कवी यशवंत यांच्या ‘आई’ची शताब्दी (Hundred Years of a Poem titled Aai by Yashwant)

कवी यशवंत यांनी आई ही कविता 1922 साली लिहिली, त्यास शंभर वर्षे होत आली. या प्रदीर्घ काळात प्रत्यक्षातील आई पार बदलून गेली आहे, पण त्या कवितेची गोडी काही कमी झालेली नाही. आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी ही ओळ ऐकल्यावर डोळ्यांत पाणी न येणारा मराठी माणूस विरळा ! त्या कवितेचे कर्ते आहेत यशवंत दिनकर पेंढारकर. ते 9 मार्च 1899 रोजी चाफळ येथे जन्मले. त्यांचे शिक्षण सांगली येथे सिटी हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा जीवनप्रवास तसा खडतर होता, पण त्यांनी त्यांच्या अंतरीची कविता व्रतस्थ भावनेने जोपासली. ते कवितेला उपासनेचे स्थान देत. उत्कट आत्मपरता हा त्यांच्या कवितेचा स्थायिभाव होता.

[youtube https://www.youtube.com/watch?v=adJUTybDT60]

 

यशवंत यांच्या आई कवितेने वेगळे काय दिले?आई (माता) ही भारतीय संस्कृतीमध्ये पूज्य मानली आहे. मातृदेवो भव हेच भारतीयांचे सूत्रवाक्य वेदकालापासून आहे, पण यशवंत यांच्या कवितेत वर्णन केलेली आई ही दूरची, आदरणीय, देवतारूप अशी नाही, तर ती माणूसपणाच्या भावनेशी येऊन भिडते. ती मूल शाळेतून घरी आल्यावर पोटाशी घेणारी, उष्ट्या तोंडाचा पापा प्रेमाने घेणारी… अशी, घराघरात दिसणारी आई आहे. ते त्या कवितेचे वेगळेपण ठरले. तोपर्यंत आईची मांडणी ही पुराणकथांत मुख्यत:सख्खी, सावत्र अशा स्वरूपात झालेली होती. पुरुषाला आवडत्या-नावडत्या अशा बायका (पत्नी) असत आणि त्या व त्यांची मुले यांच्यामधील जिव्हाळा तुलनाभावाने मांडला जाई. त्यातून आईची देवतास्वरूपाच्या विरूद्ध अशी पुराणप्रतिमा तयार होत गेली. त्यामधून पुराचे पाणी लोटल्यावर बाळाला पायाखाली घेणाऱ्या कुमातेसारखी अतिशयोक्त चित्रेदेखील निर्माण झाली. यशवंत यांनी, आई-मुलाच्या मायेचे नाते निष्कलंक व्यावहारिक पातळीवर चितारले. त्यात मानवी दुष्टाव्याचा सुतराम संबंध नाही. तो सारा नियतीचा खेळ सूचित केला आहे. मात्र मायलेकरांचे प्रेम निखळ आहे. रविकिरण मंडळाचे माधव ज्यूलियन हेही त्याच काळातील कवी. त्यांचीही आईवर कविता आहे व ती तितकीच उत्कट आहे. माधव ज्यूलियन त्यांच्या आईवरील कवितेत म्हणतात, “नाही जगात झाली आबाळ या जिवाची | तूझी उणीव चित्ती आई तरीही जाची |

जाणवणारी ही उणीव कोणती, हे कवी यशवंत यांनी त्यांच्या कवितेत सांगितले आहे. आईचे घासातील घास काढून ठेवणे, पोटाशी धरणे, उष्ट्या तोंडाचा पापा घेणे हे नुसती खाण्यापिण्याची गरज भागण्याहून काही वेगळे आहे, जे त्या पोरक्या मुलाला मिळालेले नाही. मुलाची ती भावनिक गरज त्या कवितेत उत्कटतेने व्यक्त झाली आहे. वडील पैसा मिळवून आणतात, सगळ्या भौतिक गरजा पुरवतात. आईचे घरी स्वयंपाकपाणी करणे, जेवण्यास देणे यापलीकडे अमूर्त असे संस्कारशील अस्तित्व असते. ती संध्याकाळी देवापुढे दिवा लावते. मुलांना शुभंकरोती म्हणण्यास शिकवते तेव्हा घरात मांगल्य दरवळते. आई संस्कार देण्याचे, जीवनात शुभ विचार देण्याचे काम करते. ती गेल्यावर आयुष्यात जाणवणाऱ्या त्या मांगल्याची उणीव

तूझ्याविना न कोणी लावील सांजवाती

 

सांगेल ना म्हणाया आम्हा शुभंकरोती

 

या ओळींमधून नेमकेपणाने व्यक्त झाली आहे.

वात्सल्य ही मातेच्या ठिकाणी असलेली सहज नैसर्गिक भावना; अगदी प्राण्यांमध्येही दिसणारी. चिमणी पिल्लांच्या चोचीत चारा भरवते, गाय वासराला चाटते ही भावना जितकी सहज, नैसर्गिकपणे उद्भवते तितकीच त्या भावनेची भूकही सहज, नैसर्गिक असणार. पण ती साधी गरजही काही लेकरांच्या बाबतीत न भागणे हे केवढे दुर्दैव!!

चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई

 

गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई

 

वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही

 

पाहून अंतरात्मा व्याकूळ मात्र होई !!

या ओळी म्हणूनच व्याकूळ करतात. प्रसूतिदरम्यान व एकूणच आरोग्याची हेळसांड होत असल्याने मृत्यू पावणाऱ्या महिला ही त्या काळी सहज दिसणारी गोष्ट होती. त्यामुळेही ती कविता लोकांना खूप आवडून गेली.

