थिंक महाराष्ट्र च्या वर्धापन दिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन

लेखनावर अथवा कलाविष्कारावर सद्यकाळात कोणतेही बंधन जाणवत नाही असा स्पष्ट निर्वाळा लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर आणि नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी व्यक्त केला. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील परिसंवादात बोलत होते. तिसऱ्या वक्त्या ‘कळसूत्री बाहुल्या’कार मीना नाईक यांनी ते दोघे बोलत असताना मौन धारण केले होते. भडकमकर व सोहोनी, दोघेही या प्रश्नावर आवेगाने व्यक्त झाले. त्यांचे म्हणणे असे होते, की नाटक-चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड आहेत. त्यांचे निर्बंध न पटल्यास प्रतिवाद करता येतो. एरवी खुले लेखन करण्यास वा कला सादर करण्यास कोणत्याही गटाकडून अडवणूक आहे असे जाणवत नाही. त्यांनी ‘गांधी’…, ‘गोडसे’… वगैरे नाटकांच्या विविध आवृत्ती सादर झाल्या असल्याचा दाखला दिला. तेंडुलकर यांची ‘घाशिराम कोतवाल’, ‘सखाराम बार्इंडर’ वगैरे नाटके, त्याबाबत वेगवेगळी वादंगे उठूनदेखील अनेक प्रयोगकरती झाली. ‘घाशिराम’ परदेशातही जाऊन आले. त्यावेळी मीना नाईक म्हणाल्या, की “मी ‘गिधाडे’च्या मूळ आवृत्तीत काम केले होते. त्याबाबतही वेगवेगळी वादळे निर्माण झाली होती.”

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा चौदावा वर्धापनदिन अर्थात ‘सद्भावना दिवस 2024’, ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात झाला. मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्यांचे ‘नेटवर्क’ व्हावे या उद्देशाने ‘थिंक महाराष्ट्र लिंक महाराष्ट्र’ अशी अनोखी घोषणा ‘थिंक महाराष्ट्र’ या प्रकल्पामधून राबवली जाते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने वर्धापनदिना निमित्ताने तीन छोटे छोटे संस्थात्मक कार्यक्रम योजले होते आणि चौथा होता तो सद्यकालाला अनुरूप असा नाट्यविषयक परिसंवाद. त्यामुळे एकूण कार्यक्रमाबद्दल उपस्थित श्रोत्यांच्या मनामध्ये औत्सुक्य होते.

चार पदरी कार्यक्रमाचे आकर्षण होते, ते म्हणजे तीन मान्यवर रंगकर्मींचा परिसंवाद. ‘थिंक महाराष्ट्र’च्या ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ ह्या ‘प्रत्यक्ष संवाद’ घडवून आणणाऱ्या व्यासपीठावर संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित असे हे तीनही कलाकार एकत्र आले. एकशेएकोणीस कलाकृती दिग्दर्शित करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी, कळसूत्री बाहुल्या ह्या कलेचे, सामाजिक जाणिवेतून समाजासाठी आणि विशेषतः मुलांच्या अनौपचारिक शिक्षणासाठी उपयोजन करणाऱ्या ज्येष्ठ कलाकार मीना नाईक आणि चतुरस्र लेखणीने नाटक, कादंबरी अशा दीर्घ लेखनाच्या क्षेत्रांत लीलया मुशाफिरी करणारे कलाकार अभिराम भडकमकर ह्या रंगकर्मींनी ह्या परिसंवादात त्यांचे विचार व्यक्त केले.

परिसंवादाचा विषय ‘मराठी रंगभूमी – आजचे स्वरूप आणि समाजभान’ असा होता. त्यासंबंधात भडकमकर नि:संदिग्ध बोलले. ते म्हणाले, की “सध्या ‘समाजभान’ या शब्दाचा अर्थ मर्यादित स्वरूपात घेतला जातो. खरे तर, भारतीय नाटकांमध्ये आरंभापासूनच सामाजिक घडणीचे उल्लेख असत आलेले आहेत. नाटक हेदेखील समाजरचनेचे एक अंग मानले गेले. परंतु गेल्या काही दशकांत सामाजिक भान म्हणजे सामाजिक समस्येचा उल्लेख अथवा निर्देश असे मानले जाते आणि तशा नाटकांना सामाजिक भान असलेली नाटके म्हणून समजले जाते, ते गैर आहे. सामाजिक घटना व समस्या नाटकांत वा कलाकृतींत पडसाद रूपाने येत असतात.” त्यांनी तशी एकदोन उदाहरणे दिली. कार्यक्रमास डॉ. रविन थत्ते, प्रशांत दीक्षित, प्रकाश खांडगे, शुभा खांडेकर, सुरेश चव्हाण, रविप्रकाश कुलकर्णी, किरण भिडे, चांगदेव काळे, वीणा सानेकर, किरण येले … अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

