उमटू दे एखादी स्मितरेषा ! (Let there be smile !)

5
359

माणसाला एकटा असताना, त्याच्या मनाला, मनापासून जे करायला आवडते तो त्याचा छंद किंवा त्याला मनापासून आवडणारी गोष्ट. त्या आवडी कोणाला आवडण्यासाठी किंवा त्याची छाप पाडण्यासाठी नसतात. त्या मनाचे रंजन करत, त्याच्या मनाला आनंद देत असतात आणि भावनिक, वैचारिक पातळीवर प्रगल्भ करतात. त्याच्या वृत्तीनुसार, स्वभावानुसार साहित्य, संगीत अथवा अन्य कोणतीही कला व्यक्तीनुसार बदलू शकते.

समाज माध्यमांचे अधिराज्य असलेल्या सध्याच्या काळात मनोरंजनाची समीकरणे बदलली आहेत. व्यक्तीला काय आवडायला पाहिजे याचा विचार करायला वाव न ठेवता, त्याच्यावर तथाकथित ‘मनोरंजन’ आदळले जाते. काळाच्या ओघात, आम जनता त्याच्या अधीन झालेली दिसते. दिशादर्शक प्रश्नाने, त्याची प्रतिक्रिया काय असावी हेही कार्यक्रमांचे संयोजक ठरवतात. मात्र तसे मनोरंजन अल्पजीवी ठरते. कोणत्याच पातळीवर मोठे न करता, अभिरुची न वाढवता, समाधान न करता, वेळ जाण्यापलीकडे त्यातून फारसे हातात काही पडत नाही. याच कारणामुळे अशा कार्यक्रमांचे शाळा कॉलेजमध्ये शिक्षक आणि पालक याचेच अनुकरण करून मुलांचा कार्यक्रम बसवतात; हे टाळायला पाहिजे. या सध्याच्या ‘हलक्या फुलक्या’ मनोरंजनाबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे. या संदर्भात सतारवादक विदुर महाजन यांनी त्यांची प्रांजळ मते या लेखाद्वारे मांडली आहेत.

– अपर्णा महाजन

मी सतार वाजवतो. मी जेव्हा एखादी सांगीतिक रचना वाजवतो-म्हणतो, तेव्हा त्याला अर्थ असतो का? तर त्याला अर्थ नसतो. त्याला जे असते त्याला म्हणतात भावार्थ ! म्हणून, ‘ही पाण्याची बाटली आहे’ या वाक्याला जसा अर्थ आहे, जो कळतो, तसा ‘निरेग रे निरेसा’ या स्वरवाक्याला भावार्थ आहे. फरक असा आहे, की अर्थ कळतो, भावार्थ पोचतो.

सांगितिक रचनेतून पोचणारा भाव करुण असला तरी जेव्हा तो भावार्थाच्या स्वरूपात पोचतो, तेव्हा तो स्वाभाविकपणे सुंदर असू शकतो. म्हणूनच भावार्थाची अभिव्यक्ती सुंदर पद्धतीने करणे हे भारतीय रागसंगीताचे प्रयोजन आहे. मी संगीताचा एक विद्यार्थी म्हणून ह्या प्रयोजनाचा विचार करत आलो आहे. तो समजून घेऊन मांडण्याचा हा प्रयत्न.

भावार्थ पोचल्यामुळे माणसाच्या मनातील भावनेचा निचरा होतो आणि मन त्यामुळे काही प्रमाणात रिक्त होते. चांगल्या संगीताचा चांगला परिणाम मनावर होतो, जो आपण अनुभवतो. म्हणजे काय होते? एक अर्थ, हे संगीत श्रोत्यातल्या चांगुलपणाला साद घालते, आवाहन करते आणि श्रोते एकत्रितपणे चांगुलपणा अनुभवतात, तेव्हा, त्याचे प्रमाण अधिक असते. वारीत एकत्रित चालतानाच्या सहजपणाने ते घडते. समाजातला चांगुलपणा अशा रीतीने जागृत झाला तर अनेक प्रश्न सुटतील. आपण सारे कदाचित जाती-धर्माच्या पलीकडे मानवी अस्तित्वाचा विचार करून वागू. कारण चांगुलपणा जागृत होतो तेव्हा विवेकबुद्धी, सारासार विचार करण्याची क्षमता जागृत होते आणि काय चांगले-काय वाईट याचे प्रत्येकाला असलेले भान प्रखर होण्यास मदत होते. त्यामुळे ते सारे कृतीत बदलण्याची क्षमता आणि रूपांतरित होण्याची शक्यता वाढते असे मला वाटते.

