खळाळता अवखळ झरा आणि इतर कथाः एकनाथ आव्हाड

0
164

एकनाथ आव्हाड यांचे ‘खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा’ हे मार्च 2022 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजे मुलांसाठी लिहिलेल्या सोळा कथांचा संग्रह आहे. या कथा ओघवत्या शैलीत, दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि घटना यांतून फुललेल्या आहेत. शिक्षक-पालक-बालक असे सगळेजण कधी बरोबर, कधी चुकीचे वागतात असे ते सहज सांगतात. काय योग्य- काय अयोग्य हे कथनाच्या ओघात कळून जाते. मात्र त्या कथा उपदेशाचे डोस पाजत नाहीत. त्या सगळ्यांशीच हितगुज करतात. म्हणून त्या शिक्षक-पालक-बालक, तिघांनाही जवळच्या आहेत.

जीवनात आसपास दिसणाऱ्या कितीतरी व्यक्ती, व्यवसाय, प्रसंग या कथांमधून चित्रित झाले आहेत. त्यात मुंबईच्या मुलांनी मामाच्या खेडेगावी जाऊन केलेली मौज आहे. तेथे भेटलेल्या सर्कसमधील विदूषकाची आगळीवेगळी कहाणी आहे. पितळेच्या भांड्यांना कल्हई करणारा कल्हईवाला आहे. कल्हईवाल्याचा आठवीत शिकणारा आणि वडिलांना कल्हईच्या कामात मदत करणारा प्रामाणिक मुलगा आहे. फाटक्यातुटक्या खोपटात राहणारी, कोवळ्या वयाची मुलगी आहे. तिला मदत करणारे सुखवस्तू घरातील पितापुत्री आणि शिक्षक आहेत. पोटासाठी पक्षी विकणारा पारधी आहे. मोटारी धुण्याचे काम करून शाळा शिकणारा मुलगा आहे. चित्रकलेवर प्रेम करणारे शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. आईला शिकायचा आग्रह करणारी शाळकरी मुलगी आहे.

दोन कथांचा खास उल्लेख केला पाहिजे. त्या कथा ‘मराठी भाषा’विषयक आहेत. मराठी भाषेचे वैभव असलेल्या म्हणी दिवसेंदिवस लोप पावत आहेत, अशी आपणा सगळ्यांनाच खंत वाटते. त्या म्हणी रोजच्या प्रचारात आल्या पाहिजेत असे सर्व मराठी प्रेमींना वाटते. एकनाथ आव्हाड यांनी त्यासाठी प्रत्यक्ष पाऊल उचलले आहे. त्यांनी म्हणी मुलांपर्यंत पोचण्यासाठी एक छान कथा सांगितली आहे. त्या कथेचे नाव आहे, ‘म्हणींची गंमत, गप्पांची संगत’. त्या कथेत मुली म्हणींचा खेळ खेळतात. प्रत्येकीने तिच्यावर राज्य येताच एक म्हण सांगायची आणि तिचा अर्थही सांगायचा, असे ठरते. मग आणखी तपशील ठरतो. जिच्यामध्ये संख्येचा वापर आहे अशी म्हण सांगायची. मग म्हणी सांगितल्या जाऊ लागतातः पळसाला पाने तीनच, चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, झाकली मूठ सव्वा लाखाची, पाचामुखी परमेश्वर अशा कित्येक म्हणी त्या कथेत पुढे येतात आणि वाचकाला जाणवते की केवळ आकडे असलेल्या किती म्हणी आहेत मराठीमध्ये ! या छोट्या म्हणी मोठा आशय व्यक्त करतात. असे आणखी वर्गीकरण करायला हवे. शरीराच्या अवयवांचा उल्लेख असलेल्या म्हणी, उदाहरणार्थः कानामागून आली, तिखट झाली. खाद्य पदार्थांचा उल्लेख असलेल्या म्हणी. उदाहरणार्थ नावडतीचं मीठ आळणी. दुसरी कथा आहे ‘भाषेची गोडी’ त्यात निरनिराळ्या पशुपक्ष्यांच्या आवाजाला काय म्हणतात ते सांगितले आहे. वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना, माकडाचा भुभुःकार इत्यादी. शमी सर्व वहीत लिहून घेते. बाळू सर्वांवर रचलेली स्वतःची कविता म्हणून दाखवतो. त्यात गाईचे हंबरणे, बैलाचे डुरकणे, मोराचा केकारव, हंसाचा कलरव इत्यादी बरेच काही आहे. मुक्या जिवाच्या सृष्टीतील ध्वनींना असे निरनिराळे शब्द असणे हेही मराठीचे वैभव असल्याचे लेखकांनी आवर्जून मुलांना सांगितले आहे.

सध्या सर्वत्र बोलले जाते की घरीदारी माणसामाणसातला संवाद कमी झाला आहे. मुलेमुली तर सतत मोबाईलमध्ये तोंड खुपसून असतात. एकनाथ आव्हाड यांच्या या पुस्तकातील कथांमध्ये एका जिव्हाळ्याच्या कुटुंबाचे चित्र आले आहे. शमी–बाळू हे बहीण भाऊ आणि त्यांचे आईवडील काम आणि अभ्यास आटोपल्यावर एकमेकांशी गप्पा मारतात. कधी कधी शेजारी राहणारी माणसेही त्या गप्पांत सामील होतात. रविवारी वडील आणि मुले स्वयंपाकात आईला मदत करतात. पावसाच्या कविता आठवतात. वडील कवींविषयी माहिती देतात. टोपणनावाने लिहिणाऱ्या कुसुमाग्रज, बालकवी इत्यादींची मूळ नावे सांगतात. ते कुटुंब कधी टीव्ही पाहताना दिसत नाहीत, व्हॉटसअॅप- फेसबुकवर दिसत नाही. शाळेत काय काय होते ते मुले आईवडिलांना सांगतात. वडील मुलांना गोष्टी सांगतात. सुटीच्या दिवशी सर्व कुटुंब सई परांजपे यांचे मुलांसाठीचे नाटक बघण्यास जाते. घरकामामुळे आई आधी येण्यास तयार होत नाही. पण काम बाजूला सारून तिला आग्रहपूर्वक नेले जाते. ते कुटुंब आजचे वास्तव चित्र आहे असे म्हणता येत नाही. पण लेखकाने आदर्श कुटुंब कसे असावे याचे चित्र फार सहजपणे रेखाटले आहे. कथा कधी आई सांगते, कधी वडील सांगतात, कधी बाळू सांगतो. त्यामुळे वाचणाऱ्या मुलांना गंमत वाटते. फाल्गुन ग्राफिक्सने केलेले मुखपृष्ठ आणि आतील चित्रे यामुळे पुस्तकाचे दृश्यरूप आकर्षक झाले आहे.

पुस्तकात काही ठिकाणी शब्द चुकीचे आले आहेत. कॅरमच्या कवड्या आवरल्या, असे म्हटले आहे. कॅरमच्या सोंगट्या म्हटले जाते. शाळा आणि घर यांतील अंतर मोठंच होतं असं म्हणण्यापेक्षा जास्तच होतं हे म्हणणे रूढ आहे.  

या सोळा कथा शिक्षण-शाळा, श्रमजीवी माणसे, निसर्ग, मराठी भाषा यांविषयी मुलांच्या मनात जवळीक आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या आहेत.

(खळाळता अवखळ झरा आणि इतर कथाः एकनाथ आव्हाड, प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस, मूल्यः रू 195/-)

विनया खडपेकर 7028257366 vinayakhadpekar@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here