संस्थात्मक कार्यक्रमात ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे सध्या इंटरनेटवर असलेले ‘थिंक महाराष्ट्र’चे बरेचसे लेखन मुद्रित स्वरूपात वाचकांना सादर करणे. त्यानुसार 2023 साली व्यक्ती, संस्था व संस्कृतिसंचित या तीन प्रकारांत इंटरनेटवर प्रसिद्ध झालेले साहित्य तशाच तीन प्रकारांत पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आले. पुस्तकांचे प्रकाशन भडकमकर, नाईक व सोहोनी या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. तीन पुस्तकांचा संच नऊशे रुपयाला विक्रीस (प्रत्येक पुस्तकाची किंमत साडेतीनशे रुपये) उपलब्ध होता. ही पुस्तके ‘प्रिंट टू ऑर्डर’ तंत्राने प्रसिद्ध होणार आहेत. या पुस्तकयोजनेचे प्रवर्तक गिरीश घाटे म्हणाले, की “‘थिंक महाराष्ट्र’ 2010 साली सुरू झाले तेव्हापासून दरवर्षीच्या साहित्याची तीन पुस्तके या पद्धतीने प्रकाशित करण्याचा बेत आहे. त्यामुळे गेल्या चौदा वर्षांत जे महत्त्वाचे लेखन ‘थिंक महाराष्ट्र’वर प्रसिद्ध झाले ते सारे छापील स्वरूपातही उपलब्ध असेल. सध्याचा जमाना ऑनलाइन वाचनाचा आहे हे खरेच, परंतु अजूनही बराच मोठा वाचक समुदाय पुस्तक स्वरूपात वाचणे पसंत करतो. त्यांच्यासाठी ही सुविधा आहे”. (पुस्तकांची ऑर्डर देण्यासाठी फोन करावा – 9820146432)

दुसरा संस्थात्मक कार्यक्रम प्रशस्तिपत्रे प्रदान करण्याचा होता. ‘थिंक महाराष्ट्र’वर गेल्या वर्षभरात जे लेखन प्रसिद्ध झाले त्यांपैकी चार लक्षवेधक माहितीपूर्ण लेख निवडण्यात आले. त्या लेखांच्या लेखकांना ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे ‘थिंक महाराष्ट्र’चे संपादक दिनकर गांगल यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रे देण्यात आली. ते विजेते होते श्रीकांत पेटकर, रजनी देवधर, महादेव इरकर आणि अमित भगत. या लेखांची निवड ‘थिंक महाराष्ट्र’च्या संपादन समितीच्या सदस्य सुनंदा भोसेकर यांनी केली आहे.

वर्धापनदिनाचा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम होता तो कारभारसूत्रे हस्तांतर करण्याचा. त्यानुसार ‘थिंक महाराष्ट्र’चे कर्ते दिनकर गांगल यांनी त्यांच्याकडील कारभारसूत्रे गिरीश घाटे या ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या नवनियुक्त संचालकांकडे सोपवली. यापुढे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ व ‘थिंक महाराष्ट्र’ यांची सर्व व्यवस्था गिरीश घाटे हे अन्य संचालकांच्या सहकार्याने पाहणार आहेत. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे एकूण संचालक आहेत – दिनकर गांगल, गिरीश घाटे, प्रवीण शिंदे, सुदेश हिंगलासपूरकर, यश वेलणकर, राजीव श्रीखंडे, मिलिंद बल्लाळ, संजय आचार्य, दिलीप गट्टी, मंदार भारदे.

गांगल यांनी कारभारसूत्रे हस्तांतर करत असताना गेल्या दहा-बारा वर्षांतील कार्याचा आढावा घेतला आणि वेळोवेळी ज्या ज्या लोकांचे आर्थिक, संपादकीय व व्यवस्थापन यासाठी सहाय्य लाभले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

वर्धापनदिनाचा कार्यक्रम हा पूर्वार्ध झाल्यानंतर अच्युत भोसेकर यांनी ‘महाराष्ट्र गीत’ पहाडी आवाजात म्हटले. तीच उत्तरार्धातील परिसंवादाची सुरुवात ठरली आणि निर्मोही फडके यांनी चर्चेचा आरंभ केला.

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संस्थापक, ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल ह्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या कार्यप्रणालीमागे असलेली प्रेरणा, भूमिका, उद्देश आणि कृतिशील उपक्रम ह्याबद्दल माहिती दिली. ‘थिंक महाराष्ट्र’समूहाचे गिरीश घाटे ह्यांनी ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ ह्या पुस्तकाबद्दल निवेदन केले. ज्येष्ठ लेखिका सुनंदा भोसेकर ह्यांनी पुरस्कारप्राप्त लेखांच्या निवडीबद्दलचे निकष आणि पोर्टलवरील लेख ह्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ ह्यांनी ह्या रंगतदार सोहळ्याचे थोडक्यात रसग्रहण करून सोहळ्याचे साक्षीदार झालेल्या सर्व कलाप्रेमी मान्यवरांचे आभार मानले.

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेब पोर्टलचे सभासद होऊन महाराष्ट्रातील मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्या ‘नेटवर्क’मध्ये नव्या-जुन्या पिढीतील सर्वांनी त्यांच्या लेखणीने, विचारांनी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांतूनही योगदान द्यावे असे आवाहन ह्या वेळी ‘थिंक महाराष्ट्र’ समूहाच्या वतीने करण्यात आले.

वृंदा दाभोळकर यांनी एकूण कार्क्रमाचे संचालन केले.

थिंक महाराष्ट्र 9867118517 info@thinkmaharashtra.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here