जाखडी नृत्य (बाल्या नाच)

0
151
कोकणातील लोककला – जाखडी लोकनृत्य्
कोकणातील लोककला – जाखडी लोकनृत्य्

कोकण प्रांतातील निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी नृत्य’. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्‍याने केला जातो, म्‍हणून त्‍यास ‘जाखडी’ असे म्‍हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो – ‘जखडणे’. ‘जाखडी’मध्‍ये नृत्‍य करणार्‍यांची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्‍हटले जाते. मुंबई त ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्‍या नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले. बाल्‍या अथवा जाखडी नृत्‍यास रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी ‘चेऊली नृत्य’ असेही म्हणतात. त्याला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळत आहे.

त्‍या कला प्रकाराचा उगम शाहिरी काव्य, तमाशा या लोककलां पासून सुरू झाला. त्यात कलगीवाले व तुरेवाले असे दोन पंथ असतात. (संदर्भ- वि़. ल. भावे ‘महाराष्ट्र सारस्वत’). बाल्या नाचाला कलगीतुरा किंवा शक्ती-तुर्‍याचा सामना असेही म्हणतात. सहाव्या शतकानंतर होऊन गेलेले कवी नागेश यांनी ‘कलगी’ या पंथाची सुरुवात केली. त्यांच्या नावावरुन त्या पंथाला ‘नागेशवळी’ म्हणजेच नागेशाची ओळ किंवा पंथ असेही ओळखले जाऊ लागले. नागेश यांनी कलगी पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला समकालीन कवी हरदास यांनी ‘तुरेवाले’ या पंथाची सुरुवात केली. त्याला हरदासवळी म्हणजेच हरदासाची ओळ किंवा पंथ असेही म्‍हटले जाऊ लागले. दोन पंथांपैकी एकाने शक्तीचा (पार्वतीचा) मोठेपणा आपल्या कवितेतून किंवा शाहिरीतून मांडला आणि दुसर्‍याने हराचा (शिवाचा) मोठेपणा सांगितला. पुढे, पंथांना ओळखण्याची खूण म्हणून कलगीवाल्यांनी कलगी या चिन्हाचा वापर केला आणि तुरेवाल्यांनी आपल्या डफावर पंचरंगाचा तुरा लावण्याचा प्रघात पाडला. या दोन गटात काव्यात्मक जुगलबंदी रंगते. त्या प्रकारच्या डफ-शाहिरीतून तमाशा हा लोककला प्रकार निर्माण झाला. त्याची कोकणातील आवृत्ती म्हणजे ‘बाल्या नृत्य’.

बाला नृत्यप्रकारात एक-दोन गायक, एक ढोलकी किंवा मृदुंग वादक, एक शैलीवादक, एक-दोन झांजरीवादक व गायकांना साथ देणारे एक-दोन सुरते (कोरस देणारे) असतात. ते सर्वजण मधोमध बसतात आणि आठ ते दहा जण त्यांच्या सभोवती गोलाकार भरजरी कपडे व पायात चाळ बांधून पायांच्या विशिष्ट हालचालींवर नृत्य करतात. प्रथम शक्तीवाले त्यांचे नृत्य सादर करतात. त्यामध्ये ईशस्तवन केले जाते. नर्तक गुंफलेल्या नृत्याच्या वेगवेगळ्या चाली सादर करतात. त्यानंतर गण-गौळण, सवाल-जवाब, साकी, प्रतिस्पर्ध्याच्या चुका काढणारे, भक्तीपर, सामाजिक अथवा सद्यस्थितीसंबंधी माहितीपर गाणी गाऊन त्यावर नृत्य सादर केले जाते. गणात गणपतीला वंदन केले जाते, तर गौळणीत कृष्णाने गौळणींना केलेला इशारा गायला जातो. नृत्यामध्ये सवाल-जवाब स्वरूपाचीही गाणी गायली जातात. तुरेवाले त्यांचा सवाल विचारतात व शक्तीवाले त्यांच्या काव्यातून त्यांना उत्तर देतात.

बाल्या नृत्य श्रावणमास ते दिवाळी या काळात विशेष सादर केले जाते. नाचासाठी ढोलकी, मृदुंग , घुंगरू, झांज, टाळ , बासरी, सनई या वाद्यांचा वापर केला जातो. बदलत्या काळानुसार बाल्यांचे कपडे, म्हटली जाणारी गाणी यात बदल होत गेले. पूर्वी कासोटा बांधून नाच केला जात असे. त्यानंतर नाचणारे धोतर घालू लागले. त्‍यासोबत डोक्‍यावर पेशवेशाही पगडी आणि कमरेला रंगीत शेला ही जाखडी नृत्‍याची वेशभूषा असे. हल्ली रंगेबेरंगी कपडे वापरले जातात.

