अस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले, की भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष; तर त्याचे केस लांब व दाट असतात म्हणून दीर्घकेश अशीही नावे आहेत.
अस्वल हा गलिच्छ, ओंगळवाणा आणि क्रूर प्राणी आहे. तो सस्तन प्राणी जगाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतो.
अस्वलाला लॅटिनमध्ये उर्सुस म्हणतात. संस्कृत ऋक्ष शब्दाशी लॅटिन उर्सुस शब्दाचे साम्य आढळते. कारण दोन्हींचा अर्थ उत्तरेकडील असा आहे. अस्वल हा उत्तर गोलार्धातील उत्तरतम प्रांतातील प्राणी असून नंतर तो दक्षिणेच्या उष्ण कटिबंधापर्यंत पोचला. शरीरावरील दाट केसांमुळे मुळात तो थंड प्रदेशात राहण्याच्याच लायकीचा, तरीही त्याने उष्ण कटिबंधातील वातावरणाशी जुळवून घेतले हे विशेष.
ऋक्ष आणि उर्सुस यांच्यात आणखी एक साम्य आढळते. ऋक्ष म्हणजे सप्तर्षी नक्षत्र असाही अर्थ आहे. सप्तर्षी नक्षत्राला पाश्चात्यांत ‘दि ग्रेट बिअर’ किंवा ‘उर्सा मेजर’ असे म्हणतात. दोन्हींचाही अर्थ मोठे अस्वल असाच आहे.
ऋक्ष शब्दाचे ध्वन्यात्मक रूपांतर होऊन अच्छ शब्द अस्तित्वात आला. भल्ल हा शब्दसुद्धा नंतरचा. अच्छभल्ल हा सामासिक शब्द अस्वलवाचक आहे. तो पाली व अर्धमागधी वाङ्मयात आढळतो. अच्छभल्लचे मराठी रूप म्हणजे अस्वल.
आपल्याकडे आढळणारे अस्वल काळ्या लांब केसाचे, छातीवर घोड्याच्या नाल्याच्या आकाराचा पांढरा पट्टा असणारे असते. त्याला इंग्रजीत ‘स्लोथ बिअर’ किंवा ‘आळशी अस्वल’ असे म्हणतात.
पूर्वी, दरवेशी लोक खेडेगावात अस्वल पाळत. त्याच्या नाकात वेसण घालून त्याला नाचण्यास शिकवत. त्याचे खेळ गावा-गावांतून करत. ‘अस्वलीचा कान दरवेशाच्या हातात’ ही म्हण रूढ झाली. म्हणजे एखादा बलवान गुंडसुद्धा दुसऱ्याच्या ताब्यात असतो.
अस्वलाच्या केसामुळे लहान मुलांचे आजार बरे होतात, त्यांना बाहेरची बाधा होत नाही असाही समज प्रचलित आहे. त्यामुळे खेडेगावातील बायाबापड्या अस्वलाचा केस ताईतात ठेवून ताईत पोरांच्या गळ्यात बांधतात. त्यावरून ‘रीछ का एक बाल भी बहुत है |’ अशी म्हण हिंदी भाषेत आहे.
कायद्याने अस्वलाचे खेळ करण्यास, त्याला पाळण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे अस्वल शहरातील लोकांना फक्त प्राणी संग्रहालयात पाहण्यास मिळते.
अस्वलावरून अस्वली प्रेम, अस्वली गुदगुल्या, अस्वलाला गोंदणे असे वाक्प्रचार मराठीत वापरले जातात.
सज्जनगडाचे प्राचीन नाव आश्वलायन गड असून त्याचाच अपभ्रंश म्हणून किंवा तेथे पूर्वी अस्वलांची वस्ती मोठ्या प्रमाणात होती म्हणून तो अस्वलगड म्हणून ओळखला जात असे.
विदुषी दुर्गा भागवत यांनी भारतातील वेगवेगळ्या प्राण्यांविषयीची माहिती मराठीत उपलब्ध व्हावी यासाठी प्राणी गाथा लिहिण्याचा संकल्प केला होता. त्यातील पहिला ग्रंथ अस्वल या नावाने प्रसिद्ध झाला. मराठी भाषेच्या दुर्दैवाने तो प्राणिगाथेचा पहिला आणि शेवटचा प्रयोग ठरला.
– उमेश करंबेळकर
(‘राजहंस ग्रंथवेध’ डिसेंबर २०१६ वरून उद्धृत)
Dangerous Animal
Dangerous Animal
Comments are closed.