दापोलीतील साहित्यजीवन

साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’मुळे दापोलीतील साहित्यविश्व अजरामर होऊन गेले आहे. दापोलीतील पालगड हे साने गुरुजी यांचे जन्मगाव. त्यांनी पालगड व दापोली येथेच शिक्षण घेतले. त्या पुस्तकामुळे दापोली व आसपासचा परिसर यांचा परिचय जगाला झाला. त्या पुस्तकातून त्या वेळच्या दापोलीचे सामाजिक-सांस्कृतिक दर्शन घडते. श्री.ना. पेंडसे लिखित ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरली आहे. ती कादंबरी दापोली तालुक्यातील मुर्डी, गारंबी, आंजर्ले या परिसरातील आहे. ‘श्यामची आई’, ‘गारंबीचा बापू’ या साहित्यकृतींमुळे दापोलीचा ठसा साहित्य क्षेत्रात उमटला. आधुनिक मराठी साहित्यात ‘हलचल’ निर्माण करणाऱ्या मेघना पेठे यांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील फणसू हे. रेणू दांडेकर यांचे नाव शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात पुऱ्या महाराष्ट्रात आदराने घेतले जाते. त्यांचे पती राजा दांडेकर यांनी लोकमान्यांच्या चिखलगावी सुरू केलेली वैशिष्ट्यपूर्ण शाळा यामुळे रेणू दांडेकर यांचे हे स्थान आणखी मोठे होऊन गेले आहे. रेणू यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची ‘गोष्टी घरट्यांच्या’, ‘रूजवा’, ‘मुलांशी बोलताना’, ‘अ अ अभ्यासाचा’ अशी एकाहून एक सरस पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी ‘संवाद तरुणाईशी’ या पुस्तकात तरुण पिढीच्या मनाचा कानोसा घेत त्यांच्या पालकांचीही मानसिकता उलगडून दाखवसी आहे व त्या दोहोंत समन्वय कसा साधता येईल याचे मार्गदर्शन केले आहे. त्यांचे ‘राणी और नानी’ हे हिंदी नाटक दूरदर्शनवरून प्रसारित झाले होते.

बद्दीउज्जमान खावर यांनी ‘ज्ञानेश्वरी’चे उर्दूत भाषांतर करून साहित्य क्षेत्रात मोठीच भर घातली आहे. खावर यांनी मराठी, हिंदी व उर्दू या तीन भाषांमध्ये दर्जेदार कविता व गझला लिहिल्या. निहालों के अंबांहमे (हिंदी), सश्रील (उर्दू), माझिया गझला (मराठी) ही त्यांची पुस्तके गाजली. त्यांच्या मराठी गझलांची कॅसेट प्रसिद्ध झाली आहे. दापोलीतून उर्दू  साहित्यही दर्जेदार प्रसिद्ध होते. त्यामुळे गावाचे नाव भारतभर होते.

दापोलीचा निसर्ग, तेथील जीवन बाहेरगावी गेलेल्या दापोलीकरांच्या मनातून जात नाही. ते तो त्यांच्या साहित्यातून प्रकट करतात. खुद्द दापोलीत राहणारे साहित्यिकही त्यांच्या परीने त्या करता धडपडत असतात. त्यात प्रामुख्याने नाव समोर येते ते शर्फ मुकादम यांचे. ते हयात नाहीत. मूळचे पंचनदीचे शर्फ मुकादम काही काळ दैनिक ‘सागर’साठी स्तंभलेखन करत होते. त्यांनी मराठीप्रमाणे इंग्रजी भाषेतही लेखन केले आहे. त्यांची ‘व्हेन फ्रिडम केम?’ ही कादंबरी ऑक्सफर्ड विद्यापीठात स्थूल वाचनासाठी काही वर्षे लावली होती. ती गोष्ट समस्त दापोलीकरांसाठी अभिमानाची आहे. त्यांचा साहित्यिक वारसा त्यांचे चिरंजीव इक्बाल शर्फ मुकादम पुढे नेत आहेत. त्यांच्याही लेखन कारकिर्दीला पन्नास वर्षे झाली आहेत. त्यांची सत्तावीस पुस्तके वेगवेगळ्या प्रकाशकांकडून हिंदी-उर्दू-मराठी भाषांतून प्रकाशित झाली आहेत. त्यांतील काही अशी- ‘हुसेनची आई’, ‘अकल्पित’, ‘धागे’, ‘मयुरपंख’. त्यांनी त्यांच्या गाण्यांचे अल्बमही प्रसिद्ध केले आहेत. इक्बाल हे उत्तम स्तंभलेखक, कवी, गीतकार, कथाकारही आहेत.

