दापोली- मुरुडचे कर्वे पितापुत्र

0
320

धोंडो केशव कर्वे यांच्या वयाची शतकपूर्ती (1958) त्यांच्या हयातीत झाली. त्यावेळी भारतात आयुर्मान वाढले नव्हते. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीच्या आयुष्यातील असा प्रसंग तर दुर्मीळ काय, तोपर्यंत आलाच नव्हता ! एप्रिल महिना. मुरुड गावाने त्या शत शरदांकित महर्षींचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला. गो.नि. दांडेकर, महादेवशास्त्री जोशी यांच्यासारखे साहित्यातील दिग्गज; तसेच, नाटककार तेथे आले होते. गावातील वरची पाखाडी, खालची पाखाडी येथील घरे येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करण्यात गुंतली होती. सोहळा तीन-चार दिवस चालणार होता. सोहळ्यात ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचा नाट्यप्रयोगही दाखवणार होते. सोहळ्यानिमित्त मुरुड गावापर्यंत गाडीरस्ता केला गेला. गावात चार चाकी गाडी तेव्हा प्रथमच आली. सोहळा साऱ्या मुरुड गावाचा होता. प्रत्येकाच्या अंगी उत्साह संचारला होता, कारण मुरुड गावचे सुपुत्र, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे शंभर वर्षांचे झाले होते !

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड गाव समुद्राकाठी सोळाव्या शतकाच्या सुमारास एका सिद्ध पुरुषाने वसवले. ते गाव नारळ-पोफळीच्या आगारांनी समृद्ध; आल्हाददायक हवेचे ठिकाण आहे. तेथे प्रामुख्याने ब्राह्मण वस्ती. त्याची ख्याती वेदविद्यासंपन्न विद्वानांचे गाव अशी होती. गावातील विद्याव्यासंग लक्षात येऊन सरकारी अधिकाऱ्यांनी ब्रिटिश आमदानीत काही मराठी शाळा सुरू केल्या, त्यांपैकी एक मुरुडची शाळा. ती शाळा 1 ऑगस्ट 1834 रोजी सुरू करण्यात आली. त्या शाळेत हुशार शिक्षक नेमले जात व शिक्षणासाठी परगावातील विद्यार्थी येत असत. धोंडो केशव कर्वे यांचे सहावीपर्यंतचे शिक्षण त्याच शाळेत झाले. सहावीची परीक्षा सप्टेंबर महिन्यात म्हणजे पावसाळ्यात असे. परीक्षा केंद्र मुरुडपासून दूर मुंबई, रत्नागिरी, सातारा वा कोल्हापूर येथे असे.

कोकणात वाहतूक व्यवस्थेचा अभाव होता. खाड्या पावसाळ्यात ओलांडता येत नसत. तशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धोंडो केशव कर्वे यांनी चिकाटीने शिक्षण घेतले. पुढे, ते बी ए झाले. त्यांची पहिली पत्नी राधाबाई हिचे निधन झाल्यावर त्यांनी विधवा स्त्रीशी पुनर्विवाह केला. तत्कालीन सनातनी समाजाचा त्यामुळे त्यांच्यावर रोष ओढवला. त्यांच्या त्या कृत्याचे पडसाद मुरुड गावातही उमटले. त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला गेला. धोंडो केशव पुण्यात राहत, ते दरवर्षी मे महिन्यात मुरुडला येत. कर्वे पुनर्विवाहानंतर पत्नीसह मुरुडला घरी आले. कर्वे मुरुडला आले असल्याचे समजताच मुरुड गावात गावकी भरवण्यात आली आणि त्यांना बहिष्कृत केले गेले; तत्संबंधीचे नियम पक्के ठरवले गेले. कर्वे यांना एका बैठकीवर घेऊ नये. ते ज्या सभेला असतील त्या सभेला कोणी जाऊ नये. तसेच, ते परत घरी आले तर त्यांच्या वडील बंधूंच्या कुटुंबावरही बहिष्कार घालावा अशा स्पष्ट शब्दांत ठराव करण्यात आले.

कर्वे यांना मुरुडची ओढ होती. मात्र त्या ठरावानंतर ते मुरुडला दोन-तीन वर्षे आले नाहीत ! त्यानंतर ते वर्षातून अवघ्या दोन दिवसांसाठी मुरुडला येऊन चुलत बंधूंच्या रिकाम्या घरात राहत असत. आई, बहीण कोणा गावकऱ्यांना कळू न देता मध्यरात्री तेथे येऊन त्यांना भेटत असत. विधवा पुनर्विवाहाच्या कृत्यामुळे त्यांच्या कुटुंबाला सोसावा लागणारा त्रास त्यांना दुःख देणारा होता.

