अक्षता

1
78
akshata_

अक्षता हा शब्द सर्वांच्या अगदी चांगला परिचयाचा! लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर त्यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी बहुतांश मातापित्यांना लागलेली असते. अक्षता या अखंड तांदळाच्या घेण्याची पद्धत आहे. त्याला तुकडा तांदूळ चालत नाही, कारण अक्षत म्हणजे जे क्षत किंवा भंगलेले नाही ते. अक्षता हे प्रतीक आहे. काहींच्या मते, त्यातून वधूचे कौमार्य सूचित होते. गीर्वाणलघुकोशात त्याचा अर्थ पुरुषसंबंधरहित स्त्री असा दिलेला आहे. त्या शब्दाला अक्षतयोनि: असा पर्यायी शब्दही दिला आहे. काही जाणकारांच्या मते, त्यातून वधूच्या घरची सुबत्ता सूचित होते. तांदूळ हे भारतीयांचे मुख्य अन्न. लग्नाला उपस्थित असलेले नातेवाईक, आप्त, मित्रपरिवार तांदळाच्या अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर टाकतात. वधूच्या घरी अन्नाची कमतरता नाही, म्हणून ते तशा अक्षता टाकू शकतात असाही सूचितार्थ. पण त्याही पुढे जाऊन एक वेगळा विचार उपलब्ध आहे, अक्षतांचे तांदूळ हे एक प्रकारे बीज असते. ते बीज रुजले, की तांदळाचे रोप तयार होते. तांदळाच्या एका दाण्यापासून असे अनेक दाणे, पर्यायाने अशी अनेक रोपे तयार होतात; म्हणजेच वंशवृद्धी होते, जीवसातत्य राखले जाते. लग्नात वधू-वरांच्या संसारवेलीलाही तशीच फलधारणा होऊन वंशवृद्धी व्हावी असा भाव अक्षतांच्या उपयोगामागे असावा.
अक्षतांचा सोहळा निसर्गातही चालू असतोच. खरे म्हणजे, निसर्ग स्वत:च अक्षतांची उधळण दरवर्षी करत असतो. रानातील विविध प्रजातींच्या झाडांना फुलोरा वसंत ऋतूत येतो- त्यांना शेंगा, फळे लगडतात. कापसाच्या म्हाताऱ्या काही झाडांमधून पावसाळ्याच्या आधी तयार होतात. त्या वाऱ्यासवे दूरवर पोचतात. पशू-पक्षी काही फळे खातात. फळांच्या बियांचा प्रसार त्यांच्या विष्ठेतून होतो. निसर्ग अशा प्रकारे लक्षावधी अक्षता ग्रीष्मात उधळत असतो. एक छोटीशी गंमत म्हणजे, निसर्गाचा अक्षता उधळण्याचा काळ एप्रिल-मे महिन्यात असतो आणि लग्नसराईचा, म्हणजे अक्षता उधळण्याचा हंगामही तेव्हाच असतो!

– उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in

About Post Author

Previous articleमेहनत
Next articleव्हीकेराजवाडे.कॉम (vkrajwade.com)
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810

1 COMMENT

  1. नमस्कार,
    आपले शब्दशोध आवडले…

    नमस्कार,
    आपले शब्दशोध आवडले. फालतू, मक्ता घेणे, चकाणा या शब्दांचे आठ फारच वेधक आणि वेगळे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here