ घरोघरी येतो, तेव्हा पत्नी त्याची पूजा करते. मी ‘देव नाही’ या विषयावर कोणाशीही वाद घालणे गेली पंचवीस वर्षे तरी टाळत आलो आहे. कारण ज्यांचे देव आहे या विचारांचे दृढीकरण झाले आहे, ते अजिबात बदलत नाहीत. मी मुलांच्या शिकवण्या पंधरा वर्षांपासून घेत आहे. त्यांच्यापुढे ‘देव नाही’ हे विचार सतत मांडत असतो.

नास्तिकतेमुळे माझ्यात झालेले बदल लक्षणीय आहेत. कर्मकांडात जाणारा माझा वेळ व पैसा वाचला. मी वाचन व लेखन करू लागलो, विधायक सामाजिक कामांशी जोडला गेलो. माझ्या लेखनात नास्तिक विचारधारा दिसत राहिली. तीच विचारधारा ‘अखेरपर्यंत’ हा कथासंग्रह आणि ‘बबडूच्या गोष्टी’, ‘बेटू आणि इतर कथा’, ‘अंगणवनातील कथा’ हे बालसाहित्य यांत वाहते. ‘बदल’ ही माझी बालकादंबरी तर नास्तिकता व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांभोवती फिरते. उल्लेखनीय म्हणजे इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा 2015 सालचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार त्या कादंबरीला मिळाला ! ते पुस्तक त्यांच्याकडे आलेल्या अठ्ठेचाळीस बालसाहित्य पुस्तकांतून निवडले गेले होते.

नास्तिक विचारांमध्ये पक्केपणा व पक्वता वाचनातून व स्वतंत्रपणे विचार करण्यातून आली. त्यामुळे मला ‘देव’ या कुबड्यांची गरज प्रत्यक्ष व्यवहारात निराशेच्या क्षणी, संकटांच्या प्रसंगात कधीच भासली नाही. नास्तिक विचारांमधील निर्विवाद स्पष्टता मात्र सुलभा ब्रह्मनाळकर यांच्या ‘गोफ जन्मांतरीचेअस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’ आणि रिचर्ड डॅाकिन्स यांच्या ‘सेल्फिश जीन्स’ व ‘गॅाड डेल्युजन’ या पुस्तकांमुळे आली.

विश्वाचे ज्ञान करून घेण्याचा एकमेव ज्ञानमार्ग म्हणजे विज्ञान पद्धत हा आहे. त्या पद्धतीच्या मर्यादा वैज्ञानिकांना माहीत असतात. वैज्ञानिक अमूक एक गोष्ट त्यांना माहीत नाही किंवा तमुक एक संशोधन अजून अपुरे आहे हे नेहमीच कबूल करत असतात. त्यामुळे त्यांना काय माहीत नाही, हे सतत अधोरेखित करण्याची गरज मला वाटत नाही. वैज्ञानिक त्यांना काय माहीत झाले आहे तेच सांगतात; आज जे माहीत झाले आहे ते कदाचित पुढील टप्प्यावर बदलून घ्यावे लागेल हेदेखील सांगतात. वैज्ञानिकांना विश्वाबद्दल जी काही माहिती मिळालेली आहे, तीसुद्धा खूप आहे. मिळालेल्या माहितीवरून, ‘ईश्वर’ म्हणून जेवढ्या कल्पना केल्या गेल्या आहेत तेवढ्या सर्वच्या सर्व नाकाराव्या लागतात, विज्ञान तितके समाधानकारक उत्तर देऊ शकते.

विज्ञान मला माझ्या अस्तित्वाच्या प्रश्नांना पुरेशी समाधानकारक उत्तरे देते. विज्ञान मला सर्वच संकल्पना समजणार नाहीत, हे भानही देते. पण मुळात विज्ञान पुराव्याशिवाय कोणतीही संकल्पना स्वीकारत नाही. मी जर ठाणच मांडले, तर मला आईनस्टाईनच्या संकल्पनाही समजतील. त्या अमानवी नाहीत हे मला विज्ञानाने शिकवले आहे. पुढेही, जे काही विश्वाबद्दल माहीत करून घ्यायचे आहे, ते वैज्ञानिक पद्धतीनेच माहीत करून घ्यावे लागेल.

मी ‘ईश्वर’ या कल्पनेवर विश्वास ठेवत नाही. कारण ती एक कल्पना म्हणजे गृहितक आहे. ते गृहितक विज्ञानाने अनेक अंगांनी तपासले आहे. ते गृहितक मानून विज्ञानाला विश्वाबद्दल पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत- मिळत नाहीत. विज्ञानाने अशी कितीतरी गृहितके बदलून पुढील संशोधनाचा मार्ग प्रशस्त करून घेतला आहे. दुसरे म्हणजे व्यावहारिक जीवनात ईश्वर ही कल्पना मानली की त्याबरोबर येणाऱ्या असंख्य अव्यवहार्य व अवैज्ञानिक संकल्पना मान्य करण्याची नामुष्की पत्करावी लागते. ती मला नको आहे. कोणीही निर्माता कल्पायचा असेल तर त्याला कोणी निर्माण केले, हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो.

