दातार – गोत्र आणि शाखा

0
502

दातार हा गुणवाचक शब्द दातृत्व गुण दर्शवतो. त्यामुळे दातृत्व गुणाने संपन्न ते दातार अशी त्या नावाची उपपत्ती लावता येते. दातार आडनावाची बहुतांश घराणी ही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहेत, तर काही घराणी देशस्थ ब्राह्मण शाखेची आहेत…

व्यक्तिनामामध्ये आडनाव अर्थात उपनाम वापरण्याची प्रथा ही पेशवाईत जास्त प्रचलित झाली. आडनाव हे गावावरून किंवा विशिष्ट कामावरून किंवा व्यक्तीच्या स्वभावानुसार पडलेले दिसते. दातार हे आडनाव, गुणवैशिष्ट्य दर्शवणारे आहे. दातार हा शब्द संस्कृत ‘दातृ’ या नामाचे प्रथमेचे अनेकवचन आहे. दातार हा गुणवाचक शब्द दातृत्व गुण दर्शवतो. त्यामुळे दातृत्व गुणाने संपन्न ते दातार अशी त्या नावाची उपपत्ती लावता येते. शतेषु जायते शूर: सहस्त्रेषुच पंडित: | दशसहस्त्रेषुच वक्ता दाता भवति वानवा ||

 सर्व सद्गुणांची जर क्रमवारी केली, तर त्यात दातृत्व हा गुण सर्वोत्तम आहे. अशा दातृत्व गुणांचा ज्यांनी अंगीकार केला ते दातार म्हणून प्रसिद्ध झाले!

दातार हे आडनाव नेमके कोणास आणि कधी मिळाले हा इतिहास फारसा ज्ञात नाही. निरनिराळ्या घराण्यांत त्या दृष्टीने अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. अशीच एक गोष्ट चौल राजाच्या काळात म्हणजे साधारण इसवी सन 1100 च्या सुमारास घडली, कोकणातील ते राजघराणे प्रसिद्ध होते. त्यांचे राज्य कर्नाटकपासून ते गुजरात सीमेपर्यंत पसरले होते. ते राजे कलेचे भोक्ते होते. त्यांच्या काळात विज्ञान, कला, संगीत, वास्तुकला यांची भरभराट झाली. तर त्या चौल राजाच्या राज्यात वासिष्ठ गोत्र असलेला एक ब्राह्मण त्याच्या दातृत्व गुणांसाठी प्रसिद्ध होता. लोक त्याचे कौतुक करत. त्या विद्वान ब्राह्मणाला राजाने आज्ञा केली आणि सध्या जेथे दापोली शहर आहे, त्या जवळच्या परिसरात वस्ती करून राहण्यास सांगितले. तेव्हा तो ब्राह्मण त्याला मिळालेल्या जमिनीचे दान इतरांना करून स्वत: तपसाधनेत मग्न राहू लागला. लोक त्यास दातार म्हणू लागले. त्यांचे दोन शिष्य होते- एक होते वैशंपायन आणि दुसरे होते कर्वे. त्यांच्या साथीने या दातार यांनी आजचा मुरुड गाव वसवला. ते देवीचे भक्त असल्याने देवीचे जागृत ठिकाण शोधून त्या ठिकाणी त्यांनी दुर्गादेवीची स्थापना केली. ती देवी सर्व दातार मंडळींचे अढळ श्रद्धास्थान आहे.

दातार आडनावाची बहुतांश घराणी ही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहेत, तर काही घराणी देशस्थ ब्राह्मण शाखेची आहेत. चित्पावन कोकणस्थ घराणी ही प्रामुख्याने वासिष्ठ आणि शांडिल्य या दोन गोत्रांतर्गत येतात, तर देशस्थ ब्राह्मण घराणी ही भारद्वाज व कपिलस गोत्राची आहेत. चित्पावन कोकणस्थ दातार हे काश्यप गोत्रांतदेखील येतात असे चित्पावनांच्या गोत्रावळीनुसार दिसून येते.

आंध्र प्रदेशातील गुत्ती या शहराजवळ दातारी नावाचे खेडेगाव आहे, कपिलस गोत्रातील दातार घराणे त्या गावास त्यांचे मूळ गाव समजतात. त्या गावाच्या नावावरून त्यांचे नाव दातारीकर आणि पुढे दातार असे आडनाव झाले अशी माहिती मिळते.

चित्पावन दातार घराणी ही वासिष्ठ गोत्रामध्ये ऋग्वेदी आश्वलायन आणि यजुर्वेदी हिरण्यकेशी शाखेची आहेत, तर शांडिल्य गोत्रातील घराणी ही ऋग्वेदी आहेत. चित्पावनांच्या मूळ साठ आडनावांपैकी, दातार हे आडनाव नाही. याचा अर्थ ते आडनाव कोणा व्यक्तीच्या गुणामुळे प्रचलित झाले आणि त्याच्या पुत्र-पौत्रांनी ते तसेच पुढे चालवले असे म्हणता येईल.

– मंदार दातार 9422615876 m.datar76@gmail.com

(संदर्भ : History of Dharmashastra Part-1 – By Pt. Dr. P.V. Kane)

—————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here