तमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव (Tamdalge)

0
66
_Tamdalge_1.jpg

महाराष्ट्रात तमदलगे हे शेतीसंबंधीचे सर्व पुरस्कार मिळालेले गाव आहे!… ते तेथील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील बाबासाहेब कचरे, रावसाहेब पुजारी, राजकुमार आडकुठे, वैजयंतीमाला वझे यांना शासनाने गौरवले आहे.  येथील सुरगोंडा पाटील यांनी विक्रमी लांबीची काकडी पिकवल्याची नोंद गिनीज बुकमध्ये नोंदवली आहे. नृसिंह हे तेथील ग्रामदैवत आहे.

तमदलगे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्याच्या त्याच नावाच्या मुख्य ठिकाणापासून अठरा किलोमीटर अंतरावर वसलेले एक छोटे गाव. तमसोमा ज्योतिर्गमय याचा अर्थ अंधार नाहीसा करणे/होणे तेलगुमध्ये असा आहे. त्यावरून गावातील अंध:कार नाहीसा करण्यासाठी गावाने हे  नाव तमदलगे हे धारण केले असावे असे म्हटले जाते. म्हणजे बाराशे एकर डोंगर आणि पाचशे एकर पिकाऊ जमीन! गावाची खरी अमानत. गावाची लोकसंख्या दोन हजार दोनशे आहे.

तमदलगे गावाची खरी ओळख ही शेतीत त्या गावाने दिलेल्या योगदानामुळे आहे. पावसावर अवलंबून असणारी सारी शेती. त्यामुळे काबाडकष्ट करून परिस्थितीवर मात करत कृषीसंस्कृती जागवण्याचे काम तेथील शेतकरी शेकडो वर्षे करत आला आहे. शेतकरी तेथील शेतीत अनेक विक्रम करत आलेले आहेत. गावाला देशातील पहिला कृषिपंडित पुरस्कार मिळाला, ही त्या गावाची प्रेरणा आहे. त्यावेळी सर्वत्र एक पीक पद्धत होती. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठ्याची समस्या गंभीर होती. त्यासाठी कृषी क्षेत्रात वेगळे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कृषी पंडित पुरस्काराची योजना जाहीर केली. त्या योजनेत तमदलगे येथील कै. भीमगोंडा दादा पाटील या शेतकऱ्याने भाग घेतला. त्यांनी विक्रमी ज्वारीचे उत्पादन घेऊन देशाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. त्यांचा ट्रॅक्टर भेट देऊन नवी दिल्लीत पंतप्रधानाच्या हस्ते गौरव करण्यात आला.

लहरी पावसाचे झटके या गावाने अनेकदा सोसले आहेत. तरीही परिस्थितीवर मात करत कधी पावसाळी, तर कधी आठमाही पीक पद्धतीचा अवलंब करत तेथील शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. अलिकडच्या काळात रोपवाटिकांचा गाव म्हणून तमदलगे गावाने मोठा लौकिक मिळवला आहे. गावात भाजीपाला, ऊस यांच्या सत्तर छोटया-मोठ्या रोपवाटिका चालू झालेल्या आहेत. त्यांची सुरूवात कारंदवाडी येथील प्रयोगशील शेतकरी बाबूराव राऊ कचरे यांनी केली. पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी आपली भाजीपाल्याची रोपवाटिका तमदलगे रेल्वे पूलाच्या बाजूला सुरू केली. त्यांचा नावलौकिक त्या रोपवाटिकेच्या माध्यमातून सर्वदूर झाला. त्यांना महाराष्ट्र शासनाने कृषिभूषण पुरस्काराने गौरवले आहे. त्यांचे पुत्र शिवाजी कचरे यांनाही राज्य शासनाने उद्यानपंडित पुरस्काराने गौरवले. पिता-पुत्रांनी कृषी विस्ताराचे फार मोठे काम केले आहे. शिवाजी कचरे यांनी अनेक देशांचा दौरा रोपवाटिका व्यवसायाच्या निमित्ताने केला आहे.

तमदलगे गावचेच दुसरे पुत्र रावसाहेब पुजारी यांनी कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून तमदलगे गावाचे नाव सर्वदूर केले आहे. पुजारी गेली तीस वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. शेती या विषयाला वाहिलेले त्यांचे ‘शेतीप्रगती’ हे कृषी मासिक महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांनी तेजस प्रकाशन ही कृषी विषयाला वाहिलेली प्रकाशन संस्था विकसित केली आहे; त्या संस्थेमार्फत पंच्याहत्तर कृषी पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. पुजारी यांनी स्वत: पाच पुस्तके लिहिली आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांनाही कृषी मित्र पुरस्काराने गौरवले आहे. त्यांना वसंतराव नाईक प्रतिष्ठान, आर.सी.एफ, कोल्हापूर जिल्हा परिषद, मार्ट, (पुणे) या संस्थांनी विशेष पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्यांना क्षारपीडित जमिनीच्या अभ्यासासाठी दिल्ली येथील सी.एस.ई या संस्थेने फेलोशिप दिली होती.

गावातील महिला शेतीमध्ये वेगळे काम करत असतात. त्यापैकी वैजयंतीमाला विद्याधर वझे यांनी गेली तीस-पस्तीस वर्षे शेतीत अनेक प्रयोग केले. त्यांनी ऊस, केळी, चिकू, दुधाळ जनावरांचा गोठा असे उपक्रम यशस्वी केले आहेत. शासनाने त्यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने गौरवले आहे. त्यांना आर.सी.एफ. व भीमा फेस्टिव्हलहेही  पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे पुत्र अभिजित वझे यांना कोल्हापूर जिल्हा परिषदे, ने आदर्श गोठा व्यवस्थापनाचा पुरस्कार देऊन गौरवले आहे.