          विश्व मला समजण्यापलीकडे आहे एवढी वैज्ञानिक समज मला माझे व्यावहारिक व भावनिक आयुष्य समृद्ध करण्याच्या आड येत नाही. निर्जीव वस्तू, पदार्थविज्ञान, रसायनविज्ञान यांच्या घडामोडींतून खूप उशिरा पृथ्वीवर जीवविज्ञान जन्माला आले, हे मला समजून घेता येते. निर्जिवातून सजीव निर्मिती, सजीवांचे पुन्हा निर्जिवात रुपांतर हे चक्र सातत्याने चालले आहे, हे समजून घेता येते. त्यामुळे मला आत्मा, पुनर्जन्म, भूत, पिशाच्च या संकल्पना कुचकामी आहेत हे पटते. शिवाय, त्या संकल्पना, माझी वैज्ञानिक व वैचारिक समज वाढवण्यास किंवा मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास अजिबात मदत करत नाहीत. म्हणून मी ती गृहितके रद्द करतो… आणि मस्त जगतो !

विद्यालंकार घारपुरे 9420850360 vidyalankargharpure@gmail.com

————————————————————————————————————————————-

About Post Author

6 COMMENTS

 1. खोटं मोठ्याने सांगत राहीलं की ते खरं खरं वाटत राहते..जे आजकालचे राज्यकर्ते करत आहे.तसंच देवकल्पनेचं आहे.मुलांना बालपणापासुन मायबापच देवाविषयि शिकवत राहतात..ते पुढेही पुढच्या पिढीत जात राहते.
  ब्रेक हवाय कुठेतरी…
  एक समंजस .स्वतःचा विचार करणारा …माणूस हवाच

 2. खूप छान मांडलेत. मी स्वतः काहीही धार्मिक कर्मकांड करीत नाही. लग्नही नोंदणी पद्धतीने केलं. घरात देवघर नाही. मला जोडीदारही याच विचारांचा मिळालाय. आता आमच्या सहजीवनाला ४९ वर्षे होताहेत. पण देवधर्म नाही केलं तर कुठेही प्रगती खुंटली नाही. माझ्या मुलाने डाॅक्टरेट मिळवली. त्याचाही संसार चांगला चालला आहे. माझ्या माहेरी सगळे सणवार होते. पण मला त्यात कधीच मनापासून सहभागी व्हावसं वाटलं नाही.

 3. लेखकाचे विचार पटण्यासारखे आहेत. मी विज्ञान शिक्षक आहे. कर्मकांडाच्या विरोधात आहे. नास्तीक असलो देवदर्शनाच्या निमित्ताने पर्यटन करायला आवडते. मंदीरातील देवापेक्षा मंदीराच्या आतील व बाहेरील कलाकुसर , शिल्पकला पहायला आवडते. अंधश्रद्धा नसावी हे बरोबर आहे. पण श्रद्धा असावी. केवळ विज्ञानाला धरून चाललो तर जीवन रूक्ष होईल असे वाटते. विज्ञानालाच देव मानून देवाचा शोध घ्यायला पाहिजे. उघडपणे स्वत:ला नास्तीक म्हणणारे लोक कमी आहेत. संजीव , निर्जीव सृष्टी निर्माण करणारी व हे जीवन चक्र चालवणारी शक्ती ही दिसत नाही पण जाणवते तिलाच ईश्वर मानले तर काय बिघडले ? उष्णता , प्रकाश , ध्वनी , विद्युत , चुंबकत्व , गतीज ऊर्जा , स्थितीज ऊर्जा सर्वच ऊर्जा ही देवीचीच रूपे आहेत असे मला वाटते. अजून काही ऊर्जांचा शोध भवीश्यात लागू शकतो. तंत्रज्ञान विकसित होऊ शकते. निसर्ग आणि विज्ञानाला जर कुणी देव मानत असेल तर तोच खरा आस्तीक असे म्हणने फारसे वावगे ठरणार नाही असे मला वाटते. पिण्डे पिण्डे मतीर्भिन्न: , कुण्डे कुण्डे नवम पय :

 4. आजकाल धार्मिक कर्मकांड जास्त कोणीच करत नाहीत. आळस….शिवाय टाईमपास करायलाच लोकांना आवडते. आस्तिक म्हणून घेणे अवघड..त्यापेक्षा नास्तिक म्हणणे सोपे. कर्मकांडातून सुटका……आणि लेखक असं समजतो काय, की आस्तिक लोक विज्ञानावर श्रद्धा ठेवत नाहीत….आणि शास्त्रज्ञ नास्तिक असतात… अजून खूप शिकायचे आहे हो तुम्हाला..केवळ देवपूजा करणे म्हणजे आस्तिक नाही.. आणि केवळ मी देवपूजा करत नाही.. मंदिरात जात नाही, धार्मिक कार्ये करत नाही म्हणजे मी नास्तिक असे नसते…अभ्यास करा…पुढच्या वर्गात यास. तुमचं तुम्हालाच कळेल.

 5. खूप छान मांडलेत. मी स्वतः काहीही धार्मिक कर्मकांड करीत नाही. लग्नही नोंदणी पद्धतीने केलं. घरात देवघर नाही. मला जोडीदारही याच विचारांचा मिळालाय. आता आमच्या सहजीवनाला ४९ वर्षे होताहेत. पण देवधर्म नाही केलं तर कुठेही प्रगती खुंटली नाही. माझ्या मुलाने डाॅक्टरेट मिळवली. त्याचाही संसार चांगला चालला आहे. माझ्या माहेरी सगळे सणवार होते. पण मला त्यात कधीच मनापासून सहभागी व्हावसं वाटलं नाही.

  • मीही आयुष्यभर व्यायाम केला नाही खेळलो नाही पण ठणठणीतपणे सत्तराव्या वर्षापर्यंत उभा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here