तांबूल ऊर्फ विडा

2
50
विड्याचे घटकपदार्थ: नागवेलीची पाने, डाव्या बाजूला पक्क्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला कच्च्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला मध्यभागी तंबाखू व उजव्या बाजूकडील खालच्या कोपऱ्यात लवंग
विड्याचे घटकपदार्थ: नागवेलीची पाने, डाव्या बाजूला पक्क्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला कच्च्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला मध्यभागी तंबाखू व उजव्या बाजूकडील खालच्या कोपऱ्यात लवंग

“कळीदाssर , कपूरी पान …………… रंगला विडा” ह्या गाण्याप्रमाणेच गाण्‍यात उल्‍लेखलेला ‘विडा’सुद्धा सर्व थरांतल्या लोकांमध्ये प्रिय आहे.

तांबूल म्हणजे कात , चुना, सुपारी इत्यादी पदार्थ घालून केलेला नागवेलीच्या पानाचा विडा. हा त्रयोदशगुणी असावा असा संकेत आहे. ते तेरा गुण म्हणजे तिखटसर, कडवट, उष्ण, मधुर, खारट व तुरट, वातहारक, कृमिनाशक, कफहारक, दुर्गंधी नाहीशी करणारा, मुखाची अशुध्दी नाहीशी करून मुखाला शोभा आणणारा, कामाग्नी उद्दीपीत करणारा… ‘योगरत्नाकर’ ह्या ग्रंथातील एका श्लोकामध्ये हे सर्व वर्णन दिले आहे. त्यात विड्याचे घटक म्हणून पदार्थ दिले आहेत, नागवेलीची पाने, सुपारी, कात , चुना , कापूर , कस्तुरी, लवंग , जायफळ व तंबाखू . तंबाखूमुळे दंतरोग शमन होतो, तसेच कृमी व कंड नाश पावतात.

विडा खाण्याची प्रथा भारतात दोन हजार वर्षांपासून चालत आलेली आहे. स्कंद पुराणात नागवेलीला अमृतोद्‍भव मानले आहे. ती कथा अशी की मोहिनीने अमृताची वारणी केल्यानंतर उरलेले अमृत इंद्राच्या नागराज नामक हत्तीच्या खुंटाजवळ ठेवले. काही काळानंतर त्या अमृतातून अद्‍भुत वेल उगवली. त्या वेलीच्या प्रभावाने देवगण धुंद झाले. विष्णूने धन्वंतरीकडून त्या वेलीची तपासणी करून घेतल्यावर असे अढळून आले, की तिची पाने मादक आहेत! मग विष्णू आपल्या इष्टजनांना ती पाने भेट म्हणून देऊ लागला, ती त्यांना रुचकर लागली.

दुसरी एक कथा अशी : प्राचीन काळी पृथ्वीवर विड्याचे पान नव्हते. पांडवांनी हस्तिनापुरात अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्यांना विड्याचे पान हवे होते. म्हणून पांडवांनी ते आणण्यासाठी आपल्या दूताला वसुकी नागाच्या राणीकडे पाठवले. तिने आपल्या करंगळीचा भाग कापून दिला. त्याने तो भाग पृथ्वीवर आणून जमिनीत पुरताच त्यातून नागवेल उगवली, तेव्हापासून विड्याच्या पानांना नागवेलीचे पान असे नाव पडले.

विड्याचे घटकपदार्थ: नागवेलीची पाने, डाव्या बाजूला पक्क्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला कच्च्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला मध्यभागी तंबाखू व उजव्या बाजूकडील खालच्या कोपऱ्यात लवंगविड्याची पाने विकणा-यांना तांबोळी असे म्हणतात.

विडा खाण्याची प्रथा भारताप्रमाणे इंडोचीन, सुमात्रा, मलाया, मालदीव, निकोबार, दक्षिण अरबस्तान इत्यादी देशांतही आढळते. काही संशोधकांच्या मते, गुप्तकाळात भारताचे जावा, सुमात्रा इत्यादी आग्नेयेकडील द्वीपांशी जे सागरी दळणवळण वाढले त्यातून विड्याचा, विड्याची पाने व विड्याला लागणा-या जिनसा यांचा भारतात प्रवेश झाला असावा. या अनुमानाला भाषाशास्त्राचाही आधार मिळतो. तांबूल हा शब्द ऑस्ट्रो-एशियाटिक भाषावर्गातला आहे. परंतु ‘तांबुलमंजिरी’ या ग्रंथाचे संपादक श्री. पदे ह्यांच्या मते तांबूल खाण्याची प्रथा खास भारतीय असून, ती तंत्रपरंपरेत वेदकाळापासून रुढ असावी. तांत्रिक आणि तंत्रप्रभावित उपासनेत, तसेच अन्य धर्माचारात विड्याचे महत्त्व आहे. त्या परंपरेत वाङमयात, विड्याचे उल्लेख अनेकवार आढळतात. पुढच्या काळात वैदिकांनी तांत्रिकांपासून विड्याचा स्वीकार केलेला दिसतो.

