गाविलगड – वैभवशाली बांधकामाचा बलदंड किल्‍ला

carasole

गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला बलदंड किल्ला विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या चिखलदरा तालुक्यातील पठाराच्या दक्षिणेस सुमारे पाच कि.मी. अंतरावर स्थित आहे. मेळघाटातल्या डोंगरद-यांमध्‍ये विखुरलेली किल्‍ल्‍याची व्यापकता आणि गडावरील वास्तुशिल्पातील कलाकुसर पाहून मन थक्‍क हाेऊन जाते.

गाविलगड किल्ला हा भारतवर्ष आणि ब्रिटिश काळाच्या पूर्वीपासून थेट आजपर्यंत असा सुमारे एक हजार वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. देवगिरीचे यादव, बहामनी, निजामशाही, मोगल व मराठे अशा विविध सत्तांची धुरा, राजपूत सुभेदारिणीच्या वास्तव्यखुणा असलेली ‘राणीची देवळी’, हिंदू आणि यवनी कलाकार-कारागिरांच्‍या शिल्‍पकलांची मिश्र उदाहरणे असा इतिहास गाविलगडाने सांभाळला आहे. भूमिगत क्रांतिकारकांच्या भीतीने इंग्रजांनी सातपुडा पर्वतरांगांच्या मध्यावर असलेल्या गाविलगडाला अक्षरश: उद्ध्वस्त केले.

मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास तपासताना व-हाड प्रांत, त्यानंतर इलिचपूरचा मुख्य सुभा यांच्या इतिहासात राजघराणी आणि राज्यसत्ता यांची बहुतेक वर्णने आढळतात. परंतु गाविलगड जिंकल्याशिवाय व-हाड किंवा इलिचपूर जिंकता येत नव्हते. प्राचीन डोंगरी-गवळी किंवा अहिर-गवळी या वन्यजातींनी किंवा महाभारत काळातील अस्तित्वखुणांपासून ‘गवळीगड’ या नावाने अस्तित्वात असणारा हा किल्ला इ. स. 1200 च्या आधी बांधला गेला. किल्ला इ. स. 1185 पासून 1302 पर्यंत देवगिरीच्या यादववंशीय राजांच्या ताब्यात होता. म्हणूनच त्याच्या वास्तुशिल्पांवर यादवकालीन खुणा, वास्तुशिल्पकलेचा ठसा दिसून येतो. इ. स. 1185 पासून 1302 पर्यंतचा यादवकालीन इतिहास उपलब्ध असला तरी शासकीय गॅझेटिअर्समध्ये अकोला किंवा अमरावती जिल्ह्यांच्या इतिहासात यादवकालीन गाविलगडाचा उल्लेख दिसून येत नाही. तसेच गाविलगडाचा इ. स. 1185 च्या पूर्वीचा व इ. स. 1302 ते 1425 पर्यंतचा सुमारे सव्वाशे वर्षांचा इतिहास उपलब्ध नाही.

उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार बहामनी घराण्यातील नववा राजा अहमदशाह वली याने सन 1425मध्ये गाविलगड ताब्यात घेऊन त्याचे बांधकाम सुरू केले. बहामनशाहीचे विभाजन झाल्यानंतर इमादशाहीचा मूळ पुरुष फतेहउल्ला याने सन 1488 मध्ये त्याची दुरुस्ती केली. मोगलकालीन इतिहासात अकबरासोबतच शहाजहाँपासून औरंगजेबापर्यंत गाविलगड मोगलांच्या ताब्यात असल्याचे उल्लेख आहेत. दौलताबादच्या किल्‍ल्‍याची निर्मिती होत असताना, गाविलगड औरंगजेबाच्या ताब्यातील प्रमुख किल्ला असल्याचे सांगण्यात येते.

गाविलगडाचा परिघ सुमारे बारा ते तेरा किलोमीटरचा आहे. त्याची भव्यता नजरेला जाणवते. समुद्रसपाटीपासून 2100 फूट उंचीवर असलेल्या गाविलगडाभोवती घनदाट जंगल आहे. गडाच्या तिन्ही बाजूंना उंच, अभेद्य आणि सुस्थितीतील कडे आहेत. गाविलकडाच्या शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करण्यासारखे आहे. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय अशीच आहेत. फतेहउल्ला इमादउल-मुलक म्हणून 1471 पासून गडाचा सुभेदार होता. त्याने गडावरील सुप्रसिद्ध शार्दूल दरवाजावर विजयनगरच्या हिंदू राज्याचे विजयचिन्ह ‘गंड-भेरुंड’ कोरले, असेही उल्लेख आढळतात. किल्‍ल्याच्‍या लांबरुंद पायऱ्या संपल्या, की दरवाजामधून किल्ल्यात प्रवेश करता येतो. दरवाजाच्या आतील बाजूस असलेली पहारेकऱ्यांची उभे राहण्याची जागा व घुमट पाहून पुढे गेले की पुन्हा एक दरवाजा लागतो. तो दरवाजा म्हणजे चौथा दरवाजा आहे. तो ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य दिल्ली दरवाजा वाट अडवून उभा असतो. तो त्यार मार्गावरील पाचवा दरवाजा. त्या  भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशा प्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर सहसा आढळत नाही. चिखलद-याच्या पठाराकडे असलेला दिल्ली दरवाजा, त्यामागचा बुरुजबंद दरवाजा, अचलपूरच्या दिशेने असलेला, त्या काळी मुख्य प्रवेशद्वार समजला जाणारा अचलपूर किंवा पीरफत्ते दरवाजा आणि नरनाळ्याकडे जाणारा वस्तापूर दरवाजा हे किल्ल्याच्या बांधणीचे मुख्य दरवाजे आहेत.