मात्र सात-आठ वर्षांत परिस्थिती निवळली व कर्वे कुटुंबाचे संबंध गावाशी पूर्ववत झाले.

धोंडो केशव कर्वे (18 एप्रिल 1858 – 9 नोव्हेंबर 1962) व त्यांचे चिरंजीव रघुनाथ धोंडो कर्वे (14 जानेवारी 1882 – 14 ऑक्टोबर 1953)  या दोन समाजसुधारक नररत्नांनी त्यांच्या लोकोत्तर कार्याने दापोलीतील मुरूड गावाची ओळख साऱ्या जगाला करून दिली; जनरीत बदलली !

पिता व पुत्र पुरोगामी, प्रगत विचारसरणीचे, अनिष्ट रूढींविरूद्ध झगडणारे समाजसुधारक होते. दोघांमध्ये धारदार बुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन व समाजाच्या सुखासाठी झटण्याची निस्पृह सेवावृत्ती होती. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांच्या आयुष्याचे योगदान स्त्रियांचे शिक्षण, विधवा विवाह या कार्यासाठी दिले. रधों मुरूडमध्येच जन्मले. ते मॅट्रिक परीक्षेत पहिले आले. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात शिक्षण घेतले. त्यांनी वसतिगृहात राहत असताना कॉलेजमध्ये गुप्त रोग झालेले, दरवर्षी मूल होणारे विद्यार्थी पाहिले. ते दृश्य त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ठरले. ते त्या विषयाची पुस्तके इंग्रजीपेक्षा फ्रेंच भाषेत अधिक आहेत असे माहीत झाल्यावर फ्रेंच भाषा शिकले. रधों फ्रेंच समाज, संस्कृती, साहित्य, स्त्री-पुरूष संबंध यांचा अभ्यास करावा हा हेतू मनी ठेवून, गणित विषयाची पदवी घेण्यासाठी इंग्लंडऐवजी पॅरिसला गेले. तेथे त्यांना गणित आणि स्त्री-पुरूष संबंध, गुप्तरोग, संतति नियमन हे विषय, दोन्हींचा अभ्यास साधता आला. रधों कर्वे यांनी तेथे विस्तृत वाचन केले.

रधों गणित विषयाचे उच्च शिक्षण घेऊन चरितार्थासाठी प्रोफेसर झाले. त्यांनी सामाजिक सुधारणा, अनिष्ट व अयोग्य पक्ष त्यागण्याचा, समाजप्रबोधनाचा वडिलांचा वारसा पुढे नेला. त्यांनी निवडलेले संतती नियोजन विषयक नियम व स्त्री-पुरुष संबंध या दोन्ही विषयांचे कार्यक्षेत्र समाजाला सांस्कृतिक धक्के देणारे, त्यांच्यावर रोष ओढवणारे होते. मात्र रधों यांच्यामध्ये स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटणारे विधायक कार्य, परिणामांची क्षिती न बाळगता करण्याची कार्यनिष्ठा होती. भारताची अफाट लोकसंख्या ही समस्या त्यांच्यातील द्रष्टया समाजसुधारकाला त्या वेळी जाणवली. त्यांनी त्यावर शास्त्रीय पद्धतीचे उपाय सुचवले.

रधों यांनी मुंबईत संतती नियमन केंद्र 1921 साली काढले ! त्यांनी संतती नियमनाची साधने आणून ती वापरण्यास लोकांना शिकवले, स्त्री-पुरुष संबंध, देह, चांगल्या आरोग्यासाठी देहाच्या गरजा, कामपूर्तीचे-लैंगिक संबंधांचे महत्त्व यांची शास्त्रोक्त पद्धतीने समाजाला माहिती देण्यासाठी ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे मासिक 1927 साली काढले. मात्र त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. रधोंच्या लेखणीने फक्त संततिनियमनाचे विषय हाताळले नाहीत, तर त्यांनी साहित्यापासून ते अनेक सामाजिक विषयांनाही स्पर्श केला.

मुरुडमधील कर्वे घराण्यातील धोंडो केशव व रघुनाथ धोंडो या पिता-पुत्रांच्या सामाजिक कार्याचा भिन्न दिशांतील प्रवास समाजसुधारक ते विचारवंत असा आहे. कुटुंबातील कोणी मुरुड गावात राहण्याचा संभव नसल्याने धोंडो केशव कर्वे व कुटुंबीयांनी मुरुड येथील वरच्या पाखाडीत असलेले त्यांचे घर विकून आलेल्या रकमेचा विनियोग हिंगणे येथील महिला आश्रमाला देऊन केला. कर्वे यांची मालमत्ता मुरुड येथे नाही. मात्र मुरुडच्या मर्मबंधात धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याच्या आठवणी जपल्या गेल्या आहेत. धोंडो केशव यांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून त्यांचे नाव मुरुड गावातील शाळेला देण्यात आले आहे. दुर्गा देवीच्या देवळासमोर त्यांचा अर्धपुतळा आहे. कल्याणच्या ‘खिडकीवडा’फेम वझे कुटुंबीयांनी कर्वे यांच्या स्मरणार्थ छायाचित्रांचे संग्रहालय खालच्या पाखाडीमध्ये उभारले आहे.