दाभोळचे मनोहर तोडणकर हे कवी म्हणून प्रसिद्धी पावले. तोडणकर हे साने गुरूजींना भेटलेले आहेत. त्यांनी गुरुजींच्या आदर्शवादी विचारसरणीतून लेखन प्रेरणा घेऊन नंतर मुलांसाठी ‘धाडसी अभय’, ‘म्हातारीचा बूट’ अशी पुस्तके लिहिली. ‘चांदोबाची गाडी’ हा मुलांसाठी कविता संग्रह लिहिला. बालकथा, कविता, प्रेमकविता व हायकू हे प्रकार त्यांच्या विशेष आवडीचे आहेत.

इतिहासाचे अभ्यासक अण्णा शिरगावकर हे दाभोळचे. त्यांची तर जिवंतपणीच दंतकथा बनून गेली होती ! त्यांची ‘इकडचं तिकडचं’ व इतिहासविषयक इतर पुस्तके प्रसिद्ध आहेत. इंदूभूषण बडे यांच्या नावावर ‘संस्कारधन’ तर वसंत मेहेंदळे यांच्या नावावर ‘मत्स्यगंधा’ ही कादंबरी जमा आहे. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ प्रकाश साठ्ये यांचे ‘मनाचिये गुंफी’ हे मानसशास्त्रावरचे उत्तम पुस्तक संदर्भ म्हणून वापरले जाते. त्यांच्या ‘शोध सुखाचा’ व ‘मी सुखकर्ता, मी दुख:हर्ता’ या दोन्ही पुस्तकांत ‘स्व’चे परखड परीक्षण व पुरोगामित्वाची बीजे सापडतात.

वसंत जोशी यांचा ‘गिरिजांकुर’ हा कवितासंग्रह भा.रा.तांबे, बा.भ.बोरकर या जुन्या कवींच्या काळात घेऊन जातो. शांता सहस्त्रबुद्धे यांचे ‘भावतरंग’ या पुस्तकातील ललित लेखन जुन्या-नव्याचा मेळ घालते. त्यांची ‘बहीणभाऊ’ व ‘राजपुत्र अतुल’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सहस्त्रबुद्धे यांची ‘बहीणभाऊ’ व ‘राजपुत्र अतुल’ ही लहान मुलांची सुंदर पुस्तके यांना बालसाहित्यामध्ये विशेष जागा आहे. स्थानिक शिक्षक सतीशचंद्र तोडणकर यांनी ‘आचार्य बाळकोबा’ या टोपणनावाने ‘झेंडूची फळे’ हा हास्यकविता संग्रह प्रसिद्ध केला. ती त्यांची वेगळीच ओळख होती. ते मुळात गांधीवादी विचारांचे. नंतर ते चिंतनपर साहित्याकडे वळले. त्यांची ‘संक्षिप्त गीतारहस्य’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