जोडचाल, एक पावली, दोन पावली, तीन पावली आदी चालींवर जाखडी नृत्य केले जाते. नृत्‍य करणा-यांना बाल्‍या असे संबोधतात. उजव्या पायात भरपूर घुंगरू बांधले जातात. नृत्‍याची रचना प्रामुख्‍याने वर्तुळाकार असते. नृत्‍य करताना घुंगरू बाधलेल्‍या पायाने ठेका दिल्‍यामुळे ढोलकी, झांजरी, टाळे च्‍या आवाजात घुंगरांचा आवाज भर टाकतो. पायातले घुंगरू, गायकाचा उत्‍साहपूर्ण आवाज यामुळे नाचणा-यांच्‍या अंगी उत्‍साह संचारतो आणि ते गीत-वाद्यांच्‍या तालावर आरोळया देऊ लागतात. गाण्‍याच्‍या मधे ऐकू येणा-या त्‍या आरोळ्यांमुळे सादरीकरणात आणखी रंग भरला जातो. मात्र पायात घुंगरू बांधून नाच करणारे दुर्मीळ आहेत.

गणेशोत्‍सवाच्‍या काळात जाखडी नृत्‍य व परंपरेला मोलाचे स्‍थान आहे. गणेशोत्‍सवात जाखडी पथके वाड्यावाड्यांतून बाल्‍या नृत्‍य सादर करताना दिसतात. चिपळूण तालुक्‍यातील अनारी, कुंभार्ली, पिंपळी, टेरव, कामथे, सावडे, गांग्रई, आंबडस अशा गावांतून जाखडी पथके आढळतात. नृत्‍य सादर करताना शाहीर नैसर्गिक आपत्ती, तसेच समाजातील विविध समस्‍यांवर गीते रचतात. नृत्‍याच्‍या वेळी गीते गायली जातात. राधाकृष्‍णावर विशेष करून गाणी रचली जातात. वासुदेवाची गाणी, अथवा भारूडा सारख्‍या लोकप्रकारांतून केली जाणारी जनजागृती जाखडी नृत्‍यातील गीतांतही दिसून येते. जाखडी नृत्‍यातील गीतांमध्‍ये‘गणा धाव रे…’हे गीत विशेष प्रसिद्ध आहे.

बाला नृत्यात गोफ नृत्याचाही समावेश आहे. या नृत्य-गीतांना कृष्णाच्या रासक्रीडांचा पौराणिक संदर्भ आहे. नाचणा-या बाल्‍यांचा वेशही कृष्‍णाप्रमाणे डोक्‍यावर मुकुट, दंड आणि मनगटावर बाजुबंद, गळ्यात माळा असा असतो.

गोफ नृत्‍याचे दक्षिणेकडील ‘पिनल कोलाट्टम्‌’ आणि गुजरातमधील ‘गोफगुंफन’ या नृत्यप्रकारांशी साधर्म्य आढळते.

गोफ नृत्‍यप्रकारात हातात गोफ घेतलेले बाल्‍या नृत्‍यासोबत गोफ विणत जातात आणि तेवढ्याच लकबीने तो सोडवतातही. गोफ नृत्‍यासाठी नर्तकांची संख्‍या समप्रमाणात असावी लागते. चार, सहा, आठ अशा संख्‍येने त्यांच्‍या जोड्या असतात. गोफ रंगेबेरंगी साड्या, ओढण्‍या अथवा कपड्यांपासून तयार केला जातो. नृत्‍य सादर करण्‍याच्‍या जागी, नर्तकांच्‍या शिरोभागी आढ्याच्‍या केंद्रस्‍थानी गोफ बांधून त्‍याची अनेक (नृत्‍य करणा-या व्‍यक्‍तींच्‍या संख्‍येएवढी) टोके अधांतरी सोडलेली असतात. प्रत्‍येक बाल्‍या एकेक टोक हाती घेतो. त्यानंतर गाण्‍याच्‍या तालावर आणि ढोलकीच्‍या ठेक्‍यावर नृत्‍य सुरू होते. काही वेळातच, बाल्‍या नृत्‍याची वर्तुळाकार गती सोडून परस्‍परांना सामोरे जाऊ लागतात आणि गोफाची गुंफण सुरू होते. त्यावेळी त्‍यांची नृत्‍याची पद्धत नागमोडी (झिगझॅग) वळणाची असते. अर्ध्‍या जोड्या डाव्‍या तर उर्वरित जोड्या उजव्‍या बाजूने प्रवास करत गोफ गुंफत असतात. गाण्‍याची रंगत जसजशी वाढत जाते तसतसा गोफ घट्ट विणला जात असतो. त्या वेळी ढोलकीच्‍या ठेक्‍यावरील पदन्‍यास, परस्‍परांसोबत असलेली सुसुत्रता यांचे फार महत्त्व असते. चुकलेल्‍या एका पदन्‍यासामुळेही गोफाची गुंफण बिघडू शकते. एका टप्‍प्‍यावर, गुंफण पूर्ण होते आणि बाल्‍या उत्‍साहाने नाचू लागतात. अनेकदा, गाण्‍याची चाल अथवा गाणे बदलले जाते. एखादे कडवे झाल्‍यानंतर गोफ सोडवण्‍याचा भाग सुरू होतो. त्या वेळी बाल्‍या विरूद्ध दिशेने परस्‍परांना सामोरे जाऊ लागतात आणि विणलेला गोफ तितक्याच लकबीने सोडवला जातो.

