महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी पितापुत्र

0
201

प्रसिद्ध निरूपणकार आप्पा धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. देशपातळीवर जसा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तसाच राज्य पातळीवर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे. धर्माधिकारी कुटुंबीयांचे प्रेरक आणि समाजोपयोगी कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्याच कुटुंबासाठी पित्यापाठी पुत्राला असा हा दुसऱ्यांदा पुरस्कार दिला आहे. धर्माधिकारी पितापुत्रांच्या या पुरस्काराला या काळात आगळे महत्त्व आहे. त्यामधून लौकीक जीवनातील आध्यात्मिकतेचे महत्त्व दृगोचर होते. सद्यकाळात जग तंत्रविज्ञान प्रभावाने भांबावलेले असताना सरकारच्या पुरस्कार प्रदानाचे परिणाम वेगळे ठरते.

संत आणि समाजसुधारक यांची मोठी परंपरा भारताला लाभली आहे; महाराष्ट्र त्यात अग्रेसर आहे. अशी संतांची परंपरा ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, नरहरी सोनार, चोखा मेळा, सेना न्हावी, मुक्ताबाई, कान्होपात्रा, गाडगे महाराज, कैकाडी महाराज आहे. ती मंडळी अठरा पगड जातींतून आलेली आहेत. तीच परंपरा, त्यातील अध्यात्माला समाजसेवेची जोड देत विनोबा भावे, वामनराव पै, पांडुरंगशास्त्री आठवले, आमटे पितापुत्र, धर्माधिकारी पितापुत्र इत्यादींनी पुढे चालू ठेवली आहे. पैकी धर्माधिकारी पितापुत्रांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्राप्त झाला आहे, हे त्यांचे वेगळेपण.

योगायोग असा, की सकाळ माध्यम समूहाने यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यीन) हा तरुणाईसाठी असलेला प्रोजेक्ट ऑगस्ट 2014 मध्ये सुरू केला. त्यांनी तरुणांनी लिहिते व्हावे, त्यांच्या भावना मांडाव्यात या उद्देशाने ‘यिनबझ’ नावाचे वेब पोर्टल सुरू केले. एका वर्षभरातच एक करोड तरुणाई ‘यिनबझ’च्या झेंड्याखाली एकत्रित आली. ‘यीन’च्या समारोपाच्या भाषणात (24 फेब्रुवारी 2023) ‘यीन’चे प्रेरक आणि सर्वेसर्वा अभिजित पवार यांनी व्यक्त केले, की समाजात काम करताना आध्यात्मिक, नैतिक, सामाजिक बैठक आवश्यक आहे. त्यांनी स्वाध्यायी परिवाराचे पांडुरंगशास्त्री आठवले आणि धर्माधिकारी कुटुंबीय यांचे कार्यही नमूद केले. अभिजित पवार डिलिव्हरी चेंज फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्षही आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणात तरुणांना उद्देशून सांगितले, की “तुमच्याकडे जर समाजोपयोगी चांगला उपक्रम असेल तर तुम्ही भेटू शकता. पण त्यासाठी तरुणांनी प्रथम स्वाध्याय परिवाराचे कै.पांडुरंगशास्त्री आठवले यांचा; तसेच, त्यांच्या कामाचा अभ्यास करावा. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची “श्रीबैठक” काय आहे? त्यात कोणत्याही जाती-धर्माचा संबंध नाही. त्यांपैकी कोठल्याही बैठकीत दर आठवड्याला तास-दोन तास श्रवण करण्यासाठी सहभागी व्हायचे असते. देश बदलण्यासाठी स्वाध्याय केंद्रे आणि “श्रीबैठक” हे एक चांगले मॉडेल होऊ शकते! ते बदल प्रथम स्वत:त आणा, देश बदलण्यापूर्वी स्वत:त काय बदल झाले ते पाहा. त्या बैठकांमुळे व्यक्तींच्या मनात, नीतिमूल्यात विलक्षण बदल होतील. अशी स्वतःची मानसिकता बदलली की ती व्यक्ती समाजाचा विचार करते.”

