नाथसंप्रदाय : उदय आणि विस्तार

2
58
-nathsanpraday

नाथसंप्रदाय हा संप्रदाय स्वरूपात केव्हापासून प्रचलित झाला हे सांगणे अवघड आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचा काळ हा नाथसंप्रदायाच्या प्रवर्तनाचा काळ मानला जातो. नाथसंप्रदाय हा शिवोपासक असून, त्या सांप्रदायिकांची श्रद्धा ‘शिव’ हा सर्वांचा ‘गुरू’ अशी आहे. गुरू गोरक्षनाथ ‘सिद्धसिद्धांत पद्धती’ या दिव्य ग्रंथाच्या आरंभी म्हणतात, “ज्याप्रमाणे दोन टिपऱ्यांचा नाद एकच, दोन स्वजातीय फुलांचा गंध एकच, दोन ज्योतींचा प्रकाश एकच, दोन नेत्रांतील दृष्टी एकच, त्याचप्रमाणे या विश्वाच्या पसाऱ्यात ‘शिव-शक्ती’ या नामद्वयाने नटलेले तत्त्व नि:संशय एकच आहे (आदिनाथं नमस्कृत्यं शक्तियुक्तं जगद्गुरूम् | वेक्ष्ये गोरक्षनाथोऽ हं सिद्धसिद्धांत पद्धतिम् ||).”

‘शिव’संबंधाने जे पंथ, उपपंथ भारतात उदयास आले, त्या सर्वांचा संबंध या ना त्या कारणाने नाथसंप्रदायाशी पोचतो. नाथपरंपरेतील ‘मच्छिंद्रनाथ’ हा विष्णूचा अवतार मानला गेल्यामुळे आणि महाराष्ट्रातील नाथसंप्रदाय हा विठ्ठलाच्या म्हणजेच श्रीकृष्णाच्या उपासनेत एकरूप झालेला असल्यामुळे वैष्णव धर्माचाही नाथसंप्रदायाशी संबंध पोचतो. ‘निवृत्तिनाथ’ हा ‘शंकरा’चा, ‘ज्ञानेश्वर’ हा ‘विष्णू’चा, ‘सोपान’ हा ‘ब्रह्मदेवा’चा आणि ‘मुक्ताबाई’ हा ‘चिच्छशक्ती’चा असे अवतार मानले जातात. त्यामुळे शिव, विष्णू आणि शक्ती यांच्या उपासनापंथांचे साधर्म्य नाथसंप्रदायाशी आहे.

दाढी-जटा वाढलेल्या, कमरेपासून छातीपर्यंत गुंडाळलेली मेखला, जानव्यासारखी शोभणारी शैली, हरणाच्या शिंगाची शृंगी, पुंगी, कर्णकुण्डले, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, हातात त्रिशूळ, काखेत झोळी, पायात खडावा अशा वैशिष्ट्यपूर्ण वेशातील ते साधुबैरागी रस्तोरस्ती दिसत. कानात कुण्डले असलेल्यांना ‘कानफाटे योगी’ असे म्हटले जाई.

‘नाथसंप्रदाय’ या शब्दातील ‘नाथ’ म्हणजे ‘स्वामी’ किंवा ‘धनी’. तो धनी कोण? तर या चराचर सृष्टीचा निर्माता. नाथसांप्रदायिकांच्या भाषेत सांगायचे, तर ‘शिव गोरखबानी’ या गुरू गोरक्षनाथांच्या मान्याताप्राप्त ग्रंथात हा शब्द ‘ब्रह्म’ किंवा ‘परमतत्त्व’  या अर्थाने वापरला गेला आहे, तर संस्कृत टीकाकार तोच शब्द ‘सद्गुरू’ या अर्थाने वापरताना आढळतात. सारांश, ‘नाथ’ या शब्दाचा अर्थ ‘अध्यात्म मार्गातील श्रेष्ठ किंवा आदरणीय व्यक्ती’ असा सांगता येईल किंवा नाथ म्हणजे परब्रह्म, परमतत्त्व, सद्गुरू? ‘नाथ’ हे नाव अनेक सिद्ध पुरुषांनी नाथसंप्रदायाच्या दीक्षेनंतर धारण केलेले दिसते. परब्रह्माची किंवा परमतत्त्वाची उपासना करणे हा त्या संप्रदायाचा हेतू. तो अनेक नावांनी ओळखला जातो पण ‘नाथसंप्रदाय’ किंवा ‘नाथपंथ’ हे त्याचे नाव सर्वमान्य आहे.

नाथसंप्रदाय योगमार्गातून उदयास आला. योगाची एक शाखा सिंधू संस्कृतीच्या उदयापासून प्रचलित होती. त्या संप्रदायाची पाळेमुळे वज्रयान, सहजयान या शैव-बौद्ध पंथात दडलेली आहेत. काही विद्वानांच्या मते, त्याचा उदय बंगालमध्ये आठव्या शतकाच्या अखेरीस झाला आणि नंतर तो भारतात पसरला.

हे ही लेख वाचा –
ज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज देगलूरकर
आद्य शंकराचार्य
देवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास

 

नाथसंप्रदायात ज्ञान, धर्म, कर्म आणि भक्ती या चार वाटा एकत्र येतात. परिणामी साधक सिद्ध बनतो. इतकेच नव्हे, तर त्याच्यासाठी मोक्षाची खाण उघडते. तो संप्रदाय ‘जे ब्रह्माण्डात आहे, ते ते सारे पिण्डात आहे’ असे मानतो. कुण्डलिनी जागृतीला त्या संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुण्डलिनी शक्ती अग्निचक्रात सुप्तावस्थेत पहुडलेली असते, ती ज्यावेळी सहस्रार चक्रातील शिवाशी समरस होते, तेव्हा योग्याला ‘कैवल्यावस्था’ किंवा ‘सहज समाधी’ यांचा अनुभव येतो.