गाविलगडाच्या भव्य वास्तूचे स्वरूप आणि ती उभी करण्यासाठी हिंदू आणि यवनी कलाकारांनी व कारागिरांनी विविध कालखंडांत घेतलेले कष्ट किल्ला पाहताना जाणवत राहतात. त्याचे उल्लेेख इतिहासात स्पष्टभपणे आढळत नाहीत. परंतु हिंदू आणि यादवी वास्तुशिल्पकलेचा आलेख गाविलगडाच्या विस्तारात सर्वत्र प्रकट होतो. गाविलगडाचे बुरुज, प्रचंड दगडी दरवाजे, नागमंदिर, राणीमहाल, त्या महालावरील ‘राणीची देवळी’ (झरोका), हत्तीखाना, राजाची समाधी, देवीमंदिर, मोठी मशीद आणि इतर अनेक छोट्यामोठ्या वास्तू पाहता येतात. गाविलगडाचा जुळा भाऊ नरनाळा किल्ला वगळता महाराष्ट्रात एवढे मोठे इतिहासकालीन अवशेष क्वचितच एखाद्या किल्ल्यावर आढळतील.

गाविलगडाची ख्याती होती ती त्यावरील अचूक मा-याच्या तोफांसाठी! गडावर आजही सुस्थितीत असलेल्या कालभैरव आणि बिजली या त्यांच्या कड्यांसह घडवलेल्या अखंड तोफा पाहता येतात. त्याणपैकी एक सुमारे एकोणीस फूट लांब, तर दुसरी सुमारे सोळा फूट लांब आहे. एक तोफ पीर-फतेह दरवाजावर असून दुसरी चिखलद-याकडे आहे. याशिवाय आणखी चार छोट्या तोफा आहेत. तोफांवर घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर आढळतो. काही तोफा अष्टधातूंच्या होत्या. अष्टधातूंच्या तोफेचे तीन क्विंटल वजनाचे अवशेष वन विभागाने जपून ठेवले आहेत. ऐने अकबरीतील उल्लेख आणि इतिहासकार अबुल फाजलने केलेल्या वर्णनानुसार गाविलगडावर तोफा ढाळण्याचे आणि पोलादी शस्त्रांचे काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असे.

गाविलगड किल्यासंदर्भात महाभारताची दंतकथा सांगितली जाते. भीमाने कीचकाशी कुस्ती करून त्याचा इथे वध केला व त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले अशी ती कथा. कीचकाची दरी म्हणजे कीचकदरा. चिखलदरा हा शब्दी कीचकदरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. या किल्यावर इ.स. १८०३ मध्ये दुसऱ्या मराठे-इंग्रज युद्धात महत्त्वाची लढाई झाली होती. ऑर्थर वेलस्लीच्या इंग्रजी सैन्याने येथे मराठ्यांचा निर्णायक पराभव केला.

गाविलगडचा भूभाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पूर्वी या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला होता, अशी वदंता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनीय पराक्रम केला. त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे.

किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर दोन तलाव आहेत. किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा टिकून आहेत. या किल्ल्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; पण तोही दुर्लक्षित आहे.

चिखदऱ्यापासून मध्य रेल्वेचे बडनेरा हे किल्‍ल्‍यापासून जवळचे स्थानक ११० किलोमीटरवर आहे. त्याचे मुंबईपासूनचे अंतर ७६३ किमी आहे. एस. टी. महामंडळाच्या गाविलगडाकडे जाणाऱ्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर इथून नियमित सुटतात. चिखलदरा येथे पोचण्यासाठी दोन मुख्य गाडीमार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूरकडून धारणी, हरिसाल, सेमाडोह व तेथून चिखलदरा असा येतो. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून येत असल्यामुळे, हा गाडीरस्ता सूर्यास्त ते सूर्योदय या रात्रीच्या वेळांत बंद करण्यात येतो.

दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवाडा ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. चिखलदरा येथे मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. चिखलदऱ्यापासून गाविलगडाचा किल्ला दोन किलोमीटर अंतरावर आहे. ते दोन किलोमीटरचे अंतर कोणत्याही वाहनाने पार पाडता येते.

गडावर ऑक्टोबर ते जून या काळात येथील हवामान खूपच छान असते.

गाविलगड किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

– आशुतोष गोडबोले

About Post Author

4 COMMENTS

  1. मालिचे कलाकुसरिचे काम पर्वि
    मालिचे कलाकुसरिचे काम पर्वि कारिगर करत.त्याना सँलुट.

  2. अप्रतिम लेख…
    अप्रतिम लेख…..
    खूप छान लिहीलेला आहे…

  3. धन्यवाद आपले . खुप छान. …
    धन्यवाद आपले . खुप छान. प्रफुल्ल बेलोकर, अमरावती

  4. लेख खुप छान लिहीला आहे …
    लेख खुप छान लिहीला आहे …. धन्यवाद सर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here