आणखी काय होते? भावनेचा निचरा झाल्यामुळे मन स्वच्छ होते, नकारात्मकता निघून जाते आणि स्वच्छ प्रकाश पडल्यामुळे अंधार जावा व प्रसन्न वाटावे तसे काहीसे मनाच्या घरात घडते. त्याचा परिणाम विचारप्रक्रियेवर होतो आणि सकारात्मक विचार मनात येण्यास सुरुवात होते. ते काही मार्ग दाखवतात, दिशा देतात आणि श्रोत्याला पुढे नेतात. माणूस करत असलेल्या कोणत्याही कामावर- अभ्यास किंवा कोणतेही काम यावर- त्याचा परिणाम होतो; चांगला परिणाम होतो आणि तो ते काम अधिक उत्साहाने, उत्कटतेने करतो. तसे जेव्हा होते तेव्हा स्वाभाविकपणे काम केल्यावर थकवा येण्याऐवजी ऊर्जा मिळते आणि माणसाचे भावनिक/मानसिक/वैचारिक आरोग्य सुधारते.

आणखी काय होते? मी ज्या संगीताबद्दल बोलत आहे, ते काहीसे भाषेपलीकडचे स्वरसंगीत आहे. त्यातून एखादा राग उलगडण्याचा प्रयत्न केलेला असतो. तसे संगीत कानावर येऊन आदळणारे नसते, नसावे. त्यासाठी श्रोत्याला त्याचे अवधान, चित्त, कान द्यावे लागतात आणि तसे तो करतो तेव्हा स्वाभाविकपणे तो स्वत:ला एकाग्रतेच्या दिशेने नेतो आणि अभिव्यक्ती परिणामकारक असेल तर तो शांतावतो, काहीसा स्थिर होतो. कारण त्याचे चित्त एकवटलेले असते. त्यामुळे स्वाभाविकपणे इतर गोष्टी, विचार, भावना, उपलब्ध साधने यांचा त्याला विसर पडण्यास उपयोग होऊ शकतो. तेच ध्यानातून होणेही अभिप्रेत असते. काही काळ स्वतःला त्या अनुभवात ठेवल्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतो आणि भावनिक स्वास्थ्यावरही.

मनात एकूण प्रेमभाव निर्माण होण्यास त्या साऱ्याची मदत होते. ते प्रेम केवळ व्यक्तीवरचे नसते. श्रोत्याच्या मनात निर्माण होणारा तो भाव असतो, त्यामुळे असे प्रेम त्याच्या कामावर, भवतालावर, कोणत्याही चैतन्यस्वरूप अस्तित्वाविषयी मनात येते-यावे. अशी शक्ती ‘स्वर’ या माध्यमात आहे.

अर्थातच, फक्त रागसंगीत चांगले असे माझे म्हणणे नाही. जेव्हा सुगम किंवा भावसंगीत यांच्या संदर्भातही चांगले काव्य असलेले गाणे आणि त्याला दिलेली चाल, संगीत हे तोच परिणाम साधते- कदाचित आणखी सोपेपणाने ! पण भाषेची मर्यादा पडते इतकेच. तसेच, लोकसंगीतातही विचार आणि त्यातून प्रबोधन हाच उद्देश असतो. जसे चित्रपटाची कथा चांगली असेल तर चित्रपट परिणामकारक, तसेच शब्दसंगीतात काव्य, विचार यांचे आहे असे मला वाटते. तेव्हा संगीत हे श्रोत्याने निवडावे. जगणे चांगले करणे हा उद्देश असावा, इतकेच. निकष ज्याचे त्याचेच असणार की ! लावणीतला शृंगार, गझलमधला करुणार्त भाव, शृंगार किंवा अभंग- कीर्तनातील प्रबोधनपर विचार, भक्तिभाव, पोवाड्यातली वीरश्री हे सारे त्याच्या त्याच्या योग्य रूपात परिणामकारक निर्विवाद आहेच.

हल्ली, एकूण मनोरंजनाच्या कल्पना वेगवेगळ्या झाल्या आहेत. मनोरंजनाचा सातत्याने होणारा भडिमार आणि उपलब्ध साधनांमुळे होणारा प्रसार काहीसा विचार करायला लावणारा आहे. संगीताचा एक अभ्यासक म्हणून माझा प्रतिसाद या साऱ्याला कसा असावा? असा मी जेव्हा विचार करतो तेव्हा ‘काय मंडळी हसताय नं? हसायलाच हवं’! किंवा ‘टेन्शनवरची मात्रा’ …. असे जेव्हा उद्गार सातत्याने कानावर  येतात, तेव्हा ते सातत्य, प्रसार इतका असतो की चोखंदळ प्रेक्षकालाही वाटते, हसायलाच हवे. आणि मग कशामुळे हसू येते, याचा विचार बाजूला राहतो. एखाद्याच्या व्यंगावर, कपड्यांमुळे, शा‍ब्दिक करामतींमुळे, विचित्र हालचालींमुळे आणि विसंगतीच्या असुंदर अशा दर्शनाने लोक हसतात. एका कार्यक्रमात तर एका हास्यसम्राटाने तबला हे वाद्यच फोडले होते; आणि त्यावर सगळेजण हसले होते !