कुडावळ्याचे दिलीप कुलकर्णी यांनी निसर्ग जीवनशैलीचे वेगळेच प्रयोग केले. त्यामुळे त्यांचे नाव, विशेषत: महाराष्ट्रातील पर्यावरणवाद्यांमध्ये गाजले. त्याला कारण त्यांचे त्या प्रयोगाधारे त्यांनी केलेले लेखन हेच ठरले. अर्थातच ते पर्यावरणावर लिहितात. त्यांची ‘हसरे पर्यावरण’, ‘दैनंदिन पर्यावरण’, ‘निसर्गायण’, ‘अणू विवेक’, ‘सम्यक विकास’, ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे’, ‘विका- स्वप्न’ अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते वीस वर्षांहून अधिक काळ कुडावळ्यातून ‘गतिमान संतुलन’ हे पर्यावरण विषयाला वाहिलेले मासिक प्रकाशित करत. त्यांच्या पत्नी पौर्णिमा कुलकर्णी यांचेही ‘देणं निसर्गाचं रक्षण आरोग्याचं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्राध्यापक सुखदेव काळे यांचे पाणीतंत्रावर प्रकाशझोत टाकणारे एकमेव पुस्तक आहे. पण मराठी साहित्यातील विविध प्रवाहांची व व्यक्तींची माहिती असलेले चिकित्सक वाचक म्हणून त्यांचे स्थान दापोली-रत्नागिरीतच नव्हे तर महाराष्ट्रातही अनन्य ठरेल.

शशिशेखर शिंदे यांचे ‘चारोळ्या’ व ‘बरंच काही आहे’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांचे महात्मा फुले यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित होणार आहे. विद्या शिंदे यांचा ‘वटवृक्ष’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी हिंदीत नारायण सुर्वे यांच्या कवितांवर लिहिलेले अभ्यासपूर्ण पुस्तकही महत्त्वाचे आहे. त्यांची हिंदीत पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे वृत्तपत्रांतून व मासिकांतून अनेक लेख प्रसिद्ध होत असतात.

विनायक बाळ यांचे ‘कथा कुंभ’ हे बालकथांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. माधव गवाणकर यांचे हौशी ललित लेखन हा दापोलीचा मोठा ठेवा ठरत आहे, तो त्यांच्या झपाट्यामुळे. ते मुंबईहून आले आणि दापोलीत स्थायिक झाले. ‘साहित्यजागर’ म्हणावा अशा वेगाने ते साहित्य निर्माण करत असतात. त्यांच्या ‘नाट्यछटा, पिटुकल्या गोष्टी’, ‘झकास गावच्या गोष्टी’, ‘बलदंड बबडू’ या पुस्तकांतून त्यांना मानसिकतेची असलेली सूक्ष्म जाण दिसून येते. त्यांची ‘सालं लाईफ’ ही कादंबरीही प्रकाशित झाली आहे. त्यांचे ‘नाट्यछटा’, ‘थट्टाछटा’, ‘ध धमाल’ हे नाट्यछटा संग्रह, ‘बोका बनला मामा’ ही विनोदी नाटिका आणि ‘भोंदू’, ‘झकास गावच्या गोष्टी’ या कुमारकथा, पिटुकल्या गोष्टी, छानछान गोष्टी या छोट्यांसाठी कथा असे प्रयोगमूल्य असलेले बालसाहित्य बालगोपाळांना वाचण्यास मिळाले.

सरोज भागवत यांनीही भरपूर लेखन केले आहे. त्यांचे कथा व कादंबरी हे आवडते साहित्य प्रकार आहेत. त्यांची ‘शिदोरी’ व इतर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कृषी विद्यापीठातील वाचनालय प्रमुख श्रीरंग रोडगे यांचे ‘महारवेटाळ’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

सुनील कदम यांचा ‘बेस वाटलं, सहल’ हा कवितासंग्रह. ते दापोलीतून ‘अक्षरधन’ दिवाळी वार्षिकांक प्रकाशित करतात. श्रीनिवास घैसास यांची कायदे अभ्यासावर बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचेही मूळ गाव दापोलीतील केळशी हे आहे.