तांबूल कामोद्दीपक आणि मुखसौंदर्यवर्धक असल्यामुळे प्रणयाराधनेत तांबुलाचे महत्त्व विशेष मानले गेले आहे. भारतातील कामशास्त्राबाबतच्या ग्रंथांत आणि काव्यनाटकांतील शृंगारवर्णनात तांबुलाच्या या प्रणयपोषक प्रभावाचा उल्लेख वारंवार आढळतो. माडगूळकरांनी तीच मात्रा या गाण्यात वापरली आहे.

प्रणयाराधनाशिवाय अन्य सामाजिक व्यवहारात आणि धर्माचारातही विड्याचे महत्त्व आहे. राजवाड्यात तांबूलसकरंकवाहिनी (तांबुलाचे साहित्य असलेला डबा वाहणार्‍या) सेविका नेमलेल्या असत. अशा सेवक-सेविकांचे उल्लेख संस्कृत व प्राकृत वाङमयात आढळतात. राजाला, राज्याधिकार्‍यांना, गुरुजनांना आणि अन्य आदरणीय व्यक्तींना सन्मानदर्शक विडा देण्याची प्रथा होती.

मंगलकार्यात निमंत्रितांना पानसुपारी देतात. पूजोपचारात देवतेपुढे नागवेलीच्या दोन पानांवर अखंड सुपारी ठेवतात. स्त्रियांमध्ये पूर्वीच्या काळी हळदीकुंकवाला जे महत्त्व होते, तसेच महत्त्व पुरुषांच्या आयुष्यात पानसुपारीला होते. निरोप घेताना सुवासिनींनी एकमेकीस कुंकू लावणे हा समस्त महिलावर्गात अलिखित नियम होता, तसंच पुरुषवर्गात पान खाणे व दुसऱ्याला खिलविणे हा सामाजिक शिष्टाचार होता.

विडा खाण्याची प्रथा भारताप्रमाणे इंडोचीन, सुमात्रा, मलाया, मालदीव, निकोबार, दक्षिण अरबस्तान इत्यादी देशांतही आढळतेमूल अडीच महिन्यांचे झाल्यावर त्याला विडा खायला देण्याचा संस्कारही शास्त्रपुराणात नमूद आहे. एखादे अवघड कार्य करून दाखवण्याची प्रतिज्ञा करताना ‘पैजेचा विडा’ उचलण्याची प्रथा इतिहासात आढळते. प्रिय व्यक्तीच्या मुखातील विडा खाण्याचे महत्त्व जसे प्रणयाच्या क्षेत्रात आहे, तसेच गुरूच्या मुखातील विडा प्रसाद म्हणून भक्षण करण्याचे महत्त्व गुरु-शिष्य संबंधात आहे. महानुभवांच्या लिळाचरित्र या ग्रंथात चक्रधरांनी आपल्या शिष्यांना प्रसाद म्हणून उष्टा विडा दिल्याचे उल्लेख आहेत. विधवा स्त्रिया, यती व ब्रम्हचारी यांना विडा निषिध्द मानलेला आहे.

भारतीयांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात तांबुलाला लाभलेले स्थान पाहता हे स्पष्ट होते, की तांबूल हे भारतीय लोकांच्या उल्हसित वृत्तीचे रंगतदार प्रतीक आहे, असे डॉ. प. क्र. गोडे यांनी नमूद केले आहे.

– ज्योती शेट्ये

About Post Author

Previous articleसुरू आणि चालू
Next articleअभंग आणि गझल
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या ‘वनवासी कल्‍याणाश्रम‘ या संस्‍थेत काम करू लागल्या. ईशान्‍य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्‍येची‘ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.

2 COMMENTS

  1. नमस्कार

    नमस्कार, खूप छान माहिती मिळाली.

Comments are closed.