नांदखेडा हे गाव बदनापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आहे. तेथील देवदरी हे बदनापूर, फुलंब्री व औरंगाबाद या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेले चौदाव्या शतकातील महादेव मंदिर आहे. ते निसर्गाच्या कुशीत व डोंगरांच्या रांगेत वसलेले आहे. तो मंदिर परिसर पावसाळा सुरू होताच हिरव्यागार मखमली हिरवळीने आच्छादला जातो. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतून भाविकांची मांदियाळी तेथे येत असते. दर सोमवारी भाविकांची रांग लागते. महाशिवरात्रीला आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह चालतो व मोठी यात्रा भरते. उत्सव श्रावण महिनाभर असतो. त्यावेळी भजन, काकडआरती असे कार्यक्रम होतात. निसर्गाने नटलेले व समाधान देणारे देवस्थान म्हणून त्याची एकूण ख्याती आहे. मात्र मंदिर दुर्लक्षित आहे, कारण ते पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्याचा विकास झालेला नाही.

मंदिराच्या खालील अंगाला; डाव्या बाजूस जुना बारमाही झरा आहे. तो ऐन दुष्काळातही आटत नाही. त्या झऱ्याने 1972 च्या मोठ्या दुष्काळादरम्यान आजूबाजूच्या अनेक गावांची तहान भागवली होती. भाविक झऱ्यावर हातपाय धुऊन मंदिरात प्रवेश करतात. मंदिराकडे जाणारी वाटही छान आहे. हिरवाईचे वैभव दोन्ही बाजूंना अनुभवता येते. मंदिराकडे जाण्यासाठी बांधीव पायऱ्या आहेत. प्रथम भारतमातेचे मंदिर लागते. त्या मंदिराचे द्वार कमानीच्या आकाराचे आहे. बाहेरील बाजूस भिंतीत दोन कोनाडे आहेत. त्याच्या समोरच सावळेश्वर मंदिर आहे. त्या चिरेबंदी मंदिराची उभारणी आठ कोरीव खांबांवर झालेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाच्या पिंडीसमोर राम, लक्ष्मण व सीता यांच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. त्यामुळे ते मंदिर राम, लक्ष्मण व सीता यांच्याशीही जोडले गेले आहे. मात्र प्रभाव महादेवाचाच जाणवतो !

मंदिराबाबत विविध आख्यायिका आहेत. त्या परिसरात माता सीता वनवास काळात वास्तव्य करत असे, म्हणे ! तेथून जवळच रामपुत्र लव व कुश यांचे जन्मस्थळ लहुगड आहे. सीतेने तेथे पूजनासाठी शंकराची मोठी पिंड उभी केली. ती पिंड असलेल्या स्थानावरच कालांतराने देवदरी हे मंदिर उदयास आले. काही जणांच्या मते, त्या ठिकाणाला रामेश्वरम असे नाव होते. भाविकांच्या व त्या भागातील वयोवृद्धांच्या तोंडून असे कळते, की ते साधारण चौदाव्या शतकातील मंदिर असावे.
मराठवाड्यात हैदराबादच्या निजामाने धुडगूस घातला होता. त्या वेळी शिवाजी महाराजांनी पराक्रमी सरदार प्रतापराव जाधव यांना निजामाचा उपद्रव थांबवण्यासाठी पाठवले होते. प्रतापराव जाधव यांनी त्याच दरीखोर्यात वास्तव्य करून निजामाशी लढा दिला होता. त्याच दरम्यान, तेथील जंगलात मोडकळीस आलेले रामेश्वरम मंदिर प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सतराव्या शतकात त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सरदार प्रतापराव जाधव यांचे समाधी मंदिर मारसावळी जंगल परिसरात आहे. तेथे देवाचे वास्तव्य डोंगराळ दरीत आहे. त्यामुळे रामेश्वरम देवस्थानचे नाव देवदरी असे पडले असावे.
तो परिसर भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मराठवाड्यातील निजामाच्या आधिपत्याखाली होता. निजामाच्या रझाकार सैन्याने मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेली भारतमातेची मूर्ती खंडित केली होती. मात्र त्याबद्दल तर्कवितर्क आहेत; त्या विधानाला पुरावा नाही. गमतीदार कथा अशी, की रझाकारी सैन्य गाभाऱ्यात प्रवेश करून मूर्तीची तोडफोड करण्यासाठी गेले असताना मुख्य गाभाऱ्यातून डरकाळी फोडत एक वाघीण पुढे झेपावली, त्या वाघिणीमुळे निजामाच्या सैनिकांना त्यांची शस्त्रे सोडून पळ काढावा लागला आणि मंदिराचे रक्षण झाले !

देवदरी हे तीर्थक्षेत्र तीन तालुक्यांच्या सीमेवर आहे, दुर्लक्षित आहे. तीर्थक्षेत्री जाण्याकरता मुख्य रस्ता नांदखेडा गावाच्या बाजूने आहे. भाविकांची वर्दळ त्याच बाजूने असते. परंतु तो रस्ता पर्यटन मंडळाने विकासासाठी सुरुवात केली असली तरी ते मंदिर पुरातत्त्व खात्याकडे असल्यामुळे विकासकामात नवनवे अडथळे निर्माण होत असतात.
कचरू बोचरे सरपंच नांदखेडा 9421396850
–अमृत तारो 9503267979 taroamrut@gmail.com
——————————————————————————————————————