अचलपूरचे कृषिधन – कपाशी ते केळी-संत्री

0
180

अचलपूर तालुक्याच्या शेतीतील गेल्या साठ वर्षांतील बदल शेतीशास्त्राप्रमाणेच समाजशास्त्रीय दृष्ट्यादेखील अभ्यासण्यासारखे आहेत. विज्ञान-तंत्रविज्ञानातील नवनवे संशोधन, राजकीय निर्णय, शेतकऱ्यांच्या गरजा व त्यांची ऊर्जा असे सारे घटक त्या बदलांमधून प्रकट होतात. शेतीतून रोजच्या अन्न गरजेचे धनधान्य मिळवण्याबरोबरच पैसाही मिळाला पाहिजे ही नवी दृष्टी या काळात शेतकऱ्याला प्राप्त झाली हे उघडच आहे. अचलपूरला कपास हे तसे पारंपरिक रोकड उत्पादन होतेच. अचलपूरचा कापूस उत्तम प्रतीच्या वस्त्रप्रावरणांसाठी जगभर प्रसिद्ध होता. साठ वर्षांतील ठळक बदल म्हणजे त्या कपाशीबरोबर केळी, मिरची व संत्री या पिकांनीही अचलपूरला नवी ओळख दिली आहे. त्यातून तालुका समृद्ध होत आहे व तरुण पिढी शेतीकडे पुन्हा वळत आहे.

कपाशी आणि ज्वारी हीच अचलपूर तालुक्यातील प्रमुख पिके 1955 ते 1960 च्या दरम्यान होती. त्यासोबत गावरानी मूग, उडीद, तूर, भुईमूग, मिरची, हरभरा, जवस आणि कोरडवाहू गहू अशी पिके घेतली जात. तालुक्याच्या पहाडी भागात कोदो कुटकी आणि राजगिरा यांचे पीक घेतले जाई. कांबुळी कपाशी आणि गावरानी (बारीक) कपाशी, गावरानी ज्वारी, लड्डू कणीसवाली हावरी ज्वारी, पंढरपुरी ज्वारी, लाह्या फोडी अशा पिकांचा तो जमाना होता.

कपाशीचे उत्पन्न खंडीने मोजले जाई. वीस मणाची एक खंडी होई. कपाशीचे उत्पन्न एका एकरात दीड ते दोन खंडीपर्यंत होई. ज्वारी एका एकराला चाळीस ते साठ कुडव किंवा दोन खंडी होई. मुख्य पिकात आंतरपीक (मिश्र पीक) घेण्याची पद्धत होती. एका एकरात बारा ते चौदा तास/ओळीत कपाशी, दोन तास तुरी (इरवा), एक तास ज्वारी पेरली जाई. त्यात एका एकराला एक खंडी ज्वारी, दहा ते बारा कुडव तुरी आणि एक ते दीड खंडी कपाशी होई. ज्वारीत उडीद आणि मूग यांचे मिश्र पीक घेतले जाई. त्यात उडीद एका एकराला पाच ते दहा कुडव होई. ज्वारीही एक ते दीड खंडी होई. मोटीचे (मटकी) पीक हलक्या जमिनीत घेण्याची पद्धत प्रचलित होती. कोरडवाहू गहू आणि हरभरा सपाट काळीच्या शेतात घेतला जाई. गावरानी गहू एका एकरात दोन खंडी तर हरभरा दोन ते तीन खंडी पिके. जवसाचे पीक एकरी चार-चार खंडी होई.

महाराष्ट्र राज्य स्थापन 1960 साली झाले. नंतरच्या वीस वर्षांत- 1960 ते 1980 च्या दरम्यान- कांबुळी कपाशी, बारीक गावरानी कपाशी मागे पडली. कपाशीचे 1007, 147 हे परदेशी वाण तर एके 235 हे देशी वाण आले. त्यामुळे कपाशीचे उत्पादन वाढले. ते एकरी तीन खंडींपर्यंत पोचले.

त्यानंतरच्या पंधरा वर्षांत- 1980 ते 1995 दरम्यान- एकेएच-4, एकेएच-5, हे देशी वाण तर एलआरए-5166, एकेएच-468, नांदेड-44 हे परदेशी वाण आले. फलटणच्या ‘निंबकर सीड्स’नी त्यात भर घातली. त्यामुळे कपाशीचे उत्पन्न वाढले. कपाशीचे उत्पन्न एकरी पाच ते दहा क्विंटलपर्यंत पोचले. मात्र साध्या वाणाचे दिवस संपले. त्याच सुमारास बीटी वाण वापरात आले आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला, किडीचे प्रमाणही वाढले आहे. त्या किडी औषधानेही नियंत्रणात येत नाहीत.

