कोकण किनाऱ्यावरील कासवे – वाळूवरल्या खुणा (Turtles on the Konkan Coast – Marks on the Sand)

9
339

परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक असे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात. जमिनीवरची झाडे आणि प्राणी जितके महत्त्वाचे, तितकेच पाण्याखालील वनस्पती आणि प्राणी यांचेही महत्त्व आहे. ती सृष्टी टिकवणे, त्यांतील घटकांचे संरक्षण करणे हे नैतिक कर्तव्य आहे. अशा घटकांना महत्त्व देणारे लोक दुर्लभ. मात्र, काही लोक आत्मीयतेने भवतालातील तशा घटकांचा सांभाळ करतात, त्यांची काळजी घेतात.

समुद्रात असलेल्या कासवांच्या सात प्रजातींपैकी ऑलिव्ह रिडले नावाच्या कासवांचे संवर्धन करणारे कोकणातील वेळास नावाचे छोटे गाव. अनपेक्षितपणे दिसलेल्या कासवांच्या अंड्यांच्या टरफलांपासून त्यांचा सखोल अभ्यास करणाऱ्या मोहन उपाध्ये यांच्या अद्भुत प्रवासाबद्दल विराज सवाई यांनी संवेदनशीलतेने लिहिलेला लेख. त्यांनी नोंदलेल्या विरोधाभासाकडे लक्ष वेधावेसे वाटते. ‘कासव’ किंवा ‘कूर्म’ हा विष्णूचा एक अवतार आहे, अशी भारतीय श्रद्धा आहे. पण त्यांनाच ती जमिनीवर असेपर्यंत ‘रानडुकरे’ किंवा ‘वराह’ (विष्णूचा दुसरा एक अवतार) आणि समुद्रात गेल्यावर मोठे ‘मासे’ किंवा ‘मत्स्य’ (विष्णूचा आणखी एक अवतार) कासवाच्या त्या पिल्लांना गट्टम् करतात ! निसर्गानेच त्यांना निसर्गाचा तोल राखण्यासाठी एकमेकांना खाऊन टाकण्याची मुभा दिली आहे ! ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.

अपर्णा महाजन

————————————————————————————————-

कोकण किनाऱ्यावरील कासवे – वाळूवरल्या खुणा

वेळास… तिन्ही बाजूंनी टेकड्या आणि चौथ्या बाजूला समुद्राचा शेजार. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील, सुमारे एक हजार लोकसंख्येचे गाव. ते गेल्या काही वर्षांपासून जगाच्या नकाशावर उठून दिसू लागले, ते तेथील ‘कासव महोत्सवा’मुळे. ‘ऑलिव्ह रिडले’ (Olive Ridley) प्रजातीच्या कासवांच्या संवर्धनासाठी ‘कासवांचे गाव’ अशी ओळख वेळासला 2002 सालापासून मिळाली आहे.

तेथील कासवांचा शोध अचानकच लागला. चिपळूणच्या ‘सह्याद्री निसर्गमित्र’ या संस्थेचे संस्थापक भाऊ काटदरे आणि त्यांचे सहकारी वेळासला गरुडांचा अभ्यास करण्यासाठी दोन दशकांपूर्वी आले होते. त्यांना किनाऱ्यावर अंड्यांची टरफले दिसली. ती टरफले कसली? अशी विचारणा त्यांनी गावात करूनही कोणाकडून काही माहिती त्यांना मिळाली नाही. मात्र वेळासचे एक रहिवासी गोपीनाथ महाडिक यांनी भाऊंना ती कासवांच्या अंड्यांची टरफले असल्याचे सागितले. तसेच, ‘दरवर्षी वेळासच्या किनाऱ्यावर मादी कासवे अंडी देण्यासाठी येतात. आम्ही त्यांची अंडी चोरून घरी घेऊन जातो. स्वतः खातो, आमच्या बैलांना खाऊ घालतो आणि उरलेली विकून टाकतो’ असेही त्यांनी सांगितले. तेव्हा भाऊ काटदरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कासवांचा अभ्यास सुरू केला.

