अचलपूर तालुका

3
719

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ही धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली प्राचीन भूमी ! अचलपूर शहरावर मोगल, मराठा आणि निजाम अशा तिघांनी राज्य केले. पूर्वी या शहराचे नाव नौबाग होते. ती नाग देवांची जन्मभूमी, म्हणून नौबाग नाव पडले अशी आख्यायिका आहे…

अचलपूर हा महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील तालुका आहे. अचलपूर शहराची लोकसंख्या तीन लाखांच्या जवळपास आहे. ते अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे दुसऱ्या नंबरचे शहर आहे. पहिला क्रमांक शहर अर्थातच अमरावतीचा. अचलपूर तालुक्यात छोटी छोटी एकशेऐशी खेडी येतात. तो अमरावतीच्या वायव्येस पन्नास किलोमीटरवर आहे. अचलपूर ही धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली प्राचीन भूमी ! अचलपूर हे रेल्वे स्टेशन आहे. अचलपूरला लोहमार्गाने अथवा सडक मार्गाने जाता येते. लोहमार्गाने जाताना मूर्तिजापूर येथे उतरून दुसऱ्या गाडीने जाता येते. सडक मार्गाने जाण्याकरता अमरावतीहून जावे लागते. पूर्वी त्याचे नाव नौबाग होते. ती नाग देवांची जन्मभूमीम्हणून नौबाग नाव पडले अशी आख्यायिका आहे.

अचलपूरची समुद्रसपाटीपासून उंची तीनशेएकोणसत्तर मीटर आहे. अचलपूरला लागूनच परतवाडा नावाचे गाव आहे‌. पूर्वी तेथे लष्करी छावणी होती, म्हणून त्याला कॅम्प म्हणत. अचलपूर नगरपालिकेचे क्षेत्रफळ सहा हजार सातशेअठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर आहे. अचलपूरचा पिनकोड 444805 व 444806 आहे. टेलिफोन कोड 07223 असा आहे. वाहन रजिस्ट्रेशन क्रमांक एम एच 27 असा आहे.

अचलपूर हे शहर प्राचीन आहे. तेथील पुरातन वास्तू त्याची साक्ष देतात. अचलपूर शहरावर मोगल, मराठा आणि निजाम अशा तिघांनी राज्य केले. इलीच नावाच्या राजाने तेथे कोणे एके काळी राज्य केले म्हणून इलिचपूर हे नाव त्या शहराचे होते. ते शहर बावन्न मोहल्ल्यांचे आहे. त्या मोहल्ल्यांना पुरे असे म्हणतात. मोगलांचे राज्य होते म्हणून तेथील पुरांची नावे अब्बासपुरा, सुलतानपुरा, बेगमपुरा अशी आहेत. शहर चारही बाजूंनी तटबंदी असलेले आहे. तेथील ऐतिहासिक वास्तू म्हणजे हौदकटोरा, दुल्हागेट, परकोट शहराला असलेली तटबंदी ह्या आहेत. अचलपूर ही वऱ्हाडची अतिशय भरभराटीची राजधानी होती. अचलपूर शहरातून दोन नद्या वाहतात. त्यांची नावे सर्पिण नदी (सपन असाही उल्लेख करतात) व बिच्छन नदी.

अचलपूर शहराचे ग्रामदैवत मरीमाय आहे. तेथील भाषा मराठीच आहे; पण ग्रामीण आहे- उच्चार वेगळे आहेत. पिशवीला थैली, विळीला पावशी, पाणी भरून ठेवण्याच्या टाकीला पवाली असे शब्द वापरतात. श्री चक्रधर स्वामींनी पावन केलेली अष्टमासिद्धी ही विहीर आहे. त्या विहिरीतील पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा रोग बरे होतात असे म्हणतात. गावकरी वर्षातून एकदा तरी त्या पाण्याने आंघोळ करतात. तसेच, सुलतानपुऱ्यातील भुलभुलैय्या दत्ताचे मंदिर जुने आहे. महानुभाव पंथाचे सुंदर असे जैन मंदिर आहे. महाकवी भारवी या संस्कृत पंडिताची आणि उत्तर रामचरित नाटकाचा कर्ता भवभूती याची संचारभूमी व प्रचारभूमीश्री संत कल्याण स्वामींचे (संत रामदास स्वामींचे शिष्य) सत्शिष्य भोलाराम महाराज यांनी स्थापित केलेली शेणापासून घडवलेली श्रीमारुतीची मूर्ती श्री राममठात (माळवेशपुरा) विराजमान आहे. तशीच श्री कार्तिक स्वामींची नखशिखांत मूर्ती… ती जशी देवस्थाने आहेततसेच त्यांना ऐतिहासिक महत्त्व लाभलेले आहे.