_Tamdalge_2.jpgराजकुमार बापू आडखुठे यांनी संजीवनी अॅग्रो प्राडक्टसच्या माध्यमातून केळीच्या रायपनिंग चेंबर्सची उभारणी केली आहे. ते शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोग क्लस्टर पद्धतीने राबवतात. त्यांनाही महाराष्ट्र शासनाने उद्यानपंडित पुरस्काराने गौरवले आहे. त्याशिवायही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तमदलगे येथील आणखी एक शेतकरी सुरगोंडा बाबगोंडा पाटील यांनी विक्रमी लांबीची काकडी पिकवली होती. त्याची गिनीज बुकमध्ये नोंद घेतली गेली आहे. त्यांनी सोयाबीन उत्पादनामध्येही राज्यात दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यांनी पेरू उत्पादनाचे वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यांना शासनाने एका समारंभात गौरवले आहे. शेतीसंबंधीचे सर्व पुरस्कार मिळालेले तमदलगे गाव आहे!

तमदलगे गाव लहान असले तरी तेथील प्रत्येक शेतकरी प्रयोगशील आहे. शेतकरी कष्टाळू आहेत आणि त्यांची जिद्द तर वाखाणण्यासारखी आहे. ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी अलिकडे प्लास्टिक ट्रेमधील रोपांचा वापर होत आहे. त्यासाठी अनेक तरूण पुढे आले आहेत. त्या गावाने ऊस रोपवाटिकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांतील शेतकऱ्यांना ऊसाची रोपे देण्याचा मोठा उद्योग निर्माण करून दिला आहे. गावात पंचेचाळीस रोपवाटिका कार्यरत आहेत. रोजगाराच्या संधी त्यातून मिळाल्या आहेत. रोपवाटिकेवर आधारित इतर व्यवसाय निर्माण झाले आहेत.

गावाच्या उत्तरेला पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कृपाशीर्वादाने 1972 मध्ये पाझर तलावाची झालेली निर्मिती; चांगला पाऊस झाला तर तलाव भरून जातो. परिणामी गावातील विहिरी, बोअरवेल्सना चांगले पाणी राहते. प्रदूषणरहित वातावरणामुळे त्या परिसरामध्ये लोकांचे आरोग्य चांगले आहे. स्वच्छ, गोड पाणी, वाहते झरे, आरोग्यदायी वातावरण यांमुळे गावाला वेगळे सौभाग्य लाभलेले आहे.

गावामध्ये सर्व जाती-धर्मांची देवस्थाने आहेत. मात्र, नृसिंह हे तेथील ग्रामदैवत आहे. तेथे सर्व जाती-धर्माचे लोक गावात गुण्यागोविंदाने राहतात. सर्व जाती-धर्मांचे लोक नृसिंहाची आराधना मनोभावे करतात; प्रत्येक महत्त्वाच्या कार्यात नृसिंहाचा आशीर्वाद घेतात. नृसिंह जयंती हा तेथील लोकांच्या श्रद्धेचा महत्त्वाचा भाग आहे. नृसिंह जयंतीच्या निमित्ताने सगळा गाव एकत्र येतो. गुरव समाजाकडे नृसिंह मंदिराची पूजा-अर्चा, पालखी-सोहळे सर्व काही असते. त्यासाठी देवस्थानाकडून त्या समाजाला देवस्कीची काही जमीन कसण्यास दिली गेली आहे. विठ्ठलपंथी भजनी मंडळीच्या भजनाने जयंती सोहळ्याला सुरूवात होते. नृसिंहाची पालखी निघते. नृसिंह पालखी पारकट्ट्याच्या मैदानात येते. तेव्हा, त्यांच्या उपस्थितीत शोभेच्या दारूची आतषबाजी होते. डोळ्याचे पारणे फेडणारा तो सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थ त्यांच्या कुटुंबीयासह, पाहुण्या-रावळ्यांसह त्या ठिकाणी येतात. जयंतीनिमित्ताने गोड-धोड जेवणाचा बेत घरोघरी केला जातो. तमदलगे ग्रामस्थांसाठी तो आनंदोत्सवच असतो. 

गावामध्ये हनुमान, बिरोबा, जैन बस्ती, लक्ष्मी, यल्लाम्मा आणि पिराचे देवस्थान ही इतर मंदिरे आहेत. त्या त्या समाजातील लोक त्यांची पुजाअर्चा तेथे करतात. नवशा मारूती आणि नंदी समाजाच्या मंदिरांची स्थापना नव्याने पाझर तलावाच्या बाजूला केली गेली आहे.

जयसिंगपूर परिसरातील व्यापारी मंडळींनी नियमित फिरायला येण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी काही सुविधा केल्या आहेत.

गावात बाजार भरत नाही गावकरी रविवारी पाच किलोमीटरवर असलेल्या जयसिंगपूरला आणि मंगळवारी हातकणंगले येथील बाजारात खरेदी-विक्रीसाठी जातात. गावात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची सोय आहे. गावात ‘राष्ट्रीय विद्यालय’ आहे. उच्चशिक्षणासाठी जयसिंगपूर किंवा कोल्हापूरला जावे लागते. गाव कोल्हापूर-सांगली रस्त्यावर आहे. जवळच निमगाव-तमदलगे रेल्वे स्टेशन आहे. गावात सर्वत्र मराठी आणि घरगुती वापरात कानडी भाषा बोलल्या जातात. प्रसिद्ध ‘नरसोबाची वाडी’ वीस किलोमीटर अंतरावर आहे. तसेच, जैनांचे ‘बाहुबली’ हे तीर्थक्षेत्र दहा किलोमीटरवर आहे.

–  नितेश शिंदे

niteshshinde4u@gmail.com

माहिती स्रोत – अस्मिता पुजारी

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here