कासवे ज्या ज्या किनाऱ्यांवर प्रजननासाठी येत असत, त्या त्या गावांमध्ये ग्रामसभा घेऊन त्या कासवांविषयीची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. बऱ्याचशा ग्रामस्थांना त्या अंड्यांमधून पिल्लेही बाहेर येतात, हे माहीतच नव्हते ! उलट, समुद्रात राहणारी मादी कासवे जमिनीवर येऊन माणसांसाठीच अंडी घालून जातात अशी काहीशी विचित्र धारणा तेथील लोकांमध्ये होती. त्याचा परिणाम म्हणून समुद्रातील कासवांची संख्या झपाट्याने कमी झाली. म्हणूनच, संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रजातीच्या कासवांचे निसर्गातील स्थान काय आहे? त्यांचे महत्त्व काय आहे? आणि आपण त्यांना का वाचवण्यास पाहिजे? याबद्दलची जाणीव ग्रामस्थांना करून दिली. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची एक फळी हळुहळू त्यातून तयार होत गेली. जे लोक वर्षांनुवर्षे कासवांची अंडी चोरून खात, तेच लोक अंड्यांचे संरक्षण करू लागले ! ‘सह्याद्री निसर्गमित्र’ ही संस्था, समुद्री कासवांच्या संवर्धनाचे काम तेव्हापासून गेली एकवीस वर्षे करत आहे. मोहन उपाध्ये आणि त्यांचे सहकारी हे संस्थेचे कार्यकर्ते आहेत.

उपाध्ये मुंबईत जन्मले आणि मोठे झाले. त्यांना प्राणी-पक्ष्यांची आवड होती. त्यांचे नाव अनेक जणांनी भाऊ काटदरे यांना त्यांच्या अभ्यास कार्यासाठी सुचवले. तेव्हा भाऊ काटदरे स्वतः उपाध्ये यांचा पत्ता शोधत वेळासला त्यांच्या वडिलोपार्जित घरी दाखल झाले. त्यांनी ‘समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी आमच्या संस्थेसोबत काम कराल का?’ अशी विचारणा उपाध्ये यांना केली. मोहन उपाध्ये यांना समुद्रातही कासव असते ही नवीनच माहिती मिळाली. त्यांची उत्सुकता चाळवली गेली आणि तत्क्षणी त्यांनी भाऊंना होकार दिला. जगभरात आढळणाऱ्या समुद्री कासवांच्या सात प्रजातींपैकी ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे आकाराने लहान, म्हणजे सुमारे तीन ते चार फूटांची असतात. ती कोकणातील काही विशिष्ट किनाऱ्यांवर घरटी करतात. ती घरटी कोणाला दिसणार नाहीत अशा बेताने वाळूत खड्डा खणून केली जातात. सुरुवातीला, घरटी रायगड जिल्ह्यातील चार, रत्नागिरी जिल्ह्यातील तेरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौदा किनाऱ्यांवर आढळली होती.

ऑलिव्ह रिडले कासवे नोंद करण्याच्या दृष्टीने Schedule one species मध्ये येतात. त्यांचे आयुर्मान साधारण साठ ते ऐंशी वर्षांचे असते. मादी कासवे पंधरा ते वीस वर्षांची झाल्यावर प्रजोत्पादनासाठी सक्षम होतात. एका वर्षी (15 मार्च 2023 पर्यंत) एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या साडेतीनशेहून अधिक घरट्यांची नोंद झाली. ती संख्या संवर्धनाच्या कामामुळे वर्षागणिक वाढताना दिसत आहे. ती सकारात्मक बाब आहे. संस्थेला वन विभागाचेही सहकार्य आणि भक्कम पाठिंबा या कामी सुरुवातीपासून मिळत आहे.

