अहमदनगरचा ऐतिहासिक फराहबक्ष महाल

6
492

बहामनी राजवटीत पंधराव्या शतकाच्या शेवटी फूट पडली. त्या राजवटीची हुकुमत दक्षिणेत होती. राजवटीच्या चौघा सरदारांपैकी एक मलिक अहमद बहिरी (अहमद निजामशहा) याने स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालवले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. ते तुंबळ युद्ध नगरजवळील भिंगार येथे झाले. त्यात जहांगीर खानचा पराभव झाला. त्या आनंदाप्रीत्यर्थ मलिक अहमदने भिंगारजवळ एक किल्ला आणि शहर वसवावे असे ठरवले. त्याप्रमाणे मलिक अहमदने शहर आणि शहरातील वास्तू उभारण्यास 28 मे 1490 या दिवशी सुरुवात केली. अहमदनगर शहरातील तशा वास्तूंपैकी एक आहे फराहबक्ष महाल. त्याला नगरी भाषेत फऱ्याबाग किंवा फराहबाग म्हणून ओळखतात. ती नगरमधील सर्वांत मोठी ऐतिहासिक वास्तू आहे. ती वास्तू नगर-सोलापूर रस्त्यावर आहे. अप्रतिम सौंदर्य आणि उत्तम परिसर यावरून वास्तूचे नाव फराहबक्ष म्हणजे ‘सुख देणारा महाल’ असे ठेवण्यात आले. ती वास्तू निजामशाहीतील वैभवशाली दिवसांची साक्ष आहे.

अहमदनगरच्या निजामशाहीतील राजा मुर्तझा निजामशाह याने त्या महालाचे बांधकाम 1576 ते 1583 या काळात करवून घेतले. महालाची निर्मिती चंगेज खान याने सुरू केली आणि बुऱ्हाण निजामशहा पहिला यांच्या देखरेखीखाली नियामत खान याने महालाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर निजामशहा पहिला याला ते न आवडल्यामुळे त्याने ते पाडून टाकून त्या महालाचे पुनर्निर्माण करण्याचा आदेश दिला. त्यानंतर निजामशहाने ते काम सलाबतखान पहिला याला दिले. काम चालू असतानाच सलाबतखानाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर ते काम त्याचा पुतण्या दुसरा सलाबतखान याने पूर्ण केले आहे.

फराहबक्ष महालाची इमारत अष्टकोनी आहे. त्या इमारतीचा आकार मुळात चौकोनी असला तरी कोपरे काटकोनात न मिळवता सपाट भिंतींनी मिळवल्यामुळे ती अष्टकोनी आकारात तयार झाली आहे. बाहेरील चबुतऱ्यासह तो संपूर्ण महाल 45.72 मीटर x 45.18 मीटर असून, ते बांधकाम दगड-चुन्यात करण्यात आलेले आहे. महालाच्या वरील मजल्याचे छत सपाट आहे. महालाच्या मध्यभागी असणाऱ्या कक्षाची उंची तीस फूट आहे. महालाच्या आतील व बाहेरील भागात चुन्याचा गिलावा करण्यात आला आहे. भर उन्हाळ्यातही महाल थंड राहवा यासाठी छतात पोकळी ठेवून त्यातून हवा खेळेल अशी रचना तेव्हाच्या वास्तुविशारदांनी केली आहे. महालाच्या चारही बाजूंना कृत्रिम तलावाची निर्मिती केली गेली होती. तो तलाव कोरडा पडलेला आहे. महाल तलावाच्या मध्यभागी असल्याने पाण्यावरून वाहत येणारा शीतल वारा महालातील वातावरण आल्हाददायक बनवत असे. वातावरणात आणखी रंग भरण्यासाठी महालाच्या बाहेर, चारही बाजूंना; तसेच, आत प्रवेश करताना व मध्यभागी कारंजी तयार करण्यात आली होती. त्या तलावाला व महालातील कारंज्यांना पाणीपुरवठा हत्ती बारवेतून खापरी नळाच्या सहाय्याने केला जात असे. तलावातून नव्वद मीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला होता. महालाच्या मध्यभागी उंच छत असणारा विशाल कक्ष आहे. त्या कक्षाच्या मध्यभागी मोठे कारंजे आहे. त्याच्या चारही बाजूंना चार चौरस व चार आयताकृती खोल्यांची रचना आहे. मध्यभागी असणाऱ्या कक्षासमोर तलावाच्या बाजूने उघडणाऱ्या चार उंच कमानी बांधण्यात आल्या होत्या. त्यांपैकी दोन शिल्लक आहेत. महालाच्या संरक्षक भिंतीबाहेर एका ठिकाणी कारंज्याचे बांधकाम दिसते. त्याच्या मध्यभागी पुष्करणी असावी. त्या उद्यानात गारगोट्यांचे अनेक प्रकारही त्या काळी ठेवण्यात आले असावेत असा संशोधकांचा अंदाज आहे.