रजनी अशोक देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com

प्रभाकर भिडे यांनी कर्वे व मुरुड यासंबंधात आणखी काही पूरक माहिती दिली आहे.

धोंडो केशव यांची पहिली पत्नी राधाबाई हिचे निधन 1891 साली झाले. नंतर त्यांनी विधवा स्त्रीशी पुनर्विवाह केला. ती हकिगत अशी – गोंदुबाई/गोदावरी (बाया) यांचे मोठे बंधू नरहरीपंत जोशी व धोंडो केशव कर्वे हे बी ए झाल्यापासून मुंबईला एकत्र राहत असत. गोंदुबाई/गोदावरी (बाया) यांना वयाच्या नवव्या वर्षी वैधव्य आले. नरहरीपंत यांनी तिला बाविसावे वर्ष लागल्यावर मुंबईला शिकण्यास आणून ठेवले. ती दोन्ही कुटुंबे एकत्र राहत होती.

त्यावेळी अमेरिकेतून पंडिता रमाबाई आल्यावर, त्यांनी ‘शारदा सदन’ संस्था काढली. त्या संस्थेत नरहरीपंत यांनी गोंदुबाई/गोदावरी (बाया) यांना पहिली विद्यार्थिनी म्हणून पाठवले. पंडिता रमाबाईदेखील गोंदुबाई/गोदावरी (बाया) यांचा संस्थेतील पहिली विद्यार्थिनी म्हणून मोठा लोभ करत असत. नरहरीपंत मुरुडला कर्वे यांच्याकडे जात असत. त्या जाण्या-येण्यामुळे नरहरीपंतांच्या वडिलांचा कर्वे यांच्याशी परिचय झाला. नरहरीपंत जोशी आणि कर्वे हे दोघेही विधुर बराच काळ होते. दोघेही मिळवते असून, विधुर आहेत; साहजिकच, नरहरीपंत जोशी यांच्या वडिलांनी धोंडो केशव यांना लग्नाबद्दल विचारले, ‘तुम्ही लग्न का करत नाही?’ तेव्हा कर्वे म्हणाले, “ब्राह्मण कुळातील बालविधवा मुलगी मिळाली व ती माझ्याबरोबर गरिबीत राहण्यास कबूल असेल तर तशा मुलीबरोबर पुनर्विवाह करण्याची माझी इच्छा आहे. अशी विधवा मुलगी न मिळाल्यास मी आजन्म अविवाहित राहण्याचे ठरवले आहे.” नरहरीपंतांच्या वडिलांनी म्हटले, “तुम्ही आमच्या गोंदुबाई/गोदावरी (बाया)बरोबर लग्न का करत नाही?” त्यावर कर्वे म्हणाले, “मुलीची तयारी असल्यास माझी त्याला हरकत नाही.”

मुलीचे वडील स्वतः शारदासदनात गेले. त्यांनी गोंदुबाई/गोदावरीला (बाया) सांगितले, की ‘कर्वे यांच्याबरोबर लग्न करशील तर मला त्यापासून दुःख होणार नाही.’ अशा रीतीने बायाची संमती मिळवून, तिचा पुनर्विवाह कर्वे यांच्याबरोबर वडिलांच्या प्रोत्साहनामुळे झाला. लग्नानंतर त्यांचे नाव आनंदीबाई असे झाले.

जोशी यांचे घराणे कोकणात देवरुख गावी स्थायिक झालेले होते. बायाचा पुनर्विवाह वडील व वडील बंधूंच्या संमतीने पुण्यात झाला असे वर्तमानपत्रांतून छापून आले. ते प्रसिद्ध झाल्याबरोबर देवरुखास जोशी यांच्या घरास वाळीत टाकण्यात आले. न्हावी-धोबी सर्व बंद होऊन, घरावर पूर्ण बहिष्कार पडला. मात्र बायाच्या वडिलांना मुळीच दुःख झाले नाही. बहिष्कार एक वर्षापर्यंत चालला व घराचे हाल झाले. शेवटी, गावातील देवळाच्या जीर्णोद्धाराकरता जोशी यांनी देणगी दिली. ग्रामस्थांच्या पाया पडून, त्यांची मर्जी प्रसन्न करून घरावरील बहिष्कार उठवला.

प्रभाकर भिडे 9892563154 bhideprabhakar@gmail.com

———————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here