शिवसेना-भाजप युती 1995 मध्ये सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तो पुरस्कार आरंभी साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान या क्षेत्रांत प्रत्येक वर्षी दिला जात असे. त्यात सामाजिक कार्य, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांचा नंतर समावेश करण्यात आला. तो पुरस्कार या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जातो. पुरस्कार विजेत्याला पंचवीस लाख रुपये रोख, शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र दिले जाते. (जानेवारी, 2023 चा निकष) पुरस्काराचे स्वरूप आरंभी पाच लाख रुपये रोख आणि प्रशस्तिपत्र असे होते. ‘महाराष्ट्र भूषण’च्या निकषांमध्ये सप्टेंबर 2012 मध्ये प्रथम बदल करण्यात आले. पुरस्काराची रक्कम त्यावेळी पाच लाख रुपयांवरून दहा लाख रुपये करण्यात आली. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांना 1996 मध्ये प्रदान करण्यात आला.

शिवशाहीर ब.मो.पुरंदरे वगळता इतर पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या बाबतीत फारसे वादविवाद झाले नाहीत. धर्माधिकारी यांना दिलेल्या पुरस्कारालाही संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी वर्णभेद आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या माणसाला पुरस्कार दिल्याचा आरोप केला आहे. आप्पा धर्माधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरू तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्नेही आहेत. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सांगण्यावरूनच झाली का? फूट पडली म्हणून हा पुरस्कार बक्षीस म्हणून दिला का? अशा आम्हाला शंका आहेत असे त्यांचे म्हणणे. वास्तवात गोष्ट अशी सांगण्यात येते, की एकनाथ शिंदे यांची दोन लहान मुले अपघातात गेल्यावर सैरभैर झालेल्या त्यांच्या पूर्ण कुटुंबाला धर्माधिकारी यांच्या ‘श्रीबैठकी’त दिलासा मिळाला, दुःखातून सावरता आले. इतर लाखो साधकांप्रमाणे त्यांनाही श्रीबैठकांमधून आत्मिक समाधान मिळाले. त्यांनी आप्पासाहेबांना गुरुस्थानी मानले आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पात्रता व निकष पुढीलप्रमाणे आहेत.

  1. संबंधित व्यक्तीने तिच्या क्षेत्रात वीस वर्षे पूर्ण सेवाभावी वृत्तीने; तसेच, वैशिष्टयपूर्ण/उल्लेखनीय कार्य केलेले असावे. महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये सप्टेंबर, 2012 मध्ये बदल करण्यात आले. तो पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले. परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे वास्तव्य महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे असणे गरजेचे आहे.

2. पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य दिले जाईल.  पुरस्कार निवड समिती : 1. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य – अध्यक्ष, 2. मंत्री, सांस्कृतिक कार्य- सदस्य, 3. सचिव, सांस्कृतिक कार्य – सदस्य, 4. संचालक, सांस्कृतिक कार्य – सदस्य सचिव, 5. तसेच विविध विशेषज्ञ व पाच अशासकीय सदस्य

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी – पु. ल. देशपांडे (साहित्य) 1996; लता मंगेशकर (कला, संगीत) 1997; विजय भटकर (विज्ञान) 1999; सुनील गावसकर (क्रीडा) 2000; सचिन तेंडुलकर (क्रीडा) 2001; भीमसेन जोशी (कला, संगीत) 2002; अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा) 2003; बाबा आमटे (समाजसेवा) 2004; रघुनाथ माशेलकर (विज्ञान) 2005; रतन टाटा (उद्योग) 2006; रा.कृ. पाटील (समाजसेवा) 2007; नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा) 2008; मंगेश पाडगावकर (साहित्य) 2008; सुलोचना लाटकर (कला, चित्रपट) 2009; जयंत नारळीकर (विज्ञान) 2010; अनिल काकोडकर (विज्ञान) 2011; ब.मो. पुरंदरे (साहित्य) 2015; आशा भोसले (कला, संगीत) 2021; आप्पासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा) 2023

धर्माधिकारी यांच्या घराण्यात समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा चारशे वर्षांपासून आहे. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव ‘शांडिल्य’ असे आहे. त्यांच्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करत. दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ‘धर्माधिकारी’ अशी पदवी दिली. तेव्हापासून त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनाव लावू लागले. ती मंडळी आडनावाला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करत आली आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर (2008) महाराष्ट्र भूषण म्हणून गौरवण्यात आले होते.