gazalkar1

प्रांताधिकारी म्हणून दापोलीत सेवा करून गेलेले दिलीप पांढरपट्टे हेही नावारूपाला आले आहेत. त्यांचा ‘कथा नसलेल्या कथा’ हा कथासंग्रह, ‘घर वाऱ्याचे पाय पाऱ्याचे’,‘शायरी नुसतीच नाही’, ‘बच्चालोग ताली बजाव’ हे लेखसंग्रह व इतर पुस्तके प्रकाशित आहेत. दापोली तहसील कचेरीत अधिकारी म्हणून सेवा बजावून स्वेच्छानिवृत्त झालेले रामचंद्र नलावडे यांचे आत्मचरित्र ‘दगडफोड्या’ व ‘माझ्या मना बन दगड’ ही कादंबरी व इतर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनण्याअगोदर मारुती चितमपल्ली हेही दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन वर्षे वास्तव्याला होते. त्यांचे ‘हर्णेचे दिवस’ हे पुस्तक प्रकाशित आहे. रेखा जेगरकल, प्रशांत कांबळे, मंगेश मोरे, कृष्णा दाभोळकर, प्रभावती जालगावकर, दीपक दांडेकर, स्मिता जोशी, संजय जंगम, दत्तात्रय कुलकर्णी, अजित कांबळे, वीणा महाजन, संपदा बर्वे, अलका बापट, मिलन गुजर, लीना गांधी या वृत्तपत्रांतून नियमित लिहिणाऱ्या लेखक-लेखिकांचीही पुस्तके यथावकाश प्रकाशित व्हावीत अशी दापोलीकरांची अपेक्षा आहे.

बाबुराव पकाले यांची काही नाटके प्रकाशित आहेत. नीलकंठ भाटवडेकर यांनी सुरू करून प्रदीर्घ काळ चालवलेले साप्ताहिक ‘कोकण राज’ संतोष शिर्के यांच्या संपादनाखाली प्रकाशित होते. नूतन मातोंडकर संपादित साप्ताहिक ‘अस्त्र’ दीर्घकाळ चालले. ‘दापोली विधानसभा क्षेत्र’, ‘न्यूज रत्नागिरी’ ही साप्ताहिके सध्या नव्याने प्रकाशित होत आहेत. ‘निवेदिता’ पाक्षिक संपादित करणारे प्रशांत परांजपे यांची ‘अस्मिता प्रकाशन’ ही एकमेव स्थानिक पुस्तक प्रकाशन संस्था आहे. दापोली व सभोवताल येथील साहित्यिक वातावरण अशा प्रकारचे आहे. तसेच नवीन लिहिते हातही सरसावत आहेतच. कैलास गांधी, सुदेश मालवणकर हे दापोलीतील नव्या पिढीचे गझलकार, कवी मराठी मुलखात सर्वत्र मान्यता पावले आहेत. ते पंडित बद्दीउजमान खावर यांची गझल पुढे नेत आहेत.

शिरसोली गावचे कै. संजय अंबाजी जाधव यांचीही ‘सय’, ‘अनुराग’ आणि ‘आत्मारामा’ ही तीन पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे बरेचसे साहित्य अप्रकाशित आहे. ते ‘कोकणदीप’ मासिकाचे कार्यकारी संपादक होते.

सध्या मालिका, चित्रपट क्षेत्रात दापोलीतील साहित्यिकांचा वरचष्मा आहे. आघाडीचा गीतकार मंगेश कांगणे दापोलीतील खेडच्या खारी गावचा. मंगेशने नव्वदच्यावर चित्रपट आणि मालिका यांच्यासाठी गीतलेखन केले आहे. त्याच्या खात्यात ‘दुनियादारी’ ते ‘धर्मवीर’ असे चित्रपट जमा आहेत. स्टार प्रवाह, सोनी मराठी या वाहिन्यांवरील मालिकांसाठी शीर्षक गीते लिहिणारा निलेश उजाळ पिसई गावचा. त्याचे ‘जगुया पुन्हा नव्याने’, ‘सुरंगी फुले’ आणि ‘निलेशा’ असे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. दीप्ती सुर्वे-जाधव ही स्त्री गीतकार. तिची चौदा गाणी व अनेक स्किट असे साहित्य प्रकाशित झाले आहे. ती दाभोळची आहे.