नोव्हेंबर ते मार्च हा पाच महिन्यांचा काळ अंडी घालण्याचा असतो. कासवाची मादी त्या काळात रात्री किंवा पहाटे समुद्रातून बाहेर येते. ती कोरड्या वाळूत जाऊन साधारणपणे एक ते दीड फूटांचा खड्डा करते आणि तेथे अंडी घालते. मादी समुद्रातून बाहेर येऊन, अंडी घालून पुन्हा समुद्रात जाईपर्यंत दीड ते दोन तास किनाऱ्यावर असते आणि तेव्हाच तिला शिकारी प्राण्यांकडून धोका सर्वाधिक असतो. वेळासच्या आजूबाजूचा बहुतांश भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. कुत्र्यांबरोबरच बिबटे, तरस, कोल्हे, रानडुकरे यांसारख्या प्राण्यांचे ती मादी कासवे सहज भक्ष्य होतात. त्या काळात समुद्रकिनाऱ्यांवर चोवीस तास अखंड गस्त घातली जाते आणि त्या मादी कासवांचे रक्षण केले जाते. खरे तर, ती कासवे किनाऱ्यावर कोणी प्राणी किंवा माणूस नाही ना याची खातरजमा करूनच अंडी घालतात. काही शंका आली, तर अंडी न घालता तशीच परतही जातात. पण आता मात्र माद्या मनुष्यप्राण्यापासून त्यांना किंवा त्यांच्या अंड्यांना काहीही धोका नाही, या विश्वासाने निःसंकोचपणे, कोठलीही भीड न बाळगता तेथे अंडी घालतात; हे चित्र मनाला सुकून देणारे आहे.

मादी कासवे खणलेल्या खड्ड्यांत अंडी घालून, त्यावर पुन्हा वाळू पसरवून- ती घट्ट दाबून घरटी बंद करतात आणि चक्क समुद्रात निघून जातात ! कासवांमध्ये पालकत्वाची भावना नसते. त्यामुळे त्या अंड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. संवर्धनाचे काम तेथे सुरू होते. घरटी भरती-रेषेच्या बाहेर कोरड्या वाळूत असतील, तर तेथेच जाळी लावून त्यांचे रक्षण केले जाते. त्याला in-situ conservation म्हणजेच नैसर्गिक रीतीने केलेले संवर्धन असे म्हटले जाते.

ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिलांसाठी तयार केलेली संरक्षित जागा (हॅचरी)