त्या अद्भुत संप्रदायाचा प्रारंभ आदिनाथ शंकर आणि अत्रिसुत दत्तात्रेय यांच्या आज्ञेने आणि दीक्षेने झाला. संप्रदायाचे उगमस्थान काहींच्या मते बंगाल, तर काहींच्या मते त्या संप्रदायाची उदयभूमी महाराष्ट्रात असावी, तर काहींच्या मते ‘श्रीशैल’ ही असावी.

नाथसंप्रदायाची परंपरागत अशी पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणजे हरिद्वार, बद्रिनाथ, अयोध्या, प्रयाग, द्वारका, वृंदावन, पुष्कर, त्र्यंबकेश्वर, अमरनाथ, पशुपतिनाथ, श्रीशैल ही होत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील मढी, वृद्धेश्वर डोंगराचा परिसर, देवगिरी, डुडुळगाव, पैठण, आळंदी, सप्तशृंग ही तीर्थस्थाने होत. पाकिस्तानात असलेले हिंगुला देवीचे स्थान हेसुद्धा नवनाथांशी संबंधित आहे.

-navnath

नाथ सांप्रदायिकांचे अनेक मठ, मंदिरे, आखाडे आणि समाधिस्थाने काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते नेपाळ या परिसरात विखुरलेली आढळतात, उत्तर प्रदेशातील ‘गोरखपूर’ हे नाथसंप्रदायाचे प्रमुख केंद्र, आसामात ‘कामाख्ये’ला नाथसंप्रदायाचे महापीठ समजले जाते.

‘नाथपंथ का बाणा पारी | सब दुनियासे न्यारा है|’ असे नाथसंप्रदायाच्या संदर्भात म्हटले जाते; परंतु नाथपंथी बैराग्यांविषयी समाजात काही गैरसमज आहेत. ते नाथजोगी लोकांना मंत्रसिद्धीच्या साहाय्याने मारून टाकतात, विभूती किंवा भस्म देऊन लुबाडतात, स्त्रियांना मोहात पाडून भुलवतात, मूठ मारणे, जारण, मारण, उच्चाटन यांसारखे अघोरी उपाय करण्यात निष्णात असतात. ते सदैव अफू, गांजा, चरस यांसारख्या मादक पदार्थांच्या अंमलाखाली असतात. त्यांना प्रिय मद्य, मांस, मुद्रा, मोह व मैथुन हे पंच मकारही असतात, इत्यादी समज नाथसांप्रदायिकांबाबत समाजात पसरलेले असले तरी नाथसंप्रदायाचे मूळ स्वरूप उदात्त होते आणि आहे.

नाथसंप्रदायाच्या उदयकाळात भारतात बौद्ध धर्माला उतरती कळा लागली होती. इतकेच नव्हे, तर अनेक विकृत स्वरूपाच्या तंत्रसाधना बोकाळल्या होत्या. संशोधकांच्या मते, तांत्रिक योगिनींच्या जाळ्यात सापडून ‘योगिनीकौल’ नामक स्त्रीप्रधान तंत्र संप्रदायात प्रविष्ट झाले होते. नाथसांप्रदायिकांचे उपास्य दैवत भगवान शिव यांच्या वेशभूषेचा पगडा त्यांच्यावर पडणे स्वाभाविक आहे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेचे सविस्तर वर्णन ‘नवनाथ भक्तिसार’, ‘सिद्धसिद्धान्त पद्धती’ महानुभाव पंथाचा प्रसिद्ध ग्रंथ ‘लीळाचरित्र’; तसेच, चिंतामणीनाथ विरचित ‘नाथकैवल्य’ इत्यादी ग्रंथांत आढळते. ‘पिण्डी ते ब्रह्माण्डी’ हे नाथपंथाचे प्रधान सूत्र असून ‘पदपिण्डाची गाठी’ हे अंतिम ध्येय होय! गुरूपदिष्ट ‘सोऽ हम’ पंथाचा निदिध्यास ही सर्वात प्रमुख साधना नाथसंप्रदायाच्या उदयापासून आजतागायत मानली जाते.

गोरक्ष वगैरे नाथसिद्धांच्या ठायी स्त्री-शूद्रादिकांच्या उद्धाराची तळमळ उत्कटपणे होती आणि म्हणूनच त्यांनी स्त्रियांना मंत्रोपदेश दिला. गोरक्षनाथांनी संचार संपूर्ण भारतभर करून बहुजन समाजात नाथ संप्रदायाचा पद्धतशीर प्रचार व प्रसार केला; परंतु नाथसंप्रदायाच्या वाट्याला काळाच्या ओघात उपेक्षाच आली. कारण अघोरी विद्या आत्मसात करून घेणाऱ्यांचा ‘वामाचारी पंथ’ असा त्या संप्रदायाविषयी जनसामान्यांत समज दृढ झाला आणि त्यांच्याविषयीची आदराची जागा हळूहळू भीतीने घेतली. साहजिकच, सर्वसामान्य माणूस त्या संप्रदायापासून चार हात दूर राहिला; परंतु त्या संप्रदायातील काही महान विभूतींच्या चमत्कृतीपूर्ण जीवनचरित्रांमुळे; तसेच, अलौकिकत्वामुळे जनमानसातील त्या संप्रदायाविषयीचे सुप्त आकर्षण कमी झालेले नाही.

– आनंद साने, पुणे (०२०) २४४८५०९१
(‘आदिमाता’ ऑगस्ट २०१६ वरून उद्धत)

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.