माटवण गावचे ज्येष्ठ नाटककार श्रीधर पवार यांची ‘कोकणदीप प्रकाशना’तर्फे सहा नाट्यपुस्तके प्रकाशित आहेत. मी, पांडुरंग जाधव दापोलीतील शिरसोली गावचा. माझी ‘गंधमोगरी’ (काव्यसंग्रह), ‘नैवेद्य’ (कथासंग्रह) अशी दोन पुस्तके प्रकाशित आहेत. उन्हवरे गावचा भावेश लोंढे यांची ‘पाऊलखुणा’, ‘तू आणि मी’ अशी दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. पांडुरंग जाधव मुंबईत राहून दापोलीतील कवींना एकत्र करून मित्रांच्या कविता हा मैफिलीचा कार्यक्रम गावोगावी, शाळा-महाविद्यालयांतून करतात. त्यामुळे पुन्हा एकदा लोक कवितेकडे वळू लागले आहेत असे दिसते. दाभोळ उसगावचा किरण पड्याळ, कोळथरेचा मनोहर जाधव हे दोघेही कवी वृत्तबद्ध, छंदबद्ध कविता लिहिणारे. ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. माटवणचा निलेश पवार उत्तम लिहितो.

मुंबईत एल जे एन जे महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख असलेल्या प्राध्यापक रमिला गायकवाड यांनी कोकणातील भूदान चळवळ यावर प्रबंध लिहिला आहे. तसेच, त्यांचे इतिहास विषयावरील संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. दाभोळ पांगारीचा तरुण कवी तुषार नेवरेकरही छान लिहित आहे. प्रसाद रानडे, जगदीश वामकर ही मंडळी वृत्तपत्रांतून सातत्याने लिहिणारी आहेत. अब्दुल सत्तार दळवी, वकार कादरी ही नावे मराठी साहित्यविश्वात आदराने घेतली जातात. त्यांनी हिंदी, उर्दू आणि मराठी या तिन्ही भाषांतून विपुल लेखन केले आहे.

दाभोळचे शिक्षक शांतिलाल भंडारी यांचे लेखनही उद्बोधक ठरते.

दापोलीवर प्रेम करणारे मंडणगडचे कवी सूर्यकांत मालुसरे यांचा ‘वरळीचा मनोरा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. मालुसरे हे हिंदीचे शिक्षक. त्यांचे काव्यगायनाचे कार्यक्रमही सादर होतात. मुलांसाठी नाटुकले व जादूची पुस्तके लिहिणारे कोळथरेचे महेंद्र परचुरकर यांचाही उल्लेख करण्यास हवा. रेखा नगरकल यांच्या बालकविता व बालकथा वेळोवेळी ऐकण्यास मिळतात. मूल्यशिक्षण आणि आधुनिक विचार यांवर आधारित विद्यालंकार घारपुरे यांचा ‘बबच्या गोष्टी’ हा कथासंग्रह मुलांच्या मनावर विशेष प्रभाव पाडून जातो. ‘मोरपीस’ या बडबडगीत संग्रहाचे कवी सुदेश मालवणकर यांचीही कामगिरी मोठी आहे.

इतकी मोठी साहित्य परंपरा असूनदेखील दापोलीत साहित्यिक कार्यक्रम आयोजित होताना दिसत नाहीत. त्यामुळे साहित्यिक चळवळ थंडावली की काय असेही वाटते.

पांडुरंग महादेव जाधव (शिरसोली) 9892812218 pmjadhav.lic926@gmail.com
माहिती संकलन सहाय्य- सुदेश मालवणकर, इकबाल शर्फ मुकादम
————————————————————————————————————————

About Post Author

3 COMMENTS

  1. दापोलीतल्या प्रस्थापित आणि नवोदित साहित्यिकांची आणि त्यांच्या साहित्याची छान ओळख करून दिली आहे. मनःपूर्वक आभार!

  2. अपूर्ण माहिती. दापोलीतील साहित्यसंपदेमध्ये अनेक नावे राहून गेली.
    नुसते आमच्या संग्रहालयातील पुस्तकांची पाहिली असती तरी लक्षात येईल.
    सुधारणा आवश्यक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here