गंधगान (Whispers on the Wind !)

1
317

‘मोगरा फुलला’ हे सदर सुरू करून दोन महिने झाले आहेत. दालन सुरू करताना संवेदना उजागर करणे आणि जाणीवसमृद्धी असे दोन उद्देश समोर ठेवले होते. पंचेंद्रियांना जे जाणवते ते शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आजचा डॉ. मंजुषा देशपांडे यांचा ‘गंधगान’ हा लेख पंचेंद्रियांना जे जाणवते त्यापलिकडे जाऊन अबोध नेणिवेत रुतून बसलेल्या जाणिवांविषयी सांगत आहे. एक ज्ञानेंद्रिय विकल असेल तर इतर ज्ञानेंद्रिये अधिक सजग होतात आणि विकल ज्ञानेंद्रियामुळे आलेले न्यून दूर करण्याचा प्रयत्न करतात. जन्मांध असलेली लेखिकेची मैत्रीण गंध, स्वर, स्पर्श यांच्या साहाय्याने प्रकाशाची जाणीव आत्मसात करून उजेड आणि अंधार यांतला फरक जाणून घेऊ इच्छिते. गुलजार यांची एक ओळ आहे, ‘नूर की बूँद है सदियों से बहा करती है । सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो ।’ प्रकाशाचा हा ठिपका आत्मप्रकाशाच्या साहाय्याने जाणून घेण्याचा हा प्रयत्न ! ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

गंधगान

या लेखाचे नाव ‘गंधगान’ देण्याचे कारण म्हणजे मला ‘गंधांचा’ नाद आहे आणि स्वरांचाही नाद आहे. प्रत्येक स्वर, प्रत्येक गीत हे कोणत्या तरी गंधाशी संबंधित आहे, असे मला वाटत असते. उदाहरणच सांगायचे झाले तर ‘तुझी चाल तुरुतुरु…’ हे गाणे लागले की सूर्यास्ताच्या वेळेचा पिवळ्या गवताचा गंध येतो तर ‘मालवून टाक दीप…’ या गाण्यावेळी मला संध्याकाळी फुलणाऱ्या मोगऱ्याचा गंध येतो.

मला नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्हीही गंध मोह घालतात. माझ्याप्रमाणेच अनेक जणांच्या गंधांच्या जाणिवा तीव्र असतात. कोणत्याही जागेचे, व्यक्तीचे, नात्याचे आणि घटनांचे विशिष्ट असे वास मला जाणवतात. त्यामुळे कोणीही सांगितलेले नसले तरी अनेकदा कित्येक गोष्टी मला अगोदर कळतात. आम्ही शाळेत असताना, गारांचा अचानक पाऊस आला की आई फ्लॉवर-बटाट्याचा रस्सा आणि शेवयांची गरम गरम खीर करायची. तसा पाऊस सुरू झाल्याबरोबर शाळेत असताना त्या भाजीचा आणि खिरीचा वास यायला लागायचा. वासाच्या नादावर मी जणू तरंगत घरी यायचे.

प्रत्येक ऋतूचाही एक विशिष्ट गंध असतो हे आपल्याला माहीत आहे. सध्या चालू असलेला शिशिर हा पानगळतीचा ऋतू. या ऋतूत पहाटे पडलेल्या धूक्याला भिजका गंध असतो. एवढेच कशाला या ऋतूतल्या सूर्योदयानंतरचे कोवळे किरण गवतावर पडले, की मोत्यासारख्या दवबिंदूंचा हिरवागार ताजातवाना वास घेतला की पुढच्या दिवसभरासाठी शरीर-मनात ऊर्जा भरून राहते.‌ हिवाळ्यातल्या पहाटे उठून चालायला जाणाऱ्यांच्या नशिबात दवबिंदूंचा गंध असतो. आमच्यासारख्या ‘लेट लतिफां’ना आले आणि तुळस घातलेल्या सकाळच्या चहाचा किंवा जायफळ, दालचिनी घातलेल्या कॉफीचा दरवळही अगदी एखाद्या जाडसर पांघरूणासारखा उबदारपणा देतो.

