पंकजा मुंडे वडिलांचा उल्लेख मुंडेसाहेब असा करतात, सुप्रिया सुळेही वडिलांचा उल्लेख तसाच साहेब म्हणून करतात, राजकीय नेते एकमेकांना विधानसभेत साहेब म्हणतात व कार्यकर्तेही त्यांच्या नेत्यांना साहेब म्हणतात. हे नवीनच विचित्र नाव पुढे आले आहे. लोक पूर्वी नोकरीतील अधिकाऱ्याला साहेब म्हणत व राजकीय नेत्यांना प्रेमाने भाऊ, दादा, काका, अण्णा, तात्या म्हणत; किंवा त्यांना राव लावून हाक मारली जात असे. यशवंतराव, वसंतदादा ही नावे त्यातून आली. त्यातून त्यांचा लोकांप्रती व लोकांचा त्यांच्या प्रती जिव्हाळा दिसतो. पण राजकारणाचे व्यावसायिकरण गेल्या तीन-चार दशकांत झाले, तसे कार्यकर्ते व नेता हे नाते बदलत गेले. खरे तर, लोकांनी अधिकाऱ्यांनाही लोकशाहीत साहेब म्हणू नये. पूर्वी ज्येष्ठ नेते तर अधिकारी सचिव यांना नावाने हाक मारत, पण हळूहळू नेत्यांचे त्यांच्या हितसंबंधांसाठी नोकरशाहीपुढे झुकणे सुरू झाले व गावपुढारी ते आमदार नोकरशाहीतील अधिकाऱ्यांना साहेब म्हणू लागले व कार्यकर्तेही नेत्याला साहेब म्हणू लागले. नेत्यांनाही ते आवडते पण लोकप्रतिनिधी हा साहेब कसा असू शकतो हा प्रश्न मात्र कोणालाच पडत नाही. त्यातून सुप्रिया आणि पंकजा या वडिलांच्या प्रेमाच्या नात्याचा उल्लेख साहेब करू लागल्या.
– हेरंब कुलकर्णी 8208589195 herambkulkarni1971@gmail.com
———————————————————————————————
तृप्ती अंधारे – इंग्रजांची गुलामी करण्याची… त्यांच्यासारखेच कट कारस्थान करण्याची… जो आपल्याविरुद्ध बोलेल त्याला ठेचून काढण्याची सवय मागे राहिल्याने… थोडक्यात इंग्रजांनी फेकलेलेच उचलायची… त्यावर मोठं होण्याची आणि जगण्याची सवय यामुळे हे साहेब बिरूद मागे उरले असावे.
अद्वैत मेहता – साहेब हे इंग्रज काळात आले असावे … इंग्रजांना म्हणायचे, गोरा साहेब…. इंग्रज गेले, गोरे गेले पण साहेब ही संज्ञा राहिली. ती नुसती पदवी नाही, नावही असतं साहेब !
साहेबराव पाटील डोणगावकर, साहेबराव देशमुख, साहेब कोकणे… हिंदीत गाणं आहे- ‘सुन साहिबा सुन…’ नेपाळी गुरखे पण बोलतात, ‘साबजी’, ‘जी साबजी’. साहेब ही एक प्रवृत्ती किंवा संस्कृती आहे. साहेबी थाट.
नितीन अर्जुन खंडाळे – मूळात साहेब हा शब्द फारसी ‘साहिब’पासून आला आहे. खानसाहेब, साहेब ए आलम वगैरे मुघल काळापासून आहे.
अनिल उडवंत – सुप्रिया आणि पंकजा यांनी आपल्या वडिलांना सार्वजनिक कार्यक्रमात ‘साहेब’ म्हणणे हा मार्केटिंगचा भाग आहे. आपण आपल्या माणसाला मोठेपण दिले की इतर लोकही तसेच मोठेपण देऊ लागतात. बाकी साहेब हा मराठी शब्द नाही. सहा आएब (दोष) असलेला तो ‘साहेब’ असा अर्थ सांगितला जातो. पण साहेबला इंग्रजी पर्याय म्हणून वापरला जाणारा ‘सर’ हा इंग्रजी शब्द सर्वांनाच भावतो. त्यामुळे मराठीत ‘साहेब’ आवडत असावा.
———————————————————————————————-