घरटी भरती-रेषेच्या आत असतील, तर ती अंडी तेथून काढली जातात आणि किनाऱ्यावर, समुद्रापासून लांब तयार केलेल्या एका संरक्षित जाळीत कासवे करतात, तसा खड्डा करून त्या कृत्रिम घरट्यात ठेवली जातात. पिल्ले पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसांचा उबवणीचा काळ पूर्ण झाल्यावर त्यांतून जन्माला येतात. थंडी जास्त असल्यास तो काळ साठ ते बासष्ट दिवसांचा असू शकतो. तापमान कमी असताना जन्माला येणारी पिल्ले ही नर असतात. हवेतील, जमिनीतील उष्मा जसा वाढत जाईल, तशी मादी पिल्ले जन्माला येतात, जी पुढे जाऊन कैक वर्षांनी कधीतरी पुन्हा आसपासच्या किनाऱ्यांवर येऊन अंडी घालणार असतात ! पिल्ले अंड्यांमधून बाहेर आल्यावर त्यांच्या पंखांच्या हालचालीमुळे वरची वाळू खचते आणि खड्डा तयार होतो. घरटी उघडल्याची ती खूण असते. त्यांना वर येण्यास तीन ते चार दिवस लागतात. त्या काळात त्यांच्या पंखांना अर्धे बळ मिळते. मग तेथे काम करणारी मंडळी घरट्याच्या वर वाळूत एक टोपली उपडी ठेवतात; जेणेकरून पिल्ले वर आल्यावर त्यांना खेकडे किंवा पक्षी यांनी खाऊ नये. किंवा ती दिवसा बाहेर आली, तर कोकणातील उन्हामुळे ती मरण्याची शक्यता असते. पिल्ले जसजशी बाहेर येतात, तसे एका घमेल्यात थोडी वाळू भरून, त्यात ती ठेवून समुद्रापासून शंभर-दीडशे फूट अलिकडे त्यांना काळजीपूर्वक ओल्या वाळूवर सोडले जाते. ती उपजत ज्ञानाने समुद्राच्या दिशेने जातात. त्यांचे पंख त्या अथांग समुद्री प्रवासासाठी अधिक क्षमतेने तयार होतात. ती चार पावले चालून थांबतात आणि पुन्हा चालत जातात. कासवांच्या पिल्लांचे ते पदनर्तन पाण्यात जाईपर्यंत बघणे हा आनंदसोहळा असतो ! मनात एवढीच भावना असते, की ‘सुखरूप जा, खूप मोठे व्हा आणि पुन्हा याच किनाऱ्यांवर येऊन तुमची घरटी करा.’ खरेच, ती पिल्ले समुद्रात जातानाच तेथील जीओमॅग्नेटिक फिल्ड लोकेशन (जीपीएस) मेंदूत साठवतात आणि पंधरा-वीस वर्षांनी अंडी देण्यास शारीरिक दृष्ट्या सक्षम झाल्यावर पुन्हा त्या किंवा आसपासच्या किनाऱ्यांवर घरटी करण्यासाठी येतात. पिल्ले समुद्रात जाईपर्यंत त्यांचे रक्षण केले जाते. तेथे एक चमत्कारिक विरोधाभास लक्षात येतो. ‘कासव’ किंवा ‘कूर्म’ हा विष्णूचा एक अवतार आहे, अशी भारतीय श्रद्धा आहे. पण त्यांनाच ती जमिनीवर असेपर्यंत ‘रानडुकरे’ किंवा ‘वराह’ (विष्णूचा दुसरा एक अवतार) आणि समुद्रात गेल्यावर मोठे ‘मासे’ किंवा ‘मत्स्य’ (विष्णूचा आणखी एक अवतार) कासवाच्या त्या पिल्लांना गट्टम् करतात ! निसर्गानेच त्यांना निसर्गाचा तोल राखण्यासाठी एकमेकांना खाऊन टाकण्याची मुभा दिली आहे !

वेळासचा समुद्रकिनारा ‘कासवांसाठी संरक्षित किनारा’ म्हणून घोषित केला गेला आहे. तेथील कासव महोत्सवामुळे आणि समृद्ध जैववैविध्यामुळे पर्यटनालाही चालना मिळाली आहे. गावात केवळ सहा घरांत ‘होम स्टे’ सुरू झाला. ती संख्या दहा वर्षांत चाळीसहून अधिक झाली आहे. गावातील लोकांना अर्थार्जनाचे चांगले साधन मिळाले आहे. आश्चर्याची आणि आनंदाची बाब म्हणजे, तेथे एकही हॉटेल दिसत नाही, कारण ‘गावाचे गावपण जपले जावे’ हा त्यामागील हेतू. सगळ्या ग्रामस्थांनी मिळून घेतलेला तो निर्णय (वेळास मॉडेल !) अनुकरणीय आहे.