हे गंधस्पर्श क्षणार्धात कितीही दूरवरचा प्रवास घडवू शकतात. दूरवर म्हणजे अंतर आणि काळ या दोन्ही दृष्टींनी. मागे कधीतरी एकदा आम्ही केळशीला गेलो होतो.‌ फिरता फिरता समुद्र किनाऱ्यावरच्या मंदिरात पोचलो. त्या मंदिरात येणारा सुगंध आणि आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात येणारा सुगंध अगदी तस्साच… दोन्हीमध्ये काही फरक नाही. त्या क्षणी आम्ही केळशीत असूनही कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात पोचलो होतो ! आमच्या आजीच्या हिंगणघाटच्या घरातली जमीन सारवलेली होती. तिथल्या चुलीवर शिजलेल्या वरण भाताचा, बेसनाचा, पोळ्यांचा, बागेतल्या सुगंधी गुलाबांचा, लिंबू-पेरू अशा झाडांच्या पानांचा, माजघरातल्या बाळंतिणीच्या खोलीतला अशा नानाविध गंधांची सरमिसळ होऊन तिथल्या घरालाच एक विशिष्ट गंध यायचा. तो गंध तिथे राहणाऱ्या माणसांनाही यायचा. आजही, एखाद्या निवांत क्षणी तो गंध माझ्या नाकात दरवळतो आणि मला आजोळच्या त्या कौतुकाच्या काळात घेऊन जातो.

माझे एक ह्रदयस्थ स्नेही आहेत. प्रत्येकाच्या घरी मला जाणवतो तसा त्यांच्याही घरी एक विशिष्ट सुगंध मला जाणवतो. त्या सुगंधाची गंमत म्हणजे त्यांना माझी आठवण आली की तो सुगंध माझ्या भोवती दरवळतो. मग मी त्यांना फोन करते. त्यावर ते म्हणतात, अरे, आत्ताच तुझी खूप आठवण येत होती. सुगंधाचे किती प्रकारचे उपयोग असतात ! गंध ऊर्जादायी, मादक, कामोत्तेजक, मन शांत करणारे आणि मनातली जळजळ/मळमळ काढून टाकणारेही असतात. आपल्यासारख्या देशात तीव्र आणि सौम्य सुगंधाचेही खूप कौतुक असते. माझ्या एका ब्रिटिश मैत्रिणीला भारतातील जाईचा गंधही उग्र वाटतो. तिला पिटुनियासारख्या फुलांचे मंद वास आवडतात. आपल्याकडे तर सुवासिक फुले, पाने, चंदन, कापूर या सर्वांनी आपल्या देवांचीही ‘गंधपूजा’ केली जाते.

गंध हुंगण्यासाठी आपले नाक हे केवळ बाह्य इंद्रिय आहे. अर्थातच नाक नसेल तर गंध संवेदना नसतेच, कारण गंधांशी संबंधित मज्जातंतूंपैकी एका मज्जातंतूची जोडी नाकातच असते. त्यामुळेच करोना काळात किंवा साधी सर्दी झाली, की बऱ्याच दिवसांचा मधूमेह असला तरीही आपली गंधसंवेदना काही काळासाठी थबकलेली असते. आपल्या ज्ञानेंद्रियांशी संबंधित असलेल्या मज्जातंतूंच्या जोड्यांना ‘Cranial Nerves’ म्हणतात. गंधाच्या संवेदनेशी जोडलेली Olfactory Nerve ही पहिली Cranial Nerve आहे. त्यामुळेच सुगंध आणि दुर्गंध असे दोन्ही गंध माणसाचा मेंदू अक्षरशः जागृत करतात. त्यामुळे कोणत्याही, विशेषतः मनात भिनलेल्या किंवा अवचित आवडलेल्या वासाचा संबंध स्मरणशक्तीशी असतो. त्यामुळेच स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तींसाठी ‘अरोमा थेरेपी’ ही अतिशय उपयुक्त असते असे म्हणतात. अनेक गंध चिकित्सा औदासीन्य आणि नैराश्य दूर करण्यासाठीही उत्तम असतात.

या गंधाची अलिकडे जाणवलेली एक मजा म्हणजे मन जर त्या गंधाशी तादात्म्य पावले असेल तरच ते सुगंध मनापर्यंत पोचू शकतात. म्हणजे एखाद्या खोलीत निशिगंधाचा हार ठेवलेला आहे. हार ताजा असताना अर्थातच सुगंधही तीव्र असतो. त्यामुळे तो सुगंध सर्वांनाच येईल. तो हार जसजसा शिळा होतो तसतसा त्याच्यातला सुगंध अर्थातच कमी होतो, तरीही कोणत्या तरी क्षणी त्या हारातून तेवढाच तीव्र सुगंध एखाद्याच्या नाकात भरून येतो. त्यामुळेच सुगंधाच्या सान्निध्यात राहूनही त्या गंधाचा आस्वाद सर्वांनाच घेता येत नाही. अलिकडे अतिलठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या आजारांमध्ये खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागते. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे तंत्र वापरून आवडणाऱ्या पदार्थांचे केवळ वास घेऊन त्यांची चव घेतल्याचा आभास निर्माण करता येतो.