गोफनृत्यात अत्यंवत लयबद्धतेने आणि लकबीने गोफ गुंफला आणि सोडविला जातोकाही विभागांत विशिष्ट असे मनोरे उभारले जातात. रत्‍नागिरी मध्ये अड्डेरवाले हरी विठ्ठल नावाचे प्रसिद्ध शाहीर होऊन गेले. त्यांची जाखडी नाचाच्या कथेवरील पुस्तकेही प्रसिद्ध होती. पूर्वी केवळ कोकणात असणारे हे नृत्य शहरातही पाहण्याची संधी मिळते. ते नृत्य कोकणी माणसाबरोबर महाराष्ट्रातील सर्व भागांतील लोकांच्या पसंतीस पडले आहे.

सध्‍या जाखडी नृत्याचे आधुनिकीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. नृत्याच्या गाण्यांमध्ये अश्लील शब्दांचा वापर वाढला असून नृत्याची परंपरा चुकीच्या मार्गावर नेली जात आहे असे ज्येष्ठांचे म्हणणे असते. नृत्‍यामध्‍ये ईश्‍वराचे स्‍मरण आणि भावनिकता यांना स्‍थान होते. त्या जागी जाखडीमध्‍ये सिनेमाच्‍या गाण्‍यांच्‍या तालावर गीते गायली जातात. त्‍याचबरोबर गाण्‍यातून एकमेकांशी अर्वाच्‍य भाषेत बोलणे, अश्‍लील गाणी म्‍हणणे, आकर्षणासाठी नृत्‍यात कसरती करणे, अंगावर विद्युत उपकरणे लावणे, डोंबा-याचे खेळ करत नाचणे, अशा अनेक प्रकारांनी या लोककलेत शिरकाव केला आहे. जाखडी नृत्याच्‍या दृकश्राव्‍य सीडी बाजारात येत आहेत. त्‍यातही चांगल्‍या गीतांसोबत थिल्‍लर स्‍वरूपाची गीते पाहण्‍यास-ऐकण्‍यास मिळत आहेत.

जाखडी लोककलेमधील अश्‍लीलता दूर व्‍हावी आणि या लोककलेचा पूर्वीचा बाज कायम रहावा यासाठी काही संस्‍था प्रयत्‍नशील असल्‍याचे दिसते. चिपळूण तालुक्‍यात रत्‍नाकर दळवी यांच्‍याकडून दरवर्षी जाखडी नृत्‍याच्‍या स्‍पर्धा भरवण्‍यात येतात. त्या स्‍पर्धांना प्रतिसाद मिळत असून, स्‍पर्धा जिंकणे हे जाखडी नृत्‍य मंडळांच्‍या दृष्‍टीने मानाचे समजले जाते. कोकणात अशा काही स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात येते.

यंदाच्‍या गणेशोत्‍सवात जाखडी नृत्‍याचा प्रभाव कमी झाला असल्‍याचे निरीक्षण वर्तमानपत्रांतून नोंदवण्‍यात आले आहे.

सौजन्य – लक्ष्मण पडवळ(लोककला अभ्‍यासक),य सहस्त्रबुद्धे,

गोफ नृत्‍याचे फोटो – महाराष्‍ट्राची पंरपरामराठी वाद्यवृंद

वैजंता गोगावले,
इन्‍कलाब नगर, जनसेवा मंडळ,
हेमा इंडस्‍ट्रीजच्‍या शेजारी, मेघवाडी,
जोगेश्‍वरी पूर्व, मुंबई – ४०००६०
९९६७४५८४०१
vjntgogawale@gmail.com

About Post Author