‘झिरो बजेट’ शेती – शेण हे विरजण

1
48
-zero-budget

शेतीत शेणाचा वापर कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात करायचा यावर या तंत्राचा भर आहे. जेव्हा एक ग्रॅम शेण शेतात टाकले जाते, तेव्हा तब्बल तीनशे कोटी जिवाणू जमिनीत उतरतात. एक देशी गाय दिवसाला सरासरी अकरा किलो शेण देते. एका गायीचे एका दिवसाचे शेण एका एकराला महिन्यातून एकदा द्यायचे. म्हणजे तीस दिवसांचे शेण तीस एकरांना पुरेसे आहे, शेण हे विरजण आहे, अन्न नव्हे असे पाळेकर बजावतात. पीक कोणतेही असो- कोरडवाहू असो किंवा ओलिताचे; हंगामी असो किंवा बारमाही फळबागा; एका एकराला दहा किलो शेण वापरायचे. ते वापरल्याने एक एकर जमिनीत तीस लाख कोटी सूक्ष्म जिवाणू उतरतात व जमीन सजीव करतात, पण संपूर्ण जमीन सजीव झाल्याशिवाय निसर्गाच्या सर्व यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने कामी लावता येणार नाहीत. त्यासाठी जिवाणूंची संख्या अनेक पटींनी वाढवावी लागते. ते करण्यासाठी किण्वन क्रिया (फर्मेंटेशन) घडवून आणावी लागते. झाडांच्या पानांनी प्रकाश संश्लेषण क्रियेतून तयार केलेल्या कच्च्या साखरेपैकी काही साखर झाडे त्यांच्या मुळांच्या वाटे जमिनीत पाठवून सूक्ष्म जिवाणूंना खाऊ घालतात आणि त्यांची संख्या प्रचंड गतीने वाढवतात. त्या बदल्यात जिवाणू मुळांना अनुपलब्ध अन्नद्रव्ये संस्कार करून पोचवतात. हे सहजीवन आहे. हे निसर्गात घडते. त्याच पद्धतीने दहा किलो शेणात एक किलो गूळ (विशेषत: काळा गूळ) घातला असता जिवाणूंची संख्या प्रचंड वाढल्याचे लक्षात येते. जिवाणूंच्या जैविक हालचालींसाठी लागणारी ऊर्जा पुरवण्यासाठी प्रथिनेयुक्त कडधान्याचे पीठ म्हणजे बेसन वापरावे. तोच ‘जिवामृता’चा फॉर्म्युला. देशात ‘जिवामृता’चे परिणाम सर्वोत्कृष्ट आहेत; नैसर्गिक आपत्तीतही पिके तग धरतात असे सुभाष पाळेकर यांचे म्हणणे आहे.

सेंद्रीय शेती आणि नैसर्गिक शेती यांच्यात अनेक साम्ये असली, तरी सेंद्रीय शेतीत वापरल्या जाणाऱ्या अनेक निविष्टांसाठी बाजारपेठेवर अवलंबून राहवे लागते. शेणखत टाकावे म्हटले तरी हेक्टरी दहा ते पंधरा गाड्या शेणखत लागते आणि ते विकत घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. ते चांगले कुजलेले नसल्यास शेतातील नत्राचे शोषण होते; रोगांचे, किडींचे प्रमाण वाढते. जैविक खते प्रयोगशाळेत तयार केली जातात. मात्र त्यासाठी पुन्हा बाजारावर विसंबून राहवे लागते. नैसर्गिक शेती पद्धतीत तो प्रश्न नाही. सारी संसाधने घरच्या घरी व शेतीत. शेतात बाहेरून काहीही देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी पिकांच्या नियोजनापासून ते काढणीपर्यंत त्याच पद्धतीचा बिनचूक व प्रामाणिक वापर केला पाहिजे. निसर्गातील नत्रापासून पाण्यापर्यंतच्या विविध चक्रांचा उपयोग शेतीत केला जातो असे सुभाष पाळेकर यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतीवरील खर्च कमी करणे हा खरा उपाय आहे; नैसर्गिक शेतीत तर खर्चच नाही! नैसर्गिक शेती ही शाश्वत कृषी पद्धत आहे. रासायनिक व सेंद्रीय शेतीमुळे मानव, पशू, पक्षी, पाणी व पर्यावरण यांचा विनाश होत आहे. ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीमुळे त्या सर्वांचा विनाश टाळला जातो आणि नैसर्गिक संसाधनांची शाश्वती वाढते. शून्य उत्पादनखर्च, जास्त उत्पादन, उत्तम दर्जा, चांगली मागणी, योग्य भाव… अशा शेतीमुळे खेड्यातून शहराकडे होणारे मानवी स्थलांतर रोखता येईल असे सुभाष पाळेकर यांचे म्हणणे आहे.

(बीबीसी न्यूज, लोकसत्ता यांवरून संकलित)

– नितेश शिंदे 

info@thinkmaharashtra.com

About Post Author

Previous article‘दशपदी’चे प्रणेते कवी अनिल (Poet Anil)
Next articleगरज आहे लोकशक्तीला जागृत करण्याची…
नितेश शिंदे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरिंग आणि एम ए (मराठी) असे शिक्षण घेतले आहे. ते क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांच्या साथीने 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित' या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे संपादन केले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘लघुनाटके’ लिहिली. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांनी ‘आशय’ या नियतकालिकाच्या ‘मुंबई’, ‘पु.ल.देशपांडे’ आणि ‘त्रिवेणी’ या विषयांवरील विशेषांकांचे संपादन केले आहे. नितेश यांना ‘के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ (2017) हा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत.

1 COMMENT

  1. जीवानु आमृत कसे तयार करावे?
    जीवानु आमृत कसे तयार करावे?

Comments are closed.