आदिवासी भागातील प्रयोगशील शाळा

-adivasi-prayogshilshala-ajara

मी शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील गिरगाव केंद्राच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेतील वर्ग फिरलो आणि शिक्षकांच्या भेटी घेतल्या. वर्ग फिरत असताना, काही गोष्टी नजरेस पडत होत्या. एका वर्गात गेलो, तर तिकडे मंत्रिमंडळाचा एक तक्ता तयार केला होता. त्या तक्त्याकडे पाहिले आणि एक छान गंमत दिसली – मुख्यमंत्री, शिस्तमंत्री, सांस्कृतिकमंत्री, क्रीडामंत्री या पदांपुढे नावे वेगळीच दिसत होती. 

त्याविषयीची संपूर्ण माहिती शाळेचे मुख्याध्यापक वाघातसर आणि धोडीसर यांच्याकडून घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले, की त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाली, की निवडणूक होते. विद्यार्थी स्वेच्छेने निवडणूक लढवण्यासाठी उभे राहतात. विद्यार्थी उमेदवार “मला जर निवडून दिले तर मी शिस्तबद्धपणे आणि व्यवस्थितपणे काम करेन. कोठल्याही पद्धतीचा त्रास देणार नाही.” अशा प्रकारचा प्रचार निवडणुकीला उभा असलेला करत असतो.

मतदाराने निवडणुकीत चिठ्ठीत उमेदवाराचे नाव लिहून ती चिठ्ठी बॉक्समध्ये टाकायची असते. मतमोजणी सर्व विद्यार्थ्यांसमोर होते. ज्याला जास्त मते तो मुख्यमंत्री; त्याच्यापेक्षा कमी असणारा उपमुख्यमंत्री असे टप्पे करत शिस्तमंत्री, क्रीडामंत्री, आरोग्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि स्वच्छतामंत्री असे मंत्रिमंडळ तयार होते. मंत्र्यांचा शपथविधी सोहळा वर्गातच नियमानुसार पार पडतो.

नंतर जे मतदार आहेत, त्यांचे गट पाडले जातात आणि ठरलेल्या दिवशी ठरलेल्या गटाने ठरलेले काम करायचे अशी पद्धत आहे. उदाहरणार्थ, एके दिवशी एका गटाला स्वच्छता सांगितली असेल तर दुसऱ्या गटाने पाणी आणायचे. दुसऱ्या दिवशी आणखी वेगळे गट ती कामे करतील. असे मतदार विद्यार्थ्यांच्या कामाचे स्वरूप असते. म्हणजे ते एकदा मत देऊन मोकळे होत नाहीत. त्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी सतत काम करणे अपेक्षित आहे. देशाच्या व राज्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांवर असे बंधन घातले तर! आता ज्या मंत्र्यांना जी पदे मिळाली आहेत त्यानुसार त्यांना कामे करावी लागतात. नेमून दिलेल्या गटाने शाळेच्या आवारातील परिसर, वर्ग स्वच्छ केला आहे का? त्याची पाहणी स्वच्छतामंत्र्याने करायची. जर स्वच्छ नसेल तर तो मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतो. मुख्यमंत्री त्या दिवशी काम न करणाऱ्या गटाला एकदा सूचना देतात. त्यांनी सूचना देऊन देखील कामास टाळाटाळ केली तर ती तक्रार वर्गशिक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्यापर्यंत जाते, पण अशी घटना फार क्वचित घडते.-logo-shikshakvyaspith

पाणीपुरवठामंत्र्याने पाण्याची व्यवस्था पाहवी. तसेच अभ्यासमंत्री आणि क्रीडामंत्री यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामे पाहवी असे अपेक्षित असते. सांस्कृतिकमंत्र्याकडे शाळेत होणाऱ्या नृत्य, परिपाठ, सांस्कृतिक कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी या कार्यक्रमांची जबाबदारी असते. प्रत्येक मंत्र्याने सगळ्या ‘अपडेट्स’ मुख्यमंत्र्यांना देणे महत्त्वाचे असते. मुख्यमंत्र्यांनी मूळच्या समस्या उदाहरणार्थ, उपस्थिती, शैक्षणिकदृष्ट्या परिस्थिती, आजारपण यांविषयी शिक्षकांना माहिती देत राहणे अभिप्रेत असते. जसे हे संपूर्ण शाळेचे मंत्रिमंडळ आहे तसेच ते प्रत्येक वर्गाचे आहे. तिकडे फक्त मॉनिटर आणि उपमॉनिटर असतो. बाकी ठरावीक विद्यार्थी अभ्यासमंत्री आणि आरोग्यमंत्री असतात. कोणाचा अभ्यास झाला नसेल तर त्याने ते शिक्षकांना कळवणे… हे अशा प्रकारचे कार्य प्रत्येक वर्गात सुरू असते. तशा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागते. विद्यार्थ्यांना राज्यातील मंत्रिमंडळ निवड पद्धत, त्यांचा शपथविधी सोहळा आणि त्यांची कामे या सगळ्या गोष्टींची माहिती होते.

