मंडलीक ट्रस्ट – पंचायत राज प्रबोधनाचे कार्य (Mandalik Trust For Decentralised Democracy)

0
87

डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टची स्थापना 31 मार्च 1971 रोजी झाली. ट्रस्टचा सुवर्ण महोत्सवदेखील होऊन गेला. मात्र त्यावेळी कोरोना सर्वत्र असल्याने समारंभ ऑनलाइन साजरा करावा लागला. एकूण त्या दोन वर्षांत ट्रस्टच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामास अनेक मर्यादा आल्या आहेत. परंतु ट्रस्टने गेल्या पाच दशकांत समाजजागृतीचे विशेषत: पंचायत राज संकल्पना जनमानसात मुरवण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. पी.व्ही. मंडलीक यांनी स्वत:च तो ट्रस्ट सामाजिक ऋणाच्या जाणिवेतून निर्माण केला. डॉक्टरांचा गांधीजींच्या ट्रस्टीशिप संकल्पनेवर विश्वास होता. देशात सामाजिक, आर्थिक व रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था बऱ्याच सुरू होत होत्या. त्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज मोठी होती, पण त्यांच्या योगक्षेमाची सोय नव्हती. तशी योजना गरजेची होती – त्याशिवाय नियोजित उद्दिष्ट साध्य होऊ शकणार नाही; त्यासाठी विश्वस्त निधी आवश्यक ! डॉ. मंडलीक ट्रस्टच्या रूपाने त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात आले.

मंडलीक ट्रस्टने गेल्या पन्नासाहून अधिक वर्षांत केलेल्या कामाचे तीन टप्पे करता येतात :

पहिला टप्पा 1971 ते 81 – डॉक्टर पी.व्ही. मंडलीक यांना मिळणाऱ्या आमदारकीच्या मानधनातून त्यांनी कोकणातील गरजू संस्था आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करणारे दोन-तीन कार्यकर्ते यांना मानधन देण्याचा कार्यक्रम राबवला.

दुसरा टप्पा 1981 ते 1991 –ट्रस्टने सामाजिक कार्यकर्त्यांना सहाय्य व त्यांचे प्रशिक्षण हा प्रकल्प हाती घेतला. डॉक्टरांचे निधन 28 सप्टेंबर 1978 रोजी झाले होते. ट्रस्टच्या मालाड (मुंबई) येथील इमारतीचे बांधकाम 1979/80 या दोन वर्षांच्या कालावधीत केले गेले. त्यावेळी ट्रस्टच्या अतिरिक्त जमिनीची विक्री केली व त्यामुळे ट्रस्टच्या निधीत वाढ झाली. डॉक्टरांनी त्यांच्या दैनंदिनीत एक वाक्य लिहून ठेवले होते. “सार्वजनिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांस आर्थिक आघाडीवर कोणत्याही प्रकारची चिंता नसेल तरच तो त्याची सर्व शक्ती अंगीकृत कार्याला देऊ शकेल”. ट्रस्टने डॉक्टरांचे ते वाक्य सार्थ करण्याचे ठरवून, महाराष्ट्र आणि बाकी भारत येथील समविचारी संस्थांचे निष्ठावंत आणि तळागाळात काम करणारे पूर्णवेळ कार्यकर्ते निवडून त्या कार्यकर्त्यांना पूरक आर्थिक सहाय्य देणे, त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवणे आणि त्यांना वाचन साहित्य पुरवणे हे कार्य महत्त्वाचे ठरवले. तो प्रकल्प दहा वर्षे चालला. कार्यकर्त्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य अत्यल्प असे, पण त्यात सातत्य व नियमितपणा होता. त्यामुळे त्याचा आधार कार्यकर्त्यांना वाटे.

