‘रामगड’ हा किल्ला दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर आहे. तो खेडपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. तो साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस आहे. तो किल्ला ‘रामदुर्ग’ या नावानेही ओळखला जातो. तो समुद्रसपाटीपासून साधारण चारशेआठ मीटर (एक हजार तीनशेएकोणचाळीस फूट) उंचीवर आहे. किल्ला अदमासे एक एकर जागेवर उभा आहे. तो पालगडचा जोडकिल्ला मानला जातो. त्यामुळे तो अज्ञात व म्हणून अप्रसिद्ध होता. त्या किल्ल्याची स्थाननिश्चिती कागदपत्रांच्या आधारे प्रस्तुत लेखकाने केली आहे.
किल्ल्याला दोन प्रवेशद्वारे आहेत, किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस आहे, तर दुसरे उत्तर दिशेस आहे. दोन्ही दरवाज्यांना संरक्षक बुरुज आहेत. किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. उत्तरेच्या दरवाज्याखाली पालगड बाजूने येणाऱ्या काही पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीत सात बुरूज आहेत. किल्ल्यावरील अवशेषांत काही इमारतींची जोती, थडगी यांसारखे अवशेष दिसून येतात. किल्ल्याच्या आतील बाजूस आणि उत्तर बाजूस मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढलेली आहेत. किल्ल्याच्या आतील भागातील साफसफाई केल्यास, अनेक अवशेष उघडकीस येऊ शकतील. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीखाली खंदक आहेत. तेथून पुढे जाणाऱ्या डोंगरधारेवर चौकीचे अवशेष नजरेस पडतात. किल्ल्यावर पाण्याची मात्र कोणतीही व्यवस्था नाही, पालगडाच्या पोटात दोन खांबटाकी व खडकात कोरलेली तीन टाकी आहेत. त्यांतील एक खांबटाके वगळता बाकी टाकी गाळ आणि दगड-धोंडे यांनी भरून गेलेली आहेत.
रामगड (रामदुर्ग) हा किल्ला नक्की कोणी बांधला याविषयी माहिती मिळत नाही. तो किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात 1728 मध्ये होता. त्यावरून किल्ल्याचे अस्तित्व 1728 च्या आधीपासून असावे. पुढे, तो जंजिरेकर सिद्दी याच्या ताब्यात गेला. सिद्दीवरील कोकण मोहिमेत परिसरातील रसाळगडाबरोबर रामगडदेखील पेशव्यांच्या ताब्यात आला.
इंग्रजांनी किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यास 4 मार्च 1818 रोजी पहाटेच्या वेळी सुरुवात केली. धोंडो विश्वनाथ यांनी निळोपंत पुरंदरे यांना पत्र पाठवले की किल्ल्यावर आग लागलेली दूरवरून दिसत आहे ! ते पत्र अर्थातच पेशव्यांना लिहिलेले आहे.
– संदीप परांजपे 9011020485 sparanjape0665@gmail.com
———————————————————————————————-