नानासाहेब यांनी श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती 1943 साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे स्थापन केली. आध्यात्मिक आणि सामाजिक काम हे समितीचे उद्दिष्ट होते. ‘श्रीबैठक’ पहिल्यांदा सोमवार, 8 ऑक्टोबर 1943 (विजयादशमी) रोजी मुंबई येथील गोरेगाव येथे सुरू करण्यात आली. त्या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्यांच्या शाखा भारताबाहेरील अनेक देशांत पसरल्या आहेत. त्या संस्थेमध्ये मराठीबरोबरच हिंदी, उडिया, तमिळ, बंगाली, कन्नड व इंग्रजी या भाषांतून निरूपण केले जाते. सुरुवातीला, महिला व पुरुष यांचीच बैठक होत असे. मात्र, बालोपासना संस्कार बालवयापासूनच व्हावेत म्हणून सुरू करण्यात आली आहे.

नानांनी शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते. त्यांनी अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातिभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत सद्गुणांची पेरणी केली. त्यामुळे लाखो लोक परमार्थाकडे वळले.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म कोकणातील रेवदंडा येथे 14 मे 1946 रोजी झाला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच पुरस्कार नानासाहेब यांच्या वतीने तेव्हा स्वीकारला होता. विलासराव देशमुख हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्या वेळी खारघर येथील पाचशेदहा एकराच्या परिसरात चाळीस लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. गर्दीच्या त्या उच्चांकाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये 2010 मध्ये झाली आहे. एवढ्या मोठ्या गर्दीनंतरही कोठलीही अनुचित घटना न घडता मैदान कार्यक्रमानंतर स्वच्छ झालेले होते ! नानासाहेबांच्या अनुयायांनी त्यांची शिकवण प्रत्यक्षात आणली होती !

सचिन, राहुल व उमेश ही धर्माधिकारी कुटुंबीयांची तिसरी पिढी आहे. ती समाजकार्यात जोडली गेली आहे. समाजामध्ये आदर्श नैतिक मूल्ये रूजवण्यात त्या लोकांचे कार्य आहे.

नानासाहेबांनी त्यांच्या पित्याकडून प्रेरणा घेऊन, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहत चालवले. नानासाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक आणि आध्यात्मिक विषयात भरपूर मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आप्पासाहेब आणि नातू सचिन यांनी त्यांचे सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य सुरू ठेवले आहे. युरोपीयन विद्यापीठाकडून (युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट पॅरिस, फ्रांस यांच्यावतीने) आप्पासाहेब यांना ‘द लिव्हिंग लेजंड’ आणि सचिन यांना ‘मानद डॉक्टरेट’ या पुरस्कारांनी 25 फेब्रुवारी 2022 रोजी सन्मानित करण्यात आले आहे.

नानासाहेब व आप्पासाहेब हे निरुपण मुख्यत: समर्थ रामदास स्वामी यांच्या श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या आधारे करतात. नानासाहेब यांना मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार- गुजराती महाजन भूषण पुरस्कार (17-11-2000), रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगडमित्र (13 मे 1993), टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी लिट, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मानपत्र, पुण्याच्या महर्षी व्यास प्रतिष्ठानचा पुरस्कार, महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार, तर महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचा महाराष्ट्र गौरव राष्ट्रीय एकात्मता कार्याबद्दल ‘सीरॉक इंडिया पुरस्कार, शिवराज प्रतिष्ठान पुरस्कार आणि समर्थ व्यासपीठ (पुणे) यांचा शिवसमर्थ पुरस्कार, समर्थ रामदासस्वामी भूषण पुरस्कार, पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डी.वाय. पाटील विद्यापीठ, (नेरुळ) कडून विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दासबोधावरील श्रवण बैठका महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होत आहेतच. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन याची दखल घेतली आहे. शिवाय रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियानाद्वारे स्मशानभूमी आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहिरींमधील गाळ काढून त्या साफ करणे, यासह अनेक कामे त्यांच्या माध्यमातून केली जातात.

अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला.

विलास पंढरी 9860613872 vilas_pandhari@yahoo.com

———————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here