दुसऱ्या टप्प्यातील दहा वर्षांत कार्यकर्त्यांची चार शिबिरे आयोजित करण्यात आली. त्या शिबिरांतून एस्. एम्., नानासाहेब गोरे, शरदच्चंद्र गोखले यांच्यासारख्या नामवंतांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकदा शिबिराला भेट दिली होती. एक आठवडा कार्यकर्ते एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यामधील एकलेपणाची भावना नाहीशी झाली. ते एकटे नसून त्यांच्यासारखे काम करणारे इतरही कार्यकर्ते आहेत- ते आणि सर्व मिळून एक शक्ती आहोत ही भावना त्यांच्यात दृढ झाली. हे त्या वर्षांचे, दुसऱ्या टप्प्याचे फलित सांगता येते. शिबिरांमुळे कार्यकर्त्यांचा कायापालट होऊन त्यांच्या मनाला विश्रांती मिळाली. कार्यकर्ते शिबिरात रोज एक ते दीड तास श्रमदान करत असत

मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या मीनाक्षी आपटे यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यशाळांच्या आखणीत निश्चित हेतू व आशय, दोन्ही प्राप्त झाले.

त्याच काळात तज्ञांच्या समितीच्या सुचनेनुसार ट्रस्टने चार प्रायोगिक शिबिरे घेतली. त्यावरून कामाचे महत्त्व लक्षात आले व ते कसे करता येईल याचा विचार करण्यात आला व ट्रस्टच्या कार्याला त्यातून एक नवा आयाम प्राप्त झाला. त्यासाठी सोप्या भाषेतील सचित्र अशा पुस्तिका तयार करण्यात आल्या, रंगीत भित्तिचित्रे बनवली गेली, स्फूर्तिदायक गाणी संकलन करण्यात आली. त्या पुस्तिकांच्या मालिकेतील महत्त्वाची पुस्तिका म्हणजे नवनीतभाई शहा लिखित ‘आपलं गाव-आपली पंचायत’ (सध्या नववी सुधारीत आवृत्ती चालू आहे.) ती पुस्तिका म्हणजे कार्यकर्त्यांचे बायबल आहे असे मंडलीक ट्रस्टचे कार्यकर्ते मानतात. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीने करण्याची कामे- नियम व सभासदांचे अधिकार (मराठी), ग्रामपंचायतीतील महिला सदस्यांची जबाबदारी, आदिवासी स्वशासन- सचित्र अशा एकवीस पुस्तिकांची निर्मिती मंडलीक ट्रस्टने केली आहे.

तिसरा टप्पा पंचायत राज प्रशिक्षण आणि प्रबोधन शिबिरांचा 1992-93 ते आजतागायत (2023) – महाराष्ट्र शासनाने 1990 साली महिलाविषयक धोरण जाहीर केले. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तीस टक्के आरक्षण देण्यात आले. आता ते पन्नास टक्के आहे. केंद्र शासनानेही 1993 साली घटनादुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण जाहीर केले. ते आरक्षण केवळ सभासदत्वात नसून सत्तेत भागीदारी म्हणून पदाधिकाऱ्यांच्या जागेतही तितक्याच प्रमाणात ठेवण्यात आले आहे. त्या आरक्षणामुळे महिलांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी महिलांना राजकीय, सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे असे ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्ते यांना वाटले.

मंडलीक ट्रस्टने गावपातळीवरील महिलांचे सबलीकरण, सामाजिक-राजकीय जाण वाढवण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. तसेच, ट्रस्टने ग्रामपंचायतीमध्ये नव्याने निवडून आलेल्या महिला सदस्यांना प्रबोधन आणि प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

ग्रामपंचायत सदस्यांना राज्य सरकारने प्रसारित केलेले ठराव, नियम, परिपत्रके यांची माहिती नसते. ती माहिती मिळणे गरजेचे असते. तसेच, पंचायत राज व्यवस्थेबाबत व सामाजिक अन्यायाच्या इतर घटनांसंबंधी माहिती ग्रामपंचायत सदस्यांना देणे आवश्यक आहे. तशी व्यवस्था नसल्यामुळे प्रबोधनाच्या कामात ती उणीव जाणवत होती. ती उणीव भरून काढण्यासाठी केवळ पंचायत राज व्यवस्थेच्या प्रश्नांना वाहून घेतलेले ‘पंचायत भारती’ हे पाक्षिक 5 मार्च 1995 रोजी ‘पंचायत राज प्रबोधन’ संस्थेतर्फे सुरू करण्यात आले. ते पाक्षिक मात्र लॉकडाऊन झाल्यामुळे मार्च 2020 पासून बंद आहे. ते पाक्षिक ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवले जात होते.

डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या स्थापनेला 31 मार्च, 2021 रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. मंडलीक ट्रस्टच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव झूम माध्यमातून ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला. त्यानंतरच्या कार्यकर्त्यांच्या झूमवरील बैठकीत ट्रस्टच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुरेखा दळवी म्हणाल्या, “मंडलीक ट्रस्टचे काम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडियावर माहिती प्रसारित करावी. त्याप्रमाणे नीला व संगीताने 1 एप्रिल 2021 पासून माहिती प्रसृत करण्यास सुरू केली आहे. त्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे व मंडलीक ट्रस्टचे काम अनेकांपर्यंत पोचत आहे.”

मंडलीक ट्रस्टने पंचायत राज व्यवस्थेमध्ये लोकशाही विकेंद्रीकरण तळागाळात गावपातळीवर पोचवण्यासाठी विविध तऱ्हेचे काम केले. त्यामुळे आम स्त्रियांमध्ये, विशेषत: कार्यकर्त्यांमध्ये जागृती आली. ट्रस्टचा गौरव वेगवेगळ्या संस्थांनी वेळोवेळी केला आहे. त्यात इंडियन मर्चंट चेंबर – प्लॅटिनम ज्युबिली एण्डोमेंट ट्रस्ट (मुंबई) यांनी 1999 साली आणि महाराष्ट्र फाउंडेशन या अमेरिकास्थित संस्थेने फाउंडेशनचा समाजकार्य गौरव पुरस्कार डॉ. मंडलीक ट्रस्टला 2002 साली प्रदान केले. साधना ट्रस्टनेही 2006-2007 सालचा पुरस्कार डॉ. मंडलीक ट्रस्टला दिला आहे.

ट्रस्टची स्थापना डॉ.पी.व्ही. मंडलीक यांनी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची बहीण सुभद्रा, बंधू डॉ.जी.व्ही. मंडलीक, डॉ.माणिक नवलकर आणि वामनराव भिडे असे विश्वस्त होते. नंतर विश्वस्त मंडळात वेळोवेळी एस एम जोशी, अनुताई लिमये, प्रभुभाई संघवी असे ट्रस्टी होत गेले. सध्या नीला पटवर्धन या कार्यकारी विश्वस्त आहेत. त्यांच्याबरोबर आणखी सहा ट्रस्टी आहेत.

ट्रस्टचे कार्यकर्ते कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यांची साप्ताहिक बैठक ‘झूम’वर होत असते. दोन महिन्यांतून एक अभ्यासवर्ग मुंबईत होतो, तो मालाड येथील डॉ.पी.व्ही. यांनी बांधलेल्या इमारतीत. ट्रस्टच्या इमारतीत नीला पटवर्धन व त्यांचे बंधू अनिल मंडलीक राहतात. नीला सांगतात, की त्या इमारतीभोवतालची वृक्षराजी ही पीव्हींचे खरे स्मारक आहे. त्यात नारळी-पोफळी-आंब्यांची झाडे व अन्य वृक्षसंपदा आहे. पीव्हींची इच्छा होती की मुंबईतील ही वास्तू दापोलीसारखीच हिरवीरम्य असावी. आम्ही त्यांची ती इच्छा गेली पन्नास वर्षे राखू शकलो आहोत !

नीला पटवर्धन 9869620946 patwardhanneela6@gmail.com, dr.mandliktrust@gmail.com

————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here