आज हे सगळे लिहायचे कारण म्हणजे माझी एक जन्मांध मैत्रीण. साधारण दोन वर्षांपूर्वी, याच सुमारास तिने मला विचारले होते, “दिवाळी म्हणजे काय असतं? सगळीकडे प्रकाश… म्हणजे रात्रीही दिवसासारखंच दिसतं का?” तिचा तो प्रश्न माझ्या मनात सतत झिमझिमत असतो. मला तिला दिवाळीची रोषणाई ‘दाखवायची’ आहे.

माझी ही मैत्रीण बुध्दिमान आहे. तिच्या अंधत्वाच्या मर्यादेत राहूनही आश्चर्य वाटावं अशी करिअरची शिखरे तिने सर केलेली आहेत. त्या मैत्रिणीने तिचे अंधत्व डोळसपणे स्वीकारलेले आहे. तिच्या घरच्या छोटेखानी टेरेसमध्ये तिच्या बाईच्या मदतीने तिने रंगीत फुलांची बाग फुलवलेली आहे. तिच्याकडे आपण कधी गेलो तर ती म्हणते, “आज केशरी गुलाब किंवा पिवळीधमक शेवंती किती छान फुलले आहेत ना ! ती फुलांचे रंग त्यांच्या गंधांतून जाणून घेते. दृष्टी नसल्याने तिची ‘गंध समज’ अतिशय तीव्र आहे. आमच्या युनिव्हर्सिटीत दाट झाडी आहे. त्यातली बरीचशी झाडे मुद्दाम लावलेली आहेत आणि काही परदेशी वाणेही आहेत. त्या जंगलाचा गंध आणि पन्हाळगडावर असलेल्या किंवा पळसंब्याच्या नैसर्गिक जंगलाचा गंध यांतला फरक तिला चांगला कळतो. ‘गंध आणि स्पर्श’ या दोन संवेदनांच्या मदतीने तिने तिच्या अंधत्वाच्या बऱ्याच मर्यादा पार केलेल्या आहेत. त्यामुळे दिवाळी हा गंधांचा आणि स्पर्शाचाही उत्सव आहे याची तिला जाणीव आहे. दिवाळीतल्या सजावटीचे प्रकाशस्रोत आकाशदिवे, पणत्या, मेणबत्त्या आणि लाईटच्या माळा ती स्पर्शाने आणि गंधाने अनुभवू शकते. मात्र तिला मिणमिणता उजेड आणि लख्ख प्रकाश यांतला फरक कळू शकत नाही. तिला त्या उजेडाला स्पर्श करायचा आहे. त्या उजेडाला हुंगायचे आहे. तो गंध तिला स्पर्शातून, डोळे नसले तरीही… आज ना उद्या दिसू शकेल अशी तिला खात्री आहे.

काल मी सहज परत एकदा ‘अभिमान’ सिनेमा पाहिला. त्या सिनेमामध्ये… एका प्रसंगात जया भादूरी आणि अमिताभ बच्चन नदीकाठी फिरत असताना, एका झाडाखाली पक्ष्यांची किलबिल ऐकू येत असते. ती त्याला विचारते, “असं नाही वाटत का, की ह्या उडणाऱ्या पक्षांची गाणी, खरे तर ह्या वेलीवरची सुगंधी फुले गात आहेत आणि वाऱ्यावर डोलत आहेत?” एरवीही मला तो प्रसंग खूप आवडतो. आज मात्र काहीतरी चमकलं… काहीतरी लख्ख दिसलं… जसा स्वर रंगांतून अवतरेल तसा गंधही स्वरात अवतरू शकतो आणि प्रकाशालाही गंधात पाहता येणे शक्य आहे. त्यामुळे माझ्या मैत्रिणीची इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी मला आशा वाटायला लागली… कारण गंध हा स्पर्शातून आणि रंगातून म्हणजेच प्रकाशातूनही झिरपतो… हे आता मला उमजले आहे.

-मंजुषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com

About Post Author

1 COMMENT

 1. फार अप्रतिम लेख आहे.
  अनेकांना अशी गंध संवेदना फार तीव्र असते.
  कुत्र्यांना अशी गंधाची संवेदना फार असते.
  खूप दूरवरून त्यांना ओळखीच्या व्यक्तीचा वास येतो
  हा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे.
  संध्या जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here