ज्वारीत संकरित वाण 1962 पासून आले. ज्वारीचे सीएसएच-1 हे पहिले संकरित वाण. ज्वारीचे दुसरे संकरित वाण सीएसएच-9 हे तालुक्यात पाठोपाठ दोन वर्षांत आले. ते 1980 पर्यंत चालले. त्यात प्रगती पुढे बरीच झाली. ज्वारीच्या प्रगत नवीन जाती आल्या – सीएसएच-1, सीएसएच-5, सीएसएच-9 हे सरकारमान्य संकरित वाण. त्यांतील सीएसएच-1 आणि सीएसएच-5 या वाणांचा पेरा मागे पडला. मात्र नव्या सीएसएच-9 चा पेरा तालुक्यात चालू आहे. या सरकारमान्य संकरित वाणांनंतर वेगवेगळ्या कंपन्यांचे वाण आले आहेत. गावरानी ज्वारीचा पेरा (पेरणी) केवळ तीन टक्के असून प्रचलित वाण जवळजवळ बंद झाले आहेत.

तालुक्यात कोरडवाहू गावरानी गहू 1960 ते 1965 पर्यंत चालला. ओलीत 1965 पासून सुरू झाले. कल्याण सोना हे वाण त्या दरम्यान प्रचलित होते. कल्याण सोनाच्या सोबतीला ‘सोनालिका’ हे गव्हाचे वाण 1970 पासून आले. ते 1980 पर्यंत चालले. गव्हात संशोधित वाण 1980 पासून आले आहे. मध्यप्रदेशातील ‘लोकवन’ हे गव्हाचे वाण 1985 पासून तालुक्यात आले आणि त्याचा पेरा कायम आहे.

तालुक्यात पेरल्या जाणाऱ्या तुरीला 1960 पर्यंत जात नव्हती. तिची ओळख केवळ ‘गावरानी’ ही होती. तुरीच्या जाती 1970 पासून आल्या आहेत. बदनापूर-1, बदनापूर-2 या तुरीच्या जातींनी उत्पादन अधिक दिले. तुरीच्या त्या वाणाने 1985 पर्यंत तालुक्यावर राज्य केले. तुरीच्या ‘आशा’ व ‘मारोती’ या जाती 1985 नंतर आल्या. त्यांचे वर्चस्व तालुक्यावर त्यानंतर सतत पाहण्यास मिळते.

करडईचे पीक तालुक्यात 1990 नंतर आले. तिचा पेरा पाच ते दहा टक्के एवढाच आहे. त्या धान्यात भीमा वाणाचे वर्चस्व आहे.

सोयाबीन हे कपाशीला रोकड पिकाचा पर्याय म्हणून तालुक्यात 1998 पासून आले. त्याची कारणे कपाशीवर वाढणाऱ्या किडी, घटलेले भाव आणि लागवड खर्चात झालेली वाढ ही होती. सोयाबीनचा पेरा 1990 ते 2007 या दरम्यान वाढत गेला. त्याकडे रोकड नफ्याचे पीक म्हणून बघितले गेले. पण सोयाबीनचा पेरा पुढे, 2007-2008 पासून घटला. कारण सोयाबीनवरही किडी वाढल्या- रोगांचे प्रमाण वाढले. जमिनीची उत्पादनक्षमता घटली. सोयाबीनचे उत्पादन घटले म्हणून कपाशीपासून दूर गेलेला तालुक्यातील शेतकरी कपाशीकडे वळला.

केळीचा पेरा तालुक्यात ओलिताची सोय वाढल्यामुळे 1965 पासून वाढला. तालुक्यात संत्री 1972-1973 पासून आली.

तालुक्यामध्ये 64630.05 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 54669.88 हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र आहे. त्यातील 52058.88 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तालुक्यात पस्तीस टक्के जमीन काळी, खोल असून पासष्ट टक्के जमीन हलकी व उथळ आहे. तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान सातशेसदुसष्ट मिलिमीटर असून, तालुक्यात तीन मध्यम प्रकल्पांसह विहिरी व कूपनलिका यांद्वारे 19866 हेक्टर ओलित क्षमता उपलब्ध आहे. तालुक्यात कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, ज्वारी, तूर, मिरची, उडीद, मूग, भुईमूग, ऊस ही पिके घेतली जातात. संत्रा पिकाखाली 7913 हेक्टर क्षेत्र असून भाजीपाला 551 हेक्टर क्षेत्रात घेतला जातो. केळीचाही पेरा अधिक असून सूर्यफूल, करडई, मका, कांदा यांचा पेरा तालुक्यात आहे.

अचलपूर म्हणजे कपाशीचे माहेरघर. पण केळी आणि संत्री या पिकांनी या तालुक्याला नवी ओळख दिली आहे. अचलपूर तालुक्यातील केळी आणि संत्री ही पिके देशातील प्रमुख बाजारपेठांसह देशाबाहेरही पोचली आहेत ! तालुक्यातील उत्पादित सेंद्रिय केळी, संत्रा व पपई या फळांना विदेशात मागणी अधिक आहे. केळी, मिरची, संत्रा, कापूस या पिकांनी तालुका अधिक समृद्ध केला आहे. त्याला स्थानिक शेतकऱ्यांचे परिश्रम आणि स्वातंत्र्योत्तर काळात शेती क्षेत्रात आलेल्या नवनवीन योजना कारणीभूत ठरल्या आहेत. तरुण पिढीही शेतीकडे त्या अनुषंगाने वळली आहे.

अतुल सुधाकर लव्हाळे 9822768210 lavhaleatul023@gmail.com
——————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here