जगदंबेचे देऊळ पुरा विभागात आहे. तेथे नवरात्रात मोठा उत्सव असतो. गावातील लोक रामलीला सादर करतात. ती पाहण्यास अलोट गर्दी उसळते. राखी पौर्णिमेला काठीची मोठ्ठी जत्रा भरते. त्याला बालाजीची जत्रा असे म्हणतात. उंचच उंच काठी असते. तिला लाल कपडा लपेटलेला असतोवर भगवा झेंडा असतो आणि उत्साही भाविक मंडळी ती एवढी मोठी काठी एका बोटावर घेऊनखांद्यावर व हनुवटीवर घेऊन बॅलन्स करत चालत असतात.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अचलपूरचे लोक निरोगी आणि तंदुरुस्त आहेतकारण शुद्ध हवा व सकस आहार. तेथे बहुतांश लोक शेती करतात. शेतांमध्ये जोंधळा (ज्वारी)कपाशी (कापूस)तूरभुईमूग इत्यादी पिके घेतली जातात. ऋतुमानाप्रमाणे सर्व भाज्या, फळे ताजी मिळतात. दुसरा व्यवसाय हातमागाचातसेचबांगड्यांचा, दोर-नवार-बैलांचा कासरा तयार करणेतांब्या-पितळेची भांडी तयार करणे हे व्यवसाय आहेत.

अचलपूरपासून जवळच चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे गाविलगड किल्ला पाहण्यासारखा आहे; तसेच, मुक्तागिरीचा धबधबा आहे.

अचलपूर येथील पूर्वीची दोन नाट्यगृहे प्रसिद्ध आहेत- एक बावन एक्का व दुसरे बाविशी. खरे तरमराठी नाटकाची सुरुवात अचलपूर शहरातूनच झाली असे म्हणण्यास हरकत नाही. कार्तिक शुद्ध दशमीला नाटक सादर करण्याची परंपरा 1835 साली सुरू केली. ती परंपरा पंढरीनाथ संस्थान यादवराव मठ ह्यांनी चालू केली. त्या नाट्यगृहाला नामवंत कलाकारांनी भेट दिल्याची नोंद आहे. अचलपूरची नाट्य परंपरा थक्क करणारी आहे.

अचलपूरमध्ये तीन खूप मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या. एक म्हणजे नामदेवराव हेडाऊ. त्यांनी विणकर समाजाला हाताशी घेऊन अचलपूर इंडस्ट्रियल विव्हिंग को ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली. त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला. त्यांनी पुरा विभागात जगदंब विद्यालय ही माध्यमिक शाळा काढली. नंतर कला शाखा, वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा असे जगदंब महाविद्यालय स्थापन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परगावी शिक्षणास जाण्याचा त्रास वाचला.

दुसरी व्यक्ती राजाभाऊ देशमुखांचे वडील व्यंकटेश हणमंत ऊपाख्य बाबासाहेब देशमुख यांनी 1922 मध्ये विदर्भ मिल ही सुत गिरणी चालू केली. त्यामुळे गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला. त्यांनीच सिटी हायस्कूल, जानकीबाई कन्या शाळा स्थापन केल्या. तिसरे जिराफे. त्यांनी हातमागावर नवार, मुलांचे शाळेची दप्तरे, सतरंज्या यांचे उत्पादन सुरू केले. अचलपूरच्या सतरंज्या प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध साहित्यिक प्रा.राम शेवाळकर व पत्रकार अरुण साधू अचलपूरचे होते.

– सीमा हरकरेठाणे 8087447768 seemaharkare11@gmail.com

——————————————————————————————–

About Post Author

3 COMMENTS

  1. अचलपूर येथे विदर्भ मिल या कापडगिरणीची स्थापना कै. राजाभाऊ देशमुखांचे वडील कै. व्यंकटेश हणमंत ऊपाख्य बाबासाहेब देशमुख यांनी सन १९२२ मधे केली. त्यांनीच सन १९२८ मध्ये हायस्कूल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन सिटी हायस्कूल ची स्थापना केली. अशी दुरुस्ती आवश्यक आहे.
    अचलपूर परतवाडा या दोन नगर परिषदा पुर्वी होत्या आता एकच आहे.

  2. सीमाताई खरेच खुप सुंदर माहीती दिलीत अचलपूरची. मी कित्येकदा अचलपूरला गेले आहे. पण मला हे सगळं माहीतच नव्हतं !
    विशेष असे की आपण एकमेकींना ओळखतो…हे मला तुमच्या इतर वाचकांना सांगायचे आहे. तुमचा अभिमान वाटतो ताई, या वयातला उत्साह तुमचा, आम्हाला प्रेरणादाई आहे. असेच आणखी लिहीत रहा. भगवंत आपल्याला स्वास्थपुर्ण दीर्घायुष्य देवो !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here