समुद्री कासवांच्या प्रवासाचा माग ठेवण्यासाठी अंडी देण्याकरता आलेल्या मादी कासवांच्या पाठीवर जीपीएस टॅगिंग गेल्या काही वर्षांपासून केले जाते. ती कासवे एकदा अंडी घालून गेल्यावर पुन्हा पुढील वर्षी अंडी घालण्यास येईपर्यंत नेमकी कोठपर्यंत जाऊन येतात, त्याचा अभ्यास केला जातो. जगभरात जी सात प्रकारची समुद्री कासवे आढळतात, त्यांपैकी ‘ग्रीन सी टर्टल’ ही प्रजाती शाकाहारी असते. ती कासवे समुद्रातील शेवाळ, गवत खाऊन माशांना अंडी घालण्यासाठी जागा तयार करून देतात. तसेच, ऑलिव्ह रिडले कासवे मेलेले मासे, समुद्री प्राणी खाऊन समुद्र स्वच्छ ठेवण्याचे आणि मोठ्या प्रमाणात असलेले जेलीफिश खाऊन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात.

समुद्री कासवांचे परिसंस्थेतील महत्त्व लक्षात घेता त्यांच्या संवर्धनाचे काम पुढील कित्येक वर्षे सातत्याने आणि अधिक गतीने करण्याची गरज आहे. त्यासाठी कृतिशील पुढाकार घेतला पाहिजे असे उपाध्ये कळकळीने सांगतात.

विराज सवाई 95613 01653 virajsawai17@gmail.com

————————————————————————————————

About Post Author

9 COMMENTS

  1. ऑलिव रिडले कासवांची जीवशास्त्रीय व तांत्रिक माहितीचा तपशील या लेखाद्वारें कळला.खूप ज्ञानवर्धक.या प्रजातीच्या पद्धतशीर संरक्षणासाठीं
    जिवापाड मेहनत घेत असलेले श्री.मोहन उपाध्ये व भाऊ काटदरे यांचें खरोखरच कौतुक करावंसं वाटतं.आपण सगळेच जीव हे जैवसांखळीचा एक
    भाग असल्यानें ही सांखळी अभंग कशी राखली जाईल हें पाहणे आपलं कर्तव्य आहे
    सुंदर माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल विराज सवाई यांचं मनापासून अभिनंदन व शुभेच्छा!

  2. फारच छान माहिती दिली आहे का कासवांबद्दल आपल्या इकोसिस्टीमचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे त्यासाठीची जागरूकता या लेखातून नक्की होणार आहे थँक्यू विराज

  3. मस्त! सुमित्रा भावेंचा कासव पहाताना….या कासव संवर्धनाचं मानवी मनोव्यापाराशी नातं अधोरेखित झालं होतं….त्याचं स्मरण झालं! असाच हात लिहिता राहो!

  4. आपल्याला सुपरिचित नसणा-या अनेक घडामोडी निसर्गात घडत असतात. विराज ह्यांच्यासारखे अभ्यासक त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोचवतात. नेटक्या भाषेतील माहितीपूर्ण लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल ह्या व्यासपीठाचे अभिनंदन.
    आम्ही मलेशियाला असताना अशी मोठमोठी – एखाद्या मोठ्या डायनिंग टेबलाएवढ्या आकाराची-कासवे समुद्रकिना-यावर अंडी घालायला आलेली पाहिली होती.टेबलटेनिसच्या चेंडूसारखी दिसणारी अंडीही पाहिली. एकावेळी फार मोठ्या संख्येने अंडी घातली जातात. मलेशियाच्या पूर्व किना-यावर अशी कासवे आणि अंडी बघायला खूप पर्यटक येतात.

  5. खूप नवीन माहिती मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद.

  6. खूप सुरेख तपशीलवार व वाचनीय लेख ! धन्यवाद!

  7. खूप छान लिहिलयंस. छान आणि वेगळ्या विषयावर माहिती मिळाली. अतिशय अभ्यासपूर्ण लेख.

  8. कासव महोत्सवा बद्दल खूप ऐकलं होतं.. परंतु या लेखाद्वारे अभ्यासपूर्ण माहिती समोर आली आणि उत्सुकता अजूनच वाढली.. त्याबद्दल विराज तुझे आणि सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचेही खूप आभार
    कासवांच्या पिलांचे पदनर्तन बघण्यासाठी एकदा तरी नक्कीच वेळास ला भेट द्यायला हवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here