-mantrimandal-ajara-talasari

मंत्रिमंडळ उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेश वाघात यांच्या संकल्पनेने 2015 पासून सुरू आहे. शाळेत दहावीचे वर्ग (2019) यावर्षी सुरू करण्यात आले आणि मागील वर्षीपासून (2018) नववी सुरू करण्यात आली. शाळेचा एकूण पट साडेचारशेच्या जवळपास आहे. 

शाळेतील शिक्षक धोडीसर सांगतात, की “आमच्या इकडे कंपन्या खूप आहेत. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी सातवी-आठवी झाली, की कामाला जातात. पण या शाळेतील मुख्याध्यापकांनी अक्षरशः घरी जाऊन, मुलांना घरून आणून शाळेत बसवले.” वाघातसरांचे म्हणणे आहे, की “त्या मुला-मुलींनी निदान दहावीपर्यंत तरी शिक्षण घ्यावे. मग पुढील वाट त्यांना आपोआप दिसेलच”.

शाळा विद्यार्थ्यांसाठी बचत बँक म्हणून एक उपक्रम राबवत आहेत. त्या उपक्रमात विद्यार्थी त्यांच्या वर्गशिक्षकांकडे एक रुपयापासून ते पाच-दहा रुपये जमा करतात. त्यासाठी नोंदवही बनवलेली आहे. जमा झालेले पैसे विद्यार्थी एक-दोन दिवसांनी बँकेत जमा करण्यास जातात. विद्यार्थ्यांना वही, पेन व इतर साहित्य खरेदीसाठी, शाळेची सहल, वनभोजन यांसाठी पैशाची गरज पडली, तर ते त्यांच्या बचत खात्यातून पैसे काढतात. शाळेत दर शनिवारी आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित, सामान्यज्ञान, विज्ञान, इतिहास अशा विविध विषयांवर प्रश्नमंजुषा स्पर्धा होते. विद्यार्थीही त्या स्पर्धेची उत्तम पद्धतीने तयारी करत असतात. शाळेत वाचनालयसुद्धा आहे. दर शनिवारी एक पुस्तक विद्यार्थ्याने घरी घेऊन जायचे आणि त्याचे वाचन करायचे. हीसुद्धा सवय शाळेतच लावली जाते.

पुण्यातील ‘कावेरी इन्स्टिट्यूट’कडून शाळेच्या वाचनालयासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.शाळेत संगणक कक्ष आहे. तेथे ‘एल अँड टी’ कंपनीअंतर्गत ‘प्रथम’ संस्थेच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. शाळेच्या जवळच एक वाडी (जागा) आहे. ती वाडी पुण्यातील अमोद जोशी यांची आहे. अमोद जोशी यांचा पुण्यात स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांची जमीन तेथे असल्यामुळे ते महिन्यातून एकदा तरी, शाळेला भेट देत असतात. विद्यार्थ्यांसाठी काही खाऊही आणत असतात. उन्हाळी सुट्टीत ते विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिकवणीचे वर्ग घेत असतात. त्या उपक्रमात जवळपास शंभर ते दीडशे विद्यार्थी सहभागी होत असतात. त्याच उपक्रमाला जोडून ‘फोनेटिक्स इंग्लिश प्रोग्रॅम’ राबवला जातो. त्या प्रोग्रॅमअंतर्गत दरवर्षी शंभर ते दीडशे विद्यार्थी सहभागी होत असतात. त्या संभाषणात मुलांच्या बेसिक इंग्रजी वाचनाचा सराव घेतला जातो. काही व्हॉलेंटीयर विद्यार्थ्यांचा फोन नंबर घेतात आणि त्यांना फोन करतात. फोनवर अगदी बेसिक इंग्रजीतच संभाषण होते. ते व्हॉलेंटीयर परराज्य -virsavarkar-vrukshropan-ajaraschool-talasariआणि परदेशातील देखील असतात. ते सगळे जुळवून आणण्याचे काम अमोद जोशी करत असतात. जोशी त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने शाळेला सर्वतोपरी मदत करत असतात. 

मागील वर्षी जोशी यांचे अमेरिकन मित्र निक त्यांच्या जागेवर आले होते. त्यांनी शाळेला भेट दिली आणि शाळेतील मुलांशी संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी अमेरिकन गृहस्थ निक यांच्याशी इंग्रजीत संवाद साधला. आताच्या घडीला त्या शाळेतील विद्यार्थी थोड्या प्रमाणात का होईना पण इंग्रजी बोलायला लागले आहेत. शाळेत बालआनंद मेळावा, परिसर भेट, क्षेत्र भेट, वनभोजन सहली यांसारखे उपक्रमही राबवतात. जिल्हा परिषद सारख्या मराठी शाळेत असे बदल घडण्यास लागले आहेत. त्यामुळे त्या भागातही दरवर्षी पटसंख्या वाढताना दिसत आहे. 

मुख्याध्यापक – राजेश वाघात 8830816389
rajeshvaghat811@gmail.com
जिल्हा परिषद शाळा, आरजपाडा.

– शैलेश दिनकर पाटील 9673573148
patilshailesh1992@gmail.com

About Post Author