ताईस या कशाची जाणीव काही नाही

 

त्या सान बालिकेला समजे न यात काही

किंवा

सांगे तसे मुलींना आम्हास आई नाही

एखाद्या निरागस मुलीला आई नाही म्हणजे काय? ती का नाही? हे कळणारही नाही, पण सगळ्यांकडून कानावर पडल्यामुळे तिनेही इतर मैत्रिणींना आम्हाला आई नाही म्हणून सांगावे हे कवितेत रंगवलेले चित्र करूण भाव निर्माण करते. मुलाचा जीव बाहेरच्या जगाने कौतुक कितीही केले तरी आईच्या कौतुकासाठी भुकेलेला राहवा; त्याला बाहेर मिळालेले हारतुरे नकोसे व्हावेत ही भावना कविता लिहिली त्या वयातील स्वतः कवी यशवंत यांची होती का? ते त्या ओळींपुरते लहान मुलाच्या पोरकेपणाच्या भूमिकेपासून दूर जाऊन प्रौढ माणसाच्या पोरकेपणाच्या भावनेत शिरले असे वाटते. पण नंतर मात्र आईला तू लवकर परत ये म्हणताना — भले रागावायला ये, पण ये! असा केलेला हट्ट कवितेतील दु:ख पुन्हा गडद करतो.

कवी यशवंत यांच्या सामाजिक आशयाच्या कविताही प्रभावी आहेत. त्यांना पुण्यात आल्यावर अनेक नामवंत कवी-कवयित्रींचा सहवास मिळाला. त्यांच्या पुढाकाराने रविकिरण मंडळाची स्थापना झाली. सात कवी आणि एक कवयित्री यांचे ते मंडळ होते. त्या मंडळाने महाराष्ट्राला आधुनिक कविता ऐकण्याची गोडी लावली.

काळ बदलला तशी आई बदलली. कवितेत वर्णन केलेली आई आता दिसणार नाही कदाचित.

आई तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचे

 

माहेर मंगलाचे, अद्वैत तापसांचे”

ही भावना मुलांचीही नसेल. आई लौकिक दृष्ट्या त्याहून अधिक मुलांच्या जवळ आली आहे. आई त्यांची मैत्रीण आहे, शिक्षिका आहे. आईचे घराबाहेर एक व्यक्तिमत्त्व आहे. आईमध्ये थोडे बाबापण मिसळलेत, किंबहुना स्त्रीमुक्तीचा विचार सर्वत्र सहज स्वीकृत होण्यात ती अडचण असेल का? सध्याची आई लेकाला म्हणते, तू मला जेव्हा हरवशील तेव्हाच मी जिंकेन ! सहसा कोणतेही पालक पाल्याला स्पर्धाभाव शिकवणार नाहीत. तथापी, शक्तिवर्धक पेयाच्या जाहिरातीत आई मुलाला स्पर्धा हे जीवनमूल्य शिकवते. लोकांनी ते स्वीकारले आहे. पण म्हणून, आईपण कमी झालेले नाही. म्हणूनच, या कवितेतील वातावरण, त्यातील आई नसली तरी मूल हे जोपर्यंत आईचे क्रिएशनआहे, आईमुलाचे ते नाते जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत ही कविता संवेदनशील वाचकाच्या डोळ्यांत पाणी आणतच राहील- श्रोत्यांच्या तर अधिकच !

माध्यमाचा मुद्दाही आई ही कविता टिकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला हे येथे नमूद केले पाहिजे. ती कविता गेय आहे. ती मंडळाच्या कार्यक्रमांतून सादर होई. भावगीत गायनाचे कार्यक्रम 1930 नंतर सर्वत्र फोफावले. त्यामध्ये विविध गायकांनी त्या कवितेचे करूणार्त सूर आळवले. आचार्य अत्रे यांनी पुढे 1950 च्या दशकात ती रचना श्यामची आईया चित्रपटात घेतली. लता मंगेशकर यांनी ती भावनाशीलतेच्या सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवली आणि यशवंतांची आईमराठी साहित्यसंस्कृतीचा ठेवा होऊन गेली. शंभर वर्षांनंतर आई कवितेत जाणवते तितकी संवेदनशीलता समाजाला मानवणारी नाही. परंतु आईची कुटुंबातील ती अपूर्व गरज जोपर्यंत भागत नाही अथवा संवेदनशीलता नष्ट होण्याच्या ओघात ती गरजच (सख्खे-सावत्र) नष्ट होत नाही, तोपर्यंत आई ही कविता अमर असणार आहे.

 

राजलक्ष्मी देशपांडे  98509 31417 deshpanderajlaxmi@gmal.com

राजलक्ष्मी देशपांडे यांनी एम ए (अर्थशास्त्र) पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या वयाच्या आठव्या वर्षापासून काव्यलेखन करतात. त्यांची काव्यसंग्रह-कथासंग्रह-ललित लेखसंग्रह, सामाजिक व चरित्रात्मक कादंबरी, मूल्यशिक्षण, शैक्षणिक उपक्रम या विषयांवरील दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी या संस्थेत संशोधन सहाय्यक या पदावर काम करत असताना स्वामी दयानंद सरस्वती आणि भगिनी निवेदिता यांचे चरित्र लिहिले आहे.

——————————————————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. आकाशाचा केला कागद,सागराची केली शाई ,पण,आईची महती लिहीता येत नाही.जगात सर्वत्र देवाला पोहोचता येत नाही, म्हणून आईची निर्मिती झाली आहे.स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी.परिणामी ” आई ” हे अक्षर ब्रम्हवाक्य झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here