हास्य हे तेवढ्यापुरते असते- त्या क्षणापुरते ! त्याचा परिणामही तसाच ! चांगले  संगीत, साहित्य, विचार ऐकल्यानंतर काहीतरी गवसल्याचा होणारा आनंद, उत्कट अनुभवल्याचा आनंद, मनावरच्या चांगल्या परिणामाचा आनंद, एकूण साऱ्या जगण्याबद्दल काहीतरी चांगले वाटण्याचा आनंद, सकारात्मक विचारांतून कराव्याशा वाटणाऱ्या कृती, ते करण्यासाठी मिळालेली ऊर्जा, माणसाच्या चेहऱ्यावर गालावर समाधानाचे स्मित आणते. आणि तत्काळ व तात्पुरते हसण्यापेक्षा ते स्मित मला महत्त्वाचे वाटते. अशा प्रकारच्या रंजनाचा परिणाम अधिक महत्त्वाचा आहे आणि तो अधिक उपयोगी आहे, तुम्हा आम्हा साऱ्यांच्या जगणे सुंदर करण्याच्या प्रयत्नांकरता ! टेन्शनवरची मात्रा हसणे ही नाही. ती पळवाट आहे – तात्पुरता रस्ता. पण उत्तम मानसिक, भावनिक आणि वैचारिक आरोग्य आहे. तेव्हा हसू नका ! विचार करा, अंतर्मुख व्हा ! आणि अशा सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटू दे एखादी तरी स्मितरेषा !

– विदुर महाजन 9822559775 vidurmahajan@gmail.com

About Post Author

Previous articleगंधगान (Whispers on the Wind !)
Next articleमंगेश मुंबईकर घोगरे (Mangesh Mumbaikar Ghogre)
Member for 12 years विदुर महाजन यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. ते एम ए ला विद्यापीठात प्रथम आले. त्यानंतर त्यांनी स्लिंग फ्लेक्सी कार्टन प्रायव्हेट लिमिटेड या घरच्या व्यवसायात पंचवीस वर्षे व्यवसाय केला. भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेल्या त्यांच्या कृतीला "Red and White Bravery award' मिळाले. त्यांनी 2008 पासून पूर्णवेळ सतार असा मार्ग स्वीकारला. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम आणि खेडोपाडी सतार, सतारीच्या माध्यमातून ध्यानधारणा, व्यसनापासून व्यासंगाकडे, सतार आणि 'टकमन'चे नेतृत्व बा प्रणालीवर आधारित विविध प्रकल्पांसाठी देशात आणि देशाबाहेर सुमारे आठशे कार्यक्रम केले. ते लेखक असून त्यांची 'मैत्र जीवाचे', 'शोधयात्रा', 'आनंदयात्रा', ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना नामांकित राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांचे 'ग्रीष्म', 'र' ('स्व'च्या शोधात), गांधार पंचम असे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी हार्मनी स्कूल ऑफ सितार या नावाने सतारीची शाळा 2006 मध्ये सुरू केली.

5 COMMENTS

  1. सुंदर लेख…खरोखर संगीत विलक्षण गुणकारी असतं. आनंददायी असतं.

  2. चांगले संगीत माणसांना जाती धर्माच्या पल्याड नेते, निराश मनाना उभारी देते, निख्खळ आनंद देते हे हळुवारपणे सांगणारा हा लेख मनाला भावला.

  3. भारतीय शास्त्रीय संगीतामधे खरंच विशेष शक्ती आहे. वर्षानुवर्ष संगीत साधना करणारे मग ती अगदी श्रवण साधनाही असो त्या व्यक्ती विशेष शांती धारण करतात असा अनुभव येतो. तुमची मनोवृत्ती पालटविण्याची शक्ती असलेले आपले शास्त्रीय संगीत ही अखिल विश्वाला उपहार स्वरूप आहे. विदुर सरांनी हे फार सुंदर शब्दात व्यक्त केलं आहे. आवडला लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here