वास्तू चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी चौथर्‍यावर बांधलेली आहे. ती उत्तम वायुविजन व प्रकाश व्यवस्था यासाठी प्रसिद्ध आहे. वास्तू नृत्य, गाणी व जलसे अशा कार्यक्रमांसाठी वापरली जात असे. वास्तूची रचना ध्वनि सर्वत्र व्यवस्थित ऐकू जाईल आणि दिवाणखान्यातील कार्यक्रम सर्वांना दिसू शकेल अशी करण्यात आली आहे. मध्याभागी कोठेही खांब नाही.

महालाभोवती सुंदर उद्यान होते. आमराई होती. सध्या तेथे बाभळींचे जंगल आहे. निजामशाहीतील जलमहाल आणि गार्डन पॅव्हेलियन म्हणून तो ओळखला जात असे. नगरसारख्या कोरड्या व उष्ण हवामान असलेल्या शहरात उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा मिळावा, पाहुण्यांसमवेत चार घटका मनोरंजन व्हावे, जलविहाराचा आनंद घेता यावा, यासाठी फराहबक्ष महाल बांधण्यात आला.

भारत सरकारने फराहबक्ष महालाला 4 मार्च 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

याच महालाच्या आराखड्यावर ताजमहाल बांधला गेल्याचे सांगण्यात येते. वास्तू मोडकळीस आली आहे. भिंतींवर नावे आणि इतर मजकूर लिहून त्या विद्रूप करण्यात आल्या आहेत. पुरातत्त्व विभागाने पडझड रोखण्यासाठी वास्तूला टेकू दिला आहे. त्याचा आधार मिळाला असला तरी त्यामुळे वास्तूची शोभा मात्र गेली आहे. पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या औरंगाबाद परिमंडलाकडून महालाच्या डागडुजीचे काम चालू आहे.

नगर येथील इतिहास अभ्यासक भूषण देशमुख म्हणाले, की अहमदनगरचा डंका केवळ भारतात नाही, तर जगभरात वाजत होता. तेथे जलमहाल होते, कारंजी आणि हमामखाने असलेली मोठी उद्याने होती. किल्ल्याबरोबर सगळ्या शहराला पाणी पुरवण्याची उत्तम व्यवस्था होती. पाणी वाहून नेणाऱ्या भूमिगत पाणी योजना तेव्हा अहमदनगर परिसरात अस्तित्वात होत्या. तशा त्या जगातील मोजक्या देशांत होत्या. त्या ‘कनात’ किंवा ‘करेझ’ या नावाने ओळखल्या जात. खापरी नळ योजना, जलमहाल आणि कारंजी हे एकेकाळी नगरचे वैभव होते. ते जलवैभव काळाच्या ओघात लोप पावले. मात्र त्याच्या खाणाखुणा कोठेतरी दिसतात, अजूनही कोठेतरी फुटलेल्या खापरी नळातून पाण्याचा झरा वाहत असतो! फराहबक्ष महालाच्या वास्तूत अजूनही कार्यक्रम होतात.

–  संतोष दहिवळ 9822012435 srdahiwal@gmail.com
————————————————————————————————–

About Post Author

6 COMMENTS

    • खूपच छान माहिती मिळाली . लेख अतिशय सुंदर आहे .

  1. अहमदनगरमधील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळाची सुंदर माहिती. निश्चितच ज्ञानात मोलाची भर पडली आहे.👌👍

  2. Savedi Upnagar madhe… Bahiste Bag ahe… Tya baddal thode lekh liha… Ani tithe dagduji karun live program karun jivant kara… Nagar madhe ha upkram prathamach asu shakto.. Sarkarla nivedan ahe

  3. वाचताना इतिहासात गेल्यासारखे वाटले, सर्व डोळ्यासमोर घडतंय अस वाटत होत.👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here